दोन शब्द पालकांसाठी
कोणतं छान बक्षीस तुम्ही तुमच्या मुलांना द्याल? तसं तर त्यांना पुष्कळ गोष्टी लागतात; शिवाय, तुमचं प्रेम, तुमचं मार्गदर्शन, तुमचा आधार लागतोच. पण या सर्वांहून छान बक्षीस तुम्ही त्यांना देऊ शकता; ते म्हणजे यहोवा देवाबद्दलचं ज्ञान आणि त्याचं वचन बायबल यात असलेलं सत्य. (योहान १७:३) हे ज्ञान घेऊन ते यहोवावर प्रेम करू लागतील आणि अगदी कोवळ्या वयापासूनच त्याची सेवा मनापासून करायला शिकतील.—मत्तय २१:१६.
लहान मुलांना छोट्या छोट्या गोष्टी ऐकायला व करायला आवडतात, असं बहुतेक पालकांच्या पाहण्यात आलं आहे. त्यामुळं चिमुकल्यांसाठी, बायबल धडे हे प्रकाशन सादर करण्यास आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. प्रत्येक धड्यात बायबलमधलं एखादं तत्त्व किंवा एखादा पाठ सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मुलांना कोणत्याही विषयाचं आकलन चित्रांमुळं सुलभ होतं. त्या दृष्टीनं प्रस्तुत प्रकाशनात पानोपानी रंगीत सुंदर चित्रं व त्यासोबत असलेली वाक्यं, खासकरून तीन व त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांकरता बनवण्यात आली आहेत. मुलांसोबत तुम्ही करू शकत असलेले उपक्रम यात सुचवण्यात आले आहेत. बायबल धडे माहितीपत्रक हे मुलांच्या खेळण्यासाठी बनवण्यात आलेलं नाहीए. तर ते तुम्ही तुमच्या मुलांसोबत वाचलं पाहिजे जेणेकरून तुमच्या दोघांत यावर संभाषण होईल.
मुलांना “बालपणापासूनच” बायबलमधील सत्य शिकवण्यास हे माहितीपत्रक तुम्हाला मदत करेल, अशी आम्हाला पूर्ण खातरी आहे.—२ तीमथ्य ३:१४, १५.
आपले बांधव,
यहोवाच्या साक्षीदारांचे नियमन मंडळ