व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नियमन मंडळाकडून पत्र

नियमन मंडळाकडून पत्र

प्रिय सहउपासक:

बायबलमध्ये उल्लेख करण्यात आलेले लोक आपल्याप्रमाणेच होते, हे तुम्हाला माहीतच आहे. त्यांनाही आपल्यासारख्याच आव्हानांना तोंड द्यावं लागलं होतं. तेही आपल्यासारख्याच स्वभावाचे होते. (याकोब ५:१७) काही जण चिंतांमुळं त्रासून गेले होते तर काही कुटुंबातील सदस्यांकडून किंवा सहउपासकांकडून दुखावले होते. आणि पुष्कळ जणांना, त्यांनी केलेल्या चुकांबद्दल दोषी वाटत होतं.

मग या लोकांनी यहोवाला पूर्णपणे सोडून दिलं होतं का? नाही. अनेक जण स्तोत्रकर्त्याप्रमाणे होते ज्यानं अशी प्रार्थना केली: “हरवलेल्या मेंढरासारखा मी हरवलो आहे; आपल्या दासाचा शोध कर; कारण मी तुझ्या आज्ञा कधी विसरलो नाही.” (स्तोत्र ११९:१७६) तुम्हालाही असंच वाटतं का?

यहोवाच्या लोकांपासून दूर गेलेल्या त्याच्या उपासकांना तो कधीच विसरत नाही. उलट तो त्यांना, कोणा बांधवाद्वारे किंवा बहिणीद्वारे परत आणण्याचा खूप प्रयत्न करतो. त्याचा सेवक ईयोब याला त्यानं कशी मदत केली त्यावर विचार करा. ईयोबावर एकापाठोपाठ एक संकटं आली. त्याची सर्व संपत्ती गेली, त्याच्या मुलांचा मृत्यू झाला आणि शेवटी त्याला स्वतःलाच एक भयानक आजार झाला. त्याच्या पाठीशी ज्यांनी खंबीरपणे उभं राहायला हवं होतं त्यांनीसुद्धा त्याच्या मनावर वार केले. काही काळासाठी त्याचे विचार थोडेसे भरकटले खरे, पण त्यानं यहोवाला सोडलं नाही. (ईयोब १:२२; २:१०) या सर्व संकटांतून सावरायला यहोवानं ईयोबाला कशी मदत केली?

एक मार्ग म्हणजे यहोवानं ईयोबाचा मित्र एलीहू याच्याकडून त्याला सांत्वन दिलं. ईयोब जेव्हा भडभडून बोलत होता तेव्हा एलिहूनं शांतपणे त्याचं सर्व बोलणं ऐकून घेतलं आणि मग तो बोलला. काय म्हणाला तो ईयोबाला? त्यानं ईयोबालाच दोषी ठरवून असं काही म्हटलं का ज्यामुळं ईयोबाचं मन त्याला खाऊ लागलं? त्यानं स्वतःला ईयोबापेक्षा श्रेष्ठ समजलं का? यांतलं काहीच एलिहूनं केलं नाही. यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं एलीहू म्हणाला: ‘देवापुढं मी तुझ्यासारखाच आहे. मीही मातीचाच घडलेलो आहे. माझ्या धाकानं तू घाबरू नकोस. माझ्या बोलण्यानं तू निराश होऊ नकोस.’ (ईयोब ३३:६, ७) ईयोबाच्या जखमांवर मीठ चोळण्याऐवजी एलिहूनं त्याच्या दुखऱ्‍या मनाला फुंकर घातली. त्यानं त्याला प्रेमळ सल्ला व उत्तेजन दिलं आणि ईयोबाला हेच हवं होतं.

हे माहितीपत्रकसुद्धा याच उद्देशासाठी बनवण्यात आलं आहे. सत्यापासून दूर गेलेल्या तुम्हापैकी अनेकांचं बोलणं आम्हीसुद्धा आधी ऐकून घेतलं आणि तुमची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला. (नीतिसूत्रे १८:१३) मग आम्ही, तुमच्यासारख्याच समस्या असलेल्या यहोवाच्या सेवकांना यहोवानं कशी मदत केली त्याबद्दल बायबलमध्ये असलेल्या अहवालांचं प्रार्थनापूर्वक परीक्षण केलं. आणि त्यानंतर, बायबलमधील ते अहवाल तसंच आजच्या दिवसांतल्या बांधवांचे अनुभव एकत्र करून हे माहितीपत्रक तयार केलं. यातल्या माहितीचं तुम्ही बारकाईनं परीक्षण करावं, अशी आमची मनापासून इच्छा आहे. आमचं तुमच्यावर खरोखर प्रेम आहे ही खातरी आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो.

यहोवाच्या साक्षीदारांचं नियमन मंडळ