व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय एकोणीस

देवाच्या प्रीतीत राहा

देवाच्या प्रीतीत राहा
  • देवाच्या प्रीतीत राहण्याचा काय अर्थ होतो?

  • आपण देवाच्या प्रीतीत कसे राहू शकतो?

  • जे यहोवाच्या प्रीतीत राहतात त्यांना तो प्रतिफळ कसे देईल?

या वादळी दिवसांत तुम्ही यहोवाला आपला आश्रय बनवाल का?

१, २. आज आपल्याला सुरक्षित ठिकाण कोठे सापडू शकते?

झंझावती वादळातून तुम्ही रस्त्यावरून चालला आहात अशी कल्पना करा. आकाश काळेकुट्‌ट होत चालले आहे. विजा चमकत आहेत, मध्येच एक वीज कडाडते आणि मग मुसळधार पावसाला सुरुवात होते. तुम्ही पळत सुटता, आश्रय शोधायचा बराच प्रयत्न करता. शेवटी रस्त्यालगत तुम्हाला एक आश्रयाचे ठिकाण दिसते. ते आश्रयस्थान भक्कम आहे; पावसाने ते ओले झालेले नाही तर कोरडे आहे; अशा वादळात सुरक्षित राहण्याकरता ते अगदी योग्य स्थान आहे. अशा सुरक्षित स्थानाची तुम्हाला नक्कीच कदर वाटेल!

आपण आज वादळी काळातच जगत आहोत. जगाची परिस्थिती अतिशय वाईट होत चालली आहे. पण कायमच्या नाशापासून आपल्याला सुरक्षित ठेवू शकेल असे एक आश्रयस्थान आहे. ते काय आहे? बायबल काय शिकवते, ते पाहा: “मी यहोवाविषयी म्हणेन की तो माझा आश्रय व माझा दुर्ग आहे; तोच माझा देव, त्याच्यावर मी भरवसा ठेवतो.”​—स्तोत्र ९१:​२, पं.र.भा.

३. आपण यहोवाला आपला आश्रय कसा बनवू शकतो?

जरा विचार करा! विश्वाचा निर्माणकर्ता आणि सार्वभौम यहोवा आपला संरक्षक आश्रय होऊ शकतो. तो आपल्याला सुरक्षित ठेवू शकतो, कारण तो आपल्याला हानी पोहंचवू शकणाऱ्या कोणाही व्यक्तीपेक्षा किंवा कोणत्याही गोष्टीपेक्षा कैक पटीने शक्तिशाली आहे. आणि आपल्याला इजा झालीच तर तो त्याचे वाईट परिणाम काढून टाकण्यास समर्थ आहे. मग यहोवाला आपण आपला आश्रय कसा बनवू शकतो? आपण त्याच्यावर भरवसा ठेवला पाहिजे. शिवाय, देवाचे वचन आपल्याला असे आर्जवते: “आपणाला देवाच्या प्रीतिमध्ये राखा.” (यहूदा २१) होय, आपण देवाच्या प्रीतीत राहिले पाहिजे; आपल्या स्वर्गीय पित्याबरोबर असलेला अतुट प्रेमळ नातेसंबंध आपण मजबूत ठेवला पाहिजे. तेव्हाच आपण खात्री बाळगू शकतो, की तो आपला आश्रय आहे. पण आपण अशाप्रकारचा नातेसंबंध कसा जोडू शकतो?

देवाने दाखवलेली प्रीती ओळखा आणि तिला प्रतिसाद द्या

४, ५. यहोवाने कोणकोणत्या मार्गांद्वारे आपल्याला प्रेम दाखवले आहे?

देवाच्या प्रीतीत राहण्याकरता आपण, यहोवाने आपल्याला कशाप्रकारे प्रेम दाखवले ते समजून घेतले पाहिजे. या पुस्तकाच्या साहाय्याने तुम्ही कोणकोणत्या बायबल शिकवणुकी शिकलात याचा विचार करा. निर्माणकर्ता या नात्याने यहोवाने आपल्याला राहण्याकरता ही सुंदर पृथ्वी दिली आहे. या पृथ्वीवर त्याने, भरपूर अन्न, पाणी, नैसर्गिक संपत्ती, मन मोहून टाकणारे प्राणी आणि रम्य परिसर दिला आहे. बायबलचा लेखक या नात्याने देवाने आपले नाव आणि आपले गुण कळवले आहेत. शिवाय, त्याचे वचन हेही सांगते, की त्याने स्वतःच्या एकुलत्या एका पुत्राला अर्थात येशूला पृथ्वीवर पाठवले आणि त्याला यातना सहन करून आपल्यासाठी मरण पत्करू दिले. (योहान ३:१६) या देणगीचा आपल्यासाठी काय अर्थ होतो? एका अद्‌भुत भवितव्याची आपल्याला आशा मिळते.

देवाने केलेल्या आणखी एका गोष्टीवर आपले भवितव्य अवलंबून आहे. यहोवाने एक स्वर्गीय सरकार अर्थात मशीही राज्य स्थापित केले आहे. हे राज्य लवकरच सर्व दुःखाचा अंत करून पृथ्वीला परादीस बनवेल. विचार करा! आपण तेथे चिरकालासाठी शांतीत व सुखात राहू. (स्तोत्र ३७:२९) पण त्याआधी आता आपण शक्य तितक्या उत्तम प्रकारे जीवन कसे जगू शकतो, याबाबतीत देवाने आपल्याला काही मार्गदर्शन दिले आहे. त्याने आपल्याला प्रार्थना करण्याची देणगी दिली आहे; यामुळे आपण त्याच्याशी केव्हाही, कधीही मनमोकळेपणाने बोलू शकतो. संपूर्ण मानवजातीसाठी आणि व्यक्ती या नात्याने तुमच्यासाठी यहोवाने या निरनिराळ्या मार्गांनी प्रेम दाखवले आहे.

६. यहोवाने तुम्हाला दाखवलेल्या प्रीतीला तुम्ही कसा प्रतिसाद द्याल?

तुमच्यासाठी हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे: यहोवाच्या प्रीतीला मी कसा प्रतिसाद दाखवू शकेन? पुष्कळ लोक म्हणतील: “यहोवानं माझ्यावर प्रेम केलंय तर मलाही त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे.” तुम्हाला असेच वाटते का? “तू आपल्या सर्व अंतःकरणाने व आपल्या सर्व जिवाने व आपल्या सर्व मनाने तुझा देव प्रभू [“यहोवा”] याच्यावर प्रीती कर.” (मत्तय २२:​३७, पं.र.भा समास) यहोवा देवावर प्रेम करण्यासाठी तुमच्याजवळ नक्कीच अनेक कारणे असतील. पण यहोवावर पूर्ण अंतःकरणाने, जिवाने व मनाने प्रेम करण्याची केवळ भावनाच पुरेशी आहे का?

७. देवाबद्दल प्रेमाची केवळ भावना मनात उत्पन्न होणे पुरेसे आहे का? स्पष्टीकरण द्या.

बायबलमध्ये वर्णन केल्याप्रमाणे, देवाबद्दल तुमच्या मनात फक्त प्रेमाची भावना असणे पुरेसे नाही. यहोवाबद्दल प्रेमाची भावना असणे महत्त्वाचे असले तरी, अशाप्रकारची भावना ही, त्याच्याबद्दल खरे प्रेम बाळगण्याची केवळ सुरुवात आहे. सफरचंदाच्या झाडासाठी सफरचंदाचे बी हवे. पण तुम्ही जर सफरचंद मागितले आणि कोणी तुम्हाला त्याचे बी दिली तर तुमचे समाधान होईल का? मुळीच नाही. तसेच, यहोवा देवाबद्दल मनात प्रेम असणे ही केवळ एक सुरुवात आहे. बायबल असे शिकवते: “देवावर प्रीति करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.” (१ योहान ५:३) देवावर आपले खरे प्रेम असेल तर ते उत्तम फळांद्वारे दिसून आले पाहिजे. आपल्या कृतीतून ते दिसले पाहिजे.​—मत्तय ७:​१६-२०.

८, ९. देवाबद्दल आपण प्रेम आणि कृतज्ञता कशी व्यक्त करू शकतो?

देवाने दिलेल्या आज्ञा पाळण्याद्वारे व त्याने दिलेल्या तत्त्वांनुसार जीवन व्यतीत करण्याद्वारे आपण देवावर आपले प्रेम आहे हे दाखवून देतो. असे करणे फार कठीण नाही. यहोवाचे नियम मुळात कठीण नाहीतच; उलट आपण, आनंदी, सुखी, समाधानी जीवन जगावे म्हणूनच ते बनवण्यात आले आहेत. (यशया ४८:​१७, १८) यहोवाच्या मार्गदर्शनानुसार जगण्याद्वारे आपण आपल्या स्वर्गीय पित्याला दाखवून देतो, की त्याने आपल्यासाठी जे काही केले आहे त्याबद्दल आपण आभारी आहोत. पण दुःखाची गोष्ट म्हणजे, फार कमी लोकांची अशी आभारी वृत्ती आहे. आपण येशू पृथ्वीवर होता तेव्हा त्याच्या जमान्यात असलेल्या कृतघ्न लोकांप्रमाणे होऊ इच्छित नाही. येशूने एकदा दहा कुष्ठरोग्यांना बरे केले परंतु फक्त एकच जण त्याचे आभार मानायला मागे वळाला. (लूक १७:​१२-१७) आपण त्या नऊ कृतघ्न लोकांप्रमाणे नव्हे तर त्या एकाप्रमाणे होऊ इच्छितो.

पण यहोवाच्या कोणत्या आज्ञा आहेत ज्यांचे आपण पालन केले पाहिजे? तशी या पुस्तकात आपण अनेक आज्ञांची चर्चा केली आहे तरीपण आपण काहींची उजळणी करू या. देवाच्या आज्ञांचे पालन केल्याने आपण देवाच्या प्रीतीत राहू शकू.

यहोवाच्या अधिकाधिक जवळ येण्याचा प्रयत्न करा

१०. यहोवा देवाविषयी ज्ञान घेत राहणे महत्त्वपूर्ण का आहे हे समजावून सांगा.

१० यहोवाविषयी शिकून घेणे, हे त्याच्याजवळ येण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे. ही एक अशी प्रक्रिया आहे जी कधीच थांबू नये. समजा, कडाक्याची थंडी पडलेल्या एका रात्री तुम्ही जर शेकोटीजवळ बसून शेकत असाल तर तुम्ही विस्तव विझू द्याल का? नाही. आग पेटत राहण्याकरता व तुम्हाला उब मिळण्याकरता तुम्ही शेकोटीत आणखी लाकडे टाकत राहाल. नाहीतर तुमच्या जिवालाही धोका असू शकतो! लाकडामुळे जशी आग जिवंत राहते तसे ‘देवाविषयीच्या ज्ञानामुळे’ आपल्या मनात यहोवाबद्दलची प्रीती कायम राहते.​—नीतिसूत्रे २:​१-५.

आग जळत ठेवण्यासाठी जशी लाकडाची गरज असते तसेच यहोवाबद्दलचे तुमचे प्रेम जळत ठेवण्यासाठी इंधनाची गरज आहे

११. येशूने आपल्या अनुयायांना शिकवले तेव्हा त्याचा काय परिणाम झाला?

११ येशूची इच्छा होती, की त्याच्या अनुयायांनी आपल्या मनात यहोवाबद्दल, त्याचे अमूल्य सत्य वचन यांबद्दलचे प्रेम सतत ज्वलंत ठेवावे. येशूच्या पुनरुत्थानानंतर त्याने त्याच्या दोन शिष्यांना, त्याच्या संबंधाने पूर्ण झालेल्या इब्री शास्त्रवचनांतील काही भविष्यवाण्यांविषयी शिकवले. याचा परिणाम काय झाला? ते नंतर म्हणाले: “तो . . . शास्त्राचा उलगडा करीत होता तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय?”​—लूक २४:३२.

१२, १३. (क) बहुसंख्य लोकांच्या मनातील देवाबद्दल आणि बायबलबद्दल असलेल्या प्रेमाला काय झाले आहे? (ख) आपल्या मनातील प्रेम थंड होण्याचे आपण कसे टाळू शकतो?

१२ बायबल नेमके काय शिकवते, हे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा शिकलात तेव्हा तुमच्याही अंतःकरणात आतल्या आत आनंदाने, आवेशाने व देवाबद्दलच्या प्रेमामुळे उकळी येत असल्याचे तुम्हाला जाणवले का? तुम्हाला निश्‍चित्तच असे जाणवले असेल. पुष्कळ लोकांना असे जाणवले आहे. पण आता प्रेमाची ती उकळी तुम्ही तशीच जिवंत ठेवून ती वाढवली पाहिजे. आपण आजच्या जगानुसार चालू इच्छित नाही. येशूने म्हटले: “पुष्कळांची प्रीति थंडावेल.” (मत्तय २४:१२) यहोवा आणि बायबल सत्ये यांच्याबद्दलचे प्रेम थंड होण्याचे तुम्ही कसे टाळू शकता?

१३ यहोवा देव आणि येशू ख्रिस्त यांच्याविषयी ज्ञान घेत राहा. (योहान १७:३) देवाच्या वचनातून तुम्ही जे काही शिकता त्यावर मनन करा आणि स्वतःला विचारा: ‘ही गोष्ट मला यहोवा देवाविषयी काय शिकवते? त्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, जिवाने, मनाने प्रेम करण्यास मला आणखी कोणते कारण मिळते?’ (१ तीमथ्य ४:१५) अशाप्रकारे मनन केल्याने तुमच्या मनातील यहोवाबद्दलचे प्रेम ज्वलंत राहील.

१४. प्रार्थना आपल्याला यहोवाबद्दलचे प्रेम जिवंत ठेवायला कशी मदत करू शकते?

१४ यहोवाबद्दलचे प्रेम आपल्या मनात सतत ज्वलंत ठेवण्यासाठी आपण नियमित प्रार्थना केली पाहिजे. (१ थेस्सलनीकाकर ५:१७) या पुस्तकाच्या सतराव्या अध्यायात आपण शिकलो, की प्रार्थना ही देवाकडून मिळालेली एक अमूल्य देणगी आहे. नियमित, मनमोकळा सुसंवाद असल्यास मानवी नातेसंबंध जसा मजबूत होतो तसेच, यहोवाला आपण नियमित प्रार्थना केल्यास आपला त्याच्याबरोबरचा नातेसंबंध मजबूत व जिवंत राहतो. त्यामुळे, रटाळगाण्यात जसे तेच तेच शब्द भावनाशून्यपणे किंवा निरर्थकपणे बोलले जातात त्याप्रमाणे आपल्या प्रार्थना असू नयेत म्हणून आपण सतत काळजी घेतली पाहिजे. एक मूल जसे आपल्या प्रेमळ पित्याबरोबर मनमोकळेपणाने बोलते तसे आपण यहोवाशी बोलले पाहिजे. अर्थात आपण त्याच्याशी आदराने बोलले पाहिजे पण आपण, खुल्या मनाने, प्रामाणिकपणे व अगदी मनापासून बोलले पाहिजे. (स्तोत्र ६२:८) होय, व्यक्तिगत बायबल अभ्यास आणि मनापासून प्रार्थना, या आपल्या उपासनेतील महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत व यांमुळे आपल्याला देवाच्या प्रीतीत राहायला मदत मिळेल.

आनंदाने उपासना करा

१५, १६. राज्य प्रचार कार्याला आपण एक कृपादान व संपत्ती का समजतो?

१५ व्यक्तिगत बायबल अभ्यास आणि प्रार्थना ही उपासनेची अशी कार्ये आहेत जी आपण खासगीत करू. पण आता आपण उपासनेतील अशा एका पैलूचा विचार करू या, की जो आपण सार्वजनिकरीत्या पार पाडतो; अर्थात आपल्या विश्वासांविषयी आपण इतरांना सांगतो. तुम्ही इतरांना बायबल सत्यांविषयी सांगू लागला आहात का? असल्यास तुम्हाला खरोखरच एक अद्‌भुत कृपादान मिळाले आहे. (लूक १:​७४, ७५, पं.र.भा.) यहोवा देवाविषयी आपण शिकलेली सत्ये जेव्हा इतरांना सांगतो तेव्हा आपण वास्तविकतेत सर्व खऱ्या ख्रिश्चनांना दिलेल्या एका अतिशय महत्त्वाच्या कामगिरीत भाग घेत असतो; ती कामगिरी म्हणजे देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करणे.​—मत्तय २४:१४; २८:​१९, २०.

१६ प्रेषित पौलाने आपल्या सेवेला मौल्यवान समजले; त्याने तिला संपत्ती असे संबोधले. (२ करिंथकर ४:७) यहोवा देवाविषयी आणि त्याच्या उद्देशांविषयी लोकांना सांगण्यासारखे दुसरे कोणतेही उत्तम काम तुम्ही करू शकणार नाही. ही सेवा सर्वात उत्तम धन्याची सेवा आहे आणि यामुळे तुम्हाला प्रतिफळही सर्वात उत्तम मिळेल. या कार्यात भाग घेऊन तुम्ही नम्र अंतःकरणाच्या लोकांना आपल्या स्वर्गीय पित्याच्या जवळ येण्यास व सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर येण्यास मदत करत असता! यापेक्षा आणखी कोणते काम समाधानदायक असू शकेल? शिवाय, यहोवा आणि त्याचे वचन याविषयीची साक्ष दिल्याने तुमचा विश्वास वाढेल आणि त्याच्याबद्दलचे प्रेम वाढेल. यहोवाला तुमच्या प्रयत्नांची कदर आहे. (इब्री लोकांस ६:१०) अशा कार्यांत मग्न राहिल्याने तुम्हाला देवाच्या प्रीतीत राहता येईल.​—१ करिंथकर १५:५८.

१७. ख्रिस्ती सेवा आज तातडीने का केली पाहिजे?

१७ आपण हे लक्षात ठेवले पाहिजे, की राज्य प्रचार कार्य हे तातडीने केले पाहिजे. बायबल म्हणते: “वचनाची घोषणा कर, . . . तयार राहा.” (२ तीमथ्य ४:२) वचनाची घोषणा करणे आज तातडीचे का आहे? देवाचे वचन आपल्याला सांगते: “परमेश्वराचा मोठा दिवस समीप आहे; तो येऊन ठेपला आहे; वेगाने येत आहे.” (सफन्या १:१४) होय, या दुष्ट व्यवस्थीकरणाचा अंत करण्याचा यहोवाचा समय फार जवळ आला आहे. याच्याविषयीची ताकीद लोकांना दिली पाहिजे. त्यांना कळले पाहिजे, की यहोवाला आपला सार्वभौम म्हणून निवडण्याची आता वेळ आहे. अंत यायला “विलंब लागावयाचा नाही.”​—हबक्कूक २:३.

१८. खऱ्या ख्रिश्चनांबरोबर आपण यहोवाची उपासना जाहीररीत्या का केली पाहिजे?

१८ यहोवाची इच्छा आहे, की आपण खऱ्या ख्रिश्चनांबरोबर त्याची उपासना जाहीररीत्या केली पाहिजे. म्हणूनच त्याचे वचन म्हणते: “प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा.” (इब्री लोकांस १०:२४, २५) ख्रिस्ती सभांमध्ये जेव्हा आपण सहविश्वासूंबरोबर एकत्र जमतो तेव्हा आपल्याला आपल्या प्रिय देवाची स्तुती करण्याची व उपासना करण्याची उत्तम संधी मिळते. आपण एकमेकांना उत्तेजन देखील देऊ शकतो.

१९. ख्रिस्ती मंडळीतील प्रेमाचे बंधन आणखी मजबूत करण्यासाठी आपण काय करू शकतो?

१९ यहोवाच्या इतर उपासकांबरोबर जेव्हा आपण संगती करतो तेव्हा आपण मंडळीतील प्रीतीचे व मैत्रीचे बंधन आणखी मजबूत करतो. यहोवा जसे आपल्यातले चांगले गुण पाहतो तसे आपणही इतरांचे चांगले गुण पाहिले पाहिजेत. तुमच्या सहविश्वासूंकडून परिपूर्णतेची अपेक्षा करू नका. सर्व जण आध्यात्मिक वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत व आपण सर्व जण चुका करतो, हे लक्षात ठेवा. (कलस्सैकर ३:१३) यहोवावर प्रेम करणाऱ्यांबरोबर घनिष्ठ मैत्री जोडण्याचा प्रयत्न करा; यामुळे तुमची आध्यात्मिक वृद्धी होत असल्याचे दिसून येईल. होय, तुमच्या आध्यात्मिक बंधूभगिनींबरोबर यहोवाची उपासना केल्याने तुम्हाला देवाच्या प्रीतीत राहता येईल. यहोवाची विश्वासूपणे उपासना करणाऱ्यांना व त्याच्या प्रीतीत राहणाऱ्यांना तो कसे प्रतिफळ देतो?

“खरे जीवन” मिळवण्यास झटा

२०, २१. “खरे जीवन” काय आहे आणि ही अद्‌भुत आशा का आहे?

२० यहोवा आपल्या विश्वासू सेवकांना जीवन देऊन प्रतिफळ देतो; पण कोणत्या प्रकारचे जीवन? तुम्ही सध्या खऱ्या अर्थाने जीवन जगत आहात का? पुष्कळ जण म्हणतील, की आपण आता जिवंत आहोत. आपण श्वास घेतो, खातो, पितो. म्हणजेच आपण जीवन जगत आहोत. आणि आनंदाचे क्षण येतात तेव्हा आपण असे देखील म्हणतो, “याला म्हणतात खरे जीवन!” परंतु बायबल असे सूचित करते, की एका महत्त्वपूर्ण दृष्टिकोनातून कोणीही मानव आज खऱ्या अर्थाने जीवन जगत नाही.

तुम्ही ‘खऱ्या जीवनाचा’ उपभोग घ्यावा अशी यहोवाची इच्छा आहे. घ्याल का मग तुम्ही उपभोग?

२१ देवाचे वचन आपल्याला ‘जे खरे जीवन ते बळकट धरा’ असा आर्जव करते. (१ तीमथ्य ६:१९) या शब्दांवरून असे सूचित होते, की “खरे जीवन” हे असे जीवन आहे जे आपण भवितव्यात प्राप्त करण्याची आशा धरतो. होय, परिपूर्ण झाल्यावर आपण त्या शब्दाच्या पूर्णार्थात जिवंत असू; कारण तेव्हा आपण देवाने आपल्यासाठी जसे उद्देशिले होते त्याप्रकारचे जीवन जगू. परादीस पृथ्वीवर परिपूर्ण आरोग्य, शांती सुखात जेव्हा आपण जगू तेव्हा आपण ‘खऱ्या जीवनाचा’ अर्थात सार्वकालिक जीवनाचा आनंद लुटू. (१ तीमथ्य ६:१२) किती ही अद्‌भुत आशा, नाही का?

२२. तुम्ही ‘खरे जीवन बळकट कसे धरू शकता?’

२२ आपण ‘खरे जीवन बळकट कसे धरू शकतो?’ याच वचनाच्या संदर्भात पौलाने ख्रिश्चनांना “चांगले ते करावे; सत्कर्माविषयी धनवान असावे,” असे आर्जवले. (१ तीमथ्य ६:१८) तेव्हा, बायबलमधून आपण जे सत्य शिकलो ते आपण किती प्रमाणात लागू करतो यावर पुष्कळ काही अवलंबून आहे. पण पौलाला असे म्हणायचे होते का, की चांगली कार्ये करून आपण “खरे जीवन” कमवू शकतो? नाही. ही अद्‌भुत आशा आपल्याला, देवाची आपल्यावर अपात्री “कृपा” असली तरच मिळणार आहे. (रोमकर ५:१५) परंतु, जे यहोवाची सेवा विश्वासूपणे करतात केवळ अशांनाच त्याला प्रतिफळ देण्यात आनंद वाटतो. तुम्हाला “खरे जीवन” जगताना त्याला पाहायचे आहे. देवाच्या प्रीतीत राहणाऱ्यांसाठीच असे आनंदी, शांतीमय, सार्वकालिक जीवन आहे.

२३. देवाच्या प्रीतीत राहणे महत्त्वाचे का आहे?

२३ प्रत्येकाने स्वतःला असे विचारले पाहिजे: ‘बायबलमध्ये देवाने ज्याप्रकारची उपासना सांगितली आहे तशी मी त्याची उपासना करतो का?’ दररोज परीक्षण केल्यानंतर जर या प्रश्‍नाचे होय असे उत्तर येत असेल तर याचा अर्थ आपण योग्य मार्गावर आहोत. मग आपण खात्री बाळगू शकतो, की यहोवा आपला आश्रय आहे. तो आपल्या विश्वासू लोकांना या जुन्या व्यवस्थीकरणाच्या शेवटल्या त्रस्त दिवसांत सुरक्षित ठेवेल. आणि यहोवा आपल्याला जवळ आलेल्या भव्य नव्या व्यवस्थीकरणात सुरक्षितपणे नेईल. तो काळ पाहणे खरोखरच किती रोमांचकारी असेल! आणि या शेवटल्या दिवसांत आपण उचित निवड केली म्हणून आपल्याला किती आनंद वाटेल! त्यामुळे अशा उचित निवडी आपण जर आता केल्या तर आपण अनंतकाळ यहोवा देवाने उद्देशिल्याप्रमाणे ‘खऱ्या जीवनाचा’ उपभोग घेऊ!