व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय पंधरा

देवाला मान्य असलेली उपासना

देवाला मान्य असलेली उपासना
  • सर्व धर्मांना देवाची मान्यता आहे का?

  • खरा धर्म आपण कसा ओळखू शकतो?

  • आज पृथ्वीवर देवाचे खरे उपासक कोण आहेत?

१. उचित मार्गाने आपण देवाची उपासना केली तर आपल्याला कोणता फायदा मिळेल?

यहोवा देवाला आपली मनापासून काळजी आहे आणि त्याच्या प्रेमळ मार्गदर्शनाचा आपल्याला फायदा व्हावा अशी त्याची इच्छा आहे. उचित मार्गाने आपण त्याची उपासना केली तर आपण आनंदी होऊ आणि जीवनातील अनेक समस्या टाळू. आपल्यावर देवाचा आशीर्वाद राहील आणि आपल्याला त्याचे साहाय्य मिळेल. (यशया ४८:१७) परंतु, देवाविषयीचे सत्य शिकवण्याचा दावा करणारे हजारो धर्म आहेत. तरीपण, देव कोण आहे आणि तो आपल्याकडून काय अपेक्षा करतो या शिकवणुकींच्या बाबतीत पुष्कळ तफावती आहेत.

२. उचित मार्गाने यहोवाची उपासना करण्यास आपण कसे शिकू शकतो, आणि हे समजण्यासाठी कोणते उदाहरण आहे?

यहोवाची उपासना करण्याचा उचित मार्ग कोणता आहे, हे तुम्हाला कसे माहीत होऊ शकेल? यासाठी तुम्हाला अनेक धर्मांच्या शिकवणुकींचा अभ्यास करण्याची, त्यांची एकमेकांशी तुलना करण्याची गरज नाही. तुम्हाला केवळ खऱ्या उपासनेविषयी बायबल नेमके काय शिकवते ते शिकून घ्यावे लागेल. उदाहरणार्थ: अनेक देशांत बनावटी नोटांची समस्या आहे. तुम्हाला जर अशा बनावटी नोटा शोधून काढण्याचे काम दिले तर तुम्ही ते कसे कराल? प्रत्येक बनावट नोट कशी दिसते हे जाणून घेण्याचा तुम्ही प्रयत्न कराल का? नाही. त्यापेक्षा तुम्ही खऱ्या नोटेचे जवळून परीक्षण करून आपला वेळ वाचवाल. एकदा का तुम्हाला खरी नोट कशी दिसते हे समजले की तुम्हाला लगेच बनावटी नोट ओळखता येईल. तसेच, खरा धर्म कसा ओळखायचा हे शिकल्यावर आपण इतर धर्म खोटे आहेत हे ओळखू शकू.

३. येशूने सांगितल्याप्रमाणे, देवाची स्वीकृती हवी असेल तर आपण काय केले पाहिजे?

यहोवाला मान्य असलेल्या मार्गानेच त्याची उपासना करणे महत्त्वाचे आहे. पुष्कळ लोकांचा असा विश्वास आहे, की सर्व धर्मांना देवाची मान्यता आहे; परंतु बायबल असे शिकवत नाही. शिवाय, फक्त ख्रिस्ती असण्याचा दावा करणेही पुरेसे नाही. येशूने म्हटले: “मला प्रभुजी, प्रभुजी, असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल.” तेव्हा, देवाची स्वीकृती प्राप्त करण्यासाठी आपण, देव आपल्याकडून काय अपेक्षा करतो हे शिकून घेतले पाहिजे व त्याच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. जे देवाच्या इच्छेप्रमाणे वागत नाहीत अशा लोकांना येशूने “अनाचार करणाऱ्यांनो” म्हटले. (मत्तय ७:२१-२३) बनावटी नोटांप्रमाणे, खोट्या धर्माला काही किंमत नाही. इतकेच नव्हे तर असा धर्म हानीकारकही आहे.

४. दोन दरवाजांविषयी येशूने जे सांगितले त्याचा काय अर्थ होतो आणि प्रत्येक मार्ग कोठे जातो?

यहोवा पृथ्वीवरील प्रत्येकाला सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याची संधी देत आहे. परंतु परादीसमधील सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी आपण उचित मार्गाने देवाची उपासना केली पाहिजे आणि त्याला मान्य असलेल्या मार्गाने जीवन जगले पाहिजे. परंतु दुःखाची गोष्ट म्हणजे पुष्कळ लोक असे करण्यास नकार देतात. त्यामुळे येशूने म्हटले: “अरुंद दरवाजाने आत जा; कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत; परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकोचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत.” (मत्तय ७:१३, १४) खरा धर्म सार्वकालिक जीवनाकडे जातो. खोटा धर्म नाशाकडे जातो. कोणाही मानवाचा नाश होऊ नये अशी यहोवाची इच्छा आहे त्यामुळेच तो सर्व लोकांना त्याच्याविषयी शिकून घेण्याची संधी देत आहे. (२ पेत्र ३:९) तेव्हा, आपण देवाची ज्या पद्धतीने उपासना करतो त्यावर आपल्याला जीवन मिळेल की मृत्यू हे अवलंबून आहे.

खरा धर्म कसा ओळखायचा

५. खरा धर्म आचरणाऱ्यांना आपण कसे ओळखू शकतो?

“जीवनाकडे जाण्याचा दरवाजा” कसा शोधता येईल? येशूने म्हटले, की जे लोक खरा धर्म आचरतात त्यांच्या जीवनावरून तो ओळखता येईल. तो म्हणाला: “त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल. . . . प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते.” (मत्तय ७:१६, १७) दुसऱ्या शब्दांत, खरा धर्म आचरणाऱ्यांना त्यांच्या विश्वासांवरून व त्यांच्या वर्तनावरून ओळखता येईल. खरे उपासक परिपूर्ण नाहीत व तेही चुका करतात तरी समूह या नात्याने ते देवाची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. खऱ्या धर्माचे आचरण करणाऱ्यांना ओळखण्याची सहा चिन्हे आहेत ज्यांची आपण चर्चा करू या.

६, ७. देवाच्या सेवकांचा बायबलविषयी काय दृष्टिकोन आहे, आणि याबाबतीत येशूने कोणते उदाहरण मांडले?

देवाचे सेवक बायबलवर आधारित शिकवण देतात. बायबल स्वतः म्हणते: “संपूर्ण शास्त्रलेख देवाने प्रेरलेला आहे, आणि तो शिक्षण, निषेध, सुधारणूक, न्यायीपणाचे शिकवणे, यांकरिता उपयोगी आहे, यासाठी की देवाचा माणूस पूर्ण व प्रत्येक चांगल्या कामास सज्ज व्हावा.” (२ तीमथ्य ३:१६, १७, पं.र.भा.) प्रेषित पौलाने सहख्रिश्चनांना असे लिहिले: “तुम्ही आम्हापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले ते माणसांचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले.” (१ थेस्सलनीकाकर २:१३) यास्तव, खऱ्या धर्माचे विश्वास आणि प्रथा मानव दृष्टिकोनावर किंवा परंपरेवर आधारित नाहीत. ते देवाचे प्रेरित वचन बायबल यांवर आधारित आहेत.

येशू ख्रिस्ताने देवाच्या वचनाच्या आधारावर शिकवण देऊन आपल्यासाठी एक उत्तम उदाहरण मांडले. आपल्या स्वर्गीय पित्याला प्रार्थना करताना तो म्हणाला: “तुझे वचन हेच सत्य आहे.” (योहान १७:१७) येशूचा देवाच्या वचनावर विश्वास होता आणि त्याने जे काही शिकवले ते शास्त्रवचनांच्या सामंजस्यात होते. येशू नेहमी म्हणायचा: “असा शास्त्रलेख आहे.” (मत्तय ४:४, ७, १०) मग येशू एखाद्या शास्त्रवचनाचा उल्लेख करायचा. तसेच, आज देवाचे लोक आपल्या मनच्या गोष्टी शिकवत नाहीत. बायबल हे देवाचे वचन आहे असा त्यांचा विश्वास आहे व ते बायबलच्या आधारावरच शिकवण देतात.

८. यहोवाची उपासना करण्यामध्ये काय गोवलेले आहे?

खऱ्या धर्माचे आचरण करणारे केवळ यहोवाची उपासना करतात आणि त्याचे नाव जाहीर करतात. येशूने असे म्हटले: “प्रभू [“यहोवा”] तुझा देव याला नमन कर व केवळ त्याचीच सेवा कर.” (मत्तय ४:​१०, पं.र.भा., समास) म्हणून देवाचे सेवक यहोवा व्यतिरिक्त इतर कोणाचीही उपासना करत नाहीत. या उपासनेत, इतरांनाही खऱ्या देवाचे नाव सांगणे, तो कसा आहे हे सांगणे समाविष्ट आहे. स्तोत्र ८३:१८ [पं.र.भा.] म्हणते: “ज्या तुझे नाव यहोवा असे आहे तो तूच मात्र अवघ्या पृथ्वीवर परात्पर आहेस.” लोकांना देवाबद्दलची माहिती देण्याच्या बाबतीत येशूने एक कित्ता घातला; त्याने प्रार्थनेत असे म्हटले: “जे लोक तू मला जगातून दिले त्यांना मी तुझे नाव प्रगट केले.” (योहान १७:६) तसेच, खरे उपासक आज इतरांना देवाचे नाव, त्याचे उद्देश, त्याचे गुण यांबद्दलची शिकवण देतात.

९, १०. खरे ख्रिस्ती कोणकोणत्या मार्गांनी एकमेकांबद्दल प्रेम दाखवतात?

देवाचे लोक एकमेकांना खरे, निःस्वार्थ प्रेम दाखवतात. येशूने म्हटले: “तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहान १३:३५) आरंभीच्या ख्रिश्चनांना एकमेकांवर असे प्रेम होते. आपल्यामध्ये ज्याप्रकारचे प्रेम असले पाहिजे असे देव म्हणतो त्या प्रेमाला, वांशिक, सामाजिक व राष्ट्रीय अडखळणे ठाऊक नाहीत; हे प्रेम लोकांना एकत्र आणते व त्यांच्यात खऱ्या बंधूसमाजाचे अतूट नाते तयार होते. (कलस्सैकर ३:१४) खोट्या धर्माच्या लोकांमध्ये अशाप्रकारचे बंधूप्रेम पाहायला मिळत नाही. हे आपल्याला कसे माहीत? राष्ट्रीय किंवा वांशिक भेदामुळे ते एकमेकांची कत्तल करतात. खरे ख्रिस्ती आपल्या ख्रिस्ती बांधवाची किंवा इतर कोणाचीही कत्तल करण्यासाठी शस्त्रे हातात घेत नाहीत. बायबल म्हणते: “देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतीने वागत नाही तो देवाचा नाही, व जो आपल्या बंधूवर प्रीति करीत नाही तोहि नाही. . . . आपण एकमेकांवर प्रीति करावी; काईन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला त्याच्यासारखे आपण नसावे.”​—१ योहान ३:१०-१२; ४:२०, २१.

१० अर्थात, केवळ इतरांची कत्तल न करणे म्हणजे खरे प्रेम नव्हे. खरे ख्रिस्ती एकमेकांना मदत करण्याकरता, उत्तेजन देण्याकरता निःस्वार्थीपणे आपला वेळ, शक्ती, पैसा खर्च करतात. (इब्री लोकांस १०:​२४, २५) संकटात असताना ते एकमेकांना मदत करतात आणि इतरांशी प्रामाणिकतेने वागतात. ‘आपण सर्वांचे बरे करावे’ हा बायबलमधील सल्ला ते लागू करतात.​—गलतीकर ६:१०.

११. तारण मिळण्यासाठी देवाने येशूची व्यवस्था केली आहे, असा विश्वास करणे महत्त्वाचे का आहे?

११ तारण मिळण्यासाठी देवाने येशूची व्यवस्था केली आहे, हे खरे ख्रिस्ती मान्य करतात. बायबल म्हणते: “तारण दुसऱ्या कोणाकडून नाही; कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेहि नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही.” (प्रेषितांची कृत्ये ४:१२) आपण पाचव्या अध्यायात पाहिले, की येशूने आज्ञाधारक मानवांसाठी आपले जीवन खंडणी म्हणून अर्पण केले. (मत्तय २०:२८) शिवाय, येशू हा देवाच्या स्वर्गीय राज्याचा नियुक्त राजा आहे. हे राज्य संपूर्ण पृथ्वीवर राज्य करणार आहे. आपल्याला सार्वकालिक जीवन हवे असेल तर आपण येशूचे म्हणणे ऐकले पाहिजे आणि त्याच्या शिकवणुकींनुसार जगले पाहिजे, अशी देव अपेक्षा करतो. म्हणूनच तर बायबल म्हणते: “जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही.”​—योहान ३:३६.

१२. जगाचा भाग न होण्यामध्ये काय गोवलेले आहे?

१२ खरे ख्रिस्ती जगाचा भाग नाहीत. रोमी शासक पिलात याच्यासमोर उलटतपासणी होत असताना येशू म्हणाला होता: “माझे राज्य ह्या जगाचे नाही.” (योहान १८:३६) येशूचे खरे शिष्य कोणत्याही देशात राहत असले तरी, ते त्याच्या स्वर्गीय राज्याची प्रजा आहेत व त्यामुळे ते जगाच्या राजनैतिक गोष्टींच्याबाबतीत पूर्णपणे तटस्थ राहतात. ते युद्धात भाग घेत नाहीत. पण इतरजण जेव्हा, एखाद्या राजकीय पक्षात सामील होण्याची, राजकारणात उतरण्याची किंवा मतदान करण्याची निवड करतात तेव्हा यहोवाचे साक्षीदार ढवळाढवळ करत नाहीत. देवाचे खरे उपासक राजनैतिक गोष्टींबाबत तटस्थ असले तरी ते कायद्याचे पालन करणारे आहेत. असे का? कारण देवाचे वचन त्यांना सरकारी “वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन” राहण्याची आज्ञा देते. (रोमकर १३:१) देव जे अपेक्षितो आणि राजनैतिक व्यवस्था जे अपेक्षिते या गोष्टी परस्परविरोधी असतात तेव्हा खरे उपासक प्रेषितांच्या उदाहरणाचे पालन करतात; प्रेषितांनी म्हटले होते: “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.”​—प्रेषितांची कृत्ये ५:२९; मार्क १२:१७.

१३. येशूच्या खऱ्या शिष्यांचा देवाच्या राज्याविषयी काय दृष्टिकोन आहे आणि त्यामुळे ते काय करतात?

१३ देवाचे राज्य मानवजातीसाठी एकमात्र आशा आहे, असा प्रचार येशूचे खरे अनुयायी करतात. येशूने भाकीत केले होते: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:१४) आपल्या समस्या सोडवण्यासाठी मानवी शासकांकडे पाहण्याचे उत्तेजन देण्याऐवजी येशू ख्रिस्ताचे खरे अनुयायी, देवाचे राज्य मानवजातीसाठी एकमात्र आशा आहे, अशी घोषणा करतात. (स्तोत्र १४६:३) या परिपूर्ण सरकारासाठी येशूने आपल्याला अशाप्रकारे प्रार्थना करायला शिकवले: “तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो.” (मत्तय ६:१०) हे स्वर्गीय राज्य “सर्व राज्यांचे [सध्या अस्तित्वात असलेले] चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल,” असे देवाच्या वचनात भाकीत करण्यात आले आहे.​—दानीएल २:४४.

१४. तुमच्या मते कोणता धर्म, खऱ्या उपासनेसाठी असलेल्या सर्व अपेक्षा पूर्ण करतो?

१४ आपण आत्ताच ज्या मुद्द्‌यांची चर्चा केली त्यांच्या आधारावर पुढील प्रश्न स्वतःला विचारा: ‘कोणता धार्मिक गट, बायबलच्या आधारावर शिकवण देतो आणि यहोवाचे नाव प्रकट करतो? कोणता गट, यहोवाने शिकवलेल्या पद्धतीने प्रेम दाखवतो, येशूवर विश्वास ठेवतो, जगाचा भाग नाही आणि मानवजातीसाठी एकमात्र आशा देवाचे राज्य आहे असे घोषित करतो? पृथ्वीवर असलेल्या सर्व धार्मिक गटांपैकी कोणता धर्म या सर्व अपेक्षा पूर्ण करतो?’ वस्तुस्थिती दाखवते, की फक्त यहोवाचे साक्षीदारच या सर्व अपेक्षा पूर्ण करतात.​—यशया ४३:​१०-१२.

आता तुम्ही काय कराल?

१५. देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणे याउपर आणखी कशाची तो अपेक्षा करतो?

१५ देवाला संतुष्ट करण्यासाठी फक्त त्याच्यावर विश्वास ठेवणे पुरेसे नाही. कारण, देव आहे असा तर दुरात्मे देखील विश्वास ठेवतात असे बायबल म्हणते. (याकोब २:१९) पण, ते देवाच्या इच्छेप्रमाणे वागत नाहीत आणि त्यांना त्याची संमती नाही, हे स्पष्ट आहे. देवाची संमती प्राप्त करण्यासाठी आपण फक्त त्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणे पुरेसे नाही तर त्याची इच्छा देखील पूर्ण केली पाहिजे. आपण खोट्या धर्मासोबत असलेले सर्व संबंध तोडून टाकून खऱ्या उपासनेला कवटाळले पाहिजे.

१६. खोट्या धर्मात भाग घेण्याच्याबाबतीत आपण काय केले पाहिजे?

१६ प्रेषित पौलाने दाखवले, की आपण खोट्या उपासनेत भाग घेऊ नये. त्याने असे लिहिले: “‘त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा,’ असे प्रभु म्हणतो, ‘आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका; म्हणजे मी तुम्हाला स्वीकारीन.’” (२ करिंथकर ६:१७; यशया ५२:११) यास्तव, खरे ख्रिस्ती खोट्या उपासनेशी संबंधित असलेले सर्व काही टाळतात.

१७, १८. “मोठी बाबेल” काय आहे आणि ‘तिच्यामधून निघणे’ तातडीचे का आहे?

१७ खोट्या धर्माचे सर्व प्रकार ‘मोठ्या बाबेलीचा’ भाग आहेत, असे बायबल दाखवते. * (प्रकटीकरण १७:५) या नावावरून आपल्याला प्राचीन काळच्या बॅबिलोन शहराची आठवण होते; नोहाच्या दिवसातील जलप्रलयानंतर याच शहरात खोट्या धर्माची सुरुवात झाली होती. आज खोट्या धर्मात सर्रास दिसणाऱ्या अनेक शिकवणुकींचा व प्रथांचा उगम याच बॅबिलोनमध्ये झाला होता. जसे की, बॅबिलोनी लोक, त्रैक्याची किंवा त्रिदेवांची उपासना करायचे. आज, अनेक धर्मात त्रैक्याची शिकवण ही एक प्रमुख शिकवण आहे. परंतु बायबल स्पष्टपणे शिकवते, की एकच खरा देव आहे ज्याचे नाव यहोवा आहे आणि येशू ख्रिस्त हा त्याचा पुत्र आहे. (योहान १७:३) बॅबिलोनी असाही विश्वास करायचे, की मानवांमध्ये अमर आत्मा असतो जो शरीराच्या मृत्यूनंतर जिवंत राहतो आणि यातनामय ठिकाणी त्याला पीडा होऊ शकतात. आज, बहुतेक धर्मांत अमर आत्म्याची आणि आत्मा नरकाग्नीत यातना सहन करतो ही शिकवण दिली जाते.

१८ प्राचीन बॅबिलोनी उपासना संपूर्ण पृथ्वीवर पसरल्यामुळे, आधुनिक मोठी बाबेल अगदी उचितपणे खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याला चित्रित करते. आणि देवाने भाकीत केले आहे, की खोट्या धर्माचे हे जागतिक साम्राज्य लवकरच लयास जाणार आहे. (प्रकटीकरण १८:८) तेव्हा, मोठ्या बाबेलीच्या प्रत्येक गोष्टीतून स्वतःला वेगळे करणे महत्त्वाचे का आहे हे तुम्हाला समजले का? अजूनही वेळ आहे तोपर्यंत तुम्ही होता होईल तितक्या लवकर ‘तिच्यामधून निघावे’ अशी यहोवा देवाची इच्छा आहे.​—प्रकटीकरण १८:४.

यहोवाच्या लोकांबरोबर त्याची सेवा केल्यामुळे तुम्ही जितके गमावले आहे त्याच्या कितीतरी अधिक पट मिळवाल

१९. यहोवाची सेवा केल्यामुळे तुम्ही काय प्राप्त कराल?

१९ खोट्या धर्माचे आचरण करण्याचे थांबवण्याच्या तुम्ही घेतलेल्या निर्णयामुळे नाराज होऊन काही जण तुमच्याबरोबर संबंध तोडून टाकतील. पण यहोवाच्या लोकांबरोबर त्याची सेवा केल्यामुळे तुम्ही, जितके गमावले आहे त्याच्या कितीतरी अधिक पट तुम्ही मिळवाल. येशूचे अनुकरण करण्याकरता येशूच्या आरंभीच्या शिष्यांप्रमाणे तुम्ही देखील अनेक गोष्टींचा त्याग केला असेल पण सरतेशेवटी तुम्हाला पुष्कळ आध्यात्मिक भाऊ-बहिणी मिळतील. तुम्ही लाखो खऱ्या ख्रिश्चनांनी मिळून बनलेल्या एका जागतिक कुटुंबाचा भाग व्हाल जिथे तुम्हाला खरे प्रेम दाखवले जाईल. शिवाय तुम्हाला “सांप्रतकाळी” सार्वकालिक जीवनाची भव्य आशाही मिळेल. (मार्क १०:२८-३०) कदाचित, तुमच्या विश्वासांमुळे ज्यांनी तुम्हाला सोडून दिले तेही कालांतराने, बायबल काय शिकवते हे जाणून घेतील आणि यहोवाचे उपासक बनतील.

२०. खऱ्या धर्माचे आचरण करणाऱ्यांसाठी भवितव्यात कोणती आशा आहे?

२० देव आपल्या राज्याद्वारे, या दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश करून त्या ठिकाणी एक धार्मिक नवे जग आणेल, अशी शिकवण बायबल देते. (२ पेत्र ३:​९, १३) हे नवे जग किती भव्य असेल! या धार्मिक नव्या व्यवस्थीकरणात, एकच धर्म आणि एकाच प्रकारची उपासनापद्धत असेल. तेव्हा खऱ्या उपासकांमध्ये येण्यासाठी आवश्यक ती पावले आताच उचलण्यात सुज्ञपणा आहे, असे तुम्हाला वाटत नाही का?

^ परि. 17 मोठी बाबेल खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याला का चित्रित करते याबद्दल अधिक माहितीसाठी, २१९-२० पृष्ठांवरील परिशिष्ट पाहा.