व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग चार

दोषी भावना—“माझे पाप दूर करून मला निर्मळ कर”

दोषी भावना—“माझे पाप दूर करून मला निर्मळ कर”

“नवीन नोकरीमुळं मी भरपूर पैसा कमवू लागले. पण या नोकरीमुळं मी काही चुकीच्या गोष्टींत गुंतत गेले. मी सण पाळू लागले, राजनैतिक गोष्टींत सहभाग घेऊ लागले, इतकंच काय तर चर्चलाही जाऊ लागले. मी सत्यात मागे पडले आणि ४० वर्षं मंडळीपासून दूर राहिले. मला परत यावसं वाटायचं. पण सत्य माहीत असूनही मी स्वतःच दूर गेले होते म्हणून माझं मन खात होतं. यहोवा मला कधीच माफ करणार नाही असं मला नेहमी वाटायचं. दिवसेंदिवस ही भावना आणखीनच तीव्र होत गेली. मला नेहमी दोषी वाटायचं.”—मार्था नावाची बहीण.

दोषी भावना हे एक सहन न होणारं ओझं आहे. त्या जणू काय डोक्यावर एका टांगत्या तलवारीप्रमाणे असतात. दावीद राजानं म्हटलं: “जड ओझ्याप्रमाणे [माझे अपराध] मला फार भारी झाले आहेत.” (स्तोत्र ३८:४) काही ख्रिस्ती दोषी भावनेमुळं खूप दुःखी झाले आहेत. त्यांना असं वाटतं की यहोवा त्यांना कधीच परत घेणार नाही. (२ करिंथकर २:७) पण असा विचार करणं योग्य आहे का? ‘माझ्या हातून गंभीर पाप घडल्यामुळं यहोवा मला कधीच माफ करणार नाही,’ असा विचार तुमच्या मनात कधी आला आहे का? यहोवाला काय वाटतं ते जाणून घ्या.

‘परत येण्यासाठी मी तुम्हाला मदत करेन’

यहोवा खरंतर अशा लोकांच्या शोधात असतो जे खऱ्‍या मनानं पश्‍चात्ताप दाखवतात. आणि त्यांना मदत करण्यासाठी तो स्वतःहून पुढं येतो. उधळ्या पुत्राच्या दाखल्यात येशूनं यहोवाची तुलना एका प्रेमळ पित्याशी केली. या दाखल्यातील मुलगा घर सोडून जातो आणि अनैतिक जीवन जगतो. पण कालांतरानं त्याला त्याची चूक लक्षात येते आणि तो घरी परततो. अहवालात असं म्हटलं आहे की, “तो [मुलगा] दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले.” (लूक १५:११-२०) तुम्हालाही यहोवाजवळ परत येण्याची इच्छा आहे का? मी यहोवापासून खूप “दूर” आहे, असं तुम्हालाही वाटतं का? दाखल्यातील पित्याप्रमाणे यहोवादेखील तुम्हाला दया दाखवण्यास तयार आहे. त्या पित्यासारखंच तो तुम्हाला मिठी मारण्यासाठी खूप आतुरतेनं वाट पाहत आहे.

पण तुमच्या मनात जर अशी शंका असेल, की ‘माझ्या हातून बऱ्‍याच गंभीर चुका झाल्या असल्यामुळं यहोवा मला क्षमा करणार नाही,’ तर काय? यहोवानं यशया १:१८ (NW) या वचनात जे म्हटलं त्यावर विचार करा: “आपण चर्चा करू आणि मी तुम्हाला माझ्यासोबतचा तुमचा नातेसंबंध सुधारण्यास मदत करेन; तुमची पापे लाखेसारखी लाल असली तरी मी ती बर्फासारखी पांढरी करेन.” एखाद्या व्यक्‍तीचं पाप पांढऱ्‍या शुभ्र कपड्यावरील गडद रंगाच्या डागासारखं असलं, तरी यहोवा ते पुसून टाकू शकतो व त्या व्यक्‍तीला पूर्णपणे माफ करू शकतो.

दोषीपणाच्या भावनेनं तुमचं मन तुम्हाला खात राहावं अशी यहोवाची मुळीच इच्छा नाही. तर तुम्हाला मनःशांती मिळावी अशी त्याची इच्छा आहे. आणि तुमचा विवेक शुद्ध असला तरच तुम्हाला मनःशांती मिळू शकते. मग शुद्ध विवेक तुम्ही कसा मिळवू शकता? दावीद राजानं शुद्ध विवेक मिळवण्यासाठी दोन पावलं उचलली. पहिलं म्हणजे, त्यानं यहोवाजवळ आपलं पाप “कबूल केले.” (स्तोत्र ३२:५) यशयाच्या पुस्तकात आपण वाचलं, की यहोवानं तुम्हाला, “माझ्यासोबतचा तुमचा नातेसंबंध सुधारण्यास” या, असं आमंत्रण आधीच दिलंय.  तेव्हा, त्याची मदत स्वीकारा. तुमच्या हातून झालेल्या चुका यहोवासमोर कबूल करा व त्याच्याजवळ आपलं मन मोकळं करा. दाविदानंदेखील असंच केलं होतं; म्हणून तो पूर्ण खात्रीनं अशी प्रार्थना करू शकला: “माझे पाप दूर करून मला निर्मळ कर. ... भग्न [दुःखी] व अनुतप्त [पश्‍चात्तापी] हृदय तू तुच्छ मानणार नाहीस.”—स्तोत्र ५१:२, १७.

दुसरं पाऊल म्हणजे, देवानं नियुक्‍त केलेल्या नाथान संदेष्ट्याकडून दाविदानं मदत स्वीकारली. (२ शमुवेल १२:१३) आज, यहोवानं तुम्हाला मदत करण्यासाठी मंडळीतील वडिलांना नियुक्‍त केलं आहे. पश्‍चात्ताप दाखवणाऱ्‍या लोकांना मदत करण्यास यहोवानं त्यांना प्रशिक्षण दिलं आहे. तुम्ही त्यांना मदत मागता तेव्हा ते, तुमच्या जखमी मनाला फुंकर घालण्यासाठी, तुमच्या मनातील दोषी भावना काढून टाकण्यासाठी आणि आध्यात्मिक रीत्या तुमचं दुखणं बरं करण्यासाठी बायबलमधील वचनांचा व प्रार्थनेचा उपयोग करतील.—याकोब ५:१४-१६.

तुम्हाला शुद्ध विवेक मिळावा अशी यहोवाची इच्छा आहे

“ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे ... तो धन्य!”

हे खरं आहे, की यहोवाजवळ आपलं पाप कबूल करणं आणि वडिलांची मदत घेणं तुम्हाला महाकठीण वाटेल. दाविदालाही त्याचं पाप कबूल करणं खूप कठीण गेलं. बायबलमध्ये सांगितलं आहे, की पाप केल्यानंतर काही वेळ तो “गप्प” राहिला. (स्तोत्र ३२:३) पण जेव्हा त्यानं त्याचं पाप कबूल केलं आणि खरा पश्‍चात्ताप दाखवला तेव्हा त्याला फायदा झाला.

सर्वात मोठा फायदा म्हणजे गमावलेला आनंद त्याला पुन्हा मिळाला. त्यानं म्हटलं: “ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरूण घातले आहे, तो धन्य!” (स्तोत्र ३२:१) त्यानं यहोवाला प्रार्थना केली: “हे प्रभू, माझे ओठ उघड; म्हणजे माझे मुख तुझी कीर्ति वर्णेल.” (स्तोत्र ५१:१५) पाप कबूल केल्यामुळं दाविदाला मनःशांती मिळाली. खरा पश्‍चात्ताप दाखवल्यामुळं यहोवानं त्याला माफ केलं आणि त्यामुळं तो यहोवाविषयी इतरांना सांगण्यास प्रवृत्त झाला.

तुम्हालाही शुद्ध विवेक मिळावा अशी यहोवाची इच्छा आहे. आणि तुम्ही दोषी मनानं नाही तर अगदी आनंदानं त्याच्या व त्याच्या उद्देशांविषयी इतरांना सांगावं असं त्याला वाटतं. (स्तोत्र ६५:१-४) तुमची पापं पुसून घ्या आणि यहोवाकडून मिळणारी विश्रांती मिळवा, असं बायबलमध्ये आमंत्रण देण्यात आल्याचं तुम्हाला आठवत असेल.—प्रेषितांची कृत्ये ३:१९.

सुरुवातीला उल्लेख केलेल्या मार्थाच्या बाबतीत असंच घडलं. ती म्हणते: “माझा मुलगा नेहमी मला टेहळणी बुरूज आणि सावध राहा!  नियतकालिकं पाठवायचा. हळूहळू मी यहोवाला नव्यानं ओळखू लागले. मी केलेल्या चुकांची माफी मागणं मला खूप कठीण गेलं. पण शेवटी मी त्याला प्रार्थना केली आणि त्याच्याकडं क्षमेची याचना केली. यहोवाकडं परत यायला मला ४० वर्षं लागली. इतकी वर्षं उलटल्यानंतरही एखाद्याला पुन्हा यहोवाची सेवा करण्याची आणि त्याचं प्रेम मिळवण्याची संधी मिळू शकते, याचं मी एक जिवंत उदाहरण आहे.”