व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ८८

येशूला अटक करण्यात येते

येशूला अटक करण्यात येते

येशू आणि त्याचे प्रेषित किद्रोन दरीतून चालत जैतुनांच्या डोंगराकडे गेले. ते तिथे पोचले तोपर्यंत मध्यरात्र उलटून गेली होती आणि चंद्राचा प्रकाशही पडला होता. गेथशेमाने बागेजवळ पोचल्यावर येशूने त्याच्या प्रेषितांना म्हटलं: ‘तुम्ही इथेच थांबा आणि जागे राहा.’ मग येशू बागेत आणखी पुढे गेला आणि गुडघे टेकून प्रार्थना करू लागला. तो खूप दुःखी होता. त्याने यहोवाला अशी प्रार्थना केली: “तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.” मग यहोवाने एक देवदूत पाठवला. त्या देवदूताने येशूला प्रोत्साहन दिलं. जेव्हा येशू परत प्रेषितांकडे आला, तेव्हा ते झोपले होते. त्याने त्यांना म्हटलं: ‘उठा! ही झोपण्याची वेळ नाही! शत्रूंनी मला पकडून नेण्याची वेळ जवळ आली आहे.’

काही वेळातच यहूदा तिथे पोचला. तो खूपसाऱ्‍या लोकांना सोबत घेऊन आला. त्या सर्वांकडे तलवारी आणि मोठमोठ्या काठ्या होत्या. येशू कुठे सापडेल हे यहूदाला माहीत होतं. कारण ते सहसा या बागेत यायचे. यहूदाने सैनिकांना सांगितलं होतं, की येशू कोण आहे हे तो त्यांना दाखवेल. तो सरळ येशूकडे गेला आणि म्हणाला: ‘गुरू, सलाम.’ असं म्हणून त्याने येशूचा मुका घेतला. येशूने त्याला म्हटलं: ‘यहूदा, माझा मुका घेऊन तू मला फसवतोस का?’

येशूने पुढे येऊन लोकांना विचारलं: “तुम्ही कोणाला शोधत आहात?” त्यांनी उत्तर दिलं: ‘नासरेथच्या येशूला.’ मग येशूने म्हटलं: “मीच तो आहे.” जमलेले लोक मागे झाले आणि जमिनीवर पडले. येशूने परत एकदा विचारलं: “तुम्ही कोणाला शोधत आहात?” त्यांनी म्हटलं: ‘नासरेथच्या येशूला.’ येशू त्यांना म्हणाला: ‘मी तुम्हाला सांगितलं आहे की मीच तो आहे. या माणसांना जाऊ द्या.’

काय होत आहे हे जेव्हा पेत्रला समजलं, तेव्हा त्याने त्याची तलवार काढली. त्या तलवारीने त्याने महायाजकाच्या सेवकाचा कान कापला. पण, येशूने त्याच्या कानाला हात लावला आणि त्याला बरं केलं. मग येशू पेत्रला म्हणाला: ‘तुझी तलवार परत ठेव. जर तू तलवार चालवली, तर तुलाही तलवारीने मारलं जाईल.’ सैनिकांनी येशूला धरलं आणि त्याचे हात बांधले. तेव्हा, प्रेषित घाबरून तिथून पळून गेले. मग यहूदासोबत आलेल्या लोकांनी येशूला मुख्य याजक हन्‍ना याच्याकडे नेलं. हन्‍नाने येशूला काही प्रश्‍न विचारले आणि मग त्याला महायाजक कयफाच्या घरी पाठवून दिलं. पण, प्रेषितांचं काय झालं?

“जगात तुमच्यावर संकटं येतील, पण हिंमत धरा! मी जगाला जिंकलं आहे.”—योहान १६:३३