व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ते कोण आहेत?

ते कोण आहेत?

ते कोण आहेत?

यहोवाच्या साक्षीदारांची इच्छा आहे, की तुम्ही त्यांच्याशी चांगल्याप्रकारे परिचित व्हावे. ते कदाचित तुमचे शेजारी, तुमचे सहकर्मचारी असतील. किंवा इतर दैनंदिन कामाच्या निमित्ताने कदाचित तुम्ही त्यांना भेटला असाल. रस्त्यावर येणाऱ्‍या-जाणाऱ्‍या लोकांना मासिकांचे वितरण करताना तुम्ही त्यांना पाहिले असेल. किंवा ते तुमच्या घरी आले तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत थोडक्यात बोलला असाल.

खरे तर, यहोवाच्या साक्षीदारांना तुमच्याबद्दल आपुलकी वाटते, तुमच्या कल्याणाची त्यांना काळजी वाटते. त्यांना तुमचे मित्र होण्याची इच्छा आहे. त्यांना स्वतःबद्दल, त्यांच्या विश्‍वासांबद्दल, त्यांच्या संघटनेबद्दल तसेच इतर लोकांबद्दल व आपण सर्व जण ज्या जगात राहात आहोत त्याबद्दल काय वाटते याबाबतीत ते तुम्हाला अधिक सांगू इच्छितात. म्हणूनच त्यांनी तुमच्यासाठी हे माहितीपत्रक तयार केले आहे.

यहोवाचे साक्षीदार बहुतेक सर्व बाबतीत इतरांप्रमाणेच आहेत. त्यांनाही आर्थिक, शारीरिक व मानसिक समस्या आहेत. काही वेळा तेही चुका करतात कारण ते परिपूर्ण किंवा पापरहित नाहीत. परंतु, स्वतःच्या अनुभवांतून ते शिकण्याचा प्रयत्न करतात व आवश्‍यक बदल करण्यासाठी बायबलचा परिश्रमपूर्वक अभ्यास करतात. देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतःचे जीवन त्याला समर्पित केले आहे व हे समर्पण पूर्ण करण्याचा ते प्रयत्न करतात. त्यांच्या सर्व कार्यात ते देवाच्या वचनाचे आणि त्याच्या पवित्र आत्म्याचे मागदर्शन मिळवण्याचा प्रयत्न करतात.

ते, केवळ मानवी तर्क किंवा धार्मिक कल्पना यांवर नव्हे तर बायबलच्या आधारावर विश्‍वास ठेवणे महत्त्वाचे समजतात. ईश्‍वरप्रेरणेने आपले मत व्यक्‍त करणाऱ्‍या प्रेषित पौलाप्रमाणे त्यांनाही वाटते. त्याने म्हटले होते: “देव खरा आणि प्रत्येक मनुष्य खोटा ठरो.” (रोमकर ३:४) साक्षीदार, बायबलमधील सत्य म्हणून शिकवल्या जाणाऱ्‍या शिकवणींच्या बाबतीत बिरुयातील लोकांनी जो मार्ग अनुसरला होता तोच मार्ग अगदी ठामपणे अनुसरतात. प्रेषित पौलाने बिरुयातील लोकांना प्रचार केला तेव्हा या लोकांनी “मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला, आणि ह्‍या गोष्टी अशाच आहेत की काय ह्‍याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करीत गेले.” (प्रेषितांची कृत्ये १७:११) सर्व धार्मिक शिकवणी (मग त्या शिकवणी यहोवाच्या साक्षीदारांच्या असोत किंवा दुसऱ्‍या कोणाच्या असोत), ईश्‍वरप्रेरित शास्त्रवचनांच्या एकमतात आहेत किंवा नाहीत याचे परीक्षण करून पाहिले पाहिजे, असा यहोवाच्या साक्षीदारांचा विश्‍वास आहे. असे करण्यास ते तुम्हाला आमंत्रण देतात, नव्हे आर्जवतात.

ह्‍यावरून हे स्पष्ट होते की यहोवाचे साक्षीदार, बायबल हे देवाचे वचन आहे असा विश्‍वास बाळगतात. बायबलमधील ६६ पुस्तके प्रेरित आणि ऐतिहासिकदृष्ट्या अचूक आहेत, असाही त्यांचा विश्‍वास आहे. सहसा, नवा करार व जुना करार असे ज्याला म्हटले जाते त्याला ते ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने व इब्री शास्त्रवचने असे संबोधतात. त्यांचा ग्रीक आणि इब्री या दोन्ही शास्त्रवचनांवर विश्‍वास आहे. ज्या अहवालांतील शब्दांवरून अथवा दृश्‍यावरून ते लाक्षणिक किंवा अलंकारिक असल्याचे स्पष्टपणे सूचित होते, अशा अहवालांचा अपवाद वगळता, बायबलमधील इतर सर्व गोष्टींचा ते शब्दशः अर्थ घेतात. बायबलमधील अनेक भविष्यवाण्या पूर्ण झाल्या आहेत, इतर पूर्ण होत आहेत व आणखी काही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत असा त्यांचा समज आहे.

त्यांचे नाव

यहोवाचे साक्षीदार? होय, याच नावाने ते स्वतःला संबोधतात. हे एक वर्णनात्मक नाव आहे. या नावावरून असे सूचित होते, की ते यहोवा, त्याचे देवपण आणि त्याचे उद्देश यांविषयी साक्ष देतात. “राष्ट्रपती,” “राजा” “सेनापती” या जशा पदव्या आहेत तशाच “देव,” “प्रभू” आणि “निर्माणकर्ता” याही पदव्या आहेत. या पदव्या विविध प्रकारच्या व्यक्‍तींना लागू होऊ शकतात. परंतु “यहोवा” हे एक व्यक्‍तिगत नाव आहे जे केवळ सर्वसमर्थ देव आणि विश्‍वाचा निर्माणकर्ता यालाच सूचित करते. पंडिता रमाबाई भाषांतरात स्तोत्र ८३:१८ मध्ये असे म्हटले आहे: “ज्या तुझे नाव यहोवा असे आहे तो तूच मात्र अवघ्या पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांनी जाणावे.”

मूळ इब्री शास्त्रवचनांमध्ये यहोवा (किंवा रोमन कॅथोलिक जेरुसलेम बायबलमध्ये आणि काही विद्वानांच्या मते, याव्हे) हे नाव जवळजवळ ७,००० वेळा आले आहे. बहुतेक बायबलमध्ये ते नाव आढळत नाही; त्याऐवजी “देव” किंवा “प्रभू” या पदव्यांचा उपयोग करण्यात आला आहे. परंतु याही बायबलमध्ये, यहोवा हे नाव मूळ इब्री शास्त्रवचनात कोठे आले आहे ते सहसा एखाद्याला सांगता येईल. कारण, ज्या ठिकाणी यहोवा हे नाव आले आहे त्या ठिकाणी परमेश्‍वर हा शब्द वापरण्यात आला आहे. अनेक आधुनिक अनुवादांमध्ये यहोवा किंवा याव्हे ही नावे आहेत. या कारणास्तव, मराठीतील पंडिता रमाबाई भाषांतर यात यशया ४२:८ हे वचन असे आहे: “मी यहोवा आहे. हे माझे नाव आहे.”

यहोवाच्या साक्षीदारांनी जेथून आपले नाव घेतले आहे, तो वृत्तान्त यशयाच्या ४३ व्या अध्यायात आपल्याला पाहायला मिळतो. तेथे जगाचे वर्णन एका न्यायालयीन नाटकाच्या रूपात सादर केले आहे: राष्ट्रांच्या दैवतांना, त्यांनी दावा केलेली धार्मिकतेची प्रकरणे सिद्ध करण्यासाठी त्यांच्या साक्षीदारांना पुढे आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यांना जर साक्षीदार उभे करता आले नाहीत तर यहोवाच्या बाजूने असलेल्या साक्षीदारांची साक्ष ऐकण्याचे व सत्य कबूल करण्याचे आवाहन या अध्यायात करण्यात आले आहे. तेथे यहोवा त्याच्या लोकांना असे जाहीर करतो: “यहोवा म्हणतो, तुम्ही माझे साक्षी आहा, आणि जो माझा सेवक मी निवडला आहे तो साक्षी आहे, अशासाठी की तुम्ही मला ओळखावे; व माझ्यावर विश्‍वास ठेवावा व मीच तो आहे हे तुम्हाला समजावे; माझ्यापूर्वी कोणी देव निर्माण झाला नाही, आणि माझ्यानंतर कोणीही व्हायचा नाही. मी, मीच यहोवा आहे आणि माझ्यावाचून कोणी तारणारा नाही.”—यशया ४३:१०, ११, पं.र.भा.

येशूचा पृथ्वीवर जन्म होण्याच्या हजारो वर्षांआधीपासून यहोवा देवाचे पृथ्वीवर साक्षीदार होते. त्यांपैकी काही विश्‍वासू लोकांची यादी इब्री लोकांस ११ व्या अध्यायात दिली आहे. आणि इब्री लोकांस १२:१ मध्ये असे म्हटले आहे: “तर मग, आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहो म्हणून, आपणही सर्व भार व सहज गुंतविणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे.” पंतय पिलातासमोर येशू म्हणाला: “मी ह्‍यासाठी जन्मलो आहे व ह्‍यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी.” येशूला “विश्‍वसनीय व खरा साक्षी” असे म्हटले आहे. (योहान १८:३७; प्रकटीकरण ३:१४) येशूने त्याच्या शिष्यांना सांगितले: “पवित्र आत्मा तुम्हांवर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि यरुशलेमेत, सर्व यहुदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.”—प्रेषितांची कृत्ये १:८.

या कारणास्तव, आज २३५ पेक्षा अधिक राष्ट्रांमध्ये सुमारे ६१,००,००० लोक येशू ख्रिस्ताकरवी येणाऱ्‍या यहोवाच्या राज्याची सुवार्ता लोकांना सांगत आहेत. हे नाव आपल्याला उचितपणे शोभते असे त्यांना वाटते.

[३ पानांवरील संक्षिप्त आशय]

त्यांना तुमच्याबद्दल आस्था आहे

[४ पानांवरील संक्षिप्त आशय]

देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते समर्पित आहेत

[४ पानांवरील संक्षिप्त आशय]

बायबल देवाचे वचन आहे असा ते विश्‍वास बाळगतात

[४ पानांवरील संक्षिप्त आशय]

प्राचीन इब्री भाषेमध्ये देवाचे वैयक्‍तिक नाव

[५ पानांवरील संक्षिप्त आशय]

एका न्यायालयीन नाटकाच्या संदर्भात वापरलेले त्यांचे नाव

[५ पानांवरील चित्र]

सुमारे ६१,००,००० साक्षीदार २३५ पेक्षा अधिक राष्ट्रांमध्ये