व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ९०

गुलगुथा इथे येशूचा मृत्यू

गुलगुथा इथे येशूचा मृत्यू

मुख्य याजकांनी येशूला राज्यपालाच्या महालात नेलं. तिथे पिलातने त्यांना विचारलं: ‘या माणसाने कोणती चूक केली आहे असं तुमचं म्हणणं आहे?’ ते म्हणाले: ‘हा स्वतःला राजा म्हणतो!’ पिलातने त्याला विचारलं: “तू यहुद्यांचा राजा आहेस का?” यावर येशूने उत्तर दिलं: “माझं राज्य या जगाचा भाग नाही.”

येशूने काही चूक केली आहे की नाही, हे पाहण्यासाठी पिलातने त्याला गालीलचा अधिकारी हेरोद याच्याकडे पाठवलं. पण, हेरोदलाही येशूमध्ये काही दोष सापडला नाही. म्हणून त्याने त्याला परत पिलातकडे पाठवलं. मग पिलातने लोकांना म्हटलं: ‘येशूने काही चुकीचं केलेलं मला आणि हेरोदला सापडलेलं नाही. त्यामुळे मी त्याची सुटका करत आहे.’ हे ऐकून लोक ओरडू लागले: ‘याला मारून टाका!’ मग, सैनिकांनी येशूला चाबकाने फटके मारले. ते त्याच्यावर थुंकले आणि त्याला काठीने मारलं. त्यांनी येशूच्या डोक्यावर काट्यांचा मुकुट घातला आणि त्याला चिडवू लागले. ते म्हणू लागले: ‘यहुद्यांचा राजा! तुझा जयजयकार असो.’ पिलातने पुन्हा लोकांना सांगितलं: ‘मला या माणसात काहीच दोष सापडलेला नाही.’ पण, ते लोक ओरडू लागले: “त्याला वधस्तंभावर खिळा!” त्यामुळे मग पिलातने येशूला मारून टाकण्यासाठी त्यांच्या हाती दिलं.

मग सैनिक येशूला गुलगुथा नावाच्या ठिकाणी घेऊन गेले. तिथे त्यांनी येशूला वधस्तंभावर ठेवून त्याच्या हाता-पायाला खिळे ठोकले आणि तो स्तंभ उभा केला. मग येशूने अशी प्रार्थना केली: ‘बापा, या लोकांना माफ कर. कारण ते काय करत आहेत हे त्यांना माहीत नाही.’ लोक येशूला चिडवू लागले. ते म्हणू लागले: ‘जर तू देवाचा मुलगा आहेस तर वधस्तंभावरून खाली ये! वाचव स्वतःला.’

येशूच्या शेजारी ज्या गुन्हेगारांना स्तंभांवर लटकवण्यात आलं होतं, त्यांच्यापैकी एकाने येशूला म्हटलं: “येशू, तू राजा होशील तेव्हा माझी आठवण ठेव.” तेव्हा येशूने त्याला वचन दिलं: “तू माझ्यासोबत नंदनवनात असशील.” मग भर दुपारी सगळीकडे अंधार पसरला. तो अंधार तीन तासांसाठी राहिला. येशूचे काही शिष्य आणि त्याची आई मरीया हे सर्व वधस्तंभाजवळ उभे राहिले. योहानने मरीयाची स्वतःच्या आईसारखी काळजी घ्यावी असं येशूने त्याला सांगितलं.

शेवटी येशू म्हणाला: “पूर्ण झालं आहे!” त्याने आपलं डोकं खाली केलं आणि शेवटचा श्‍वास घेतला. त्याच वेळी एक खूप मोठा भूकंप झाला. मंदिराच्या पवित्र आणि परमपवित्र स्थानांच्या मध्ये असलेला मोठा पडदा मधोमध वरून खालपर्यंत फाटला. सैन्यातल्या एका अधिकाऱ्‍याने म्हटलं: ‘हा खरोखरच देवाचा मुलगा होता.’

“देवाची कितीही अभिवचने असली, तरी ती सर्व ख्रिस्ताद्वारे खरी ठरली आहेत.” —२ करिंथकर १:२०