व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ३०

राहाब गुप्तहेरांना लपवते

राहाब गुप्तहेरांना लपवते

इस्राएलचे गुप्तहेर जेव्हा यरीहो शहरात गेले, तेव्हा ते राहाबच्या घरी राहिले. यरीहोच्या राजाला ही गोष्ट समजली, तेव्हा त्याने सैनिकांना राहाबच्या घरी पाठवलं. सैनिक आले तेव्हा तिने त्या दोन गुप्तहेरांना घराच्या छतावर लपवलं आणि सैनिकांना दुसऱ्‍या दिशेने पाठवलं. त्यानंतर तिने त्यांना म्हटलं: ‘यहोवा तुमच्या बाजूने आहे आणि तुम्ही हा देश नक्की जिंकणार, हे मला माहीत आहे. म्हणून मी तुम्हाला मदत करेन. पण तुम्ही माझ्या कुटुंबाला वाचवाल, असं मला वचन द्या.’

गुप्तहेरांनी राहाबला म्हटलं: ‘आम्ही तुला वचन देतो, की तुझ्या घरी जे असतील त्यांना काहीच होणार नाही.’ त्यांनी तिला सांगितलं: ‘तुझ्या खिडकीला एक लाल दोरी बांध. त्यामुळे तुझं कुटुंब वाचेल.’

राहाबने एका रस्सीच्या मदतीने गुप्तहेरांना खिडकीतून खाली उतरवलं. मग ते गुप्तहेर डोंगरांकडे गेले आणि तीन दिवसांसाठी तिथे लपून राहिले. त्यानंतर ते यहोशवाकडे परत गेले. मग इस्राएली लोकांनी यार्देन नदी पार केली आणि ते कनान देश मिळवण्याची तयारी करू लागले. त्यांनी सर्वात आधी यरीहो शहर जिंकलं. यहोवाने त्यांना दिवसातून एकदा यरीहो शहराला फेरी मारायला सांगितली. असं त्यांना सहा दिवस करायचं होतं. पण, सातव्या दिवशी त्यांना सात वेळा फेरी मारायची होती. त्यानंतर याजकांनी कर्णा वाजवला आणि सैनिक खूप मोठ्याने ओरडले. त्याच वेळी शहराच्या भिंती कोसळल्या! पण, राहाबचं घर ज्या भिंतीवर होतं ती कोसळली नाही. त्यामुळे राहाबचं घर सुरक्षित राहिलं. राहाब आणि तिच्या कुटुंबाने यहोवावर भरवसा ठेवल्यामुळे त्यांचा जीव वाचला.

“त्याचप्रमाणे . . . गुप्तहेरांचा पाहुणचार करून त्यांना वेगळ्या वाटेने पाठवून दिल्यामुळे [राहाबलासुद्धा] कार्यांद्वारेच नीतिमान ठरवण्यात आले नव्हते का?”—याकोब २:२५