व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ५४

यहोवा योनाशी सहनशीलतेने वागला

यहोवा योनाशी सहनशीलतेने वागला

अश्‍शूर देशात निनवे नावाचं एक शहर होतं. त्या शहराचे लोक खूप दुष्ट होते. यहोवाने योना संदेष्ट्याला निनवेला जायला सांगितलं होतं. तिथल्या लोकांनी आपली वाईट कामं सोडून द्यावी, अशी सूचना देण्यासाठी यहोवाने त्याला सांगितलं. पण योना मात्र निनवेच्या उलट दिशेला पळाला. तो तार्शिशला जाणाऱ्‍या एका जहाजावर चढला आणि ते जहाज तार्शिशला जायला निघालं.

जहाज समुद्रात असताना एक भयंकर वादळ आलं. जहाजाचे नाविक घाबरले. त्यांनी आपआपल्या देवांना प्रार्थना केली. ते विचारू लागले: ‘हे सर्व का होत आहे?’ शेवटी योनाने त्यांना सांगितलं: ‘हे सर्व माझ्यामुळे होत आहे. यहोवाने मला एक काम दिलं होतं. पण मी त्यापासून दूर पळून जात आहे. तुम्ही मला समुद्रात फेकून द्या, मगच हे वादळ शांत होईल.’ खरंतर, त्या नाविकांना योनाला समुद्रात टाकायचं नव्हतं. पण योनाने त्यांना पुन्हा-पुन्हा तेच सांगितलं. शेवटी जेव्हा त्यांनी योनाला समुद्रात टाकलं, तेव्हा कुठे वादळ शांत झालं.

आता आपण मरणार असं योनाला वाटलं. समुद्रात खोल, अगदी खोलवर बुडत असताना त्याने यहोवाला प्रार्थना केली. मग यहोवाने एक मोठा मासा पाठवला. त्या माशाने योनाला गिळलं. पण योना मेला नाही. यहोवाने त्याला त्या माशाच्या पोटात सुरक्षित ठेवलं. तिथून त्याने यहोवाला प्रार्थना केली: ‘मी वचन देतो यहोवा, मी तुझं नेहमी ऐकेन.’ मग तीन दिवसांनंतर यहोवाने असं काहीतरी केलं, की त्या माशाने योनाला बाहेर कोरड्या जमिनीवर टाकून दिलं.

यहोवाने योनाला वाचवलं. मग आता योनाला निनवेला जाण्याची गरज नव्हती का? असं नाही. यहोवाने त्याला निनवेला जायला पुन्हा एकदा सांगितलं. या वेळी मात्र योनाने यहोवाचं ऐकलं. तिथे पोचल्यावर त्याने तिथल्या दुष्ट लोकांना सांगितलं: ‘चाळीस दिवसांत निनवेचा नाश होईल.’ मग योनाला ज्याची अपेक्षा नव्हती ते घडलं. निनवेच्या लोकांनी योनाचं ऐकलं आणि वाईट कामं करण्याचं सोडून दिलं. निनवेच्या राजाने लोकांना सांगितलं: ‘देवाला प्रार्थना करून त्याच्याकडे माफी मागा आणि वाईट कामं करण्याचं सोडून द्या. असं केल्यामुळे कदाचित तो आपल्याला माफ करेल आणि आपला नाश करणार नाही.’ लोकांनी वाईट कामं करण्याचं सोडून दिलं आहे, हे जेव्हा यहोवाने पाहिलं तेव्हा त्याने त्यांचा नाश केला नाही.

निनवे शहराचा नाश झाला नाही यामुळे योना रागावला. विचार कर, यहोवा योनाशी किती सहनशीलतेने आणि दयाळूपणे वागला. पण योना मात्र निनवेच्या लोकांना दया दाखवायला तयार नव्हता. याउलट तो रागावला आणि शहराबाहेर एका भोपळ्याच्या वेलाच्या सावलीत जाऊन बसला. पण तो वेल मरून गेला तेव्हा योनाला राग आला. मग यहोवा त्याला म्हणाला: ‘तुला निनवेच्या लोकांपेक्षा या वेलाबद्दल जास्त वाईट वाटलं, हो ना? मग मी निनवेच्या लोकांवर दया दाखवली आणि त्यांचा नाश केला नाही, तर ते बरोबर नाही का?’ यहोवा योनाला काय समजवण्याचा प्रयत्न करत होता? हेच की कुठल्याही वेलापेक्षा निनवेच्या लोकांचा जीव जास्त महत्त्वाचा होता.

“तुमच्या बाबतीत [यहोवा] सहनशीलता दाखवतो, कारण कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सगळ्यांनी पश्‍चात्ताप करावा असे त्याला वाटते.”—२ पेत्र ३:९