पाठ २६
बारा गुप्तहेर
इस्राएली लोक सीनाय डोंगराजवळून निघाले. ते पारानच्या वाळवंटातून प्रवास करत कादेश नावाच्या ठिकाणी पोचले. तिथे यहोवाने मोशेला म्हटलं: ‘मी इस्राएली लोकांना कनान देश देणार आहे. त्यामुळे प्रत्येक कुळातून एक-एक अशा १२ गुप्तहेरांना तिथे पाठव. तो देश कसा आहे, हे पाहून येण्यासाठी त्यांना सांग.’ मोशेने १२ पुरुषांची निवड केली आणि त्यांना सांगितलं: ‘कनानमध्ये जा आणि पाहा, की तिथली जमीन शेतीसाठी चांगली आहे की नाही? तिथले लोक कमजोर आहेत की ताकदवान? ते तंबूंमध्ये राहतात की शहरात?’ त्यानंतर, १२ गुप्तहेर कनानला जायला निघाले. त्यांच्यात यहोशवा आणि कालेबसुद्धा होते.
४० दिवसांनंतर गुप्तहेर कनान देश पाहून परत आले. येताना ते त्यांच्यासोबत अंजीरं, डाळिंबं आणि द्राक्षं घेऊन आले. आल्यानंतर ते म्हणाले: ‘तो देश खूप चांगला आहे. पण, तिथले लोक खूप ताकदवान आहेत आणि शहरांच्या भिंतीही खूप उंच आहेत.’ मग, कालेब म्हणाला: ‘पण आपण त्यांना हरवू शकतो. चला आपण लगेच जाऊ!’ कालेब असं का बोलला तुला माहीत आहे? कारण त्याला आणि यहोशवाला यहोवावर पूर्ण भरवसा होता. पण, बाकीचे गुप्तहेर म्हणाले: ‘नाही, नाही. तिथले लोक खूप धिप्पाड आणि शक्तिशाली आहेत. आम्ही तर त्यांच्यासमोर लहानशा किड्यांसारखे वाटत होतो.’
हे ऐकून इस्राएली लोक खूप निराश झाले. ते तक्रार करू लागले आणि एकमेकांना असं बोलू लागले: ‘आपलं मार्गदर्शन करण्यासाठी आपण दुसऱ्या कोणालातरी निवडू आणि परत मिसरला जाऊ. कनानमध्ये जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालण्यात काय अर्थ आहे?’
मग यहोशवा आणि कालेबने त्यांना समजावलं: ‘यहोवाच्या म्हणण्याप्रमाणे करा. घाबरू नका. तो आपलं रक्षण करेल.’ पण, इस्राएली लोक ऐकायला तयारच नव्हते. त्यांना तर यहोशवा आणि कालेबचा जीवसुद्धा घ्यायचा होता!मग यहोवाने काय केलं? तो मोशेला म्हणाला: ‘मी इस्राएली लोकांसाठी इतकं करूनसुद्धा ते माझं ऐकायला तयार नाहीत. म्हणून ते रानात ४० वर्षं राहतील आणि तिथेच मरून जातील. जो देश मी त्यांना देण्याचं वचन दिलं आहे तिथे फक्त त्यांची मुलं, तसंच यहोशवा आणि कालेब हे जातील.’
“इतकं का घाबरता? किती कमी विश्वास आहे तुमच्यात!” —मत्तय ८:२६