व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा १०४

येशू स्वर्गाला परत जातो

येशू स्वर्गाला परत जातो

जसजसे दिवस जातात, तसा येशू आपल्या अनुयायांना अनेकदा दर्शन देतो. एकदा, जवळपास ५०० शिष्य त्याला पाहतात. येशू त्यांना दर्शन देतो तेव्हा, तो त्यांच्याशी कशाबद्दल बोलतो, ते तुम्हाला ठाऊक आहे का? देवाच्या राज्याबद्दल. यहोवानं येशूला त्या राज्याबद्दल शिकवण्यासाठी पाठवलं. मृतातून उठवल्यानंतरही, तो हेच करत राहतो.

देवाचं राज्य म्हणजे काय, ते तुम्हाला आठवतं का? होय, ते राज्य म्हणजे, स्वर्गातलं देवाचं खरोखरचं शासन, आणि देवानं राजा म्हणून निवडलं आहे, ते येशूला. आपण मागे पाहिल्याप्रमाणे, भुकेलेल्यांना जेवू घालून, आजाऱ्‍यांना बरं करून, आणि मृतांनाही उठवून, तो किती अद्‌भुत राजा होईल, ते येशूने दाखवलं.

त्यामुळे, येशू स्वर्गातला राजा म्हणून हजार वर्षं शासन करील तेव्हा, पृथ्वीवर कशी परिस्थिती असेल? बरोबर, सर्व पृथ्वीला सुंदर परादीस केलं जाईल. युद्ध, गुन्हे, आजारपण अथवा मृत्यूही राहणार नाही. हे खरं असल्याचं आपल्याला माहीत आहे, कारण लोकांना आनंद लुटता यावा म्हणून देवानं पृथ्वीला परादीस व्हावी अशी बनवली. त्याच कारणानं, सुरवातीला त्यानं एदेन बाग बनवली. आणि देवाला जे करून हवं आहे, ते अखेरीस केलं जाईल, याकडे येशू लक्ष देईल.

आता येशूची स्वर्गाला परत जायची वेळ येते. ४० दिवस तो आपल्या शिष्यांना दर्शन देत असल्यामुळे, तो जिवंत असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे. परंतु शिष्यांना सोडून जाण्यापूर्वी, तो त्यांना सांगतो: ‘तुम्हाला पवित्र आत्मा मिळेपर्यंत जेरूसलेममध्येच राहा.’ पवित्र आत्मा, ही वाहत्या वाऱ्‍यासारखी देवाची सक्रिय शक्‍ती आहे. ती त्याच्या अनुयायांना देवाची इच्छा करण्यात मदत करील. शेवटी येशू म्हणतो: ‘पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्हाला माझ्याबद्दल प्रचार करायचा आहे.’

येशूनं असं म्हटल्यानंतर, एक आश्‍चर्यजनक गोष्ट घडते. इथे तुम्हाला दिसतो तसा, तो स्वर्गाला वर वर जायला लागतो. मग एका ढगानं तो त्यांच्या दृष्टिआड होतो, आणि शिष्यांना पुन्हा कधी दिसत नाही. येशू स्वर्गाला जातो, आणि तिथून पृथ्वीवरच्या त्याच्या अनुयायांवर शासन करायला लागतो.