देवाच्या स्तुतीसाठी पवित्र शास्त्र साहित्याचे उत्पादन
देवाच्या स्तुतीसाठी पवित्र शास्त्र साहित्याचे उत्पादन
छापील पृष्ठांच्या सहाय्याने देवाच्या राज्याचा प्रचार करण्याबद्दल यहोवाच्या साक्षीदारांची ख्याती आहे. १९२० पासून वितरणासाठी नियतकालिकांचे व पुस्तकांचे उत्पादन करण्यासाठी वॉचटावर संस्थेने साक्षीदारांमधील स्वयंसेवी कार्यकत्यांचा उपयोग केला आहे. कमीत कमी खर्चात साहित्याच्या विश्वसनीय उत्पादनाची खात्री व्हावी म्हणून असे करण्यात आले.
गेल्या जवळपास ६० वर्षांमध्ये संस्थेने पवित्र शास्त्र साहित्याचे आपले उत्पादन, प्रथम ब्रुकलिन येथे सुरु केले व नंतर इतर देशांमध्ये ते विकसित केले. वाढत्या संख्येच्या स्वयंसेवकांनी हे सर्व काम केलेले आहे.
१९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात, मसुद्यावरील प्रक्रिया व त्याच्या छपाईची पारंपारिक पद्धत हळू हळू काढून टाकून त्याऐवजी संगणक प्रक्रिया, फोटोटाईप सेटिंग व ऑफसेट छपाई सुरु केली गेली. यामध्ये समस्या अशी होती की, उपलब्ध असणारी व्यापारी यंत्रे फक्त मर्यादित भाषांच हाताळू शकत होती. परंतु संस्था तर आधीच जवळपास १६० भाषांमध्ये साहित्य उत्पादन करीत होती व त्याहूनहि अधिक भाषांमधील साहित्याची गरज होती.
या कारणासाठी बहुभाषिक इलेक्ट्रॉनिक फोटो टाईप सेटिंग व्यवस्था बनविण्यासाठी स्वयंसेवकांना पाचारण केले गेले. त्याची फलनिष्पत्ती अतिशय समाधानकारक होती. त्यात येणाऱ्या तांत्रिक समस्यांची छाननी केली गेली व मसुद्याची नोंद आणि रचना तसेच फोटो टाईप सेटिंग करणारी यंत्रणा बनविण्यात आली, तिला मेप्स म्हणतात. ती जवळपास २०० भाषा हाताळते. त्यात आणखी भाषांची भर घालता येते.
आज यहोवाच्या साक्षीदारांनी बनविलेली मसुदा-नोंद व ग्राफिक्सची यंत्रे २५ देशात उपयोगात आणली जात आहेत व आणखी बनविण्याची योजना आहे. ही यंत्रसामग्री वापरण्यासाठी व त्याची देखभाल करण्यासाठी या देशांमधील स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आता संस्था ३६ देशांमध्ये १०० भाषात नियतकालिकांचे उत्पादन करते आणि त्यातील ५ देशांमध्ये बांधणी केलेल्या पुस्तकांचे व पवित्र शास्त्राचेहि उत्पादन होत आहे.
हे काम करण्यासाठी लेखक, भाषांतरकार, मुद्रिते-तपासणीस, मुद्रक, बाइंडर व वितरण व्यवस्था करणारे कामगार अशा लोकांची गरज असते. इतर काही मंडळ्यांशी होणारा पत्रव्यवहार सांभाळतात. काहीजण अन्न उत्पादन, भोजन व्यवस्था, साफसफाई, धुलाई वगैरे करतात. ही सर्व कामे वेगवेगळ्या देशांमध्ये कामाला तयार झालेले स्वयंसेवक करतात. १९८५ मध्ये जगभरात ८,४३८ स्वयंसेवक वेगवेगळ्या कचेऱ्यात, कारखान्यात, निवास स्थानामध्ये व शेतावर काम करीत होते.
हे लोक कोण आहेत? पुरुष, स्त्रिया, अविवाहीत व विवाहीत, तरुण व वयस्क असे ते सर्व समर्पित यहोवाचे साक्षीदार आहेत. काहीजण ४०, ५० व ६०ही वर्षे हे काम करीत आहेत. त्यांना नेमून दिलेल्या कामात ते आठवड्यात साधारणपणे ४४ तास व लागल्यास अधिकही घालवतात. सायंकाळ व शनिवार-रविवार हे लोक घरोघरच्या प्रचार कार्यात तसेच मंडळीच्या इतर कार्यास देतात.
जगभरात या कार्यकर्त्यांसाठी बेथेल होम म्हटल्या जाणाऱ्या संस्थेच्या निवासात साध्या राहण्याची व जेवणाची सोय केलेली असते. शिवाय सेवेमध्ये होणाऱ्या प्रवास खर्चासाठी लहान भत्ता आणि वैयक्तिक गरजांसाठी छोटीशी रक्कम देण्यात येते.
१९२० पासून या स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी जगभरात वितरणासाठी जवळपास २०० भाषांमध्ये ९ महापद्मापेक्षा अधिक पवित्र शास्त्रे, पुस्तके, नियतकालिके व पत्रिकांचे उत्पादन केले आहे. प्रत्येक राष्ट्र, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे व लोक ह्यांना सार्वकालिक सुवार्ता सांगता यावी यासाठी ते आपला कार्यभाग पार पाडीत आहेत.—प्रकटीकरण १४:६, ७.
● छपाईच्या कोणत्या सुविधा वॉचटावर संस्थेपाशी आहेत व का?
● ही सर्व कामे कोण करतात व ते कसे राहतात?
[२४ पानांवरील चित्रं]
ब्रुकलिन व वॉलकिल, न्यूयॉर्क, यु.एस.ए. येथे कारखाना, निवासस्थान, कार्यालय व शेतावर स्वयंसेवक पवित्रशास्त्र साहित्याच्या उत्पादनाशी असणारी संबंधित कामे करत असताना
[२५ पानांवरील चित्रं]
पवित्र शास्त्र व पवित्र शास्त्रविषयक साहित्याच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या उत्पादनाशी संबंधित असणारी कामे स्वयंसेवक करीत असताना
स्पेन
जर्मनी
फिनलंड
कॅनडा
डेन्मार्क
स्वीडन
दक्षिण आफ्रिका
ब्राझिल
नेदरलँडस्
ऑस्ट्रेलिया