व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आवड दाखवणारे लोक सहसा विचारत असलेले प्रश्‍न

आवड दाखवणारे लोक सहसा विचारत असलेले प्रश्‍न

आवड दाखवणारे लोक सहसा विचारत असलेले प्रश्‍न

देव प्रीती आहे तर तो दुष्टाईला परवानगी का देतो?

देवाने दुष्टाईला परवानगी दिली आहे आणि पृथ्वीवरील कोट्यवधी लोक स्वच्छेने वारंवार दुष्टाईचा मार्ग अवलंबतात. उदाहरणार्थ, ते युद्ध करतात, मुलांवर बॉम्ब फेकतात, पृथ्वीचा नाश करतात व दुष्काळ घडवतात. कोट्यवधी लोक धुम्रपान करून फुफ्फुसाचा कर्करोग, व्यभिचार करून लैंगिकरीत्या संक्रमित होणारे आजार, प्रमाणाबाहेर मादक पदार्थांचे सेवन करून यकृताचा रोग जडवून घेतात. अशी पुष्कळ उदाहरणे देता येतील. सर्व दुष्टाईचा अंत व्हावा अशी या लोकांची खरोखर इच्छा नसते. त्यांना फक्‍त दुष्टाईमुळे मिळणाऱ्‍या शिक्षांपासून मुक्‍ती हवी असते. त्यांनी जे पेरले आहे त्याची त्यांना कापणी करावी लागते तेव्हा मात्र ते ओरडतात, “या सर्व गोष्टी मलाच का भोगाव्या लागतात?” आणि नीतिसूत्रे १९:३ म्हणते त्याप्रमाणे ते देवाला दोष देतात: “मनुष्याची मूर्खता त्याचा मार्ग विपरीत करते, आणि त्याचे हृदय प्रभूवर चिडते.” (मराठी कॉमन लँग्वेज भाषांतर) देवाने या लोकांची दुष्कृत्ये थांबवली तर, ही दुष्कृत्ये करण्याचे स्वातंत्र्य आपल्याकडून हिरावून घेण्यात आल्याबद्दल ते निषेध करतील!

यहोवाने दुष्टाईला अनुमती देण्याचे एक मुख्य कारण म्हणजे, तो सैतानाच्या दाव्याला उत्तर देऊ इच्छितो. दियाबल सैतानाने म्हटले होते, की या पृथ्वीवरील कोणताही मनुष्य परीक्षेत असताना देवाला इमानदार राहू शकणार नाही. (ईयोब १:६-१२; २:१-१०) सैतानाने केलेला हा दावा सिद्ध करू देण्याकरता यहोवाने त्याला आजपर्यंत जिवंत ठेवले आहे. (निर्गम ९:१६) आता, सैतान त्याचा दावा खरा ठरवण्यासाठी लोकांवर पीडा आणून त्यांना देवाच्या विरुद्ध जाण्यास प्रवृत्त करत आहे. (प्रकटीकरण १२:१२) परंतु ईयोब एकनिष्ठ राहिला. येशूही एकनिष्ठ राहिला. तसेच खरे ख्रिस्ती देखील आज एकनिष्ठ राहत आहेत.—ईयोब २७:५; ३१:६; मत्तय ४:१-११; १ पेत्र १:६, ७.

लोक अनंतकाळ जगतील अशा पृथ्वीवरील परादीसवर मी विश्‍वास ठेवला असता, परंतु वास्तवात असे घडणे शक्य आहे का?

हे बायबलनुसार नाही. मानवजातीला कित्येक शतकांपासून वाईटाचा अनुभव येत असल्यामुळे वास्तवात असे घडणे शक्य नाही, असे वाटते. यहोवाने पृथ्वी निर्माण केली आणि पृथ्वीवर वनस्पतींची व प्राण्यांची काळजी घेऊ शकणाऱ्‍या तसेच पृथ्वीचे सौंदर्य नष्ट करून टाकण्याऐवजी ते टिकवून ठेवणाऱ्‍या धार्मिक पुरुष व स्त्रियांनी लोकवस्ती करावी असे मानवांना सांगितले. (१२ आणि १७ पृष्ठे पाहा.) ते वाग्दत्त परादीस येणे शक्य नसण्यापेक्षा, सध्याची दुःखद परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की ती आणखी जास्त काळ राहणे शक्य नाही. फार लवकर या दुष्ट परिस्थितीचे रुपांतर परादीसमध्ये होणार आहे.

बायबल केवळ दंतकथा आहे व ते विज्ञानानुसार नाही, अशी थट्टा करणाऱ्‍या लोकांना मी काय उत्तर द्यावे?

ह्‍या अभिवचनांवर विश्‍वास ठेवणे म्हणजे भोळसटपणा नव्हे. “विश्‍वास वार्ता ऐकण्यावरून होतो.” देवाच्या वचनाचा अभ्यास केल्यावर, आपल्याला त्यातील बुद्धीची प्रचिती येते आणि त्यावरील आपला विश्‍वास वाढतो.—रोमकर १०:१७, पं.र.भा; इब्री लोकांस ११:१.

बायबलच्या संबंधाने असलेले पुरातत्त्वशास्त्र, बायबलच्या ऐतिहासिक अचूकतेची पुष्टी देते. खरे विज्ञान बायबलशी सुसंगत आहे. लौकिक विद्वानांनी शोध लावण्याआधीच बायबलमध्ये बऱ्‍याच वस्तूस्थितींविषयी लिहून ठेवण्यात आले होते, उदाहरणार्थ: पृथ्वीची घडण होताना ती कोणकोणत्या अवस्थेतून गेली याबद्दलचा अनुक्रम, पृथ्वीचा गोलाकार; ती निराधार असणे आणि पक्ष्यांचे स्थलांतर.—उत्पत्ति अध्याय १; यशया ४०:२२; ईयोब २६:७; यिर्मया ८:७.

बायबल हे प्रेरित वचन आहे, हे त्यांतील पूर्ण झालेल्या भविष्यवाणींतून दिसून येते. जागतिक सत्तांचा उदय व पाडाव याविषयी तसेच मशीहाचे आगमन केव्हा होईल आणि त्याला केव्हा मारले जाईल याविषयी दानीएलाने आधीच भाकीत केले होते. (दानीएल अध्याय २, ८; ९:२४-२७) आज, इतर भविष्यवाण्या पूर्ण होत आहेत व आपण जगत असलेला काळ हा ‘शेवटल्या दिवसांचा’ काळ आहे हे सूचित करत आहेत. (२ तीमथ्य ३:१-५; मत्तय अध्याय २४) मनुष्य अशाप्रकारची भाकीते करू शकत नाही. (यशया ४१:२३) आणखी पुष्टीकरता, बायबल—देवाचे वचन की मानवाचे? (इंग्रजी) आणि तुमची काळजी घेणारा सृष्टीकर्ता आहे का? (इंग्रजी) ही यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेली पुस्तके पाहा.

बायबलवरील प्रश्‍नांची उत्तरे द्यायला मी कसा शिकू शकतो?

तुम्ही बायबलचा अभ्यास करून त्यावर मनन केले पाहिजे; शिवाय, मार्गदर्शनासाठी देवाच्या पवित्र आत्म्याचे साहाय्य मागितले पाहिजे. (नीतिसूत्रे १५:२८; लूक ११:९-१३) बायबल म्हणते, “तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल; कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो.” (याकोब १:५) तसेच, योग्य सल्ल्यासाठी अनेक बायबल आधारित पुस्तके देखील आहेत. फिलिप्पाने जसे इथियोपियाच्या व्यक्‍तीबरोबर अभ्यास केला तसेच आपल्यालाही बायबल समजण्यासाठी इतरांची मदत घ्यावी लागेल. (प्रेषितांची कृत्ये ८: २६-३५) यहोवाचे साक्षीदार आवड दाखवणाऱ्‍या लोकांच्या घरी जाऊन विनामूल्य बायबल अभ्यास चालवतात. तुम्हालाही अशाप्रकारचा अभ्यास हवा असेल तर कसलाही संकोच न बाळगता तुम्ही विनंती करू शकता.

अनेक लोक यहोवाच्या साक्षीदारांचा विरोध करून त्यांच्याबरोबर अभ्यास करू नका असे मला का सांगतात?

येशूच्या प्रचारकार्याचा लोकांनी विरोध केला; येशूने म्हटले, की त्याच्या शिष्यांचाही विरोध केला जाईल. येशूच्या शिकवणींनी प्रभावीत झालेल्या लोकांना धार्मिक विरोधक लगेच टोमणा मारायचे: “तुम्हीहि फसला आहा काय? अधिकाऱ्‍यांपैकी किंवा परूश्‍यांपैकी कोणीतरी त्याच्यावर विश्‍वास ठेवला आहे काय?” (योहान ७:४६-४८; १५:२०) साक्षीदारांबरोबर अभ्यास करू नका, असा सल्ला देणाऱ्‍या अनेकांना एकतर अपुरी माहिती असते किंवा त्यांच्या मनात कलुषितपणा असतो. बायबलविषयीचे तुमचे ज्ञान वाढते की नाही हे साक्षीदारांसोबत अभ्यास करून पाहा.—मत्तय ७:१७-२०.

ज्या लोकांना त्यांचा स्वतःचा धर्म आहे अशा लोकांकडे साक्षीदार का जातात?

साक्षीदार असे करतात तेव्हा ते येशूचे अनुकरण करत असतात. येशू यहुद्यांकडे गेला. यहुद्यांना त्यांचा स्वतःचा धर्म असला तरीसुद्धा, अनेक बाबतीत तो धर्म देवाच्या वचनापासून दूर होता. (मत्तय १५:१-९) प्रत्येक राष्ट्रांत कोणते न कोणते धर्म असतात; मग ते तथाकथित ख्रिस्ती धर्म असोत अथवा गैरख्रिस्ती धर्म असोत. असे असले तरी, लोकांनी देवाच्या वचनाशी तंतोतंत जुळणाऱ्‍या विश्‍वासाला धरून राहणे फार महत्त्वाचे आहे. साक्षीदारांना शेजाऱ्‍यांवर प्रेम आहे म्हणून ते लोकांना अशी मदत करण्याचा प्रयत्न करतात.

केवळ आपलाच धर्म खरा आहे असा साक्षीदार विश्‍वास करतात का?

धर्माचा गंभीरपणे विचार करणाऱ्‍या व्यक्‍तीला, ती ज्या धर्माचे पालन करते तो धर्म शंभर टक्के खरा आहे असा विश्‍वास असला पाहिजे. नाहीतर, तिने अथवा त्याने विनाकारण का म्हणून त्याचे पालन करावे? “सर्व गोष्टींची पारख करा; चांगले ते बळकट धरा,” असा ख्रिश्‍चनांना सल्ला देण्यात आला आहे. (१ थेस्सलनीकाकर ५:२१) आपले विश्‍वास शास्त्रवचनांवर आधारित आहेत याची एखाद्याने खात्री करून घ्यावी; कारण जगात फक्‍त एकच खरा विश्‍वास आहे. इफिसकर ४:५ याला पुष्टी देत म्हणते, की “प्रभू एकच, विश्‍वास एकच, बाप्तिस्मा एकच” आहे. तारणाकडे नेणारे अनेक मार्ग व अनेक धर्म आहेत या आधुनिक, शिथिल दृष्टिकोनाला येशूने मान्यता दिली नाही. उलट त्याने म्हटले: “परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद आणि मार्ग संकोचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत.” यहोवाच्या साक्षीदारांचा विश्‍वास आहे की त्यांना तो मार्ग सापडला आहे. नाहीतर, ते दुसऱ्‍या धर्माकडे वळाले असते.—मत्तय ७:१४.

केवळ आपलाच बचाव होईल असा त्यांचा विश्‍वास आहे का?

नाही. यहोवाचे साक्षीदार नसलेल्या गतकाळातील कोट्यवधी मृत लोकांचे पुनरूत्थान होऊन त्यांना देखील जीवनाची संधी मिळेल. आज हयात असलेल्या अनेक लोकांना “मोठे संकट” येण्याआधी सत्य आणि धार्मिकतेच्या बाजूने होण्यासाठी अद्यापही वेळ आहे; असे केल्यास त्यांचे तारण होऊ शकेल. शिवाय, आपण एकमेकांचा न्याय करू नये असे येशूने म्हटले. आपण बाह्‍यस्वरूप पाहतो, परंतु देव हृदय पाहतो. त्यामुळे तो अगदी अचूक पाहतो आणि दयाळूपणे न्याय करतो. त्याने, आपल्या नव्हे तर येशूच्या हाती न्याय करण्याचे काम सोपवले आहे.—मत्तय ७:१-५; २४:२१; २५:३१.

यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना उपस्थित राहणाऱ्‍यांकडून कोणत्या आर्थिक देणगीची अपेक्षा केली जाते?

पैशांच्या देणगीसंबंधी प्रेषित पौलाने म्हटले: “प्रत्येकाने आपआपल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे. दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो.” (२ करिंथकर ९:७) यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात व अधिवेशनांत कधीही वर्गणी गोळा केली जात नाही. तेथे दान-पेट्या ठेवल्या जातात जेणेकरून जो स्वेच्छेने वर्गणी देऊ इच्छितो तो त्यात वर्गणी टाकू शकतो. कोणी किती टाकले किंवा नाही टाकले, हे कोणालाच समजून येत नाही. काही जण इतरांपेक्षा अधिक देऊ शकतात; इतर जण कदाचित काहीच देण्याच्या स्थितीत नसतील. यरुशलेमच्या मंदिरातील भांडार व त्यात दान टाकणाऱ्‍यांवर विवेचन करताना येशूने योग्य दृष्टिकोन दाखवला: एखाद्याची देण्याची क्षमता आणि देण्यामागची मनोवृत्ती ही महत्त्वाची आहे; रक्कमेला महत्त्व नाही.—लूक २१:१-४.

मी यहोवाचा साक्षीदार झालो तर, त्यांच्याप्रमाणे मलाही प्रचार करावा लागेल का?

एखादी व्यक्‍ती, ख्रिस्ताच्या शासनाधीन पृथ्वीवरील वचनयुक्‍त परादीसविषयीचे भरपूर ज्ञान घेते तेव्हा ती ते ज्ञान स्वतःजवळ ठेवत नाही तर इतरांनाही सांगू लागते. तुम्हालाही असेच वाटेल. हीच सुवार्ता आहे!—प्रेषितांची कृत्ये ५:४१, ४२.

इतरांना सुवार्ता सांगणे हा, तुम्ही येशू ख्रिस्ताचे शिष्य आहात हे दाखवण्याचा एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे. बायबलमध्ये येशूला “विश्‍वसनीय व खरा साक्षी” म्हटले आहे. पृथ्वीवर असताना त्याने असा प्रचार केला: “स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” आपल्या शिष्यांनाही त्याने असेच करण्यास पाठवून दिले. (प्रकटीकरण ३:१४; मत्तय ४:१७; १०:७) नंतर, येशूने आपल्या अनुयायांना अशी आज्ञा दिली: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा, . . . . त्यांस . . . शिकवा.” अंत येण्यापूर्वी, “साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल,” असेही त्याने भाकीत केले.—मत्तय २४:१४; २८:१९, २०.

या सुवार्तेचा प्रचार करण्याचे अनेक मार्ग आहेत. अनेकवेळा, मित्रांसोबत व ओळखीच्या लोकांसोबत संभाषण सुरू केल्याने सुवार्ता सांगण्यासाठीसुद्धा मार्ग मोकळा होतो. काही जण पत्राद्वारे किंवा टेलिफोनद्वारे सुवार्तेचा प्रचार करतात. इतर काही लोक, त्यांच्या ओळखीच्या लोकांना आवडतील अशा खास विषयांचे साहित्य पोस्टाद्वारे त्यांना पाठवतात. सर्वांना संदेश ऐकण्याची संधी मिळावी म्हणून साक्षीदार घरोघरी देखील जातात.

“आत्मा व वधू ही म्हणतात, ये. ऐकणाराही म्हणो, ये. आणि तान्हेला येवो; ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेवो,” हे प्रेमळ आमंत्रण बायबलमध्ये आहे. (प्रकटीकरण २२:१७) पृथ्वीवरील परादीस आणि त्यांतील आशीर्वादांबद्दल आपण इतरांना स्वखुषीने सांगितले पाहिजे; इतरांना सुवार्ता सांगण्याची आपल्याला अगदी मनापासून तीव्र इच्छा झाली पाहिजे.

यहोवाचे साक्षीदार आणि त्यांच्या विश्‍वासांबद्दल तुम्हाला नक्कीच आणखी पुष्कळ प्रश्‍न असतील याची आम्हाला खात्री आहे. कदाचित काही प्रश्‍न वादग्रस्त असतील. तुमच्या प्रश्‍नांची उत्तरे द्यायला आम्हाला आवडेल. या माहितीपत्रकात जागा कमी असल्यामुळे आम्ही तुमच्या सर्वच प्रश्‍नांची उत्तरे देऊ शकत नाही. तेव्हा, तुम्हाला आणखी प्रश्‍न असल्यास तुमच्या भागातील साक्षीदारांना तुम्ही विचारू शकता. त्यासाठी तुम्ही त्यांच्या राज्य सभागृहात होणाऱ्‍या सभांना जाऊ शकता किंवा ते तुमच्या घरी येतात तेव्हा तुम्ही त्यांना विचारू शकता. किंवा खाली दिलेल्या योग्य पत्त्यावर यहोवाच्या साक्षीदारांना तुम्ही आपले प्रश्‍न पाठवू शकता.