व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ५२

यहोवाची आगीची सेना

यहोवाची आगीची सेना

अरामचा राजा बेनहदाद हा इस्राएलवर सारखा हल्ला करायचा. पण दर वेळी अलीशा संदेष्टा इस्राएलच्या राजाला सावध करायचा. यामुळे स्वतःला वाचवणं राजाला शक्य व्हायचं. म्हणून बेनहदाद राजाने अलीशाला पकडण्याचं ठरवलं. अलीशा दोथान शहरात असल्याचं त्याला कळलं. त्याला पकडण्यासाठी त्याने अरामच्या सैनिकांना तिथे पाठवलं.

अरामचे सैनिक रात्री दोथानला पोचले. दुसऱ्‍या दिवशी सकाळी अलीशाचा सेवक जेव्हा बाहेर गेला, तेव्हा त्याने पाहिलं की शहराला मोठ्या सैन्याने चारही बाजूंनी घेरलं आहे. तो घाबरला आणि ओरडला: ‘अलीशा, आता काय करायचं आपण?’ अलीशा त्याला म्हणाला: ‘त्यांच्या सैनिकांपेक्षा आपल्याकडे जास्त सैनिक आहेत.’ त्याच वेळी यहोवाने अलीशाच्या सेवकाला एक दृश्‍य दाखवलं. त्याने पाहिलं की शहराच्या चारही बाजूला असलेले डोंगर, घोड्यांनी आणि आगीच्या रथांनी भरून गेले आहेत.

जेव्हा अरामचे सैनिक अलीशाला पकडायला आले, तेव्हा त्याने मदतीसाठी यहोवाकडे प्रार्थना केली. मग यहोवाने असं काहीतरी केलं, ज्यामुळे ते सैनिक गोंधळून गेले आणि त्यांना कळलंच नाही की ते कुठे आहेत. अलीशा त्यांना म्हणाला: ‘तुम्ही चुकीच्या शहरात आला आहात. माझ्यामागून या. तुम्ही ज्या माणसाला शोधत आहात त्याच्यापर्यंत मी तुम्हाला घेऊन जातो.’ ते सैनिक अलीशाच्या मागून शोमरोन शहरापर्यंत गेले. तिथे इस्राएलचा राजा राहायचा.

अरामच्या सैनिकांना समजलं, की ते शोमरोनमध्ये पोचले आहेत. पण तिथून पळून जाणं आता त्यांना शक्य नव्हतं. इस्राएलच्या राजाने अलीशाला विचारलं: ‘मी यांना मारून टाकू का?’ खरंतर, अलीशाकडे बदला घेण्याची ही चांगली संधी होती कारण अरामचे सैनिक त्याला पकडून न्यायला आले होते. पण त्याने असं केलं का? नाही. याउलट अलीशा राजाला म्हणाला: ‘नको, त्यांचा जीव घेऊ नकोस. त्यांना खाऊ-पिऊ घाल आणि परत जाऊ दे.’ यामुळे, राजाने त्या सैनिकांना मोठी मेजवानी दिली आणि मग त्यांना घरी पाठवून दिलं.

“देवाच्या बाबतीत आपल्याला ही खातरी आहे, की त्याच्या इच्छेनुसार असलेले काहीही आपण मागितले तरी तो आपले ऐकतो.”—१ योहान ५:१४