व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा १०३

बंद खोलीच्या आत

बंद खोलीच्या आत

पेत्र आणि योहान, येशूचं शरीर ठेवलं होतं ती कबर सोडून गेल्यावर, मरीया तिथे एकटी राहाते. ती रडायला लागते. मग, आपण मागच्या चित्रात पाहिल्याप्रमाणे, ती वाकून कबरेच्या आत पाहाते. तिथे तिला दोन देवदूत दिसतात! ते तिला विचारतात: ‘तू का रडते आहेस?’

मरीया उत्तरते: ‘त्यांनी माझ्या प्रभूला नेलं, आणि कोठे ठेवलं, ते मला ठाऊक नाही.’ मग ती मागे वळते, तेव्हा तिला एक माणूस दिसतो. तो तिला विचारतो: ‘तू कोणाला शोधते आहेस?’

मरीयेला वाटतं की, तो माळी आहे, आणि त्यानं येशूचं शरीर नेलं असावं. म्हणून ती म्हणते: ‘तू त्याला नेलं असलंस तर, कोठे ठेवलं आहेस, ते मला सांग.’ पण खरं तर, हा माणूस आहे येशू. मरीयेला ओळखू येत नाही, असं शरीर त्यानं धारण केलं आहे. परंतु, तो तिला नावानं हाक मारतो तेव्हा, तिला कळतं की, हा येशूच आहे. धावत जाऊन, ती शिष्यांना सांगते: ‘मी प्रभूला पाहिलं आहे!’

पुढे त्या दिवशी, दोन शिष्य अम्माऊस गावाला जात असताना, एक माणूस त्यांना येऊन मिळतो. येशू मारला गेला असल्यानं, शिष्य फार उदास झाले आहेत. पण ते चालत असताना, तो माणूस त्यांना पवित्र शास्त्रातल्या अनेक गोष्टी समजावून सांगतो. त्यामुळे त्यांना दिलासा मिळतो. शेवटी, ते जेवणासाठी थांबतात त्या वेळी, हा माणूस येशू असल्याची ओळख त्या शिष्यांना पटते. तेव्हा येशू अदृश्‍य होतो; व प्रेषितांना त्याच्याबद्दल सांगण्यासाठी, हे दोघे शिष्य लगबगीने जेरूसलेमला माघारे जातात.

हे होत असतानाच, येशू पेत्रालाही दर्शन देतो. त्याबद्दल ऐकल्यावर इतर उत्तेजित होतात. मग, हे दोघे शिष्य जेरूसलेमला पोहंचतात व प्रेषितांचा शोध घेतात. वाटेत येशूनं त्यांनाही कसं दर्शन दिलं, याबद्दल ते त्यांना सांगतात. आणि ते सांगत असतानाच घडणारी आश्‍चर्यजनक गोष्ट तुम्हाला माहीत आहे का?

या चित्राकडे पहा. दरवाजे बंद असले तरी, येशू त्या खोलीत प्रकट होतो. शिष्यांना खूप आनंद होतो! हा दिवस अत्यंत रोमांचकारी नाही का? येशूनं आपल्या शिष्यांना किती वेळा दर्शन दिलं, ते तुम्हाला मोजता येतं का? पाचदा ना?

येशू दर्शन देतो तेव्हा, प्रेषित थोमा त्यांच्या बरोबर नसतो. त्यामुळे शिष्य त्याला सांगतात: ‘आम्ही प्रभूला पाहिलं आहे!’ पण थोमा म्हणतो की, स्वत: येशूला पाहिल्यावरच तो त्यावर विश्‍वास ठेवील. आठ दिवसांनी, एका बंद खोलीत शिष्य पुन्हा एकत्र जमले आहेत आणि या वेळी थोमा त्यांच्या बरोबर आहे. अचानक, त्या खोलीत येशू प्रकट होतो. आता मात्र थोमा विश्‍वास ठेवतो.