व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ४२

धाडसी आणि विश्‍वासू योनाथान

धाडसी आणि विश्‍वासू योनाथान

योनाथान हा शौल राजाचा सर्वात मोठा मुलगा होता. तो खूप धाडसी योद्धा होता. दावीदने म्हटलं की योनाथानचा वेग गरुडापेक्षा आणि त्याची ताकद सिंहापेक्षा जास्त आहे. एक दिवस योनाथानने काही पलिष्टी सैनिकांना एका टेकडीवर पाहिलं. त्याची हत्यारं घेऊन चालणाऱ्‍या माणसाला तो म्हणाला: ‘यहोवाने आपल्याला काहीतरी चिन्ह दिलं, तरच आपण त्यांच्यावर हल्ला करू. म्हणजे जर पलिष्टी लोकांनी आपल्याला वर यायला सांगितलं, तर याचा अर्थ होईल की आपण त्यांच्यावर हल्ला केला पाहिजे.’ पलिष्टी लोक ओरडले: ‘वर या. लढा आमच्यासोबत!’ त्यामुळे ते दोघे त्या टेकडीवर चढले. त्यांनी तिथे असलेल्या २० सैनिकांना हरवून टाकलं.

योनाथान शौलचा मोठा मुलगा असल्यामुळे, पुढचा राजा तोच असणार होता. पण यहोवाने दावीदला इस्राएलचा राजा होण्यासाठी निवडलं होतं. ही गोष्ट योनाथानला माहीत होती. तरीसुद्धा तो दावीदवर जळत नव्हता. याउलट, योनाथान आणि दावीद हे जिवलग मित्र बनले. त्यांनी एकमेकांचं रक्षण करण्याचं आणि एकमेकांच्या बाजूने बोलण्याचं वचनसुद्धा दिलं. योनाथानने दावीदला आपला झगा, तलवार, धनुष्य आणि कमरेचा पट्टा दिला. या गोष्टी देऊन त्याने दाखवलं, की तो दावीदचा मित्र आहे.

दावीद आपला जीव वाचवण्यासाठी शौलपासून पळत होता. तेव्हा योनाथान त्याच्याकडे गेला आणि त्याला म्हणाला: ‘घाबरू नकोस, हिंमत धर. राजा होण्यासाठी यहोवाने तुलाच निवडलं आहे. आणि ही गोष्ट माझ्या वडिलांनासुद्धा माहीत आहे.’ तुलाही योनाथानसारखा चांगला मित्र हवा आहे का?

आपल्या मित्राला मदत करण्यासाठी योनाथानने अनेक वेळा आपला जीव धोक्यात घातला. त्याला माहीत होतं, की शौलला दावीदचा जीव घ्यायचा आहे. म्हणून तो आपल्या वडिलांना म्हणाला: ‘दावीदने काहीच चुकीचं केलेलं नाही. तुम्ही त्याला मारून टाकलं, तर ते पाप ठरेल.’ हे ऐकून शौलला योनाथानचा खूप राग आला.

काही वर्षांनंतर, शौल आणि योनाथान दोघंही एका लढाईत मरून गेले. योनाथान मरून गेल्यानंतर, दावीद त्याच्या मुलाला म्हणजे मफीबोशेथला शोधू लागला. जेव्हा मफीबोशेथ सापडला तेव्हा दावीद त्याला म्हणाला: ‘तुझे बाबा माझे खूप चांगले मित्र होते. म्हणून इथून पुढे मी तुझी काळजी घेईन. तू आयुष्यभर माझ्या महालात राहशील आणि माझ्यासोबत जेवशील.’ दावीद आपल्या मित्राला, योनाथानला कधीच विसरला नाही.

“ज्याप्रमाणे मी तुमच्यावर प्रेम केलं आहे, त्याचप्रमाणे तुम्हीही एकमेकांवर प्रेम करा. कोणी आपल्या मित्रांसाठी आपला प्राण द्यावा यापेक्षा मोठं प्रेम कोणतंच असू शकत नाही.”—योहान १५:१२, १३