व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ २

देवाने पहिला पुरुष आणि पहिली स्त्री बनवली

देवाने पहिला पुरुष आणि पहिली स्त्री बनवली

यहोवाने एदेन नावाच्या ठिकाणी एक बाग लावली. या बागेत खूपसारी फुलं, झाडं आणि प्राणी होते. मग देवाने मातीतून पहिला पुरुष बनवला आणि त्याच्या नाकात श्‍वास फुंकला. मग काय झालं तुला माहीत आहे? तो पुरुष जिवंत झाला! त्याचं नाव होतं आदाम. यहोवाने त्याला बागेची देखरेख करण्याचं आणि सर्व प्राण्यांना नावं देण्याचं काम दिलं.

मग यहोवाने आदामला एक खूप महत्त्वाचा नियम दिला. तो आदामला म्हणाला: ‘तू बागेच्या सर्व झाडांची फळं खाऊ शकतो. पण त्यातल्या एका खास झाडाचं फळ तू खाऊ नको. तू जर ते खाल्लं तर तू मरशील.’

नंतर यहोवा म्हणाला: ‘मी आणखीन एक व्यक्‍ती बनवणार आहे. ती आदामला मदत करेल.’ त्यामुळे त्याने असं काहीतरी केलं, ज्यामुळे आदामला गाढ झोप लागली. मग देवाने त्याची एक फासळी काढली आणि त्यातून स्त्री बनवली. ती आदामची पत्नी झाली. तिचं नाव होतं हव्वा. आदाम आणि हव्वा यांचं मिळून पहिलं कुटुंब बनलं. तिला पाहून आदामला कसं वाटलं? आदामला खूप आनंद झाला. त्याने म्हटलं: ‘यहोवाने माझ्या फासळीतून किती सुंदर स्त्री बनवली. ही तर माझ्यासारखी आहे!’

यहोवाने आदाम आणि हव्वा यांना सांगितलं: ‘तुमचं कुटुंब वाढवा आणि ही पृथ्वी भरून टाका.’ यहोवाची इच्छा होती, की त्यांनी आनंदाने मिळून या पूर्ण पृथ्वीला एक सुंदर बाग किंवा नंदनवन बनवावं; अगदी एदेन बागेसारखं. पण यहोवाच्या इच्छेप्रमाणे झालं नाही. असं का? याबद्दल पुढच्या धड्यात सांगितलं आहे.

“निर्माणकर्त्याने सुरुवातीपासूनच त्यांना स्त्री व पुरुष असं निर्माण केलं.” —मत्तय १९:४