व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

परिशिष्ट

“मोठी बाबेल” कोण आहे?

“मोठी बाबेल” कोण आहे?

प्रकटीकरणाच्या पुस्तकातील माहिती, चिन्हे दाखवून कळवण्यात आली असल्यामुळे त्यातील काही वाक्यांशांचा अक्षरशः अर्थ घेता येत नाही. (प्रकटीकरण १:१, पं.र.भा.) जसे की, यात एका स्त्रीविषयी सांगितले आहे, जिचे नाव तिच्या कपाळावर “मोठी बाबेल” असे लिहिले आहे. ही स्त्री “जनसमूह, राषट्रे” यांच्यावर बसली आहे असे म्हटले आहे. (प्रकटीकरण १७:१, ५, १५) वास्तविकेत कोणी स्त्री असे करू शकत नसल्यामुळे मोठी बाबेल ही लाक्षणिक स्त्री असावी. ही लाक्षणिक वेश्या कशास सूचित करते?

प्रकटीकरण १७:१८ मध्ये, याच लाक्षणिक स्त्रीला “पृथ्वीवरच्या राजांवर राज्य करणारी मोठी नगरी” असे म्हटले आहे. “नगरी” हा शब्द, लोकांच्या एका संघटित गटाला सूचित करतो. ‘पृथ्वीवरचे राजे’ या ‘मोठ्या नगरीच्या’ नियंत्रणात असल्यामुळे मोठी बाबेल नावाची स्त्री, ही आंतरराष्ट्रीय प्रमाणावर विस्तार असलेली प्रभावशाली संघटना असावी. तिला उचितपणे जागतिक साम्राज्य म्हटले जाऊ शकते. कोणत्या प्रकारचे साम्राज्य? धार्मिक साम्राज्य. प्रकटीकरण पुस्तकातील काही वचनांवरून आपण असा निष्कर्ष कसा काय काढू शकतो, याची नोंद घ्या.

साम्राज्य हे राजकीय, व्यापारी किंवा धार्मिक असू शकते. मोठी बाबेल नाव असलेली स्त्री राजकीय साम्राज्य नाही कारण देवाचे वचन म्हणते, की “पृथ्वीवरील राजांनी” अर्थात या जगाच्या राजकीय नेत्यांनी तिच्याबरोबर “जारकर्म केले.” तिच्याबरोबर केलेले जारकर्म म्हणजे, या पृथ्वीवरील राजांबरोबर तिने बांधलेले संधान; म्हणूनच तर तिला ‘मोठी कलावंतीण’ असे म्हटले आहे.​—प्रकटीकरण १७:​१, २; याकोब ४:४.

मोठी बाबेल व्यापारी साम्राज्य असू शकत नाही कारण व्यापाऱ्यांना चित्रित करणारे “पृथ्वीवरील व्यापारी” तिच्या नाशाच्या वेळी शोक करतील असे म्हटले आहे. खरे पाहता, राजे आणि व्यापारी असे दोघेही “दूर उभे राहून” तिच्याकडे पाहत राहतील, असे वर्णन करण्यात आले आहे. (प्रकटीकरण १८:३, ९, १०, १५-१७) तेव्हा, तर्कशुद्धपणे आपण असा निष्कर्ष काढू शकतो, की मोठी बाबेल राजकीय किंवा व्यापारी साम्राज्य नव्हे तर धार्मिक साम्राज्य आहे.

मोठी बाबेल धार्मिक साम्राज्य आहे याची पुष्टी पुढील वाक्यावरून मिळते. पुढे तिच्याविषयी असे म्हटले आहे, की ती तिच्या “चेटकाने” सर्व राष्ट्रांना ठकवित आहे. (प्रकटीकरण १८:२३) चेटकाचे सर्व प्रकार मुळात धर्मविषयक आणि दुरात्मिक असल्यामुळे, बायबल मोठ्या बाबेलीला “सर्व प्रकारच्या अशुद्ध आत्म्यांचा आश्रय” असे जेव्हा म्हणते तेव्हा त्यात आश्चर्य करण्यासारखे काहीच नाही. (प्रकटीकरण १८:२; अनुवाद १८:१०-१२) हे साम्राज्य खऱ्या धर्माचा कडाडून विरोध करेल, ‘संदेष्ट्यांना,’ ‘पवित्र जनांना’ छळेल, असेही वर्णन करण्यात आले आहे. (प्रकटीकरण १८:२४) खरे पाहता, मोठ्या बाबेलला खऱ्या धर्माविषयी इतकी चीड आहे, की ती ‘येशूची साक्ष’ देणाऱ्यांचा अतिशय क्रूरपणे छळ करते आणि त्यांना ठारही मारते. (प्रकटीकरण १७:६) म्हणूनच, मोठी बाबेल असे नाव असलेली ही स्त्री खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याला चित्रित करते. या धर्मांमध्ये, यहोवा देवाच्या विरोधात असलेल्या सर्व धर्मांचा समावेश होतो.