व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

रक्‍त संक्रमण–किती सुरक्षित?

रक्‍त संक्रमण–किती सुरक्षित?

रक्‍त संक्रमण–किती सुरक्षित?

कोणताही गंभीर वैद्यकीय उपचार करून घेण्यापूर्वी, विचारी माणूस, त्यापासून संभवणारे फायदे व धोके जाणून घेईल. रक्‍ताच्या संक्रमणाविषयी काय म्हणता येईल? आता वैद्यकीय शास्त्रात ते एक महत्त्वाचे साधन झाले आहे. रोग्याविषयी खरी कळकळ वाटणाऱ्‍या अनेक डॉक्टरांना रक्‍त देण्यात जराही मागे-पुढे पाहावेसे न वाटण्याचा संभव आहे. त्याला जीवनाचा उपहार म्हणण्यात आले आहे.

लाखो लोकांनी रक्‍त दिले व घेतले आहे. १९८६-८७ मध्ये कॅनडाच्या अडीच कोटी लोकसंख्येमध्ये १ कोटी ३० लाख रक्‍तदाते होते. “आकडेवारी उपलब्ध असलेल्या सर्वात अलिकडल्या वर्षात एकट्या अमेरिकेत १ कोटी २० लाख ते १ कोटी ४० लाख युनिट रक्‍त संक्रमणासाठी वापरण्यात आले.”—द न्यूयॉर्क टाईम्स, फेब्रुवारी १८, १९९०.

डॉ. लुईस जे. किटींग म्हणतातः “रक्‍तात ‘अद्‌भुत’ गुण असल्याचा समज नेहमीच होता व आहे. आरंभाला ४६ वर्षे रक्‍ताचा पुरवठा अधिक सुरक्षित असल्याचे डॉक्टर व जनतेला वाटत होते.” (क्लिव्हलँड क्लिनिक जर्नल ऑफ मेडिसिन, मे १९८९) त्यावेळी परिस्थिती कशी होती व आता कशी आहे?

३० वर्षांपूर्वीही विकृतीशास्त्रज्ञ (पॅथॉलॉजिस्ट) व रक्‍तपेढ्यातील कर्मचाऱ्‍यांना आदेश होता की, “रक्‍त सुरुंगाच्या दारूप्रमाणे आहे! त्याने बरेचसे चांगले व खूप वाईटही होऊ शकते. ईथरने भूल दिल्याने वा आंत्रपुच्छ काढून टाकल्याने होणाऱ्‍या मृत्युच्या प्रमाणाइतकेच त्यानेही मृत्यू होतात. १,००० ते ३,००० वा बहुधा ५,००० संक्रमणामागे अंदाजे एक मृत्यु होत असल्याचे म्हटले जाते. लंडन विभागामध्ये दर १३,००० बाटल्या रक्‍त देण्यात एक मृत्यु होता असे सांगण्यात आले आहे.”—न्यूयॉर्क स्टेट जर्नल ऑफ मेडिसिन, जानेवारी १५, १९६०.

त्यानंतर संक्रमण सुरक्षित होण्यासाठी धोक्यांचे निवारण झाले आहे का? स्पष्टपणे म्हणायचे तर, दर वर्षी हजारो लोकांवर रक्‍ताची वाईट प्रतिक्रिया होते व अनेक मरतात. वर दिलेल्या मतांकडे पाहता रक्‍तातून होणाऱ्‍या रोगांविषयी तुमच्या मनात विचार येईल. हा पैलू पारखण्यापूर्वी काही धोक्यांचा विचार करा, जे इतके परिचित नाहीत.

रक्‍त व तुमची रोगप्रतिकारक शक्‍ती

२० व्या शतकाच्या प्रारंभी शास्त्रज्ञांनी रक्‍ताच्या अद्‌भुत गुंतागुंतीविषयी मानवाचे ज्ञान वाढवले आहे. रक्‍ताचे वेगवेगळे प्रकार असतात असे त्यांना कळले. संक्रमणामध्ये देणाऱ्‍याचे व रुग्णाचे रक्‍त जुळवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अ गटाचे रक्‍त असलेल्या कोणाला ब गटाचे रक्‍त मिळाल्यास त्याला लोहित-पेशी-विघटन प्रतिक्रिया होण्याची शक्यता आहे. यामुळे त्याच्या अनेक लाल पेशींचा नाश होऊन त्याला झटकन मरण येऊ शकते. रक्‍ताचे गट तपासणे तसेच रक्‍त देणाऱ्‍या व घेणाऱ्‍याचे रक्‍त परस्परांस जुळवणे आता नेहमीचे झाले असले तरी चुका होतात. दर वर्षी लोहित-पेशी-विघटक प्रतिक्रियांमुळे लोक मरतात.

विसंगतीचा प्रश्‍न, इस्पितळात जे थोडे रक्‍त-गट जुळवण्याचा प्रयत्न केला जातो त्यापलिकडे जातो असे वस्तुस्थिती दर्शवते. असे का? “ब्लड ट्रान्सफ्यूशनः युजेस्‌, अब्युजेस्‌ ॲण्ड हॅझर्डज्‌” या आपल्या निबंधात डॉ. डग्लस एच. पोसे, ज्युनियर लिहितातः “जवळपास ३० वर्षांपूर्वी सापेक्षतेने धोकादायक कार्यपद्धती असे रक्‍ताच्या संक्रमणाचे वर्णन सॅम्पसन यांनी केले . . . [तेव्हापासून] कमीत कमी आणखी ४०० लोहित-पेशी-विघटक एँटीजेन द्रव्ये ओळखण्यात आली असून त्यांचे गुणधर्म ठरवण्यात आले आहेत. लाल पेशींचे आवरण अत्यंत गुंतागुंतीचे असल्याने अशा द्रव्यांची संख्या वाढत राहील यात शंका नाही.”—जर्नल ऑफ द नॅशनल मेडिकल असोशिएशन, जुलै १९८९.

आता शास्त्रज्ञ, संक्रमण केलेल्या रक्‍ताचा शरीराच्या संरक्षण प्रतिक्षम संस्थेवरील परिणामाचा अभ्यास करीत आहेत. तुम्ही वा तुमच्या एखाद्या नातलगाला शस्त्रक्रियेची गरज असल्यास त्याचा अर्थ काय होईल?

डॉक्टर एखाद्या हृदय, यकृत किंवा दुसऱ्‍या एखाद्या अवयवाचे आरोपण (ट्रान्सप्लांट) करतात तेव्हा प्राप्तकर्त्याच्या प्रतिक्षम संस्थेला ते कळून ती त्याला नाकारण्याचा संभव आहे. आणि संक्रमण हेही एक पेशींचे आरोपणच आहे. “योग्यरित्या” जुळवलेले रक्‍तही प्रतिक्षम संस्थेला दडपून टाकू शकते. शेकडो वैद्यकीय निबंधांनी “रक्‍ताच्या संक्रमणाचा संबंध प्रतिकारक्षमतेच्या (इम्युनॉलॉजिक) प्रतिक्रियेशी लावला” असल्याचे विकृतीशास्त्रज्ञांच्या एका परिषदेत सिद्ध करण्यात आले.—“केस बिल्डस्‌ अगेन्स्ट ट्रान्सफ्युशन,” मेडिकल वर्ल्ड न्यूज, डिसेंबर ११, १९८९.

तुमच्या प्रतिकारक (इम्यून) संस्थेचे एक महत्त्वाचे काम म्हणजे कॅन्सरच्या पेशींचा शोध लावून त्यांचा नाश करणे. प्रतिकारकता दडपल्याने कर्करोग व मृत्यु घडण्याची शक्यता आहे का? दोन अहवालांकडे लक्ष द्या.

कॅन्सर या नियतकालिकाने (फेब्रुवारी १५, १९७८) नेदरलँडमध्ये केलेल्या अभ्यासाचे परिणाम दिले आहेतः “बृहदांत्राचा कर्करोग असलेल्या रोग्यांमध्ये अधिक काळ वाचण्यावर त्याचा विशेष प्रतिकूल परिणाम दिसून आला. या गटात सर्वांचा मिळून बचावण्याचा सरासरी ५ वर्षांचा काळ असलेल्यांमध्ये संक्रमण घेतलेल्यातले ४८% व संक्रमण न घेतलेल्यामध्ये ७४% रोगी होते.” दक्षिण कॅलिफोर्नियाच्या विश्‍वविद्यालयातील डॉक्टरांनी कर्करोगासाठी शस्त्रक्रिया झालेल्या शंभर रोग्यांचा मागोवा घेतला. “स्वरयंत्राचा कर्करोग झालेल्या सर्वांमध्ये रक्‍त न घेणाऱ्‍यात १४% लोकांना व घेणाऱ्‍यांमध्ये ६५% लोकांना त्या रोगाची पुनर्बाधा झाली. तोंड, घसा, नाक व सायनस यांच्या कर्करोगात पुनर्बाधा होण्याचे प्रमाण संक्रमण न घेणाऱ्‍यात ३१% व संक्रमण घेणाऱ्‍यात ७१% होते.”—ॲनल्स ऑफ ऑटॉलॉजी, ऱ्‍हीनॉलॉजी ॲण्ड लॅरिंगॉलॉजी, मार्च १९८९.

संक्रमणाविषयी केलेले अभ्यास काय सूचित करतात? “ब्लड ट्रान्सफ्यूशन ॲण्ड सर्जरी फॉर कॅन्सर” या निबंधात डॉ. जॉन एस. स्प्रॅट या निर्णयाला पोहंचले की, “कर्करोगाच्या सर्जनला रक्‍तहीन सर्जन व्हावे लागण्याची शक्यता आहे.”—द अमेरिकन जर्नल ऑफ सर्जरी, सप्टेंबर १९८६.

तुमच्या शरीरातील प्रतिकारक संस्थेचे आणखी एक विशेष काम म्हणजे रोगाच्या प्रादुर्भावापासून बचाव करणे. तेव्हा रक्‍त घेणाऱ्‍या रुग्णांचा कल रोगाचा प्रादुर्भाव होण्याकडे अधिक असतो असे काही अभ्यासात दिसून आले हे समजण्यासारखे आहे. डॉ. पी. आय. टार्टर यांनी बृहदांत्र व गुदद्वाराच्या शस्त्रक्रियांविषयी अभ्यास केला. संक्रमण न दिलेल्या रोग्यांपैकी ४ टक्के रुग्णांना इतर रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्याच्या तुलनेत २५ टक्के रुग्णांना नवीन रोगाचा प्रादुर्भाव झाला. ते लिहितातः “शस्त्रक्रियेच्या आधी, मध्ये वा नंतर रुग्णाला दिलेल्या रक्‍ताचा संबंध संसर्गजन्य समस्यांशी लावला गेला. . . . शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्‍या संसर्गाचा धोका, दिल्या गेलेल्या रक्‍ताच्या प्रत्येक युनिटबरोबर वाढत गेला.” (द ब्रिटीश जर्नल ऑफ सर्जरी, ऑगस्ट १९८८) अमेरिकन असोशिएशन ऑफ ब्लड बँकस्‌ याच्या १९८९ मधील सभेला उपस्थित असलेल्यांना असे समजलेः कमरेचा खुबा बदलण्याच्या शस्त्रक्रियेच्या वेळी परक्याचे रक्‍त मिळालेल्यांमधील २३ टक्के लोकांना संसर्गजन्य रोग झाले. तर ज्यांना रक्‍त दिले नव्हते त्यांना कोणत्याही रोगाचा संसर्ग झाला नाही.

रक्‍ताच्या संक्रमणाच्या या परिणामाबद्दल डॉ. जॉन ए. कॉलिन्स यांनी लिहिलेः “श्रम घेण्याजोगे काहीही साध्य न करणारा एखादा ‘उपाय’ अशा रोग्यांना पुढे होणाऱ्‍या समस्यांपैकी महत्त्वाच्या एकीची तीव्रता वाढवत असल्याचे आढळून आल्यास ते खरोखर उपरोधिक ठरेल.”—वर्ल्ड जर्नल ऑफ सर्जरी, फेब्रुवारी १९८७.

रोगापासून मुक्‍त की धोकादायक?

सद्‌सद्विवेकी डॉक्टर व अनेक रोग्यांना रक्‍तातून होणाऱ्‍या रोगाविषयी चिंता वाटते. कोणता रोग? स्पष्टच सांगायचे तर तो एक रोग नव्हे; खरे तर अनेक रोग आहेत.

अधिक प्रसिद्ध असलेल्या रोगांची चर्चा केल्यावर टेक्नीक्स्‌ ऑफ ब्लड ट्रान्सफ्यूशन (१९८२) हे पुस्तक उपदंश, सायटोमेगॅलो व्हायरसमुळे होणारा रोग व मलेरिया यासारख्या “संक्रमणाशी संबंधित इतर संसर्गजन्य रोगां”विषयी बोलते. ते पुढे म्हणतेः “इतर अनेक रोगही रक्‍त-संक्रमणामार्फत पसरवले जातात असे म्हटले जाते. त्यात नागीण, संसर्गजन्य मोनोन्युलिओसिक (एप्स्टीन बार व्हायरस) टॉक्सोप्लास्मोसिस, ट्रिपॅनोसोमिॲसिस [आफ्रिकेतील झोपेचा रोग व चागासचा रोग], लेईशमॅनिॲसिस, ब्रुसेलोसिस [चढउतार करणारा ताप], टायफस (विषमज्वर), हत्तीरोग, गोवर, साल्मोनेलोसिस व कोलोरॅडो किटकज्वर यांचा समावेश आहे.”

वस्तुतः अशा रोगांची यादी वाढत आहे. “रक्‍ताच्या संक्रमणामुळे लाईम रोग? असंभाव्य, पण तज्ञ दक्षता घेत आहेत,” असे मथळे तुम्ही वाचले असतील. लाईम रोग झालेल्या माणसापासून घेतलेले रक्‍त किती सुरक्षित असते? ते असे रक्‍त स्वीकारतील काय असे स्वास्थ्य अधिकाऱ्‍यांच्या एका गटाला विचारले गेले. “सर्वांनी नकार दिला, परंतु अशा रक्‍तदात्यांचे रक्‍त टाकून द्यावे अशी शिफारस एकानेही केली नाही.” पेढीतील जे रक्‍त स्वीकारण्यास तज्ञ स्वतः तयार नाहीत अशा रक्‍ताबद्दल जनतेला काय वाटावे?—द न्यूयॉर्क टाईम्स, जुलै १८, १९८९.

चिंतेचे दुसरे कारण म्हणजे एखाद्या रोगाचा बराच प्रादुर्भाव असेल अशा देशातून रक्‍त गोळा करून, जेथे त्याच्या धोक्याविषयी डॉक्टर व जनता अनभिज्ञ आहेत अशा दूरवरच्या देशात ते वापरले जाण्याची शक्यता आहे. शरणार्थी व परदेशी स्थाईक होणारे धरून, आजच्या वाढत्या प्रवासामुळे रक्‍तापासून बनलेल्या वस्तुमध्ये अज्ञात रोग असण्याचा धोका वाढत आहे.

याशिवाय, “रक्‍ताचा कर्करोग, लिंफोमा, डिमेन्‌शिया (अल्झिमरचा रोग) यांसह पूर्वी संसर्गजन्य न मानलेल्या अनेक आजारांचा प्रसार होऊ न देण्यासाठी रक्‍ताचा पुरवठा तपासावा लागेल, असा ईशारा संसर्गजन्य रोगांच्या एका विशेषज्ञाने दिला.”—ट्रान्सफ्यूशन मेडिसिन रिव्ह्‌यूज, जानेवारी १९८९.

हे धोके अंगावर शहारे आणणारे आहेत, पण इतरांनीही आणखीही जास्त भीती निर्माण केली आहे.

एडस्‌ची साथ

“रक्‍ताबद्दल डॉक्टर व रोग्यांच्या विचारांची दिशा एडस्‌ने कायमची बदलली आहे. ही कल्पना तशी वाईट नाही असे रक्‍ताच्या संक्रमणाविषयी भरलेल्या परिषदेसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थमध्ये जमलेल्या डॉक्टरांनी म्हटले.”—वॉशिंग्टन पोस्ट, जुलै ५, १९८८.

एडस्‌ (ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम अथवा मिळवलेले प्रतिक्षमतेच्या क्षीणतेचे लक्षण) च्या साथीने, रक्‍तामार्फत होणाऱ्‍या रोगांच्या धोक्याबद्दल लोकांना तीव्रतेने जाणीव करून दिली आहे. लाखो लोकांना (एडस्‌चा) संसर्ग झालेला आहे. त्याचा प्रसार हाताबाहेर जात आहे. त्याच्या रोग्यांच्या मृत्यूचे प्रमाण जवळ जवळ १०० टक्के आहे.

रक्‍तामुळे पसरू शकणाऱ्‍या मानवी प्रतिक्षमता क्षीणता आणणाऱ्‍या विषामुळे (ह्‍युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस HIV) एडस्‌ होतो. एडस्‌ची ही आधुनिक पीडा १९८१ साली उजेडात आली. त्याच्या पुढल्याच वर्षी स्वास्थ्य तज्ञांना कळले की हा विषाणू बहुधा रक्‍तापासून बनविलेल्या पदार्थापासून पसरणे शक्य आहे. एडस्‌ विषाणू (व्हायरस) च्या ॲन्टीबॉडीज (त्या व्हायरसला प्रतिकार करणाऱ्‍या पेशी) असलेले रक्‍त ओळखण्यासाठी परिक्षा उपलब्ध झाल्यावरही रक्‍ताशी संबंधित उद्योगांची प्रतिक्रिया मंद होती, हे आता कबूल केले जाते. शेवटी रक्‍तदात्यांच्या रक्‍ताची परिक्षा करणे १९८५ मध्ये सुरु झाले. a परंतु तेव्हाही दुकानात पोहोचलेल्या रक्‍तनिर्मित पदार्थांना ती लागू केली गेली नाही.

त्यानंतर ‘आता रक्‍त पुरवठा सुरक्षित आहे’ असे आश्‍वासन जनतेला देण्यात आले. पुढे मात्र एडस्‌ला एक धोकादायक “सुप्त काळ” असल्याचे उघड करण्यात आले. एखाद्या व्यक्‍तीला एडस्‌चा संसर्ग झाल्यापासून त्याच्या शरीरात लक्षात येण्याइतक्या ॲन्टीबॉडीज उत्पन्‍न होण्यापूर्वी कित्येक महिने लोटू शकतात. आपल्या शरीरात जो विषाणू (व्हायरस) असल्याचे माहीत नसल्याचे परिक्षा केल्यास नकारात्मक परिणाम देणाऱ्‍या रक्‍ताचे तो दान करील. असे घडले आहे. असे रक्‍त दिले गेल्यानंतर लोकांना एडस्‌ झाला आहे!

एकूण चित्र अधिक गंभीर झाले. द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन (जून १, १९८९) या नियतकालिकाने “निःशब्द एडस्‌ संसर्गा”ची माहिती दिली. सध्या प्रचलित असलेल्या प्रच्छन्‍न परिक्षांनी लक्षात न येता, लोक, एडस्‌चा विषाणू (व्हायरस) अनेक वर्षे शरीरात बाळगू शकतात असे सिद्ध करण्यात आले. अशी उदाहरणे तुरळक मानून काही लोक त्यांना कमी लेखतील. परंतु, “रक्‍त व त्याच्या घटकांद्वारे एडस्‌चा प्रसार होण्याचा धोका पूर्णतया काढून टाकणे शक्य नाही,” असे त्याने सिद्ध होते. (पेशंट केअर, नोव्हेंबर ३०, १९८९) यावरून बेचैन करणारे अनुमान असे की, परिक्षेचा परिणाम नकारार्थी आल्यास, स्वास्थ्य दृष्ट्या ते सुरक्षित आहे, असा त्याचा अर्थ नाही. अजूनही किती लोकांना रक्‍तापासून एडस्‌ होईल?

पुढचे पाऊल? की पाऊले?

फ्लॅटमध्ये राहणाऱ्‍या अनेक लोकांनी वरच्या मजल्यावर धप्प असा पावलाचा आवाज ऐकला असेल. त्यानंतर ते दुसऱ्‍या पावलाच्या आवाजाच्या अपेक्षेने ताठरतात. रक्‍ताच्या या पेचप्रसंगात आणखी किती प्राणघातक पाऊले पडतील हे कोणालाच ठाऊक नाही.

एडस्‌च्या विषाणूचे नाव HIV असे ठेवण्यात आले, पण आता काही तज्ञ त्याला HIV-1 म्हणतात. का बरे? कारण एडस्‌सारखा आणखी एक विषाणू (HIV-2) त्यांना सापडला. तो एडस्‌ची लक्षणे निर्माण करतो व काही प्रदेशात मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे. शिवाय “येथे सध्या प्रचलित असलेल्या एडस्‌च्या परिक्षांनी (तो) सातत्याने शोधता येत नाही.” अशी माहिती द न्यूयॉर्क टाईम्सने दिली. (जून २७, १९८९) “या नव्या शोधामुळे . . . (एखाद्याने केलेले) रक्‍तदान सुरक्षित असल्याची खात्री करणे रक्‍तपेढ्यांना अधिक कठीण झाले आहे.”

पण, एडस्‌ विषाणूच्या दूरच्या नातलगांविषयी काय म्हणता येईल? (अमेरिकेच्या) राष्ट्रपतीने नेमलेल्या आयोगाने म्हटले की अशा एका विषाणूमुळे “प्रौढांतील टी-पेशींचा रक्‍ताचा कर्करोग/लिंफोमा व मज्जासंस्थेचा एक तीव्र रोग होतो असे समजले जाते.” हा विषाणू रक्‍तदात्या लोकांमध्ये आधीच आहे व तो रक्‍तामध्ये पसरू शकतो. ‘अशा इतर विषाणूंसाठी रक्‍तपेढ्यांमध्ये केल्या जाणाऱ्‍या परिक्षा कितीशा परिणामकारक आहेत?’ असा विचार करण्याचा लोकांना हक्क आहे.

रक्‍तामार्फत येणारे किती विषाणू रक्‍त पुरवठ्यात आहेत हे खरोखर काळच सांगील. डॉ. हॅरॉल्ड टी. मेरिमन लिहितातः “जे माहीत आहे त्यापेक्षा अज्ञातामुळे जास्त चिंता वाटण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांचा सुप्तावस्थेचा काळ असलेल्या, एकाकडून दुसऱ्‍याकडे जाऊ शकणाऱ्‍या विषाणूंचा संबंध रक्‍ताच्या संक्रमणाशी लावणे कठीण होईल व ते शोधण्यास आणखी जास्त कठीण होतील. अशांमध्ये उघडकीस आलेला HTLV गट नक्कीच पहिला आहे.” (ट्रान्सफ्यूशन मेडिसिन रिव्ह्‌यु, जुलै १९८९) “एडस्‌च्या साथीचे दुःख जणू पुरेसे नव्हते . . . १९८० च्या दशकात, नवीनच सुचवलेल्या व वर्णन केलेल्या संक्रमणामधील अनेक धोक्यांनी (लोकांचे) लक्ष वेधले आहे. इतर गंभीर विषाणूजन्य रोग अस्तित्वात असून स्वजातीय रक्‍ताच्या संक्रमणामुळे पसरतात हे सांगण्यासाठी मोठ्या कल्पनाशक्‍तीची गरज नाही.”—लिमिटिंग होमोलोगस एक्स्पोजरः अल्टरनेटिव स्ट्रॅटेजीस्‌, १९८९.

आतापर्यंत इतकी “पावले” पडली आहेत की रोग नियंत्रण केंद्रांनी “सर्व काळजी” घेण्याचा सल्ला दिला आहे. याचा अर्थ, ‘सर्व रुग्ण HIVच्या व रक्‍तामार्फत येणाऱ्‍या इतर एकपेशीमय सूक्ष्म जंतूच्या बाबतीत रोगाचा संसर्ग देणारे आहेत असे स्वास्थ्य सेवेतील कर्मचाऱ्‍यांनी गृहीत धरावे.’ या सबळ कारणास्तव स्वास्थ्य सेवेतील कर्मचारी व जनतेतील लोक रक्‍ताबद्दलचा आपापला दृष्टीकोण फिरून ठरवत आहेत.

[तळटीपा]

a सर्व रक्‍ताची तपासणी केली जात आहे असे आपल्याला गृहीत धरता येत नाही, उदाहरणार्थ, १९८९ च्या सुरवातीपर्यंत ब्राझिलमधील ८० टक्के रक्‍तपेढ्या सरकारी नियंत्रणाखाली नव्हत्या, तसेच त्या पेढ्या एडस्‌साठी परिक्षा करत नव्हत्या असे कळते.

[८ पानांवरील चौकट/चित्र]

ताप, थंडी वाजणे वा अंगावर पित्त उठणे या गोष्टी अंदाजे १००तील एका संक्रमणासोबत होतात. . . . अंदाजे ६,००० मधील एका लाल पेशींच्या संक्रमणामुळे लाल पेशींचे विघटन होते. ही प्रतिक्षमतेची एक तीव्र प्रतिक्रिया असून एकाएकी वा संक्रमणानंतर काही दिवसांनी विलंबित प्रकाराने होऊ शकते; त्याने [मूत्रपिंडाची] गंभीर अक्षमता, आघात, रक्‍तवाहिनीमध्ये रक्‍त गोठणे व मृत्यू देखील होऊ शकतो.”—नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) कॉन्फरन्स, १९८८.

[९ पानांवरील चौकट]

वैद्यकशास्त्राचे १९८४ चे नोबेल पारितोषिक विभागून डेन्मार्कचे शास्त्रज्ञ नीलस्‌ जर्न यांना मिळाले. त्यांनी रक्‍त संक्रमण का नाकारले असे विचारता ते म्हणालेः “व्यक्‍तीचे रक्‍त हे त्याच्या बोटाच्या ठशांसारखे असते—कोणतेही दोन प्रकारचे रक्‍त तंतोतंत एकसारखे नसते.”

[१० पानांवरील चौकट]

रक्‍त, निकामी यकृते व . . .

“रक्‍तातून आलेला एडस्‌ . . . कावीळसारख्या इतर रोगांइतका धोकादायक कधीच नव्हता हे उपरोधिक आहे.” असा खुलासा वॉशिंग्टन पोस्टने केला.

होय, कोणाताही विशिष्ट उपचार नसलेल्या कावीळीने असंख्य लोक अतिशय आजारी पडले आहेत व मृत्युमुखी पडले आहेत. यु. एस. न्यूज ॲण्ड वर्ल्ड रिपोर्टनुसार (मे १, १९८९) अमेरिकेत रक्‍त दिले गेलेल्यांमध्ये जवळपास ५ टक्के लोकांना कावीळ होते—वर्षाला १,७५,००० लोक. त्यातील साधारण निम्मे दीर्घकालीन रोगप्रसारक होतात, आणि ५ मधील कमीत कमी एकाला यकृताची कठिणता वा कर्करोग होतो. ४,००० लोक तर मरतात असा अंदाज आहे. असे समजा की एखादे जंबो जेट विमान पडून त्यातील सर्व प्रवासी मरण पावले आहेत अशी बातमी तुम्ही वाचता. परंतु हा ४,०००चा मृत्यु म्हणजे संपूर्ण भरलेले एक जंबो जेट दर महिन्याला पडण्यासारखेच आहे!

अस्वच्छ अन्‍न व पाण्यातून सौम्य प्रकारची (प्रकार अ) कावीळ पसरते हे डॉक्टरांना बऱ्‍याच काळापासून माहीत होते. त्यानंतर त्यांना दिसले की, एक अधिक गंभीर प्रकार रक्‍तामार्फत पसरत होता, व त्यासाठी रक्‍ताची तपासणी करण्याचा कोणताही मार्ग त्यांच्यापाशी नव्हता. होता होता, या विषाणू (व्हायरस) च्या (प्रकार ब) “पाऊल खुणा” कशा ओळखाव्या ते हुशार शास्त्रज्ञांना कळले. १९७०री च्या दशकाच्या सुरवातीपर्यंत काही देशांमध्ये रक्‍ताची तपासणी होत होती. रक्‍ताचा साठा सुरक्षित तसेच रक्‍ताचे भविष्य उज्ज्वल वाटू लागले. परंतु ते खरेच तसे होते का?

तपासणी केलेले रक्‍त दिलेल्या हजारो लोकांना अजूनही कावीळ होत असल्याचे लवकरच स्पष्ट झाले. क्षीण करणाऱ्‍या आजारानंतर अनेकांना समजले की, त्यांचे यकृत निकामी झालेले आहे. पण मग, रक्‍ताची तपासणी केलेली असताही असे का घडत होते? त्या रक्‍तामध्ये एन-ए, एन-बी (NANB) असा कावीळीचा प्रकार होता. एक दशकभर त्याने संक्रमणांना पीडिले—इस्राएल, इटली, जपान, स्पेन, स्वीडन व अमेरिका यांजमध्ये संक्रमण दिलेल्यांपैकी ८ ते १७ टक्के लोकांना ती कावीळ झाली.

मग, “अखेर एन-ए, एन-बी कावीळीचा गूढ विषाणू (व्हायरस) वेगळा करण्यात आला”; “रक्‍तातील तापाचा जोर ओसरला” असे मथळे आले. परत, “हुलकावण्या देणारे कारण सापडले!” असा भास निर्माण करण्यात आला. १९८९ च्या एप्रिलमध्ये, तोपर्यंत कावीळ-क म्हटल्या जाऊ लागलेल्या एन-ए, एन-बी कावीळीसाठी तपासणी उपलब्ध असल्याचे जनतेला सांगण्यात आले.

हा दिलासा अकाली आहे की काय असा प्रश्‍न तुम्हाला पडेल. वस्तुस्थिती अशी आहे की, एक तृतियांश रुग्णांकरता जबाबदार असू शकेल असा कावीळीच्या आणखी एका विषाणूबद्दल शास्त्रज्ञांनी माहिती दिली आहे. “अ, ब, क, ड एवढीच कावीळीची बाराखडी नसून अजूनही उद्‌भवण्याची शक्यता असल्याची काही तज्ञांना काळजी वाटते.” असे मत, हार्वर्ड मेडिकल स्कूल हेल्थ लेटरने (नोव्हेंबर १९८९) प्रदर्शित केले. द न्यूयॉर्क टाईम्सने (फेब्रुवारी १३, १९९०) म्हटलेः “इतर विषाणूमुळे (व्हायरस) कावीळ होऊ शकते असा तज्ञांना पक्का संशय आहे. त्यांचा शोध लागल्यास त्यांना कावीळ-ई वगैरे नावे देण्यात येतील.”

रक्‍त बिनधोक करण्यासाठी कराव्या लागणाऱ्‍या परिक्षांच्या दीर्घ मुदतीच्या शोधांना रक्‍तपेढ्यांना तोंड द्यावे लागेल का? खर्चाची समस्या सांगताना अमेरिकन रेड क्रॉसच्या निर्देशकांनी खाली बेचैन करणारे बोल काढलेः “लागण पसरवणाऱ्‍या प्रत्येक कारणासाठी परिक्षेमागे परिक्षेची भर घालणे आपल्याला शक्य नाही.”—मेडिकल वर्ल्ड न्यूज, मे ८, १९८९.

ब-कावीळीसाठी असलेली परिक्षा देखील सदोष आहे; अजूनही ती रक्‍तातून अनेकांना होते. याशिवाय, क-कावीळीसाठी असलेल्या घोषित परिक्षेने लोकांचे समाधान होईल का? द जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशनने (जानेवारी ५, १९९०) दाखवले की, या परिक्षेने प्रतिद्रव्य (ॲन्टीबॉडीज) शोधता येण्यापूर्वी एक वर्ष सरून गेलेले असणे शक्य आहे. दरम्यान अशा रक्‍ताचे संक्रमण मिळालेल्या लोकांना यकृताचा विनाश व मृत्युला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.

[११ पानांवरील चौकट/चित्र]

दूरवरच्या लोकांना रक्‍तामुळे रोग कसे होतात याचे उदाहरण चागासच्या रोगाने मिळते. “द मेडिकल पोस्ट” (जानेवारी १६, १९९०) कळवते की, ‘लॅटिन अमेरिकेत १ कोटी ते १ कोटी २० लाख लोकांना दीर्घकालीन लागण झालेली आहे.’ त्याला “दक्षिण अमेरिकेमधील संक्रमणाने होणारा सर्वात महत्त्वाचा धोका” असे म्हटले गेले आहे. एक “मारेकरी किडा” झोपलेल्या माणसाच्या चेहऱ्‍यावर चावून रक्‍त चोखतो व त्या जखमेमध्ये विष्ठा करतो. अशी ही व्यक्‍ती हृदयाच्या प्राणघातकी समस्या निमार्ण होण्यापूर्वी अनेक वर्षे तो चागास रोग बाळगून असेल (दरम्यान ती व्यक्‍ती रक्‍तदान करणेही शक्य आहे).

पण यामुळे दूरवरच्या भूखंडावरील लोकांना काळजी का वाटावी? “द न्यूयॉर्क टाईम्स” मध्ये (मे २३, १९८९) डॉ. एल. के. आल्टमन्‌ यांनी संक्रमणानंतर चागास रोग झालेल्या रुग्णांविषयी, त्यातील एक दगावला, असे सांगितले. ऑल्टमन यांनी लिहिलेः “अशा इतर केसेसचा पत्ताच लागला नसेल कारण [येथील डॉक्टरांना] या रोगाची चांगली माहिती नाही व तो संक्रमणातून पसरतो हेही त्यांना समजले नाही.” होय, रोग दूरवर पसरण्याचे रक्‍त हे एक साधन आहे.

[१२ पानांवरील चौकट]

डॉ. क्नुड लुंड-ओलेसन यांनी लिहिलेः “अतिधोक्याच्या गटातील काही व्यक्‍ती स्वतःहून रक्‍तदान करतात कारण मग ओघाने त्यांची एडस्‌करिता परिक्षा होते. या कारणासाठी रक्‍त संक्रमण स्वीकारण्याबद्दल चलबिचल होण्यामागे सबळ कारण आहे असे मला वाटते. यहोवाच्या साक्षीदारांनी त्याला अनेक वर्षे नकार दिला आहे. ते भविष्यात डोकावले होते का?”—“युगेस्क्रिफ्ट फॉर लेगर” [डॉक्टरांचे साप्ताहिक], सप्टेंबर २६, १९८८.

[९ पानांवरील चित्रं]

पोप गोळी लागून मृत्युमुखी पडण्यापासून वाचले. इस्पितळातून बाहेर आल्यावर “अतिशय यातना होत असल्यामुळे” त्यांना दोन महिन्यांसाठी परत इस्पितळात नेण्यात आले. का बरे? त्यांनी स्वीकारलेल्या रक्‍तातून आलेल्या संभवतः जीव घेणाऱ्‍या सायटोमेगॅलो-व्हायरसच्या लागणीमुळे

[चित्राचे श्रेय]

UPI/Bettmann Newsphotos

[१२ पानांवरील चित्रं]

एडस्‌चा विषाणू

[चित्राचे श्रेय]

CDC, Atlanta, Ga.