व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा १०९

पेत्र कर्नेल्याला भेट देतो

पेत्र कर्नेल्याला भेट देतो

तिथे उभा असलेला माणूस आहे प्रेषित पेत्र, आणि त्याच्या पाठीमागे असलेले त्याचे काही मित्र आहेत. पण हा माणूस पेत्राच्या पाया का पडतो आहे? त्यानं असं करावं का? तो कोण आहे, ते तुम्हाला माहीत आहे का?

हा माणूस आहे कर्नेल्य. तो रोमन सैन्यातला एक अधिकारी आहे. कर्नेल्य पेत्राला ओळखत नाही. पण पेत्राला आपल्या घरी येण्याचं निमंत्रण देण्याबद्दल त्याला सांगितलं गेलं. हे कसं झालं, ते पाहू या.

येशूचे पहिले अनुयायी यहूदी होते. पण कर्नेल्य यहूदी नव्हे. तरी त्याचं देवावर प्रेम आहे, तो देवाला प्रार्थना करतो, आणि लोकांसाठी बऱ्‍याच दयाळू गोष्टी करतो. एका दिवशी दुपारी, एक देवदूत त्याच्यापुढे प्रकट होऊन म्हणतो: ‘देव तुझ्यावर प्रसन्‍न आहे. आणि तो तुझ्या प्रार्थनेला उत्तर देणार आहे. पेत्र नावाच्या एका माणसाला बोलावण्यासाठी माणसं पाठव. यापोमध्ये, समुद्रापाशी राहाणाऱ्‍या, शिमोन नावाच्या माणसाच्या घरी तो राहातो आहे.’

तात्काळ कर्नेल्य पेत्राचा शोध घेण्यासाठी माणसं रवाना करतो. दुसऱ्‍या दिवशी, ती माणसं यापोजवळ येत असताना, पेत्र शिमोनाच्या घराच्या धाब्यावर असतो. तिथे, एक मोठं कापड स्वर्गातून उतरताना आपण पाहातो आहोत, असं देव पेत्राला भासवतो. त्या कापडात सर्व प्रकारचे प्राणी आहेत. देवाच्या नियमाप्रमाणे, हे प्राणी खाण्यासाठी अशुद्ध होते. तरीही एक आवाज म्हणतो: ‘पेत्रा, ऊठ. मारून खा.’

पेत्र म्हणतो: ‘छे! अशुद्ध गोष्टी मी कधीही खाल्या नाहीत.’ परंतु तो आवाज पेत्राला सांगतो: ‘देव आता ज्याला शुद्ध म्हणतो आहे, त्याला अशुद्ध म्हणू नकोस.’ असं तीनदा होतं. या सर्वाचा अर्थ काय असावा, असा विचार पेत्र करत असताना, कर्नेल्यानं पाठवलेली माणसं त्या घरापाशी येऊन पेत्राची चौकशी करतात.

जिना उतरून पेत्र म्हणतो: ‘तुम्ही ज्याला शोधता आहात, तो मीच. तुम्ही का आला आहात?’ एका देवदूतानं पेत्राला आपल्या घरी बोलवायला कर्नेल्याला सांगितलं, असा खुलासा ती माणसं करतात. तेव्हा, पेत्र त्यांच्याबरोबर जायला तयार होतो. दुसऱ्‍या दिवशी, पेत्र आणि त्याचे मित्र कैसरियात कर्नेल्याला भेटण्यासाठी निघतात.

कर्नेल्यानं त्याचे नातेवाईक आणि जिवलग मित्र गोळा केले आहेत. पेत्र येतो तेव्हा, कर्नेल्य त्याला भेटतो. आणि तुम्हाला इथे दिसतो तसा खाली वाकून तो पेत्राच्या पाया पडतो. परंतु पेत्र म्हणतो: ‘ऊठ. मी केवळ एक माणूसच आहे.’ होय, पाया पडून एखाद्या माणसाची उपासना करणं चूक आहे, असं बायबल दाखवतं. आपण फक्‍त यहोवाची उपासना केली पाहिजे.

आता पेत्र तिथे जमलेल्या लोकांना उपदेश करतो. तो म्हणतो: ‘देवाची सेवा करण्याची इच्छा असलेले सर्व लोक त्याला मान्य आहेत, हे मला दिसतं आहे.’ पेत्र बोलत असतानाच, देव त्याचा पवित्र आत्मा पाठवतो, आणि ते लोक वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलायला लागतात. फक्‍त यहूद्यांवर देवाची कृपा आहे, अशी त्यांची कल्पना असल्यामुळे, पेत्राबरोबर आलेल्या यहूदी शिष्यांना आश्‍चर्य वाटतं. तेव्हा यावरून, देव एका वंशाच्या लोकांना दुसऱ्‍या कोणत्याही वंशाच्या लोकांपेक्षा अधिक चांगले किंवा अधिक महत्त्वाचे मानत नाही, ही गोष्ट ते शिकतात. आपण सर्वांनी लक्षात ठेवण्यासारखी, ही एक चांगली गोष्ट नाही का?