मरणावर विजय—तो तुम्हाकरता शक्य आहे का?
मरणावर विजय—तो तुम्हाकरता शक्य आहे का?
१. मरणावरील विजयाच्या कल्पनेबद्दल आमचा प्रतिसाद कसा असतो?
मरणावर विजय! अहाहा! मुळात ही कल्पनाच मानवी हृदयांना अतिशय सुखकर आहे. पण अगदी पुरातन काळापासून, याच्या अगदी उलट घडत आले आहे. मरणाने मानवजातीवर निरंकुश अधिपत्य गाजविलेले आहे. मग हा दिशाबदल कसा साध्य केला जाईल? कोण ते करू शकेल? मरणावर विजय तुम्हाकरता शक्य आहे का?
मरणाचा आरंभ
२, ३. ऋग्वेदानुसार मानवजातीस मरण कसे आले?
२ मरण ही वस्तुस्थिती आहे. ती दंतकथा नाही, हे आजही आपल्या शोकग्रस्त मानवी कुटुंबाला चांगले माहीत आहे. मरणाच्या आरंभाबद्दल पाहता, मरणाऱ्यात यम हा पहिला पुरूष होता, असे वर्णन हिंदूंच्या ऋग्वेदात आहे. ऋग्वेद सूचित करतो की, यम हे पहिल्या पुरूषाचे दुसरे नाव असून, त्याला जुळ्या बहिणी होत्या व या पैकीची यमी ही पहिली स्त्री होय. तेथे म्हटले आहे: “पृथ्वी व भविष्यकाळ यांचा विचार करता आपल्या पित्याचे आपत्त्य असा पुत्र व्हावा. होय, अस्तित्वातील एकमेव मर्त्याची संतती, हीच, देवांची तुझ्याकडून उत्कट अपेक्षा आहे.” (ऋग्वेद १०. १. ३)१ * अशाप्रकारे, ऋग्वेद यमाकडे “अस्तित्वातील एकमेव मर्त्य”, म्हणजेच पहिला पुरूष म्हणून पाहतो. तसेच “पृथ्वी व भविष्य काळ” यांच्यासाठी त्याने संतती निर्माण करावी अशी त्याच्याविषयी देवांची इच्छा असल्याचे वर्णनही करतो.
३ मानवजातीतील मृत्युच्या आरंभाबद्दल ऋग्वेद म्हणतो: “त्याने [यम] देवाच्या इच्छेस्तव मरणाची निवड केली. मनुष्य हिताचे जे चिरकालिक जीवन त्याची त्याने निवड केली नाही.” (ऋग्वेद १०. १३. ४) लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की, यम म्हणजेच “विराम.”२ * पृथ्वीवर चिरकालिक जीवनास विराम दिल्याबद्दल ख्याती असलेल्याला हे नाव यथार्थ आहे.
४. (अ) मरणाच्या आरंभाबद्दल पवित्र शास्त्रांतील वृत्तांताची आठवण ऋग्वेद करुन देत असल्यासारखे का दिसते? (ब) देवाने आदामास मरणाचे कारण कसे समजावले?
४ ऋग्वेदामधील ही अवतरणे पहिला पुरूष आणि पहिली स्त्री व त्यांनी मानवी कुटुंबात मरण कसे आणले याच्या, पवित्र शास्त्रातील अधिक पुरातन अहवालाची आठवण करून देतात असे दिसते. उदाहरणार्थ, पवित्र शास्त्रातील वृत्तांत खुलासा करतो की, पहिला पुरूष व स्त्री यांचे नाते फार जवळचे होते. आदामाने म्हटल्याप्रमाणे: “आता ही मात्र माझ्या हाडांतले हाड व मांसातले मांस” बनली होती. (उत्पत्ती २:२३) तसेच, त्यांनी ‘फलद्रूप व्हावे, बहुगुणित व्हावे व पृथ्वी व्यापून टाकावी’ अशी पहिल्या मानवी जोडप्याकरता देवाची इच्छा होती. (उत्पत्ती १:२८) शिवाय, पहिला पुरूष आदाम याने जाणून बुजून जीवनास धिक्कारून मरण पसंत केले. हे मनुष्यजातीच्या हिताचे नव्हते; कारण परिणामी देवाच्या निवाड्यानुसार त्याचे सर्व वंशज चिरकालिक जीवनाला मुकले. आनुवंशिकतेच्या स्वाभाविक नियमाने ती शिक्षा कार्यान्वित झाली. या कारणामुळे, पवित्र शास्त्र म्हणते: “आदामास तो म्हणाला: ‘तू आपल्या स्त्रीचे ऐकले आणि “ज्या झाडाचे फळ खाऊ नको” म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्ले; म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे. तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील. तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुनः मातीला जाऊन मिळशील. कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे. तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.’”—उत्पत्ती ३:१७, १९.
५. आदामाच्या वंशजावर याचा कसा परिणाम झाला व का?
५ पहिल्या मनुष्याच्या कृतीचा त्याच्या वंशजावर झालेला परिणाम सांगताना पवित्र शास्त्र म्हणते: “एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.” यावरून हे स्पष्ट होते की, सृष्टिकर्त्या परमेश्वराची अवज्ञा केल्याने शिक्षा म्हणून मरण आले. देवाची अवज्ञा करणे हे पाप आहे. आणि “पापाचे वेतन मरण आहे.”—रोम ५:१२; ६:२३.
६. (अ) पापाचे वेतन मरण आहे, या विधानाशी ऋग्वेद सहमत आहे का? (ब) ऋग्वेदाच्या लेखकांना देवाविषयी कोणती जबाबदारी जाणवली?
६ ऋग्वेद दर्शवितो की ईश्वरी कायद्याचा भंग हे पाप असून त्याची शिक्षा मरण होय. तेथे आम्ही वाचतो: “हे वरुणदेवा, सामान्य लोकांप्रमाणेच आमच्याकडूनही नित्य तुझ्या व्रताचा (नियमांचा) भंग होत असला तरी, क्रुद्ध होऊन तू आमच्यावर प्राणघातक शस्त्र चालवू नकोस.” (ऋग्वेद १. २५. १, २) यावरून वैदिक लेखकांना पापाची जाणीव होती व पापाबद्दल शिक्षा, या दृष्टीने ते मरणाकडे पाहात असे दिसते. यज्ञ व प्रार्थनांनी त्यांनी देवाचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. ऋग्वेदातील अनेक स्तोत्रे, पाप-क्षालनार्थ प्रार्थना व त्यांच्या देवांचे सांत्वन करणाऱ्या होमबलींना अनुसरुन आहेत. ते त्यांचा देव वरुण याला, बहुधा देवाविषयी वैधानिक जबाबदारीच्या जाणीवेने नैतिक आदेशांचा समर्थक मानीत.३ *
मरणाचे भय
७. मरणाच्या विचाराने मानवजातीवर काय परिणाम होतो?
७ आपल्या मानवी कुटुंबाच्या अनुभवांमध्ये मरण हा निश्चितच एक दुःखद घटक आहे. शोचनीय हानी आणि मागे राहिलेल्या दुःखितांना वाटणाऱ्या तीव्र असहाय्यतेशी त्याचा संबंध आहे. सर्वसामान्य मानवजातीला मरणाबद्दल कसलीही सद्भावना नाही. मरणाकरता मृत्यू असा संस्कृत शब्द आहे. ऋग्वेदात मृत्यूला मूर्तिमंत मरण व भयाचा पुत्र असे चित्रित करण्यात आले आहे. त्यावरुन भय आणि मरण यामधील अगदी घनिष्ठ संबंध सूचित होतो. खरोखर सुरवातीच्या वैदिक लिखाणात आलेल्या मृत्युच्या उल्लेखावरून, मरणाकडे भयग्रस्त दृष्टीने पाहिले जात असल्याचे स्पष्ट होते.४ *
८. मरणाच्या भयाबद्दल कोणती कबुली दिलेली आहे?
८ हिंदू लेखक रोहित मेहता मान्य करतात की, मरण, अनेकांच्या सुप्त भीतीचे दर्शन घडवते.५ * हिंदूच्या कथा-उपनिषदामधील एका रूपकाची चर्चा करताना श्री मेहता यांनी लिहिले: “तरूण व निर्भय अशा चौकस लोकांना आपले रहस्य सांगण्यास मरण का नाखुष होते? मर्त्य लोकांना मरणाचे रहस्य कळल्यास, त्यांना निश्चितच त्याचे भय राहणार नाही, असे कदाचित यमास वाटले असावे.”
९. (अ) मरणाच्या भयाने मानवजातीस कसे दास्यत्वांत टाकले आहे? (ब) हे भय दूर करण्यास कशामुळे साहाय्य मिळू शकेल?
९ मरणाच्या या भयाने मानवजातीस सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा व शुभ-अशुभाच्या मानसिक गुलामगिरीत जखडून ठेवले आहे. पवित्र शास्त्र “मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात” असलेल्यांचा उल्लेख करते. (इब्री. २:१५) मरणाच्या भयाने माणसे दास्यात कशी जखडली गेली आहेत? दैनंदिन जीवनाच्या हालचालींना रोकणाऱ्या शकुनाच्या कल्पना, चालीरीती व अंधश्रद्धा यांच्या जाचक बंधनामुळे. उदाहरणार्थ, “शकून ज्ञान” नावाचे हिंदू पुस्तक खगोल शास्त्राशी संबंधीत आहे.६ * “पालीचे शास्त्र” नावाचा शकुन कोश होता.७ * सर्वात वाईट शकुन म्हणजे मांजर आडवे जाणे; तो मरण सूचक होता. शकुनांविषयी वाटणारी अशा सर्व प्रकारची भीती मुळात मरणाच्या भयापासून उद्भवलेली आहे. तिचा मनुष्य ज्याप्रकारे जीवन व्यतित करतो त्यावर मोठा परिणाम झालेला आहे. मरण हे प्रत्यक्षात काय आहे याची समज झाल्यास, अशी भीती दूर होण्यास निश्चितच मदत होईल यात शंका नाही.
जीव आणि आत्मा—हे काय आहेत?
१०. (अ) मरणाबद्दल कोणते प्रश्न उपस्थित केले आहेत? (ब) आपल्याला खरी उत्तरे कशी मिळू शकतात?
१० मृत कोठे आहेत? मेलेले लोक कोणत्या अवस्थेत आहेत? खरोखर, मरणाच्या वेळी काय घडते? मृतांच्या अवस्थेविषयी असलेली बरीचशी अनिश्चितता, “जीव” व “आत्मा” या दोन शब्दांच्या समजुतीवर अवलंबून आहे. वरील प्रश्नांविषयी सत्य जाणण्यासाठी या दोन शब्दांचे मूळ अर्थ व धार्मिक टीकाकारांनी त्यांचे कालांतराने लावलेले अर्थ, यातील फरक जाणणे जरूरीचे आहे. याविषयातील सत्य जाणण्यास, नुसत्या मानवी स्पष्टीकरणाच्या तर्कांवर आधारित पूर्वग्रहाच्या आहारी न जाण्याची दक्षता बाळगली पाहिजे. अनेक वेळा, मानवी धार्मिक शिक्षक इतरांपेक्षा वेगळे स्पष्टीकरण देतात. तेव्हा, त्यातील काही स्पष्टीकरणे “जीव” आणि “आत्मा” या शब्दांच्या मूळ अर्थापासून वेगळी असणारच.
११, १२. (अ) “आत्मा” या शब्दाकरता संस्कृत शब्द काय आहे; आणि त्याचा अर्थ काय होतो? (ब) देव आत्मा आहे असे का म्हणतात?
११ उदाहरणार्थ, आत्मा या संस्कृत शब्दाचे भाषांतर करताना अनेकदा “जीव” हा शब्द वापरला जातो. ते बरोबर आहे का? हा संस्कृत शब्द, “श्वासोच्व्छास करणे” या अर्थाच्या अन् पासून बनला आहे असे काहीजण मानतात, तर इतर काही, “हालचाल” या अर्थाच्या अत् पासून असल्याचा, तर इतर वा म्हणजे “फुंकणे” यापासून आहे असे म्हणतात. सर्वात पुरातन शब्द “श्वासोच्व्छास करणे” या अर्थाच्या धातू पासून बनलेला असावा अशी कल्पना आहे.८ * पवित्र शास्त्र आरंभी ज्या इब्री व ग्रीक भाषांमध्ये लिहिले गेले त्यातील, “आत्मा” या शब्दाच्या प्रतिशब्दांशी त्याची तुलना करणे चित्तवेधक आहे. इब्री शब्द (रुʹह) आणि ग्रीक शब्द (न्युʹमा) या दोन्हींचा मूळ अर्थ “श्वास” किंवा “वायू” असा आहे. आणि “स्पिरिट” हा इंग्रजी शब्द, “स्पिरिटस्” म्हणजे “श्वास” या लॅटीन शब्दापासून आलेला आहे.
१२ “आत्मा” या शब्दासाठी वापरलेले हे इब्री, ग्रीक आणि इंग्रजी शब्द, वेगवेगळ्या रीतीने उपयोगात आणलेले आहेत. पण त्यांच्या सर्व वापरण्याच्या तऱ्हेत काही साम्य आहे:९ * ते सर्व, माणसांना अदृश्य व श्वास किंवा वायुप्रमाणे गतिमान शक्तीचे प्रमाण देणाऱ्या गोष्टीचा उल्लेख करतात. तेव्हा, संस्कृत मधील आत्म या शब्दाचे भाषांतर “जीव” असे करण्याऐवजी “आत्मा” करणे अधिक उचित होईल, हे उघड आहे. म्हणूनच, “देव आत्मा आहे,” या वाक्याचे संस्कृत भाषांतर, “ईश्वर आत्म” असे केले आहे. (योहान ४:२४) याचे कारण, “आत्मा” व आत्म या शब्दात सूचित केल्याप्रमाणे देव अदृश्य आणि शक्तिमान आहे. अर्थात, देव हा शरीरविरहित आत्मा नाही व आधीही नव्हता. तर तो नेहमीच निखळ आत्मिक व्यक्ती होता व राहील.
१३, १४. “जीव” या शब्दाचे भाषांतर करण्यास कोणता संस्कृत शब्द वापरला जातो? व त्याचा अर्थ काय?
१३ पवित्र शास्त्रातील उत्पत्ती २:७ मध्ये असे लिहिलेले आम्ही वाचतो: “मनुष्य जिवंत जीव (NW) झाला.” येथे “जीव” हा शब्द आहे. आणि तो, मूळ इब्री शब्द “नेफेशचे” भाषांतर आहे. हा इब्री शब्द “श्वासोच्व्छास करणे” या अर्थाच्या मूळ शब्दावरुन आला आहे. तथापि तो “जिवंत जीव, व्यक्ती आणि मनुष्य” यांना सूचित करतो. या वचनाचे भाषांतर संस्कृतमध्ये करताना “जिवंत जीव” याचे भाषांतर “सः सात्मप्राणी बभुवः” असे केले गेले. ‘सात्मप्राणी’ यात स-आत्मा-प्राणी१० * असे तीन शब्द आहेत. स म्हणजे “सह”; व आत्म११ * म्हणजे “आत्मा”; आणि प्राण हा शब्द “चैतन्य, जीवन, जीवनावश्यक श्वास” सूचित करतो.१२ * इब्री नेफेश प्रमाणे संस्कृत भाषेतील प्राणिन्१३ * चा अर्थ “जिवंत किंवा ज्ञानेंद्रियांचा उपयोग करू शकणारा प्राणी, व्यक्ती” होय.
१४ संस्कृतमध्ये प्राणी चा शब्दशः अर्थ “श्वासोच्व्छास करणारा,”१४ * श्वासोच्व्छास करणारे कोणी किंवा काही, असा होऊ शकतो. इब्री मधील नेफेश शब्द देखील तेच सूचित करतो. पशूही श्वासोच्व्छास करणारे आहेत; तेही श्वसन करतात. याचकरता उत्पत्ती २:१९ मध्ये पवित्र शास्त्राच्या संस्कृत भाषांतरात नेफेश चे भाषांतर प्राणे (प्राणीचे अनेकवचन) केले आहे, तेथील “जीवा”बद्दलचा इब्री शब्द मानवांना नव्हे तर पशूंना उद्देशून आहे. अशा प्रकारे, इब्रीमधील नेफेश व जीवसाठी वापरलेला ग्रीक शब्द सूके यांचे भाषांतर करण्यास, संस्कृत भाषेतील पवित्र शास्त्रामध्ये प्राण हा शब्द वारंवार वापरण्यात आला आहे.
१५. “जीव” यासाठी असणारा संस्कृत शब्द पवित्र शास्त्रात उत्पत्ती २:७ आणि १ करिंथकर १५:४५ मधील अनुवादात कसा वापरण्यात आला आहे?
१५ यास्तव, “[मनुष्य] जिवंत जीव झाला” (सः सात्मप्राणी बभूवः) या संस्कृत शब्दसमुहाचे शब्दशः मराठीकरण: “[मनुष्य] आत्म्यासह जीव झाला” असे करता येईल. (उत्पत्ती २:७) “[मनुष्य] ‘आत्मजीवी’ झाला” किंवा “जिवंत जीव झाला” असे म्हणणे अधिक उचित होईल. उत्पत्ती मधील या विधानाचा, पवित्र शास्त्रात पुढे १ ले करिंथकर १५:४५ मध्ये उल्लेख आहे. तेथे उत्पत्तीचे अवतरण घेऊन लेखक म्हणतो: “पहिला मनुष्य आदाम जिवंत जीव असा झाला.” या वचनाचे संस्कृत भाषांतर आहे: “पुरूष आदाम जीवप्राणी बभुव.” “जिवंत जीव” या शब्दसमुहाला तेथे “जीवप्राणी” म्हटले आहे. जीव१५ * हा शब्द “जिवंत”पणा सुचवितो तर “प्राणी” म्हणजे एक स्वतंत्र “जीव” किंवा वेगळी व्यक्ती होय.
१६. “जीव” आणि “आत्मा” यांच्या अर्थाबद्दल गोंधळ का आहे? तो असावा का?
१६ काही भारतीय भाषांमध्ये “जीव” आणि “आत्मा” हे दोन शब्द आलटून पालटून वापरले जात असल्यामुळे गोंधळ उद्भवतो. पवित्र शास्त्राचे इतर भाषांमध्ये भाषांतर करताना विद्वानांनी या शब्दांच्या वापरावर आपल्या पूर्वग्रहांचा प्रभाव होऊ दिला.१६ * तथापि, पवित्र शास्त्राच्या मूळ भाषांत आणि संस्कृतमध्ये “जीव” (नेफेश, प्राण) आणि “आत्मा” (रूह, आत्म) हे दोन शब्द आलटून पालटून वापरता येत नाहीत. *
१७. “जीव” आणि “आत्मा” यांच्याबाबतीत सत्य आपण कसे जाणू शकतो?
१७ “जीव” (सोल) आणि “आत्मा” (स्पिरिट) यांच्याबाबत वस्तुस्थिती समजावून घेण्याकरता आपण त्यांच्या वेगवेगळ्या अर्थामधील व वापरामधील फरक जाणला पाहिजे. असा फरक असल्याचे पवित्र शास्त्रात इब्रीयांस ४:१२ मध्ये स्पष्ट दिसते, तेथे म्हटले आहे: “कारण देवाचे वचन सजीव, सक्रीय, कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव [प्राण, संस्कृत] व आत्मा [आत्म, संस्कृत]. . . ह्यांना भेदून आरपार जाणारे आहे.” हा फरक १ थेस्सलनीकाकरांस ५:२३ मध्येही दाखवला आहे.
१८. (अ) शेकडो वर्षे कोणत्या प्रश्नाने मनुष्यजातीस भुलवले आहे? (ब) वैदिक काळांत कोणती विभाजित मते अस्तित्वात होती?
१८ मग प्राण किंवा जीव म्हटलेली ही गोष्ट काय आहे? मरणानंतर ती जिवंत राहते का? या प्रश्नाने शेकडो वर्षे मानवास भुलवले आहे. कथा-उपनिषद१७ * ग्रंथात हिंदूंचा मृत्यूदेव आणि नचिकेत नावाच्या एका तरूणामधील संभाषण सांगितले आहे. नचिकेत म्हणाला: “काही म्हणतात जीव हा मरणोत्तर अस्तित्वात राहतो, इतर म्हणतात तो राहत नाही. माझी विनंती आहे की, तिसरा वर म्हणून, मला या प्रश्नाचे खरे उत्तर आपणाकडून अवगत व्हावे.” अशा तऱ्हेने, मरणोत्तर जिवंत राहण्याबद्दल या उपनिषदात थोडी अनिश्चितता व्यक्त करण्यात आली आहे. वेद लिहून झाल्यानंतरही मृतांच्या अवस्थेबद्दल विभिन्न मते होती. मग उपनिषदाने या प्रश्नाचे उत्तर कसे दिले? ते म्हणते: “या मुद्यावर पूर्वी देवांनाही शंका होत्या. ते समजायला सोपे नाही. तो विषय गूढ आहे. हे नचिकेता दुसरा एखादा वर माग, याविषयी मला गळ घालू नकोस. व त्या वरातून मला मोकळा कर.”१८ * या कारणास्तव काही धर्मांच्या समाजामध्ये या प्रश्नाबद्दल अनिश्चितता आहे.
१९. मरणानंतरच्या बचावून राहण्याबद्दल काही धार्मिक लोकांची कोणती भिन्न मते आहेत?
१९ तथापि, बहुतेक लोक, मरणानंतर एखाद्या व्यक्तीचे बचावून राहणे गृहित धरतात.१९ * पण समंजस व्यक्तींना नुसत्या विधानात स्वारस्थ नाही. त्यांना खात्रीलायक पुरावा हवा. आयुष्य हे अल्प मुदतीचे आहे या विचारानेच काहींना संताप येतो. काहींचे तर म्हणणे आहे की, मरणानंतर बचावून राहण्याची कल्पना, हा, आपल्या असुरक्षिततेच्या भावनेवर मात करण्यासाठी काही धार्मिक लोकांनी शोधून काढलेला एक मार्ग आहे. मृत्युमुळे जीवन मध्येच संपण्याची कल्पना काहींना रुचत नाही,२० * आणि मिळणाऱ्या स्पष्टीकरणांनी त्यांच्या बुद्धीचे तेव्हा२१ * समाधान होत नाही. मरणाच्या वेळी नक्की काय घडते?
मरणाच्या वेळी काय घडते?
२०. (अ) पहिल्या मानवी जीवाच्या उत्पत्तीचे वर्णन पवित्र शास्त्र कसे करते? (ब) जिवंत मानवी जीव कशाचा मिळून बनलेला आहे व त्यासाठी कसे उदाहरण देता येईल?
२० पवित्र शास्त्र प्राण किंवा जीव याबद्दल अधिक माहिती देते. याशिवाय, मृतांच्या अवस्थेबद्दल सांत्वन व आनंददायक माहिती त्यात असून, ते आपल्या मृत प्रियजनांकरता देखील आशा देते. मानवी जीवाचे पवित्र शास्त्रातील वर्णन उत्पत्ती २:७ मध्ये सापडते: “मग परमेश्वर (यहोवा, NW) देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडिला व त्याच्या नाकपुडयांत जीवनाचा श्वास फुंकिला; तेव्हा मनुष्य जिवंत जीव (सात्मगप्राणी. संस्कृत) झाला.” कृपया, लक्षात घ्या, मनुष्याला जीव मिळाला नाही, तर तो जिवंत जीव झाला. ह्या कारणास्तव मनुष्य स्वतः जीव आहे. म्हणून, तुमच्यापाशी जीव नसून तुम्ही स्वतः एक जीव आहा. जिवंत मानवी जीवाचे दोन महत्त्वाचे घटक आहेत. मांसल शरीर आणि जीवन-शक्ती (आत्मा). शरीरापासून जीवन-शक्ती अलग केल्यास जिवंत जीव राहत नाही. तो जीव अस्तित्व विरहित होतो. मनुष्य “श्वसन करणारा” राहत नाही म्हणून तो त्यापुढे जीव राहत नाही. हे अगदी, हायड्रोजन आणि प्राणवायू या दोन वायूंपासून बनलेल्या पाण्याप्रमाणे आहे. या दोन वायूंचा योग्य प्रमाणात संयोग केल्यास त्यातून पाणी तयार होते. या संयोगातून एक वायू काढून घेतल्यास पाण्याचे अस्तित्वच संपते.
२१. (अ) मरणाने माणूस शरीरविरहित जीव का होत नाही? (ब) मरणाचे वेळी माणूस शरीररहित आत्मा का बनत नाही? उदाहरण द्या.
२१ त्याप्रमाणे, मरणाने तुम्ही शरीरापासून मुक्त झालेला जीव बनत नाही. ते केवळ या साध्या कारणासाठी की, तुमचे शरीर तुमच्या जीवाचा भाग आहे. जेव्हा शरीर मरते तेव्हा तो जीव मरतो, त्याचे अस्तित्व संपते. तुम्ही शरीरापासुन मुक्त झालेला आत्मा किंवा आत्म बनत नाही. का नाही? कारण जिवंत प्राण्यास चेतना देणारा तसेच प्राण्याला विचार व हालचाल करण्याचे व जगण्याचे सामर्थ्य देणारा आत्म, ही व्यक्तिभाव रहित जीवन-शक्ती किंवा आत्मा आहे. जिवंत प्राण्यातील जीवन-शक्ती अथवा आत्मा मालवतो त्यावेळी, बल्ब मधील वीज काढून घेतल्यासारखा परिणाम होतो. प्रकाश मालवतो. हा प्रकाश कोठे जातो? तो अस्तित्व-रहित होतो. याचकारणामुळे मरण हे जीवनाच्या अगदी विरुद्ध आहे. आणि म्हणूनच जीवनकर्त्याची आज्ञा मोडल्यामुळे, दंड म्हणून मानवजातीस मरण आले.
२२. (अ) जीव मरतो हे स्पष्ट करण्यास पवित्र शास्त्र काय म्हणते? (ब) पवित्र शास्त्र मृतांच्या स्थितीचे स्पष्टीकरण कसे करते?
२२ तेव्हा, मानवी जीव हा अमर नसून मर्त्य—मरणाधीन व अस्तित्व-रहित होणारा आहे. याला बळकटी देताना पवित्र शास्त्र म्हणते: “पाहा, सर्व जीव माझे आहेत, बापाचा जीव तसा पुत्राचा जीवही माझा आहे. जो जीव [प्राणी, संस्कृत] पाप करतो, तो मरेल.” (यहेज्केल १८:४ NW) परिणामी, ऋषी, व गुरूंच्या तर्कापेक्षा प्रत्यक्षात मृतांची स्थिती फार वेगळी आहे. देवाचे वचन या नात्याने पवित्र शास्त्र, अधिकार वाणीने म्हणते: “अधिपतींवर भरवसा ठेवू नका. मनुष्यावर भरवसा ठेवू नका. त्याच्याकडून साहाय्य मिळणे शक्य नाही. त्याचा आत्मा (NW) जातो तो आपल्या मातीस पुनः मिळतो त्याचवेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो.” “आपणास मरावयाचे आहे हे जिवंताला निदान कळत असते; पण मृतास तर काहीच कळत नाही; त्यांस आणखी काही फलप्राप्ती व्हावयाची नसते. त्यांचे स्मरण कोणास राहात नाही. जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर; कारण ज्या शिओलकडे (NW) तू जावयाचा आहेस तेथे काही उद्योग, युक्तिप्रयुक्ति, बुद्धी व ज्ञान यांचे नांव नाही.”—स्तोत्रसंहिता १४६:३, ४; उपदेशक ९:५, १०.
२३. (अ) याप्रकारे आपल्याला मरणाबद्दल काय शोध लागला आहे? (ब) मरणाबद्दलचे आपले विचार बदलणे शक्य आहे का? उदाहरण द्या.
२३ अशा प्रकारे मरणाने व्यक्तीचे विचार व जाणीव पूर्णपणे थांबतात. अशी शिकवण पवित्र शास्त्र देते. मरण, कार्य, उद्योग, योजना, बुद्धी व ज्ञान यांचा अंत करते. मरण म्हणजे अस्तित्व नसणे. मरणानंतर जीवन नाही, हे नक्की! मानवी जीव आणि मृतांची परिस्थिती यांच्याबद्दलचे हे स्पष्टीकरण अनेकांना धक्कादायक वाटेल. पण पृथ्वी गोल आहे असा शोध लागला तेव्हांही अनेकांस धक्का बसला होता. मानवजातीला ते सत्य स्वीकारावे लागले. तसेच, जपानच्या सम्राटाने आपले मनुष्यत्व मान्य करून देवपण नाकारले तेव्हा, लाखो लोकांना वस्तुस्थितीनुसार आपल्या विचारात फेरबदल करावा लागला. शिवाय, शास्त्रज्ञांनी मनुष्याला चंद्रावर पाठवले त्या वेळी लाखोंना विश्वाविषयी त्यांच्या धार्मिक कल्पनांत बदल करावा लागला. त्याचप्रमाणे या २० व्या शतकांत जगातील लाखोंनी, नाशवंत जीव आणि बेशुद्ध असलेल्या मृतांबद्दल पवित्र शास्त्राच्या शिकवणी विषयी त्यांना मिळालेल्या माहितीशी, आपली मते जुळवून घेतली आहेत.
२४. मृतांच्या परिस्थितीबाबत लागलेला शोध सांत्वनपर का आहे?
२४ पण मृतांबद्दलचे हे ज्ञान सांत्वन करणारे किंवा आनंददायक कसे आहे? आपले मृत प्रियजन इतर कोठेही यातनेत तळमळत नाहीत, हे जाणणे खरोखरी सांत्वनपर आहे. ते कोठेही अर्धवट जिवंत किंवा निर्वाणाच्या अचेतन अवस्थेत२२ * नाहीत. तसेच ते पुनर्जन्म किंवा संसाराच्या२३ * निर्दय आणि कठोर चक्रांमध्ये कष्ट भोगत नाहीत. त्यांनी त्यांचे व्यक्तिमत्त्व कायमचे गमावले नाही, किंवा (मोक्ष)२४ * मिळाला नाही अथवा ते व्यक्तिभावरहित जागतिक आत्म्यामध्ये (परमात्मन्)२५ * विलीन झाले नाहीत. तर मृत व्यक्ती मेलेल्या आहेत. त्या अस्तित्वरहित अवस्थेत आहेत. शिवाय, आपल्या मृत प्रियजनांकरता उज्ज्वल आशा आहे. ह्याकारणास्तव याआधी दिलेली मृताबद्दलची माहिती सांत्वनपर आणि आनंददायक आहे. पण आता आपण विचारू: मृतांसाठी जीवनाच्या नवीकरणाची आशा असणे कधी शक्य आहे का आणि जिवंताकरता काय आशा आहे?
एक वैधानिक समस्या
२५. आपल्यापुढे एक वैधानिक समस्या का उभी राहिली आहे? आणि ती कोणती आहे?
२५ आपणास आठवत असेल की, आपला मानववंश, देवाकडील नीतीमान निवाड्यानुसार पाप आणि मरणाच्या अधीन झाला. व तो निवाडा आनुवंशिकतेमुळे आजही लागू आहे. त्यामुळे समस्या अशी उद्भवते की: न्यायाधीश म्हणून स्वतःच्या निवाड्याचा किंवा निर्णयाचा आदर करताना, खऱ्या न्यायाची पायमल्ली होऊ न देता, आपल्या वंशाची पाप आणि मरणापासून देव कशी सुटका करू शकणार? ईश्वरी कायदा आणि नीतिमत्व, ही कायदा भंग करणाऱ्यांसाठी मृत्युदंडाची मागणी करतात. तेव्हा, न्यायाची पायमल्ली न करता पातक्यांना कसे मुक्त करणार व मरणास कसे काढून टाकणार? देव फक्त प्रीती आणि दया यातच परिपूर्ण नसून तो न्यायातही परिपूर्ण आहे. देव स्वच्छंदी नाही. आपले वचन उचलून धरण्यास व स्वतःचे देवत्व आणि सार्वभौमत्व टिकवून ठेवण्याकरता देव स्वतःच्या अनुल्लंघनीय कायद्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही.
२६. समस्या सोडविण्यास कशाची गरज आहे आणि का?
२६ स्वतःचे, विश्वनियंता हे पद राखण्यास, आपले निर्णय देणारा व त्यांची अंमलबजावणी करणारा म्हणून देवाने आपल्या निर्णयास अनुसरले पाहिजे. कायदे भंग करणाऱ्यास, कायद्याच्या आधाराविना दया दाखवण्याने न्यायाचा विपर्यास होईल. खऱ्या न्यायाकरता पाप्यांना दाखविलेली ईश्वरी दया कायदेशीर असली पाहिजे. यास्तव, पाप्यांची सुटका होऊन त्यांना खऱ्या जीवनाची पुनर्प्राप्ती होण्याआधी देवाला समाधानकारक अशी, तोलामोलाची किंवा अनुरूप खंडणी दिली गेली पाहिजे. (१ तीमथ्य २:५, ६) या रीतीने देव संपूर्ण विश्वाकडून आदर आणि आज्ञाधारकपणाची अपेक्षा हक्काने करु शकेल.
२७, २८. (अ) आपल्या पहिल्या पूर्वजांद्वारे आपण काय गमावले? (ब) ते परत कसे मिळेल हे उदाहरणाने सांगा. (क) प्राचीन काळातल्या हिंदूनी त्यांच्या देवांना प्रसन्न करण्यासाठी काय केले, आणि त्याला कदाचित कोणते कारण असेल?
२७ आपला सर्वप्रथम पूर्वज, आदाम, याने मतस्वातंत्र्याच्या स्वार्थी उपयोगाच्या बदली स्वतःचे परिपूर्ण मानवी जीवन आणि चिरकालिक जीवनप्राप्तीचा हक्क गमावला. असे करण्यात त्याने, त्याच्या सर्व भावी संततीला—आपल्यासहित—पाप आणि मरणात लोटले. चिरकालिक जीवनाची आपणा सर्वांची संधी हुकली. आपल्या मूळ पूर्वजाने ती गमावली. ही स्थिती जणू, एक कुटुंब दारुण संकटात सापडते; तेव्हा बाप घरातील सर्व सोने सावकाराकडे किंवा बँकेकडे गहाण ठेवतो त्यासारखी आहे. आता ते कुटुंब सोन्याविना जीवन कंठित असते. आणि त्याच्या संततीलाही ते वारशाने मिळत नाही. कालांतराने भावी पिढी, सावकाराच्या दृष्टीने न्याय्य अशी समाधानकारक किंमत देऊन कुटुंबाचे सोने सोडवून परत मिळवू शकते.
२८ त्याचप्रमाणे न्यायपूर्ततेसाठी आपल्या मानव वंशास, पाप आणि मरणापासून सोडवण्यासाठी व त्यांच्या जन्मसिद्ध हक्काची पुनर्स्थापना करण्यासाठी मुक्तीचे मोल अथवा किंमत देण्याची गरज आहे. ऋग्वेदात बलींवर दिलेल्या भराचे मूळ कदाचित पूर्वजांमधील बळींच्या प्रथेच्या आठवणीत असू शकेल. (पडताळा उत्पत्ती ४:४; ८:२०) इंडियन विज्डम हे पुस्तक दाखविते की, वैदिक काळात घोडे, बैल, मेंढरे आणि बकरे हे बळी दिले जात. शिवाय, ते म्हणते: “असे बळी प्रायश्चित्ताची यज्ञार्पणे समजली जात.”२६ * प्राचीन हिंदूंनाही त्यांच्या देवांची मर्जी संपादन करण्यासाठी रक्तरूपी जीवनाचा बळी देणे आवश्यक असल्याचे वाटत होते हे येथे महत्त्वाचे आहे.
२९. (अ) पशूंचे बली दिल्याने, जरूर ती किंमत का पुरी होऊ शकत नाही? (ब) मानवी वंश जरूर ती किंमत देऊ शकतो का?
२९ तथापि एका प्राचीन प्रामाण्याने म्हटल्याप्रमाणे: “बैलांचे व बकऱ्यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे.” (इब्री. १०:४) आपला पहिला पूर्वज आदाम याने अवज्ञाकारक जीवनाच्या बदल्यात जे गमावले, त्याच्या तंतोतंत बरोबरीचे, परिपूर्ण मानवी जीव हेच मोल हवे होते. देवाच्या परिपूर्ण न्यायाचे समाधान करू शकेल अशी, खंडणीची एकमेव किंमत आहे. पण आपणा मानवांना, एवढी मोठी किंमत देण्याची पत आहे का? पाप आणि मरणापासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी ही खंडणीची किंमत देण्यास आपण असमर्थ आहोत, हे आपल्याला प्रामाणिकपणे कबूल करावे लागते. एका प्रांजळ पवित्र शास्त्र लेखकाने कबुल केल्याप्रमाणे: “कोणाही मनुष्यास आपल्या भावाला मुक्त करता येत नाही; किंवा त्याच्याबद्दल देवाला खंडणी देता येत नाही.”—स्तोत्रसंहिता ४९:७.
देवाची प्रीती सुटकेकरता सामोरी आली
३०. (अ) देवाने, मानवाला त्याच्या असहाय्यतेपासून कसे वाचवले? (ब) देवाच्या एका आत्मिक पुत्राला योग्य ती किंमत चुकविण्यासाठी पात्र कसे केले गेले?
३० मानवजातीची असाहाय्यता ओळखून, देव त्याच्या विस्मयकारक प्रीतीमुळे आपल्या मदतीला आला. स्वर्गातील त्याच्या परिपूर्ण आत्मिक पुत्रांतून देवाने ही जरूरीची किंमत देण्याची तयारी दर्शवली. पवित्र शास्त्र म्हणते: “देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहान ३:१६) आपल्या पहिल्या परिपूर्ण पूर्वजाच्या बरोबरीची किंमत होण्यासाठी, या आत्मिक पुत्राला मानव बनणे जरूरीचे होते. आत्मिक व्यक्तीचे देहधारण किंवा अवतार हा आपल्या पहिल्या मानवी पूर्वजाच्या तंतोतंत बरोबर होऊ शकत नव्हता. यासाठी देवाच्या एकुलत्या एक आत्मिक पुत्रास आपले आत्मिक स्वरूप सोडावे लागले आणि परिपूर्ण शरीर व रक्ताचा—आपल्या वंशातील एक, ना कमी ना अधिक—असा बनण्यासाठी, मानवजातीमध्ये चमत्काराने जन्म घ्यावा लागला. पवित्र शास्त्र त्याचे असे वर्णन करते: “काळाची पूर्तता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले; तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन असा जन्मलेला होता. ह्यात उद्देश हा होता की, जे नियमशास्त्राधीन होते त्यास त्याने खंडणी भरून सोडवावे, आणि आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा.”—गलतीकर ४:४, ५.
३१. (अ) इतिहास काळातील धार्मिक नेत्यांनी मरणावरील खऱ्या विजयाकडे दुर्लक्ष का केले? (ब) आम्हा मानवांना कोणा मुक्तिदात्या शिवाय तसेच सोडून देण्यात आलेले आहे का? आणि तसे उत्तर तुम्ही का देता?
३१ परिपूर्ण पुरूष म्हणून स्त्रीपासून जन्माला आल्यामुळे ज्याला त्या खंडणीची किंमत देता आली; किंवा मानवजातीची पाप आणि मरणापासून सुटका खरेदी करता आली, असा देवाचा हा आत्मिक पुत्र कोण होता? सबंध इतिहासात, संत, ऋषी, स्वामी, विश्वगुरू, साधु, देवमाणूस आणि सुधारक म्हणवून घेणारे असंख्य लोक होऊन गेले. पण त्यांच्यापैकी एकानेही, आपण तारक किंवा खंडणी देणारा असल्याचा दावा कधी केला नाही! यावरुन असे दिसते की, त्यांच्यापैकी कोणालाही विमोचनाच्या धार्मिक तत्वाची जाणीव किंवा समज नव्हती. धर्माच्या सबंध इतिहासात, ज्याने मानव जातीस पाप आणि मरण यांच्यापासून मुक्ती मिळवून देणारा असल्याचा दावा केला, असा केवळ एकच आध्यात्मिक नेता होऊन गेला. “मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे.” असे म्हणणारा तोच होता.—मत्तय २०:२८.
३२, ३३. (अ) ख्रिस्ताचे मरण हे साधारण प्रतीचे मरण का नव्हते? (ब) खंडणीच्या तत्त्वाचे सोदाहरण द्या, आणि एका मनुष्याच्या कृतीने लाखोंचे पाप व मरणापासून रक्षण कसे होऊ शकते, याचा खुलासा करा.
३२ या व्यक्तीची ओळख करून देतांना देवाचे वचन म्हणते: “देवाच्या कृपेने प्रत्येकाकरता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून ज्याला देवदूतांपेक्षा किंचित्काल कमी केले होते, तो येशू मरण सोसल्यामुळे गौरव व थोरवी ह्यांनी मुकुटमंडित केलेला असा आपण पाहतो.” (इब्री. २:९) तेव्हा, येशू ख्रिस्ताचे मरण हे सर्वसाधारण मरण नव्हते— ते बलिदान होते. आपल्या मानव वंशाच्या जीवनाचे हक्क खरेदी करण्यासाठी, ख्रिस्ताने स्वतःच्या परिपूर्ण मानवी जीवन व पृथ्वीवरील भवितव्यावर पाणी सोडले. याप्रकारे, भूतलावरील त्याच्या सेवेमुळे व बलिदानपर मरणामुळे, ख्रिस्त येशू मानवजातीचा मुक्तिदाता बनला. ह्याकारणास्तव असे लिहिले आहे: “जशी अपराधाची तशी कृपादानाची गोष्ट नाही; कारण ह्या एका मनुष्याच्या अपराधाने [आदामाच्या पापाने] पुष्कळ माणसे मरण पावली, तर देवाची कृपा आणि एक मानव येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेचे दान ही पुष्कळ जणांकरता विशेषेकरून विपुल झाली. तर मग जसे एका अपराधामुळे सर्व माणसांना दंडाज्ञा होते, तसे नीतिमत्त्वाच्या एकाच निर्णयाने [ख्रिस्ताच्या बलिदानाने] सर्व माणसांना जीवदायी नीतिमत्त्व प्राप्त होते.”—रोम ५:१५, १८.
३३ जशी कॉलऱ्याची साथ, केवळ एका रोग्यापासून हां हां म्हणता सबंध गावात फैलावते व एकाच डॉक्टराच्या औषधाने त्याच गावातील अनेकांना आराम वाटू लागतो, त्याप्रमाणे देवाचा परिपूर्ण न्याय पहिल्या पुरूषाच्या लाखो पापी वंशजाकरता मुक्तिची किंमत म्हणून केवळ एकाच, जुळत्या खंडणीस, मान्यता देतो.—पडताळा १ तीमथ्य २:५, ६.
३४. (अ) मानवी जीवनाचे हक्क देवास कसे व कोणत्या उद्देशाने सादर केले जातात? (ब) खंडणीच्या योजनेने देवाकरता काय केले?
३४ याचे प्रतिफळ म्हणून देवाने आपल्या पुत्राला त्याचे आत्मिक जीवन परत दिले. त्यामुळे आपल्या वंशाच्या जीवन हक्कासाठी खरेदीची किंमत म्हणून बलिदान केलेल्या त्याच्या समर्पित मानवी जीवनाचे मोल, स्वर्गातील देवाला देणे त्याला शक्य झाले. त्यायोगे आदामाच्या वंशास जीवनाचा हक्क परत करण्याचा कायदेशीर आधार देवापाशी होता. पवित्र शास्त्र म्हणते: “कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापाबद्दल म्हणजे नीतिमान पुरूषाने अनीतिमान लोकांकरता, एकदा मरण सोसले. तो देहरूपात जिवे मारला गेला आणि आत्म्यात जिवंत केला गेला.” (१ पेत्र ३:१८) अत्याधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही उदात्त गोष्ट संपादन करण्याने देवाची मूळ सृष्टी, त्याचे वचन आणि त्याची नीतिमत्ता योग्य असल्याचे शाबीत करते.
मरणावर विजय मिळविणे
३५. ख्रिस्ताने विकत घेतलेल्या या जीवनाच्या हक्काचा लाभ स्वतःला मिळवून घेण्याकरता आपण काय केले पाहिजे?
३५ या जीवन हक्कांचा फायदा घेण्याची आपली इच्छा आहे का? त्यासाठी आपण काय केले पाहिजे? आज या २०व्या शतकातील एका मोठ्या आंतरराष्ट्रीय लोकसमुदायाप्रमाणे आपण देखील देवाचे व त्याच्या एकुलत्या एक पुत्राचे त्यांच्या स्वार्थत्यागी प्रेमाकरता व अपात्री कृपेकरता कृतज्ञतापूर्वक आभार मानले पाहिजेत. पवित्र शास्त्र त्यांचे वर्णन असे करते: “ह्यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा, शुभ्र झगे परिधान केलेला व हाती झावळ्या घेतलेला मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकऱ्यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. ते उच्च स्वराने म्हणत होते: ‘राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून [येशू ख्रिस्त] तारण आहे.’” (प्रकटीकरण ७:९, १०) खासकरून १९३५ पासून आपल्या २०व्या शतकाचा ऐतिहासिक पुरावा, हा कृतज्ञ आंतरराष्ट्रीय मोठा लोकसमुदाय आज पृथ्वीवरील सर्व खंडात अस्तित्वात असल्याचे सिद्ध करतो. पण आपण ही कृतज्ञता कशी व्यक्त करावी?
३६. (अ) आपण देवाचे कृतज्ञापूर्वक आभार कसे मानावेत? (ब) यहोवा कशाप्रकारचा देव आहे?
३६ आपण स्वर्गीय देवाला ओळखले पाहिजे व त्याची भक्ती कशी करावी, हे शिकले पाहिजे. ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी सुमारे १,५०० वर्षे, मोशे या प्राचीन संदेष्ट्याने अविवेकाने देवाला पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यातून काय निष्पन्न झाले? आम्ही वाचतो: “‘कृपा करून मला तुझे तेज दाखीव’. पण तो म्हणाला: ‘मी आपले सगळे चांगुलपण तुझ्यापुढे चालवीन; तुझ्यासमोर परमेश्वर [यहोवा, NW] या नावाची घोषणा मी करीन’ . . तरीपण तो म्हणाला की, ‘तुला माझे मुख पाहवणार नाही, कारण माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही.’” “तेव्हा परमेश्वर [यहोवा, NW] मेघातून उतरला तेथे त्याच्यापाशी उभा राहिला, आणि त्याने परमेश्वराच्या [यहोवा, NW] नावाची घोषणा केली. परमेश्वराने [यहोवा, NW] त्याच्यासमोरून जाताना अशी घोषणा केली, परमेश्वर, परमेश्वर [यहोवा, NW] दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध दयेचा व सत्याचा सागर, हजारो जणांवर दया करणारा, अन्याय, अपराध व पाप ह्यांची क्षमा करणारा, पण शिक्षेपासून सुटका न देणारा असा.’”—निर्गम ३३:१८-२०; ३४:५-७. NW
३७. (अ) एखादा, देवाची “आत्म्याने” भक्ती कशी करू शकतो? (ब) एखादा पित्याची भक्ती “सत्याने” कशी करु शकतो?
३७ तो अदृश्य देव या सुंदर वर्णनाप्रमाणेच असावा अशी अपेक्षा आपण करणार नाही का? आपण प्रशंसा व उपासना करावी अशा प्रकारचा हा देव आहे. पण यहोवाची भक्ती आपण कशी करावी? आपण आत्म्याने व खरेपणाने त्याची भक्ती करावी अशी देवाची अपेक्षा आहे. पवित्र शास्त्र म्हणते: “तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे; किंबहूना आलीच आहे; कारण असे आपले उपासक असावे अशीच पित्याची इच्छा आहे. देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.” (योहान ४:२३, २४) पित्याची उपासना आत्म्याने करणे याचाच अर्थ, भौतिक स्थळे, वस्तू, इमारती आणि देवांच्या प्रतिमांना पूज्य मानण्यास मनाई आहे. सत्याला खरे महत्त्व आहे. पित्याची, यहोवाची, भक्ती सत्याने करणे याचा अर्थ, आपल्या धार्मिक प्रथा, विश्वास व शिकवणी, देवाच्या वचनात प्रकट केल्याप्रमाणे, खऱ्या परिस्थितीला, वस्तुस्थितीला अनुसरून असल्या पाहिजेत. देवाचा प्रमुख प्रवक्ता पित्याला प्रार्थना करताना म्हणाला: “तुझे वचन हेच सत्य आहे.”—योहान १७:१७; पडताळा प्रे. कृत्ये १७:२४, २५.
३८. ख्रिस्त येशूबद्दल कसा व का गैरसमज आहे?
३८ यहोवा हा खरा देव जर आहे तर मग येशू ख्रिस्त कोण आहे? यहुद्याकरता ख्रिस्त हा अडखळणाचे कारण होता. यहूद्देत्तरांकरता ख्रिस्त हा मूर्खपणा होता. पवित्र शास्त्र म्हणते: “आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो; हा यहुद्यांस अडखळण व हेल्लेण्यांस मूर्खपणा आहे.” (१ करिंथकर १:२३) त्यांचा मुक्तिदाता म्हणून यहुद्यांनी ख्रिस्ताला नाकारले. कारण त्याच्या जीवन व मरणाची रीत त्यांच्या राष्ट्रीय आकांक्षेस अनुसरून नव्हती. मानवी तर्काने देवाचा शोध करणाऱ्या यहूद्देत्तर राष्ट्रांना ख्रिस्ताची जीवन पद्धती व मरण हे अगदीच अनाकलनीय होते. त्याचे मरण निव्वळ व्यर्थ—निरर्थक दिसत होते, ख्रिस्ताने प्रकट व साध्य केलेली यहोवा देवाची इच्छा आणि उद्देश, मानवी कल्पना व मूल्यांच्या अगदी विपरीत असल्यामुळे मूर्खपणाचे वाटले.
३९. (अ) ख्रिस्त येशूबद्दल, लाखो लोकांनी कसली खात्री करून घेतली आहे? (ब) त्यांनी त्याच्याबद्दल काय मान्य केले आहे?
३९ आजही लाखो लोक ख्रिस्त येशूवर अडखळतात. त्यांच्या मते ख्रिस्त हा मूर्खपणा आहे. तुम्हालाही ख्रिस्ताबद्दल तसेच वाटते का? याच्या उलट आज, ज्यांनी ख्रिस्त येशूच्या खऱ्या मूल्याविषयी स्वतःची खात्री केली आहे असेही लाखो लोक आहेत. ते ओळखून आहेत की, ख्रिस्त हा सर्वसमर्थ देव नसून यहोवाचा पुत्र आहे. यहोवाच्या सर्व प्राणीमात्रांच्या सृष्टीत ख्रिस्त हा प्रथम जन्मलेला आहे; आणि इतर सृष्टीकरता देवाने त्याला शब्द अथवा प्रवक्ता केले. याकारणास्तव आम्ही वाचतो: “प्रारंभी शब्द होता. शब्द देवासह होता आणि शब्द एक देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याजवाचून झाले नाही.” (योहान १:१-३, NW) अशाप्रकारे, मानव होण्यापूर्वीच्या अस्तित्वात येशू ख्रिस्त देवाचा “कुशल कारागिर” आणि देवाचा आवाज अथवा देवाच्या वतीने बोलणारा अशी दुहेरी भूमिका पार पाडीत होता.—पडताळा, नीतीसूत्रे ८:२२, ३०; कलस्सैकर १:१५, १६.
४०. (अ) देवासन्मुख मानवजातीसाठी महायाजक बनण्यासाठी, ख्रिस्त कसा पात्र ठरतो? (ब) यहोवाच्या उपासकांच्या बाबतीत ख्रिस्त कोणती भूमिका पार पाडतो?
४० आपल्या स्वतःच्या मानवी बलिदानाचे व त्याच्या जीवनदायी फायद्यांचे व्यवस्थापन करण्यात ख्रिस्त, स्वर्गीय देवाच्या, यहोवाच्या, सन्मुख मानवजातीचा महायाजक बनतो. आपण वाचतो: “ख्रिस्त हा पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टीसंबंधी प्रमुख याजक होऊन आला व जो हातांनी केलेला नाही, म्हणजे या सृष्टीतला नाही अशा अधिक श्रेष्ठ व पूर्ण मंडपातून, आणि बकरे व वासरे ह्यांचे नव्हे, तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्र-स्थानात गेला, आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली.” शिवाय त्यायोगे तो जीवनाविषयी देवाचा प्रमुख प्रतिनिधी होतो. शिक्षकाच्या भूमिकेमध्ये तो, यहोवा देवाच्या सर्व उपासकांचा गुरू आहे. “तुम्ही आपणास गुरूजी म्हणवून घेऊ नका; कारण तुमचा गुरू एक आहे व तुम्ही सर्व भाऊ भाऊ आहां.”—इब्री ९:११, १२; मत्तय २३:८; पडताळा प्रे. कृत्ये ३:१५
४१. (अ) ख्रिस्ताने जगाच्या धर्मांतराचा प्रचार का केला नाही? (ब) “मोठ्या संकटामधून” कोणी वाचतील का? (क) येशू ख्रिस्त कशा प्रकारची व्यक्ती आहे?
४१ तेव्हा, ख्रिस्त येशू केवळ एखाद्या धर्मसुधारकापेक्षा बराच काही आहे. त्याला बह्वंशी माहिती होती की, हे दुष्ट व्यवस्थिकरण सुधारण्याच्या पलिकडील आहे. ह्याकारणास्तव येशूने जगाच्या धर्मांतराबद्दल नव्हे तर ‘मोठ्या संकटाबद्दल’ प्रचार केला. तो म्हणाला: “जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही; व पुढे कधीही येणार नाही असे मोठे संकट त्या काळी येईल; आणि ते दिवस कमी केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता; परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले जातील.” (मत्तय २४:२१, २२) ते “मोठे संकट” दुष्टांचा नायनाट करील व सबंध सृष्टीसमोर यहोवाच्या नीतिमत्तेचे समर्थन करील. तथापि काही “मनुष्यांचा निभाव” लागेल असे येशूच्या शब्दातून ध्वनित होते. याचे कारण, ख्रिस्त सरळ अंतःकरणाच्या लोकांवर प्रेम करतो. म्हणूनच तो त्यांच्याकरता मेला. पुढील शब्दांत आपल्याला येशूच्या व्यक्तिमत्वाची झलक दिसते: “येशू त्यांच्या सभास्थानात शिकवीत, राज्याच्या सुवार्तेची घोषणा करीत आणि सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुःखणी बरी करीत नगरातून व गावांतून फिरत होता. तेव्हां लोकसमुदायांना पाहून त्यांचा त्याला कळवळा आला. कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे ते गांजलेले व पांगलेले होते.”—मत्तय ९:३५, ३६.
४२. आजच्या पीडित लोकांना लवकरच सुटका कशी प्राप्त होईल?
४२ आपल्या या २०व्या शतकातही अनेक लोक “मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे गांजलेले व पांगलेले” आहेत, आणि येशूला त्यांच्याविषयी कळवळा वाटत आहे असे आम्ही खात्रीने म्हणतो. ह्याकारणास्तव आत्मसमर्पण करणाऱ्या त्याच्या पुत्राद्वारे चालणाऱ्या देवाच्या राज्याचा प्रेमळ अंमल, ‘मोठ्यासंकटामधून’ वाचलेल्या विश्वासू लोकांवर लवकरच सुरु होईल. देवाच्या वचनाने भाकीत केले: “पाहा, राजा धर्माने राज्य करील.”—यशया ३२:१.
४३. (अ) देवाचे राज्य काय आहे? (ब) मानवी सरकारांनी त्यांच्या प्रजेस फायदे देण्याचा कसा प्रयत्न केला? आणि त्यात त्यांना कितपत यश आले?
४३ देवाचे राज्य हे ख्रिस्त येशूच्या नेतृत्वाखाली स्वर्गामध्ये सरकार बनवणाऱ्या, परीक्षा घेतलेल्या व कसोटीस उतरलेल्या विश्वासू सचोटी रक्षकांचे मिळून बनलेले आहे. सबंध पृथ्वीवर आपले सार्वभौमत्त्व चालवील असे हे देवाचे स्वर्गीय राज्य आहे. (प्रकटीकरण ५:१०) आज, लोक आपआपल्या मानवी सरकारांकडे, व्यवसाय फायदे, घरांच्या सोयी आणि आरोग्य सुविधांकडे पाहतात; आणि अनेक सरकारे देखील त्यांच्या प्रजेकरता या फायद्यांचा विकास करण्यासाठी पंचवार्षिक योजनांची मालिका ठरवतात. पण ते त्यांच्यातील मृतांकरता कोणतीही आशा देऊ शकत नाहीत. आणि पूर्वीच्या सर्व सरकारांच्या अनुभवांचा इतिहास, जिवंत लोकांविषयीच्या त्यांच्या (सध्याच्या सरकारांच्या) योजनांच्या पूर्ण यशाची शक्यता नसल्याचे दर्शवतो.
४४. (अ) हजार वर्षांच्या कालावधीत देव काय साध्य करील? (ब) मानवांना मरणावर विजय मिळवणे शक्य व्हावे म्हणून देव कशाची योजना करील?
४४ तथापि, पंचवार्षिक योजनांच्या मालिकेने नव्हे तर, एका सहस्त्र वार्षिक कार्यक्रमाद्वारे देवाचे राज्य “जास्तीत जास्त, अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना ह्यापलिकडे” कार्य करील. यास्तव, आपण वाचतो: “नंतर मी राजासने पाहिली. त्यावर कोणी बसले होते. त्यांना न्यायनिवाडा करण्याचा अधिकार दिला होता . . . ते जिवंत झाले आणि त्यांनी ख्रिस्ताबरोबर एक हजार वर्षे राज्य केले.” (इफिसकर ३:२०; प्रकटीकरण २०:४) त्या सहस्त्रवार्षिक अंमलात देवाचा राजा-याजक त्याच्या खंडणीच्या बलिदानाचे फायदे, पृथ्वीवरील आनंदी लोकांस लागू करील. ओघाओघाने त्याच्या भौतिक शरीरातून पाप आणि त्याचे घातक परिणाम म्हणजे आजार, अपूर्णत्व व म्हातारपण हे काढून टाकले जातील. तेव्हा, देवाचे राज्य हेच, मानवजातीला मरणावर विजय प्राप्त होण्यासाठी त्याचे साधन आहे.
४५, ४६. (अ) पाप, आजार आणि जीवन यांच्याबद्दल, देव कोणती हमी देतो? (ब) मानवजातीला धार्मिकता आणि चिरतारूण्य पुन्हा प्राप्त करून देण्याविषयी कसली शाश्वती देव देतो?
४५ या अभिवचनांच्या पूर्ततेसाठी स्वतः देवाने दिलेल्या काही हमींचे आपण सर्व मिळून वाचन करु या: “ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरूण घातले आहे तो धन्य! ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनीतीचा दोष लावीत नाही व ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य!” “हे माझ्या जीवा परमेश्वराचा [यहोवा, NW] धन्यवाद कर; हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नांवाचा धन्यवाद कर. हे माझ्या जिवा, परमेश्वराचा [यहोवा, NW] धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो; तो तुझे सर्व रोग बरे करतो; तो तुझा जीव विनाशगर्तेपासून उद्धरितो. तो तुला दया व करूणा ह्यांचा मुकुट घालतो; तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थानी तृप्त करतो; म्हणून तुझे तारूण्य गरुडासारखे नवे होते.”—स्तोत्रसंहिता ३२:१, २; १०३:२-५.
४६ “‘मग त्याचे शरीर बालकाच्यापेक्षा टवटवीत होते; त्याचे तारूण्याचे दिवस त्याला पुनः प्राप्त होतात.’ तो देवाची प्रार्थना करतो, आणि तो त्याजवर प्रसन्न होतो तो आनंदाने त्याचे दर्शन घेतो; देव त्याची निर्दोषता पूर्ववत स्थापित करतो.” (ईयोब ३३:२५, २६) एवढेच नव्हे तर, सर्व पुरावे सूचित करतात की, ख्रिस्ताचे हजार वर्षांचे शासन, सध्याच्या आपल्या पिढीच्या हयातीत सुरू होईल! *
४७. (अ) स्मृती कबरेतील मृतांना ख्रिस्ताच्या खंडणीचे फायदे कसे लागू केले जाऊ शकतात? (ब) यहोवा, मृत मानवी जीवांना कसे पुनरूत्थान देईल? (क) देवाचा पुत्र राजा म्हणून किती काळापर्यंत अधिपत्य करील?
४७ मानवजातीच्या जगाला ख्रिस्ताची खंडणी लागू करण्यासाठी मृत मानवी जीव स्मृती कबरेतून पुनः जिवंत होणे जरूर आहे. यास्तव देवाच्या वचनाने खात्री दिल्याप्रमाणे, ख्रिस्ताच्या वर्चस्वाखालील देवाचे राज्य, मानव वंशातील करोडो मृतांचे पुनरूत्थान करील: “तेव्हा समुद्राने आपल्यामधील मृत मनुष्यांस बाहेर सोडले; मृत्यू व अधोलोक ह्यांनी आपल्यातील मृतांस बाहेर सोडले. आणि ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरवण्यात आला.” (प्रकटीकरण २०:१३) हे करणे कसे शक्य आहे? सृष्टीकर्ता पृथ्वीच्या मातीतून हाडा-मांसाची शरीरे पुन्हा तयार करील आणि त्याच्या अचूक स्मृतीतून (लोकांची) पूर्व-जीवन पद्धती आठवून त्यांच्या नवीन मेंदूवर तिचा छाप ठेवील व प्रत्येक शरीरात जीवन-शक्ती वा आत्म भरील. मग हे पुनर्निर्मित जिवंत जीव किंवा जीवप्राणी या पृथ्वीवर पुन्हा राहू लागतील. किती विस्मयजनक चमत्कार! केवळ यहोवा देव, कायदेशीर खंडणीच्या योजनेद्वारे हे करू शकतो, आणि याच कारणामुळे, मृत प्रियजनांचे भविष्य काल्पनिक अमर जीवावर नव्हे तर, यहोवा देवाच्या अढळ प्रेमावर व स्मृतीवर अवलंबून आहे. “आपल्या पायाखाली सर्व शत्रु ठेवीपर्यंत त्याला [ख्रिस्ताला] राज्य केले पाहिजे. जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय.” (१ करिंथकर १५:२५, २६) देवाच्या मानवी सृष्टीवर वर्चस्व गाजवण्याची परवानगी मृत्यूला परत कधीच दिली जाणार नाही.
४८. (अ) मृत्यूवर विजय मिळवणे तुम्हाकरता शक्य आहे का? (ब) भविष्यासाठी कोणत्या विजयी घोषणेची निवड तुम्ही करू शकता?
४८ केवढी ही भव्य आशा! किती संतोषजनक! याची कल्पनाही मानवी अंतःकरणाला सुखावते. खरोखरी, मृत्यूवर विजय मिळवणे तुम्हाकरता शक्य आहे! तुम्ही तो पसंत कराल का? देवाने, जसा आपल्या पहिल्या पूर्वजांच्या मतस्वातंत्र्याचा आदर केला, तसाच तो तुमच्याही मतस्वातंत्र्याचा आदर करतो. पण तुम्ही सुज्ञ निवड करावी अशी आम्ही प्रार्थना करतो. तुम्ही त्या भावी आनंदी लोकांमध्ये असावे जे विजयी स्वरात असे ओरडतील: “अरे मरणा, तुझा विजय कोठे? अरे मरणा, तुझी नांगी कोठे?”—१ करिंथकर १५:५५.
संदर्भ ग्रथांची सूची
^ १. द हिम्स् ऑफ द ऋग्वेद, ले. राल्फ टी. एच. ग्रिफिथ, १८९६. जे. एल. शास्त्री यांनी सुधारलेली आवृती, १९७३. मोतीलाल बनारसीदास, नवी दिल्ली, १९७६ चे पुनर्मुद्रण. (ऋग्वेदाची ही आवृत्ती या पुस्तिकेत सर्वत्र वापरलेली आहे.)
^ २. अ डिक्शनरी ऑफ हिंदुइझम, ले. मार्गारेट व जेम्स स्टटले, पृ. ३४६. अलाईड पब्लिशर्स, १९७७.
^ ३. वरील पुस्तकातील पृ. ३२४.
^ ४. वरील पुस्तकातील पृ. १९४.
^ ५. द जर्नी विथ डेथ, ले. रोहित मेहता, पृ. ७. मोतीलाल बनारसीदास, दिल्ली १९७७.
^ ६. अ डिक्शनरी ऑफ हिंदुइझम, पृ. २०९ म्हणते: “निमित्तज्ञान म्हणजे ‘शकुनाचे ज्ञान’”
^ ७. हिंदु रिलिजन, कस्टमस् ॲन्ड मॅनर्स्, ले. पी. थॉमस, पृ. ७६, ७७, डी. बी. तारापोरवाला सन्स ॲन्ड कं., मुंबई १९५६ म्हणते: “गोवली शास्त्र किंवा पालीचे शास्त्र”
^ ८. अ संस्कृत-इंग्लिश डिक्शनरी, ले. सर एम. मोनिएर विल्यमस्, पृ. १३५, प्रथम आवृत्ती, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, १८९९. मोतीलाल बनारसीदास, दिल्ली, १९७६ चे पुनर्मुद्रण. अ डिक्शनरी ऑफ हिंदुइझम, पृ.३१.
^ ९. एड टु बायबल अंडरस्टँडिंग, वॉचटॉवर सोसायटी, १९७१, पृ. १५४२.
^ १०. अ संस्कृत-इंग्लिश डिक्शनरी, पृ. १२००.
^ ११. वरील पुस्तकातील पृ. १३५.
^ १२. वरील पुस्तकातील पृ. ७०५
^ १३. वरील पुस्तकातील पृ. ७०६
^ १४. एड टू बायबल अंडरस्टँडिंग, पृ. १५३३.
^ १५. अ संस्कृत-इंग्लिश डिक्शनरी, पृ. ४२२
^ १६. भारतीय भाषांमधील पवित्र शात्रांमध्ये “जीव” आणि “आत्मा” यांच्या वापरामध्ये असलेला गोंधळ खालील तक्त्यातील नमुन्यांनी स्पष्ट केला आहे.
शास्रवचन मू. सं. हिं. बं. म. गुज. मल्या.
उत्पत्ती १:२ रूअ आत्म आत्मा आत्मा आत्मा आत्मा आत्मावू
उत्पत्ती २:७ नेफेश प्राणी प्राणी प्राणी प्राणी प्राणी धेही
मत्तय २:२० सायके प्राण प्राण प्राण जीव जीव प्राणन्.
योहान ४:२४ न्युमा आत्म आत्मा आत्मा आत्मा आत्मा आत्मावू
१थेस्स ५:२३ न्युमा आत्मन् आत्मा आत्मा आत्मा आत्मा आत्मावू
१थेस्स ५:२३ सायके प्राणी प्राण प्राण जीव प्राण प्राणन्
इब्री ४:१२ सायके प्राणी जीव प्राण जीव जीव प्राणन्
इब्री ४:१२ न्युमा आत्म आत्मा आत्मा आत्मा आत्मा आत्मावू
वरील तक्त्यातील भाषांच्या संक्षेपाचा खुलासा.
मू = मूळ भाषा
बं = बंगाली
गुज = गुजराती
सं = संस्कृत
म = मराठी
मल्या = मल्याळम्
हिं = हिंदी
तामिळ भाषेतील पवित्र शास्त्रामध्ये सायकेचे भाषांतर करताना कमीत कमी सात वेगवेगळे शब्द वापरले आहेत. त्यातील पाच शब्द संस्कृतमधून आलेले आहेत. १०२ वेळा आलेल्या सायके यासाठी तामिळ पवित्र शास्त्राने खालील शब्द योजले आहेत.
आत्तुमा (संस्कृत: आत्मा, मूलतत्व) ३६ वेळा.
जीवन (संस्कृत: जीवन, जिवंत) ३२ वेळा.
मनम् (संस्कृत: विचार करणे, विचार, मन, हृदय) ९ वेळा.
मनुषन् (संस्कृत: मानव, मनुष्य) रोमकरांस १३:१.
प्राणन् (संस्कृत: जीव, जीवनाचा श्वास, व्यक्ती) ५ वेळा.
युयिर (तामिळ: जीवन, अस्तित्व, व्यक्ती) १० वेळा.
पेर (तामिळ: नाव, लौकीक, व्यक्ती) ४ वेळा.
५ वेळा यादीत घेतलेले नाही.
पहा, ग्रीक न्यू टेस्टमेंट टर्मस् इन इंडियन लँग्वेजेस, ले. जे. एस. एम. हूपर. द बायबल सोसायटी ऑफ इंडिया, १९५७, पृ. १७६, १७७, २४०, २४१.
उत्पत्ती १९:१९, २०; २५:८; ३५:२९; ४७:२५; १ शमुवेल १९:५, ११; २२:२३; २३:१५; २४:११; २ शमुवेल १:९; २३:१७; १ राजे १:१२; २:२३; ३:११; १९:२, ३, १०, १४; ७:७; १ इतिहास ११:१९; २ इतिहास १:११; मत्तय २:२०; प्रे. कृत्ये १५:२५, २६; २०:१४; रोम १६:४; फिलिप्पै २:३०; प्रकटीकरण १६:३.—द काँकॉर्डन्स् टू द टमिल बायबल, ले. डी. ए. थ्रोअर, १९४३. द ख्रिश्चन लिटरेचर सोसायटी, मद्रास १९७६ चे पुनमुर्द्रण.
नेफेश व सायके या शब्दांसाठी तामिळ पवित्र शास्त्रात संस्कृतमधील प्राण हा शब्द जेथे वापरला आहे, अशा शास्त्रवचनांचे काही नमुने:“प्राणी” साठी सर्वसाधारणपणे वापरलेला मल्याळम शब्द धेही आहे. तो, धेय म्हणजे “निर्मिलेले” किंवा देह म्हणजे “शरीर” वा देहिन् म्हणजे “शरीर असलेला” या संस्कृत शब्दापासून बनलेला आहे.
^ १७. इंडियन विजड़म्, ले. सर एम. मोनिअर-विल्यमस्, १८९३, पृ. ४१. कॉस्मो पब्लिकेशन्स्, न्यू दिल्ली, १९७८ चे पुनर्मुद्रण.
^ १८. द सेक्रेड रायटिंग्ज् ऑफ द वर्ड्ज् ग्रेट रिलिजन्स, ले. एस्. ई. फ्रॉस्ट, ज्यूनियर, १९४३, पृ. ३३. द न्यू होम लायब्ररी, द ब्लॅकिस्टन कं., फिलाडेल्फिया, १९४७ चे पुनर्मुद्रण.
^ १९. द जर्नी विथ डेथ, पृ. ११.
^ २०. हिंदुइझम, ले. निराद सी. चौधरी, पृ. ३१२. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, न्यूयॉर्क, १९७९.
^ २१. द जर्नी विथ डेथ, पृ. १४.
^ २२. द वंडर दॅट वॉज इंडिया, ले. ए. एल. बाशम, पृ. २७१. फॉन्टाना बुक्स् यांनी रुपा आणि कं. यांच्यासह नवी दिल्ली येथून काढलेले, १९८४ चे पुनर्मुद्रण.
^ २३. ए डिक्शनरी ऑफ हिंदुइझम, पृ. २६४.
^ २४. द वंडर दॅट वॉज इंडिया, पृ. ३२३.
^ २५. अ डिक्शनरी ऑफ हिंदुइझम, पृ. ३१, २१९.
^ २६. इंडियन विजडम, पृ. २८.
मृत्यूला तोंड देण्याकरता धैर्य
एका स्त्रीने लिहिले, “माझे पती नुकतेच कर्करोगाने वारले. आशा आणि जीवन अशा दोन्हींचा विनाश करणारा हा आजार आहे. पण तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाळ जगू शकाल या पुस्तकातील माहितीने माझ्या पतींना धैर्याने मरण्यास साहाय्य केले. इतरांना आशेने जगण्यास त्याची खचितच मदत होऊ शकते. प्रत्येकाने ते जरूर वाचले पाहिजे.”
या आशादायक पुस्तकाची २५६ पृष्ठे असून १५० हून अधिक चित्रे, सुंदर रंगानी भरलेली आहेत. रूपये २० पाठवून आपली प्रत प्राप्त करा.
[तळटीपा]
^ पृष्ठ २९ वर असलेल्या संदर्भ ग्रंथाच्या सूचिमध्ये १६ वे सदर पाहा.
^ पुराव्याकरता, कुरुक्षेत्र ते हर्मगिदोन—आणि तुमचा बचाव ही वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रकाशित केलेली पुस्तिका पाहा.
[अभ्यासाचे प्रश्न]
[५ पानांवरील चित्रं]
पहिल्या मानवी जोडप्याने मानवजातीवर मरण आणले
[७ पानांवरील चित्रं]
मरण काहीतरी गमावल्याची आणि असाहाय्याची भयंकर भावना आणते
[११ पानांवरील चित्रं]
ते सर्व जीव आहेत
[१३ पानांवरील चित्रं]
शरीर + जीवनी शक्ती = जिवंत जीव
[१८ पानांवरील चित्रं]
मानवजातीची पापापासून सुटका करण्यासाठी देवाने प्रीतीचा न्यायाद्वारे तोल साधला
[२० पानांवरील चित्रं]
परिपूर्ण येशू आदामाशी तंतोतंत जुळणारा होता
[२२ पानांवरील चित्रं]
देवाची भक्ती करण्यासाठी आम्हाला मोठ्या इमारती किंवा मूर्त्यांची गरज नाही
[२३ पानांवरील चित्रं]
आदामाच्या पापाने येशूच्या बलिदानाची जरुरी प्रस्तुत केली
[२७ पानांवरील चित्रं]
मरणावर विजय मिळवणे!