सुवार्ता सांगण्याचे त्यांचे मार्ग
सुवार्ता सांगण्याचे त्यांचे मार्ग
“सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा,” अशी ख्रिश्चनांना आज्ञा देण्यात आली आहे तरी, त्यांनी इतरांवर दबाव आणून किंवा जबरदस्तीने त्यांचे धर्मांतर करावे असा याचा अर्थ होत नाही. ‘दीनास शुभवृत्त सांगण्याची,’ ‘भग्न हृदयी जनांस पट्टी बांधण्याची’ व ‘शोकग्रस्तांचे सांत्वन करण्याची’ कामगिरी येशूला मिळाली होती. (मत्तय २८:१९; यशया ६१:१, २; लूक ४:१८, १९) यहोवाचे साक्षीदार देखील बायबलमधून सुवार्तेची घोषणा करण्याद्वारे येशूचे अनुकरण करतात. प्राचीन काळचा संदेष्टा यहेज्केल याच्याप्रमाणेच आज यहोवाचे साक्षीदार, “होत असलेल्या सर्व अमंगळ कृत्यांमुळे उसासे टाकून विलाप” करणाऱ्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.—यहेज्केल ९:४.
सध्याच्या परिस्थितीला वैतागलेल्या लोकांना शोधून काढण्याचा यहोवाच्या साक्षीदारांचा सर्वपरिचित मार्ग आहे, घरोघरचे कार्य. येशू ज्याप्रकारे “उपदेश करीत व देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरोनगरी व गावोगावी फिरत होता,” त्याचप्रकारे यहोवाचे साक्षीदार लोकांपर्यंत पोंहचण्याचा होता होईल तितका प्रयत्न करतात. येशूच्या आरंभीच्या शिष्यांनीही असेच केले. (लूक ८:१; ९:१-६; १०:१-९) आज शक्य आहे तेथे, यहोवाचे साक्षीदार प्रत्येक घरी वर्षातून अनेकवेळा जातात व घरमालकासोबत काही मिनिटांसाठी एखाद्या रोचक किंवा काळजी करण्यासारख्या स्थानिक अथवा जागतिक विषयावर चर्चा करण्याचा प्रयत्न करतात. यावर अधिक विचार करण्यासाठी एक किंवा दोन शास्त्रवचने दाखवली जातात. आणि घरमालकाने आवड दाखवली तर, साक्षीदार सोयीच्या वेळी पुढील चर्चेसाठी योजना करतात. घरमालकाला बायबल आणि बायबल आधारित प्रकाशने दिली जातात; आणि घरमालकाची इच्छा असेल तर त्याच्याबरोबर मोफत गृह बायबल अभ्यास चालवला जातो. अशा प्रकारचे कोट्यवधी बायबल अभ्यास संपूर्ण जगात, एकेका व्यक्तीबरोबर व कुटुंबांबरोबर नियमितरीत्या चालवले जातात.
स्थानिक राज्य सभागृहात होणाऱ्या सभांद्वारे देखील इतरांना “राज्याची सुवार्ता” सांगितली जाते. साक्षीदार या सभागृहांमध्ये दर आठवडी सभा भरवतात. एक सभा असते, जाहीर भाषण. उत्सुकता वाढवणाऱ्या एखाद्या विषयावर हे जाहीर भाषण असते. त्यानंतर टेहळणी बुरूज नियतकालिकाचा अभ्यास असतो. हा अभ्यास बायबलच्या एखाद्या विषयावर अथवा
भविष्यवाणीवर आधारित असतो. दुसरी सभा ही साक्षीदारांना सुवार्तेचे उत्तम उद्घोषक होण्यास प्रशिक्षण देणारी एकप्रकारची प्रशाला आहे. त्यानंतरच्या सभेतील भाग, स्थानिक क्षेत्रातील साक्षकार्याची चर्चा करण्याकरता असतो. याशिवाय सर्व साक्षीदार, दर आठवडी, खासगी घरांमध्ये लहान गटांत बायबल अभ्यासांसाठी एकत्र जमतात.सर्व लोक सभांना उपस्थित राहू शकतात. येथे वर्गणी गोळा केली जात नाही. या सभा सर्वांसाठी फायदेकारक आहेत. बायबल म्हणते: “प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा.” खाजगी अभ्यास व संशोधन आवश्यक आहेच, परंतु एकमेकांचा सहवास उत्तेजनकारक आहे. “लोखंड लोखंडाला तिखट करते, आणि मनुष्य आपल्या मित्रांचे मुख पाणीदार करतो.”—इब्री लोकांस १०:२४, २५; नीतिसूत्रे २७:१७, पं.र.भा.
साक्षीदारांचा दैनंदिन जीवनात इतर लोकांशी संपर्क येतो तेव्हा लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी ते प्रत्येक संधीचा चांगला उपयोग करतात. शेजाऱ्यासोबत, बसमध्ये, विमानात एखाद्या प्रवाशासोबत ते बोलतात; किंवा, एखाद्या मित्राबरोबर अथवा नातेवाईकाबरोबर खूप वेळपर्यंत बोलतात; किंवा जेवणाच्या सुटीत सहकर्मचाऱ्याबरोबर चर्चा करतात. येशू पृथ्वीवर होता तेव्हा त्याने समुद्रकिनाऱ्यावरून चालताना, टेकडीवर बसला असताना, कोणाच्या तरी घरी जेवताना, लग्न समारंभाला उपस्थित असताना किंवा गालील समुद्रात मासे पकडण्याच्या नावेतून प्रवास करताना साक्षकार्य केले. सभास्थानांत आणि जेरुशलेमच्या मंदिरात त्याने शिकवले. तो जेथे कोठे होता तेथे त्याला देवाच्या राज्याबद्दल बोलण्याच्या संधी मिळाल्या. याबाबतीत यहोवाचे साक्षीदारही येशूचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात.—१ पेत्र २:२१.
उदाहरणाद्वारे प्रचार करणे
तुम्हाला सुवार्ता सांगणाऱ्याने जर त्या शिकवणी स्वतः लागू केल्या नाहीत, तर मग सुवार्ता सांगण्याच्या या मार्गांतील एकही मार्ग तुम्हाला अर्थपूर्ण वाटणार नाही. लोकां सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण म्हणजे निव्वळ दांभिकपणा होय. या धार्मिक दांभिकतेमुळे कोट्यवधी लोक बायबलपासून दुरावले गेले आहेत. याला बायबल कारणीभूत आहे असे म्हणणे उचित नाही. शास्त्र्यांकडे व परुश्यांकडे इब्री शास्त्रवचने होती, परंतु तरीसुद्धा येशूने त्यांचा ढोंगी म्हणून धिक्कार केला. ते मोशेचे नियमशास्त्र वाचत असल्याचा उल्लेख करीत येशू आपल्या शिष्यांना म्हणाला: “ते जे काही तुम्हास सांगतील ते सर्व आचरीत व पाळीत जा; परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका.” (मत्तय २३:३) ख्रिश्चन व्यक्तीचे उत्तम उदाहरण, तासन्तास प्रवचन झाडण्यापेक्षा अधिक प्रभावशाली ठरते. हाच मुद्दा, ख्रिस्ती पत्नींना दाखवण्यात आला होता ज्यांचे पती ख्रिस्ती विश्वासात नव्हते. या पत्नींना असे सांगण्यात आले होते: “तुमचे भीडस्तपणाचे निर्मल वर्तन पाहून ते वचनावाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले” जातील.—१ पेत्र ३:१, २.
यास्तव, यहोवाचे साक्षीदारसुद्धा इतरांना ज्या ख्रिस्ती वर्तनाविषयी उपदेश देतात त्याचप्रकारे ते स्वतःही जगण्याचा प्रयत्न करून सुवार्ता सांगतात. ‘इतरांनी त्यांच्यासोबत जसे वागावे म्हणून त्यांची इच्छा आहे तसेच तेही त्यांच्याशी वागण्याचा’ प्रयत्न करतात. (मत्तय ७:१२) असे ते केवळ सहसाक्षीदार, मित्रजन, शेजारी किंवा नातेवाईकांबरोबरच नव्हे तर सर्वांबरोबर वागायचा प्रयत्न करतात. अपरिपूर्ण असल्यामुळे ते १०० टक्के यशस्वी होत नाहीत. परंतु केवळ राज्याची सुवार्ता सांगूनच नव्हे तर शक्य तेव्हा लोकांना मदतीचा हात देऊन सर्व लोकांचे भले करण्याची त्यांची मनापासून इच्छा आहे.—याकोब २:१४-१७.
[१९ पानांवरील चित्र]
हवाई
[१९ पानांवरील चित्र]
व्हेनझुएला
[१९ पानांवरील चित्र]
युगोस्लाव्हिया
[२० पानांवरील चित्रे]
सुलभ रचना असलेली राज्य सभागृहे, बायबलची चर्चा करण्याची ठिकाणे आहेत
[२१ पानांवरील चित्रे]
साक्षीदार आपल्या कौटुंबिक जीवनात तसेच इतर लोकांबरोबरच्या त्यांच्या व्यवहारात जसे बोलतात तसे वागण्याचाही प्रामाणिक प्रयत्न करतात