व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ६३

भिंतीवरचे शब्द

भिंतीवरचे शब्द

काही काळानंतर बेलशस्सर बाबेलचा राजा बनला. एका रात्री त्याने त्याच्या राज्यातल्या एक हजार महत्त्वपूर्ण लोकांना मोठ्या मेजवानीसाठी बोलवलं. नबुखद्‌नेस्सर राजाने यहोवाच्या मंदिरातून भांडी आणली होती. बेलशस्सरने त्याच्या सेवकांना त्या भांड्यांमधून सोन्याचे पेले आणायला सांगितले. बेलशस्सर आणि त्याच्या पाहुण्यांनी द्राक्षरस पिण्यासाठी त्या पेल्यांचा वापर केला. तसंच, त्यांनी त्यांच्या देवांची स्तुती केली. मग, ते जेवत असलेल्या खोलीत अचानक एक हात भिंतीवर काहीतरी लिहिताना दिसू लागला. पण, भिंतीवर लिहिलेले ते शब्द कोणालाही कळत नव्हते.

बेलशस्सर घाबरून गेला. त्याने त्याच्या जादूगारांना बोलवलं आणि त्यांना म्हटलं: ‘जर तुमच्यापैकी कोणी मला या शब्दांचा अर्थ समजावून सांगितला, तर मी त्याला बाबेलमधला तिसरा सर्वात शक्‍तिशाली पुरुष बनवेन.’ त्या जादूगारांनी खूप प्रयत्न केला. पण कोणालाही त्या शब्दांचा अर्थ सांगता आला नाही. तितक्यात राणी तिथे आली आणि तिने राजाला म्हटलं: ‘दानीएल नावाचा एक पुरुष आहे. तो नबुखद्‌नेस्सरला स्वप्नांचा आणि कोड्यांचा अर्थ समजावून सांगायचा. तो तुम्हाला या शब्दांचा अर्थ सांगू शकतो.’

तेव्हा दानीएल राजाकडे आला. बेलशस्सरने त्याला म्हटलं: ‘तू जर हे शब्द वाचून त्यांचा अर्थ मला सांगितला, तर मी तुला एक सोन्याचा हार देईन. तसंच, मी तुला बाबेलमधला तिसरा सर्वात शक्‍तिशाली पुरुष बनवेन.’ यावर दानीएलने म्हटलं: ‘मी तुम्हाला या शब्दांचा अर्थ सांगेन. पण, मला तुमच्या कोणत्याही भेटवस्तू नकोत. तुमचे वडील नबुखद्‌नेस्सर किती गर्विष्ठ होते आणि यहोवाने त्यांना कशी शिक्षा दिली हे तुम्हाला माहीत होतं. तरीसुद्धा, तुम्ही यहोवाच्या मंदिरातून आणलेल्या सोन्याच्या पेल्यांतून द्राक्षरस प्यायलात. तुम्ही देवाचा अनादर केला आहे आणि म्हणूनच त्याने हे शब्द लिहिले आहेत: मने, मने, तकेल, ऊफारसीन. या शब्दांचा अर्थ म्हणजे, मेद आणि पारस या देशांचे लोक बाबेलवर विजय मिळवतील. आणि तुम्ही राजा राहणार नाही.’

बाबेल शहराच्या आजूबाजूला मोठमोठ्या जाड भिंती होत्या. तसंच, खूप खोल नदीही होती. यामुळे बाबेलवर विजय मिळवणं अशक्य आहे असं लोकांना वाटायचं. पण ज्या रात्री बाबेलचे लोक मेजवानी करत होते, त्याच रात्री मेदी आणि पारसी लोकांनी बाबेलवर हल्ला केला. कोरेश नावाच्या पारसी राजाने नदीचं पाणी दुसरीकडे वळवलं आणि नदीतलं पाणी कमी झालं. त्यामुळे, मेदी आणि पारसी सैनिकांना शहराच्या दरवाजापर्यंत चालत जाणं शक्य झालं. जेव्हा ते तिथे पोचले, तेव्हा पाहतात तर काय दरवाजा उघडाच होता! मग, सैनिक आत शिरले. त्यांनी शहरावर कबजा केला आणि राजाला मारून टाकलं. त्यानंतर कोरेश बाबेलचा शासक बनला.

या घटनेच्या एका वर्षाच्या आत कोरेशने अशी घोषणा केली: ‘यहोवाने मला यरुशलेममधलं त्याचं मंदिर पुन्हा बांधायला सांगितलं आहे. त्याच्या लोकांपैकी ज्यांना या कामात मदत करण्याची इच्छा आहे, ते यरुशलेमला जाऊ शकतात. मी त्यांना मुक्‍त करतो.’ कोरेशने आज्ञा दिल्यानंतर अनेक यहुदी लोक यरुशलेमला परत गेले. या घटनेमुळे खरंतर यहोवाने दिलेलं वचन पूर्ण झालं. त्याने सांगितलं होतं, की यरुशलेमचा नाश होऊन ७० वर्षं झाल्यानंतर त्याचे लोक यरुशलेमला परत येतील. आणि अगदी तसंच घडलं! यासोबतच, नबुखद्‌नेस्सरने यहोवाच्या मंदिरातून सोन्याचे व चांदीचे पेले आणि जी इतर भांडी आणली होती, ती सर्व कोरेशने परत पाठवली. कोरेशचा वापर करून यहोवाने आपल्या लोकांची कशी मदत केली, हे तुला समजलं का?

“ती पडली आहे! मोठी बाबेल पडली आहे! ती दुरात्म्यांचं निवासस्थान . . . बनली आहे!”—प्रकटीकरण १८:२