व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा १०७

स्तेफनाला दगडमार होतो

स्तेफनाला दगडमार होतो

इथे गुडघे टेकलेला माणूस स्तेफन आहे. तो येशूचा एक प्रामाणिक शिष्य आहे. पण त्याला काय होत आहे, पाहा! हे लोक त्याला मोठे दगड मारताहेत. त्यांनी अशी गोष्ट करावी, इतका त्यांना स्तेफनाचा तिटकारा का आला आहे? चला, पाहू या.

अद्‌भुत चमत्कार करायला देव स्तेफनाला मदत करत आला आहे. ही गोष्ट या लोकांना आवडत नाही; आणि त्यामुळे, त्यानं लोकांना दिलेल्या सत्याच्या शिकवणीबद्दल ते त्याच्याशी वाद घालायला लागतात. पण देव स्तेफनाला मोठी बुद्धी देतो, आणि हे लोक खोट्या गोष्टी शिकवत असल्याचं स्तेफन सिद्ध करतो. या गोष्टीनं ते आणखीनच संतापतात. म्हणून ते त्याला धरतात, व त्याच्याबद्दल खोटंनाटं सांगण्यासाठी माणसं आणतात.

महायाजक स्तेफनाला विचारतो: ‘या गोष्टी खऱ्‍या आहेत का?’ बायबलवर आधारलेल्या उत्तम भाषणानं स्तेफन त्याचं उत्तर देतो. शेवटी, पूर्वीच्या काळी दुष्ट लोकांनी यहोवाच्या संदेष्ट्यांचा कसा द्वेष केला, हे तो सांगतो. मग तो म्हणतो: ‘तुम्हीही त्यांच्यासारखेच आहात. तुम्ही, देवाचा सेवक असलेल्या येशूचा जीव घेतलात, आणि देवाचे नियम पाळले नाहीत.’

त्यामुळे धार्मिक नेते अत्यंत चिडतात! संतापाने ते दातओठ खातात. परंतु डोकं वर करून स्तेफन म्हणतो: ‘पाहा! स्वर्गामध्ये येशू देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसतो आहे.’ तेव्हा, कानावर हात ठेवून ते लोक स्तेफनावर धावून जातात. त्याला धरून ते शहराबाहेर खेचून नेतात.

इथे ते आपले कपडे काढून शौल नावाच्या माणसाच्या हवाली करतात. तुम्हाला शौल दिसतो का? मग काही लोक स्तेफनाला दगड मारायला लागतात. तुम्हाला दिसतो तसा, स्तेफन गुडघे टेकतो, व देवाची प्रार्थना करतो: ‘यहोवा, या दुष्टपणासाठी त्यांना शिक्षा करू नकोस.’ कारण, धार्मिक नेत्यांनी त्यातल्या काहींना फसवलं असल्याचं त्याला माहीत आहे. त्यानंतर स्तेफन मरण पावतो.

जेव्हा कोणी तुमचं वाईट करतो, तेव्हा तुम्ही त्याला दुखवता का, किंवा त्याला दुखवण्याची विनंती देवाला करता का? स्तेफनानं किंवा येशूनं असं केलं नाही. जे त्यांच्याशी दुष्टपणानं वागले, त्यांच्याशीही ते चांगुलपणानं वागले. आपण त्यांचं उदाहरण गिरवण्याचा प्रयत्न करू या.