व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ९७

कर्नेल्यला पवित्र आत्मा मिळतो

कर्नेल्यला पवित्र आत्मा मिळतो

रोमी सैन्यातला एक मोठा अधिकारी कैसरीया नावाच्या शहरात राहायचा. त्याचं नाव होतं कर्नेल्य. तो यहुदी नव्हता. पण तरीही यहुदी लोक त्याचा आदर करायचे. तो गरिबांना आणि गरजू लोकांना उदार मनाने मदत करायचा. कर्नेल्यचा यहोवावर विश्‍वास होता आणि तो नेहमी त्याला प्रार्थना करायचा. एक दिवस एक देवदूत कर्नेल्यकडे आला आणि त्याने त्याला म्हटलं: ‘तू केलेल्या प्रार्थना देवाने ऐकल्या आहेत. आता काही पुरुषांना यापो शहरात पाठव. तिथे पेत्र काही दिवसांपासून राहत आहे. त्याला तुझ्याकडे बोलावून घे.’ कर्नेल्यने लगेच तीन पुरुषांना यापो शहरात पाठवलं. यापो शहर कैसरीयाच्या दक्षिणेकडे होतं आणि ते जवळजवळ ५० किलोमीटर दूर होतं.

हे सगळं घडत होतं तेव्हा यापोमध्ये पेत्रला एक दृष्टान्त दिसला. त्या दृष्टान्तात त्याने असे काही प्राणी पाहिले, ज्यांचं मांस खाण्याची यहुदी लोकांना परवानगी नव्हती. मग त्याने एक आवाज ऐकला आणि त्या आवाजाने त्याला ते प्राणी खायला सांगितले. पण पेत्रने असं करायला नकार दिला. तो म्हणाला: ‘पण याआधी मी अशुद्ध प्राण्यांचं मांस कधीच खाल्लं नाही.’ मग त्या आवाजाने पेत्रला म्हटलं: ‘या प्राण्यांना अशुद्ध म्हणू नकोस. देवाने त्यांना शुद्ध केलं आहे.’ त्यानंतर पवित्र आत्म्याने पेत्रला सांगितलं: ‘घराबाहेर तीन माणसं आली आहेत. त्यांच्यासोबत जा.’ पेत्र दाराजवळ गेला आणि ते का आले आहेत, हे त्यांना विचारलं. त्यांनी उत्तर दिलं: ‘आम्हाला कर्नेल्य नावाच्या एका रोमी सैन्याच्या अधिकाऱ्‍याने पाठवलं आहे. आम्ही तुला कैसरीयाला कर्नेल्यच्या घरी घेऊन जाण्यासाठी आलो आहोत.’ पेत्रने त्या पुरुषांना रात्री तिथेच त्याच्यासोबत राहण्यासाठी थांबवलं. मग दुसऱ्‍या दिवशी तो त्यांच्यासोबत कैसरीयाला गेला. त्याच्यासोबत यापोमधले काही बांधवही गेले.

तिथे पोचल्यावर जेव्हा कर्नेल्यने पेत्रला पाहिलं, तेव्हा त्याने गुडघे टेकून त्याला नमस्कार केला. पण, पेत्रने त्याला म्हटलं: ‘ऊठ, उभा राहा! मीसुद्धा एक माणूसच आहे. यहुदी लोक दुसऱ्‍या जातीच्या लोकांच्या घरी जात नाहीत. असं असलं, तरी देवाने मला तुझ्या घरी यायला सांगितलं आहे. तू मला का बोलवलं आहेस, ते मला सांग.’

कर्नेल्यने पेत्रला सांगितलं: ‘चार दिवसांआधी मी देवाला प्रार्थना करत होतो. तेव्हा एका देवदूताने मला सांगितलं की मी तुला बोलावून घ्यावं. यहोवाने तुला जे शिकवायला सांगितलं आहे, ते सर्व आम्हाला शिकव.’ पेत्र म्हणाला: ‘आता मला समजलं आहे, की देव भेदभाव करत नाही. त्याची उपासना करण्याची ज्याला कोणाला इच्छा आहे, त्या सर्वांना तो स्वीकारतो.’ पेत्रने त्यांना येशूबद्दल खूपसाऱ्‍या गोष्टी शिकवल्या. मग कर्नेल्य आणि तिथे असलेल्यांवर पवित्र आत्मा आला. त्यानंतर त्या सर्वांनी बाप्तिस्मा घेतला.

“प्रत्येक राष्ट्रात जो कोणी [देवाची] भीती बाळगून योग्य ते करतो, त्याचा तो स्वीकार करतो.” —प्रेषितांची कार्ये १०:३५