व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ६१

ते मूर्तीपुढे झुकले नाहीत

ते मूर्तीपुढे झुकले नाहीत

नबुखद्‌नेस्सर राजाला मोठ्या पुतळ्याचं स्वप्न पडून काही काळ झाला होता. त्यानंतर त्याने सोन्याची एक मोठी मूर्ती बनवली. त्याने ती मूर्ती दूरा नावाच्या मैदानात उभी केली. मग देशातल्या सर्व महत्त्वाच्या लोकांना त्याने तिथे बोलवलं. त्यांच्यामध्ये शद्रख, मेशख आणि अबेद्‌नगो हेसुद्धा होते. राजाने सर्वांना अशी आज्ञा दिली: ‘कर्णा, वीणा आणि बासरी यांचा आवाज ऐकताच, या मूर्तीपुढे सर्वांनी झुकायचं. जो कोणी असं करणार नाही, त्याला आगीच्या भट्टीत टाकण्यात येईल.’ ही तीन इब्री मुलं आता काय करणार होती? ती त्या मूर्तीपुढे झुकून तिची उपासना करणार होती का? की, फक्‍त यहोवाचीच उपासना करणार होती?

मग राजाने सर्व वाद्ये वाजवण्याची आज्ञा दिली. संगीत सुरू होताच सगळ्यांनी मूर्तीपुढे झुकून तिची उपासना केली. पण शद्रख, मेशख आणि अबेद्‌नगो हे मात्र झुकले नाहीत आणि ही गोष्ट काही लोकांच्या लक्षात आली. त्यांनी राजाला म्हटलं: ‘ते तीन इब्री तरुण तुमच्या मूर्तीपुढे झुकले नाहीत.’ नबुखद्‌नेस्सरने त्या तिघांना बोलवलं आणि त्यांना म्हटलं: ‘मी तुम्हाला आणखीन एक संधी देतो. या मूर्तीपुढे झुका, नाहीतर मी तुम्हाला आगीच्या भट्टीत टाकून देईन. मग कोणताच देव तुम्हाला वाचवू शकणार नाही.’ त्या तिघांनी राजाला म्हटलं: ‘महाराज आम्हाला आणखीन एका संधीची गरज नाही. आमचा देव आम्हाला वाचवू शकतो. आणि जरी त्याने आम्हाला वाचवलं नाही, तरीसुद्धा आम्ही या मूर्तीपुढे झुकणार नाही.’

हे ऐकून नबुखद्‌नेस्सरला खूप राग आला. त्याने त्याच्या लोकांना सांगितलं: ‘भट्टीतली आग आणखीन सात पट वाढवा.’ मग त्याने त्याच्या सैनिकांना आज्ञा दिली: ‘या तिघांना बांधून त्या भट्टीत टाकून द्या.’ सैनिकांनी त्या तिघांना भट्टीजवळ नेलं. ती भट्टी इतकी गरम होती, की त्या तिघांना आत टाकत असताना सैनिक जळून गेले. नंतर जेव्हा राजाने पाहिलं, तेव्हा त्याला त्या भट्टीत तीन नाही, तर चार पुरुष चालताना दिसले. तो खूप घाबरला आणि त्याने अधिकाऱ्‍यांना विचारलं: ‘आपण आगीत तीन पुरुषांना टाकलं होतं ना? पण मला तर चार पुरुष दिसत आहेत. आणि त्यांच्यापैकी एक तर देवदूतासारखा आहे!’

त्या भट्टीच्या थोडं जवळ जाऊन नबुखद्‌नेस्सरने मोठ्याने हाक मारली: ‘हे सर्वात महान देवाच्या सेवकांनो, बाहेर या.’ शद्रख, मेशख आणि अबेद्‌नगो यांना पाहून सर्वांनाच आश्‍चर्य वाटलं. कारण त्यांना काहीही झालं नव्हतं. त्यांचे कपडे, शरीर आणि केससुद्धा जळले नव्हते. इतकंच काय, तर त्यांच्या अंगाला जळण्याचा वासही येत नव्हता.

त्यानंतर नबुखद्‌नेस्सर म्हणाला: ‘शद्रख, मेशख आणि अबेद्‌नगो यांचा देव महान आहे. त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही. त्याने त्याच्या देवदूताला पाठवून या तिघांना वाचवलं आहे.’

या तीन इब्री तरुणांप्रमाणे, कोणत्याही परिस्थितीत यहोवाला विश्‍वासू राहण्याचा तूही प्रयत्न करशील ना?

“तू केवळ तुझा देव यहोवा याचीच उपासना कर आणि केवळ त्याचीच पवित्र सेवा कर.”—मत्तय ४:१०