व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ४६

कर्मेल डोंगरावर घडलेली परीक्षा

कर्मेल डोंगरावर घडलेली परीक्षा

दहा वंशांनी बनलेल्या इस्राएलच्या राज्यात खूपसारे वाईट राजे होते. पण अहाब हा सर्वात वाईट राजा होता. त्याने ईजबेल नावाच्या एका दुष्ट स्त्रीशी लग्न केलं. ईजबेल बआल देवाची उपासना करायची. अहाब आणि ईजबेलमुळे संपूर्ण देशात बआल देवाची उपासना होऊ लागली. इतकंच काय, तर त्या दोघांनी यहोवाच्या संदेष्ट्यांचा खूनही केला. मग यहोवाने काय केलं? त्याने एलीया नावाच्या एका संदेष्ट्याला अहाब राजाकडे संदेश घेऊन पाठवलं.

एलीयाने अहाब राजाला सांगितलं, की त्याच्या वाईट कामांमुळे इस्राएल देशात पाऊस पडणार नाही. मग तीन वर्षांपेक्षा जास्त काळ पाऊस पडला नाही. शेतात पीक उगवलं नाही आणि लोकांना खायला मिळालं नाही. त्यानंतर यहोवाने एलीयाला परत अहाबकडे पाठवलं. राजा त्याला म्हणाला: ‘ही सर्व संकटं तुझ्यामुळेच आली आहेत. तूच जबाबदार आहेस!’ यावर एलीयाने म्हटलं: ‘मी नाही आणला हा दुष्काळ! तू बआल देवाची उपासना करतोस म्हणूनच हे घडलं. चल, आपण एक परीक्षा घेऊन पाहू. मग खरा देव कोण आहे हे सर्वांना कळेल. देशातल्या सर्व लोकांना आणि बआलच्या संदेष्ट्यांना कर्मेल डोंगरावर बोलव.’

त्यानंतर सर्व लोक डोंगरावर आले. एलीया त्यांना म्हणाला: ‘आजच काय ते ठरवा. जर यहोवा खरा देव आहे तर त्याची उपासना करा. पण जर बआल देव असेल तर त्याची उपासना करा. मी तुम्हाला एक आव्हान देतो. बआलच्या ४५० संदेष्ट्यांना एक अर्पण तयार करायला सांगा. मग त्यांना त्यांच्या देवाला हाक मारायला सांगा. मीसुद्धा एक अर्पण तयार करेन आणि यहोवाला प्रार्थना करेन. जो देव आग पाठवून उत्तर देईल, तोच खरा देव असेल.’ लोकांनी एलीयाचं आव्हान स्वीकारलं.

मग बआलच्या संदेष्ट्यांनी अर्पण तयार केलं. ते दिवसभर त्यांच्या देवाला हाक मारून म्हणत होते: ‘हे बआल आम्हाला उत्तर दे!’ पण बआलने काहीच उत्तर दिलं नाही. तेव्हा एलीया बआलला चिडवू लागला. तो म्हणाला: ‘बआल कदाचित झोपला असेल. त्याला उठवायला हवं. अजून मोठ्याने हाक मारा म्हणजे त्याला जाग येईल.’ बआलचे संदेष्टे संध्याकाळपर्यंत हाक मारत राहिले. पण तरीसुद्धा त्यांना काहीच उत्तर मिळालं नाही.

त्यानंतर एलीयाने त्याचं अर्पण वेदीवर ठेवलं. त्याने संपूर्ण वेदीवर पाणी ओतलं. मग त्याने प्रार्थना केली: ‘हे यहोवा, या लोकांना समजू दे की तूच खरा देव आहेस.’ त्याच क्षणी यहोवाने आकाशातून आग पाठवली आणि ते अर्पण जळून गेलं. लोक ओरडू लागले: ‘यहोवाच खरा देव आहे!’ एलीया म्हणाला: ‘बआलच्या संदेष्ट्यांना पकडा! एकालाही जाऊ देऊ नका!’ त्या दिवशी बआलच्या ४५० संदेष्ट्यांना मारून टाकण्यात आलं.

मग समुद्रावर एक लहानसा ढग दिसू लागला. एलीया अहाबला म्हणाला: ‘वादळ येत आहे. रथात बसून लवकर घरी जा.’ आकाशात काळे ढग जमा झाले. वारा वाहू लागला आणि धो-धो पाऊस पडू लागला. शेवटी दुष्काळ संपला होता. अहाब आपला रथ शक्य तितक्या वेगाने पळवू लागला. पण, यहोवाच्या मदतीने एलीया त्या रथापेक्षाही जास्त वेगाने धावला! दुष्काळ तर संपला होता, पण एलीयाच्या समस्या संपल्या होत्या का? चला पाहू या.

“ज्या तुझे नाव यहोवा असे आहे तो तूच मात्र अवघ्या पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांनी जाणावे.”—स्तोत्र ८३:१८, पं.र.भा.