व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ५६

योशीयाचं देवाच्या नियमांवर प्रेम होतं

योशीयाचं देवाच्या नियमांवर प्रेम होतं

योशीया आठ वर्षांचा असताना यहूदाचा राजा झाला. त्या काळात तिथले लोक जादूटोणा आणि मूर्तिपूजा करायचे. योशीया १६ वर्षांचा असताना यहोवाची उपासना योग्य पद्धतीने कशी केली जाते, हे शिकण्याचा प्रयत्न करू लागला. मग २० वर्षांचा झाल्यावर त्याने पूर्ण देशातून खोट्या देवांच्या मूर्तींचा आणि वेदींचा नाश करायला सुरुवात केली. त्यानंतर जेव्हा तो २६ वर्षांचा झाला, तेव्हा त्याने यहोवाच्या मंदिराची दुरुस्ती करून घेतली.

हिल्कीया महायाजकाला मंदिरात यहोवाच्या नियमांची गुंडाळी सापडली. ही गुंडाळी कदाचित मोशेने स्वतः लिहिलेली असावी. योशीया राजाचा सचिव शाफान याने ती गुंडाळी योशीयाकडे आणली आणि मोठ्याने वाचून दाखवली. तेव्हा योशीयाला कळलं, की लोकांनी खूप वर्षांपासून यहोवाच्या आज्ञा पाळायचं सोडून दिलं होतं. मग योशीया राजा, हिल्कीयाला म्हणाला: ‘यहोवा आपल्यावर खूप रागावला आहे. जाऊन यहोवाशी बोल. आपण काय केलं पाहिजे, हे तो आपल्याला सांगेल.’ यहोवाने हुल्दा संदेष्ट्रीद्वारे उत्तर दिलं. तो म्हणाला: ‘यहूदाच्या लोकांनी मला सोडलं आहे. मी त्यांना शिक्षा करेन. पण योशीयाने नम्रता दाखवल्यामुळे, तो राजा असेपर्यंत मी असं करणार नाही.’

हा संदेश ऐकल्यावर योशीया राजा मंदिरात गेला. त्याने यहूदाच्या सर्व लोकांना एकत्र यायला सांगितलं. मग त्याने यहोवाचे नियम मोठ्याने वाचून दाखवले. त्यानंतर योशीया आणि लोकांनी वचन दिलं, की ते पूर्ण मनाने यहोवाचे नियम पाळतील.

यहूदाच्या लोकांनी अनेक वर्षांपासून वल्हांडणाचा सण साजरा केला नव्हता. पण हा सण दरवर्षी साजरा केला जावा, हे योशीयाने नियमांमध्ये वाचलं. तेव्हा त्याने लोकांना म्हटलं: ‘आपण यहोवासाठी वल्हांडणाचा सण साजरा करू या.’ मग योशीयाने खूप बलिदानं अर्पण करण्याची आणि मंदिरात गीत गाणाऱ्‍यांची व्यवस्था केली. सर्व लोकांनी वल्हांडणाचा सण साजरा केला. त्यानंतर सात दिवसांसाठी त्यांनी बेखमीर भाकरींचा सणसुद्धा साजरा केला. शमुवेल संदेष्ट्याच्या काळापासून अशा प्रकारचा वल्हांडण सण, केव्हाही साजरा करण्यात आला नव्हता. खरंच, देवाच्या नियमांवर योशीयाचं मनापासून प्रेम होतं. तुलासुद्धा यहोवाबद्दल शिकायला आवडतं का?

“तुझे वचन माझ्या पावलांकरता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाश आहे.” —स्तोत्र ११९:१०५