व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ३३

रूथ आणि नामी

रूथ आणि नामी

एक वेळ अशी आली, जेव्हा इस्राएल देशात लोकांना खायला अन्‍न नव्हतं. तिथे दुष्काळ पडला होता. त्यामुळे नामी नावाची इस्राएली स्त्री तिच्या पतीसोबत आणि दोन मुलांसोबत मवाब देशात राहायला गेली. काही काळाने नामीचा पती मरून गेला. तिच्या मुलांनी रूथ आणि अर्पा नावाच्या मवाबी स्त्रियांशी लग्न केलं. दुःखाची गोष्ट म्हणजे, काही काळाने नामीची दोन्ही मुलंही मरून गेली.

काही काळाने इस्राएल देशातला दुष्काळ संपला. नामीला हे कळलं तेव्हा तिने परत आपल्या घरी, इस्राएलला जाण्याचं ठरवलं. रूथ आणि अर्पाही तिच्यासोबत निघाल्या. पण रस्त्याने जात असताना, नामी मध्येच त्यांना म्हणाली: ‘तुम्ही दोघी खरंच खूप चांगल्या आहात. माझ्या मुलांसोबत आणि माझ्यासोबत तुम्ही खूप प्रेमाने वागलात. पण आता तुम्ही मवाब देशात, आपआपल्या घरी परत जा. पुन्हा लग्न करा आणि सुखाने राहा.’ यावर रूथ आणि अर्पा म्हणाल्या: ‘आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आम्ही नाही जाणार तुम्हाला सोडून.’ पण नामीने त्यांना खूप समजावलं. शेवटी, अर्पा मवाबला परत जायला निघाली. पण रूथ मात्र थांबली. हे बघून नामी तिला म्हणाली: ‘बघ, अर्पा तिच्या लोकांकडे आणि तिच्या देवांकडे परत चालली आहे. तूही तिच्यासोबत परत जा. तुझ्या आईच्या घरी जा.’ पण रूथने म्हटलं: ‘नाही. मी तुम्हाला सोडून मुळीच जाणार नाही. तुमचे लोक, माझे लोक होतील. तुमचा देव, माझा देव होईल.’ हे ऐकून नामीला कसं वाटलं असेल, तुला काय वाटतं?

रूथ आणि नामी इस्राएल देशात पोचले. त्या वेळी इस्राएलमध्ये सातू या धान्याच्या कापणीची सुरुवात झाली होती. एक दिवस रूथ एका शेतात उरलेलं धान्य जमा करायला गेली. ते शेत बवाज नावाच्या माणसाचं होतं. बवाज राहाबचा मुलगा होता. रूथ एक मवाबी स्त्री आहे आणि ती नामीला कशी विश्‍वासू राहिली आहे, याबद्दल त्याने ऐकलं होतं. त्याने शेतात काम करणाऱ्‍यांना, रूथसाठी थोडं जास्त धान्य सोडून द्यायला सांगितलं.

त्या संध्याकाळी नामीने रूथला विचारलं: ‘रूथ, आज कोणाच्या शेतात काम केलंस तू?’ रूथने उत्तर दिलं: ‘बवाज नावाच्या माणसाच्या शेतात.’ मग नामी म्हणाली: ‘बवाज? तो तर माझ्या पतीचा नातेवाईक आहे. तू त्याच्याच शेतात दुसऱ्‍या स्त्रियांसोबत काम करत राहा. तिथे तू सुरक्षित राहशील.’

त्यामुळे कापणी संपेपर्यंत रूथ बवाजच्या शेतात काम करत राहिली. बवाजने पाहिलं, की रूथ मेहनती आहे आणि तिच्यात खूप चांगले गुण आहेत. रूथचा पती मरून गेला होता आणि तिला मुलंही नव्हती. अशा परिस्थितीत, त्या काळी रूथच्या पतीचा एखादा नातेवाईक रूथशी लग्न करू शकत होता. म्हणून बवाजने रूथशी लग्न केलं. त्यांना एक मुलगा झाला. त्याचं नाव ओबेद. नामीच्या मैत्रिणी खूप खूश झाल्या. त्या नामीला म्हणाल्या: ‘यहोवाने आधी तुला रूथसारखी सून दिली, जी तुझ्यासोबत खूप चांगली वागली. आणि आता तर तुला नातूसुद्धा दिला. यहोवाची स्तुती होवो.’ ओबेद हा पुढे जाऊन दावीद राजाचा आजोबा बनला.

“एखादा असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षाही आपणास धरून राहतो.”—नीतिसूत्रे १८:२४