व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय ४

‘चार तोंडं असलेले जिवंत प्राणी’ कशाला सूचित करतात?

‘चार तोंडं असलेले जिवंत प्राणी’ कशाला सूचित करतात?

यहेज्केल १:१५

अध्याय कशाबद्दल आहे: जिवंत प्राणी कशाला सूचित करतात आणि त्यांचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला काय शिकायला मिळेल

१, २. पृथ्वीवरच्या आपल्या सेवकांना महत्त्वाची सत्यं सांगण्यासाठी यहोवाने काही वेळा दृष्टान्तांचा आणि स्वप्नांचा वापर का केला?

 कल्पना करा एक वडील आपल्या लहान मुलांना बायबलमधून काहीतरी शिकवत आहेत. मुलांना त्या गोष्टी चांगल्या प्रकारे समजाव्यात म्हणून वडील त्यांना काही चित्रं दाखवतात. त्यामुळे मुलांना त्या लगेच समजतात आणि ते विचारलेल्या प्रश्‍नांची अगदी आनंदाने, उत्साहाने उत्तरंही देतात. यामुळे वडिलांना कळतं, की ते जे शिकवत आहेत ते मुलांना समजत आहे. मुलं लहान असल्यामुळे त्यांना जर चित्र न दाखवता नुसतंच शिकवलं असतं, तर त्यांना यहोवाबद्दल काही गोष्टी समजल्या नसत्या. पण चित्रांचा वापर केल्यामुळे त्यांना त्या नीट समजल्या.

त्याच प्रकारे आपल्यालासुद्धा न दिसणाऱ्‍या खऱ्‍या गोष्टी समजणं कठीण जाऊ शकतं. म्हणून यहोवाने दृष्टान्तांचा आणि स्वप्नांचा वापर केला. उदाहरणार्थ, यहोवाने स्वत:बद्दल काही गोष्टी शिकवण्यासाठी यहेज्केलला असा एक दृष्टान्त दाखवला, ज्यात लक्ष वेधून घेणारी दृश्‍यं होती. असंच एक दृश्‍य आपण आधीच्या लेखात पाहिलं होतं. आता आपण त्या भव्य दृष्टान्ताच्या एका विशिष्ट भागावर चर्चा करणार आहोत. तसंच त्याचा अर्थ समजून घेतल्यामुळे यहोवासोबतचं आपलं नातं आणखी कसं मजबूत होऊ शकतं, हेही आपण समजून घेणार आहोत.

‘मला चार जिवंत प्राण्यांच्या आकृत्यांसारखं काहीतरी दिसलं’

३. (क) यहेज्केल १:४, ५ या वचनांप्रमाणे यहेज्केलने दृष्टान्तात काय पाहिलं? (सुरुवातीचं चित्र पाहा.) (ख) दृष्टान्तातल्या गोष्टींचं वर्णन करण्यासाठी यहेज्केलने कोणते शब्द वापरले, आणि का?

यहेज्केल १:४, ५ वाचा. दृष्टान्तात यहेज्केलला “चार जिवंत प्राण्यांच्या आकृत्यांसारखं काहीतरी” दिसलं. त्यांचं स्वरूप काहीसं स्वर्गदूतांसारखं, माणसांसारखं आणि पशू-पक्ष्यांसारखं होतं. लक्ष द्या, यहेज्केलने दृष्टान्तात जे काही पाहिलं त्याचं त्याने अगदी व्यवस्थित वर्णन केलं. तो म्हणतो, की त्याला जिवंत प्राण्यांच्या “आकृत्यांसारखं” काहीतरी दिसलं. तुमच्या लक्षात येईल, की यहेज्केलच्या पहिल्या अध्यायात दिलेल्या संपूर्ण दृष्टान्तात संदेष्टा बऱ्‍याचदा ‘यासारखं,’ ‘यासारखा,’ “स्वरूपासारखं” असे शब्द वापरतो. (यहे. १:१३, २४, २६) याचाच अर्थ, यहेज्केलच्या हे लक्षात आलं असेल की ही दृश्‍यं स्वर्गातल्या अदृश्‍य गोष्टींना फक्‍त चित्रित करतात. पण मुळात त्या गोष्टी खरंच तशा नाहीत.

४. (क) दृष्टान्ताचा यहेज्केलवर काय परिणाम झाला? (ख) करुबांबद्दल यहेज्केलला काय माहीत होतं?

दृष्टान्तात यहेज्केलने जी दृश्‍यं पाहिली आणि जे आवाज ऐकले त्यांमुळे तो नक्कीच थक्क झाला असेल. त्या चार जिवंत प्राण्यांचं स्वरूप “जळत्या निखाऱ्‍यांसारखं” होतं. त्यांच्या हालचाली इतक्या चपळ होत्या, की ते “चमकणाऱ्‍या विजेसारखे दिसायचे.” तसंच, त्यांच्या पंखांचा आवाज “महाजलाशयांच्या जोरदार प्रवाहासारखा” होता. आणि ते हालचाल करायचे तेव्हा “मोठ्या सैन्याच्या आवाजासारखा आवाज व्हायचा.” (यहे. १:१३, १४, २४-२८; “त्या जिवंत प्राण्यांकडे मी पाहत होतो,” ही चौकट पाहा.) नंतरच्या एका दृष्टान्तात यहेज्केल सांगतो, की ते चार जिवंत प्राणी ‘करूब’ किंवा शक्‍तिशाली स्वर्गदूत आहेत. (यहे. १०:२) यहेज्केल याजकाच्या कुटुंबातला होता. त्यामुळे त्याला हे नक्कीच माहीत असेल, की करूब देवाच्या खूप जवळ राहून त्याची सेवा करतात.—१ इति. २८:१८; स्तो. १८:१०.

‘त्या प्रत्येकाला चार तोंडं होती’

५. (क) करूब आणि त्यांची चार तोंडं यहोवाच्या शक्‍तीला आणि वैभवाला कसं सूचित करतात? (ख) दृष्टान्ताच्या या भागातून यहोवाच्या नावाबद्दल असलेल्या कोणत्या गोष्टीची आपल्याला आठवण होते? (तळटीप पाहा.)

यहेज्केल १:६, १० वाचा. यहेज्केलने हेसुद्धा पाहिलं की प्रत्येक करुबाला चार तोंडं होती; एक माणसाचं, एक सिंहाचं, एक बैलाचं आणि एक गरुडाचं. त्यांना पाहून, यहोवा किती शक्‍तिशाली आणि वैभवशाली आहे हे यहेज्केलच्या लक्षात आलं असेल. कारण प्रत्येक तोंड त्या-त्या प्राण्याच्या विशिष्ट गुणाला म्हणजे वैभवाला, ताकदीला आणि शक्‍तीला सूचित करतं. जसं की, सिंह वैभवशाली आहे, बैल हा मोठा ताकदवान प्राणी आहे आणि गरुड हा शक्‍तिशाली पक्षी आहे. तसंच, माणूस सृष्टीचा मुकुट आहे; म्हणजेच पृथ्वीवरच्या सगळ्या प्राण्यांवर त्याला अधिकार आहे. (स्तो. ८:४-६) यहेज्केलने पाहिलं की ते चार शक्‍तिशाली करूब सर्वोच्च अधिकारी यहोवा याच्या राजासनाच्या खाली आहेत. म्हणजेच, यहोवाचा त्यांच्यावर अधिकार आहे आणि आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी तो आपल्या सृष्टीचा हवा तसा उपयोग करू शकतो. a म्हणूनच, स्तोत्रकर्त्याने यहोवाबद्दल म्हटलं, की “त्याचं वैभव पृथ्वी आणि आकाशाहून उंच आहे.”—स्तो. १४८:१३.

चार प्राणी आणि त्यांची चार तोंडं ही यहोवाच्या शक्‍तीला, वैभवाला आणि गुणांना कशी सूचित करतात? (परिच्छेद ५, १३ पाहा)

६. करुबांच्या चार तोंडांचा अर्थ काय होतो हे समजायला यहेज्केलला कोणत्या गोष्टीमुळे मदत झाली असेल?

दृष्टान्तात पाहिलेल्या गोष्टींचा जेव्हा यहेज्केलने नंतर विचार केला असेल, तेव्हा त्याला पूर्वी होऊन गेलेल्या देवाच्या सेवकांची आठवण झाली असेल. त्याला आठवलं असेल, की त्यांनी माणसांमधले काही विशिष्ट गुण सांगण्यासाठी प्राण्यांची उदाहरणं दिली होती. जसं की, कुलप्रमुख याकोबने आपला मुलगा यहूदा याची तुलना सिंहासोबत आणि बन्यामीनची तुलना लांडग्यासोबत केली होती. (उत्प. ४९:९, २७) कारण या प्राण्यांमधली वैशिष्ट्यं यहूदा आणि बन्यामीनमध्ये, तसंच त्यांच्या वंशजांमध्ये प्रामुख्याने दिसून येणार होती. यहेज्केलला शास्त्रवचनांतली ही उदाहरणं माहीत असल्यामुळे करुबांची तोंडं विशिष्ट गुणांना सूचित करत असावीत, हे त्याला समजलं असावं. पण नेमक्या कोणत्या गुणांना?

यहोवा आणि स्वर्गदूतांचे गुण

७, ८. करुबांची चार तोंडं कोणत्या गुणांना सूचित करतात?

यहेज्केलच्या आधीच्या बायबल लेखकांनी, कोणत्या गुणांबद्दल सांगण्यासाठी सिंह, गरुड, बैल या प्राण्यांची उदाहरणं दिली? याबद्दलची काही उदाहरणं पाहा: ‘सिंहासारखं हृदय असलेली माणसं,’ (२ शमु. १७:१०; नीति. २८:१) “गरुड भरारी मारतो,” “त्याची नजर दूरपर्यंत जाते.” (ईयो. ३९:२७, २९) आणि “बैलाच्या ताकदीमुळे भरपूर पीक मिळतं.” (नीति. १४:४) या वचनांच्या आधारावर आपल्या प्रकाशनांमध्ये बऱ्‍याच वेळा सांगितलं आहे, की धैर्यवान सिंहाचं तोंड न्यायाला, गरुडाचं तोंड बुद्धीला आणि बैलाचं तोंड ताकदीला सूचित करतं.

पण ‘माणसाचं तोंड’ कशाला सूचित करतं? (यहे. १०:१४) ते नक्कीच अशा एका गुणाला सूचित करतं जो प्राण्यांमध्ये नाही, तर फक्‍त माणसांमध्ये आहे. कारण माणसांना देवाच्या प्रतिरूपात निर्माण करण्यात आलं आहे. (उत्प. १:२७) तो गुण कोणता आहे हे देवाने माणसांना दिलेल्या आज्ञांवरून दिसून येतं. त्या म्हणजे: ‘तुम्ही आपला देव यहोवा याच्यावर पूर्ण मनाने प्रेम करा’ आणि ‘आपल्या सोबत्यावर स्वतःसारखं प्रेम करा.’ (अनु. ६:५; लेवी. १९:१८) जेव्हा आपण या आज्ञांचं पालन करून निःस्वार्थ प्रेम दाखवतो तेव्हा खरंतर आपण यहोवाचं अनुकरण करत असतो, त्याच्यासारखं प्रेम दाखवत असतो. प्रेषित योहाननेही देवाबद्दल म्हटलं: “आधी त्याने आपल्यावर प्रेम केलं, म्हणून आपण प्रेम करतो.” (१ योहा. ४:८, १९) या सगळ्या गोष्टींवरून आपण म्हणू शकतो, की ‘माणसाचं तोंड’ प्रेमाला सूचित करतं.

९. चार तोंडांना सूचित करणारे गुण कोणामध्ये आहेत?

हे सगळे गुण कोणामध्ये आहेत? सर्व विश्‍वासू स्वर्गदूतांमध्ये हे गुण आहेत. कारण ती चार तोंडं करुबांची आहेत आणि करूब यहोवाच्या सर्व विश्‍वासू स्वर्गदूतांना सूचित करतात. (प्रकटी. ५:११) शिवाय यहोवानेच या करुबांना घडवल्यामुळे तो या गुणांचा स्रोत आहे. (स्तो. ३६:९) म्हणून आपण म्हणू शकतो, की करुबांची चार तोंडं यहोवाच्या गुणांना सूचित करतात. (ईयो. ३७:२३; स्तो. ९९:४; नीति. २:६; मीखा ७:१८) यहोवा कोणत्या काही मार्गांनी हे उल्लेखनीय गुण दाखवतो हे आता आपण पाहू या.

१०, ११. यहोवाच्या चार उल्लेखनीय गुणांमुळे आपल्याला कशा प्रकारे मदत होते?

१० न्याय. यहोवा “न्यायप्रिय” असल्यामुळे “तो कधीही पक्षपात करत नाही.” (स्तो. ३७:२८; अनु. १०:१७) त्यामुळे कोणीही यहोवाचा उपासक बनू शकतो आणि सर्वकाळाचे आशीर्वाद मिळवू शकतो; मग तो कोणतीही भाषा बोलणारा असो, कोणत्याही संस्कृतीतला असो, गरीब असो किंवा श्रीमंत असो. बुद्धी. यहोवा “बुद्धिमान” आहे. त्याने आपल्याला बायबल दिलं आहे, ज्यात “व्यावहारिक बुद्धी राखून” ठेवली आहे. (ईयो. ९:४; नीति. २:७) बायबलमधल्या सुज्ञ सल्ल्याचं आपण पालन केलं तर आपल्याला रोजच्या जीवनातल्या समस्यांचा सामना करायला मदत होते आणि आपलं जीवन अर्थपूर्ण बनतं. शक्‍ती. यहोवाकडे “अफाट शक्‍ती” आहे. तसंच, तो आपल्याला पवित्र शक्‍तीद्वारे “असाधारण सामर्थ्य” देतो. त्यामुळे आपल्यासमोर कितीही कठीण परीक्षा आली आणि कितीही मोठं दुःख आलं तरी पवित्र शक्‍तीमुळे आपल्याला त्याचा सामना करायचं बळ मिळतं.—नहू. १:३; २ करिंथ ४:७; स्तो. ४६:१.

११ प्रेम. यहोवा “एकनिष्ठ प्रेमाने भरलेला देव आहे.” तो कधीच आपल्या विश्‍वासू सेवकांना सोडून देत नाही. (स्तो. १०३:८; २ शमु. २२:२६) आजारपणामुळे किंवा वाढत्या वयामुळे आपल्याला कदाचित पूर्वीसारखी त्याची सेवा करायला जमत नसेल आणि त्यामुळे आपण निराश होऊ. पण आपण आधी यहोवाची जी सेवा केली ती तो कधीच विसरत नाही. आणि यामुळे आपल्याला खरंच खूप दिलासा मिळतो. (इब्री ६:१०) यावरून स्पष्टच आहे, की आजही आपल्याला यहोवाच्या चार उल्लेखनीय गुणांचा म्हणजे न्याय, बुद्धी, शक्‍ती आणि प्रेम यांचा फायदा होतो. तसंच, पुढेही होत राहील.

१२. यहोवाचे गुण समजून घेण्याच्या बाबतीत कोणती गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे?

१२ आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की आपण यहोवाचे गुण पूर्णपणे समजू शकत नाही. आपल्याला त्यांबद्दल जितकं माहीत आहे, ती “तर त्याच्या कार्यांची फक्‍त किनार आहे.” (ईयो. २६:१४) “सर्वशक्‍तिमान देवाला पूर्णपणे समजून घेणं आपल्या आवाक्याबाहेर आहे,” कारण “त्याची महानता कल्पनेपलीकडे आहे.” (ईयो. ३७:२३; स्तो. १४५:३) त्यामुळे यहोवाचे सगळे गुण आपण मोजू शकत नाही. तसंच, ते एकमेकांशी इतके जुळलेले आहेत की आपण त्यांना वेगळंही करू शकत नाही. (रोमकर ११:३३, ३४ वाचा.) खरंतर, यहेज्केलच्या दृष्टान्तातून कळतं, की यहोवाचे गुण मर्यादित नाहीत, ते असंख्य आहेत. (स्तो. १३९:१७, १८) हे महत्त्वाचं सत्य दृष्टान्तातल्या कुठल्या भागातून समजतं?

“चार तोंडं आणि चार पंख”

१३, १४. करुबांची चार तोंडं कोणत्या गोष्टीला दर्शवतात, आणि आपण असं का म्हणू शकतो?

१३ यहेज्केलने दृष्टान्तात पाहिलं, की प्रत्येक करुबाला एक नाही, तर चार तोंडं आहेत. यावरून आपल्याला काय समजतं? बायबलमध्ये ‘चार’ ही संख्या सहसा एखाद्या गोष्टीच्या पूर्णतेला सूचित करते. (मत्त. २४:३१; प्रकटी. ७:१) आणि विशेष म्हणजे, यहेज्केलच्या या दृष्टान्तात चार या संख्येचा बऱ्‍याचदा उल्लेख केला आहे, म्हणजे जवळजवळ १० वेळा! (यहे. १:५-१८) यावरून काय म्हणता येईल? हेच की, जसं चार करूब यहोवाच्या सर्व विश्‍वासू स्वर्गदूतांना सूचित करतात, तसंच त्यांची चार तोंडं एकत्रितपणे यहोवाच्या सर्व गुणांना दर्शवतात. b

१४ करुबांची चार तोंडं फक्‍त चारच गुणांना दर्शवत नाहीत हे समजण्यासाठी दृष्टान्तातल्या चाकांचा विचार करा. प्रत्येक चाक भलंमोठं आणि उंच आहे. असं असलं, तरी प्रत्येक चाकाची स्वतःची अशी वेगळी ओळख नाही. पण जेव्हा आपण त्या चारही चाकांना सोबत बघतो, तेव्हा आपल्याला समजतं, की ती एकत्र मिळून रथाचा पाया आहेत. त्याच प्रकारे, करुबांची चार तोंडं एकत्र मिळून फक्‍त चार गुणांना नाही, तर यहोवाच्या सर्व गुणांना दर्शवतात. चारही उल्लेखनीय गुण कोणत्या ना कोणत्या प्रकारे यहोवाच्या इतर सगळ्या गुणांमध्ये दिसून येतात.

यहोवा आपल्या सगळ्या विश्‍वासू सेवकांच्या जवळ आहे

१५. यहेज्केलला पहिल्या दृष्टान्तातून कोणती महत्त्वाची गोष्ट कळली?

१५ यहेज्केलला पहिल्या दृष्टान्तातून यहोवासोबतच्या त्याच्या नात्याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट कळली. यामुळे त्याला खूप प्रोत्साहन मिळालं आणि आनंद झाला. ती गोष्ट काय होती हे आपल्याला यहेज्केल पुस्तकाच्या सुरुवातीच्या शब्दांवरून कळतं. यहेज्केल म्हणतो की तो “खास्दी लोकांच्या देशात” होता. त्यानंतर तो म्हणतो, “तिथे यहोवाची शक्‍ती माझ्यावर कार्य करू लागली.” (यहे. १:३) लक्ष द्या, यहेज्केलला दृष्टान्त यरुशलेममध्ये नाही, तर तिथे म्हणजे बाबेलमध्ये मिळाला. c यावरून यहेज्केलला कळलं की तो जरी यरुशलेमपासून, तिथल्या मंदिरापासून दूर बंदिवासात असला तरी तो यहोवापासून आणि त्याच्या उपासनेपासून दूर नाही. तिथे दृष्टान्त दाखवून यहोवा त्याला हेच सांगत होता की शुद्ध उपासना करण्यासाठी एका विशिष्ट ठिकाणी असणं किंवा परिस्थिती चांगली असणं महत्त्वाचं नाही. त्याऐवजी मन साफ असणं आणि सेवा करायची इच्छा असणं जास्त महत्त्वाचं आहे.

१६. (क) यहेज्केलच्या दृष्टान्तातून आपल्याला दिलासा कसा मिळतो? (ख) तुम्हाला पूर्ण मनाने यहोवाची सेवा करायची प्रेरणा कशामुळे मिळते?

१६ यहेज्केलला जी महत्त्वाची गोष्ट कळली त्यावरून आज आपल्यालाही सांत्वन मिळतं. आपल्याला खातरी मिळते की आपण पूर्ण मनाने यहोवाची सेवा केली तर तो आपल्या जवळ असतो; मग आपण कुठेही राहत असलो, आपली परिस्थिती कशीही असली किंवा आपण कितीही दुःखात असलो तरीही. (स्तो. २५:१४; प्रे कार्यं. १७:२७) यहोवा आपल्या प्रत्येक सेवकावर एकनिष्ठ प्रेम करतो. तो आपल्या बाबतीत धीर धरतो आणि लगेच आशा सोडत नाही. (निर्ग. ३४:६) त्यामुळे कोणतीही गोष्ट आपल्याला त्याच्या एकनिष्ठ प्रेमापासून वेगळी करू शकत नाही. (स्तो. १००:५; रोम. ८:३५-३९) तसंच, या उल्लेखनीय दृष्टान्तामुळे यहोवा किती पवित्र आहे, शक्‍तिशाली आहे आणि उपासना मिळण्याचा हक्क फक्‍त त्यालाच आहे हे आपल्याला कळतं. (प्रकटी. ४:९-११) खरंच, यहोवाबद्दल आणि त्याच्या गुणांबद्दल आपल्याला महत्त्वपूर्ण सत्यं समजावीत, म्हणून त्याने यासारख्या दृष्टान्तांचा वापर केल्याबद्दल आपण त्याचे खूप आभारी आहोत. यहोवाच्या या सुंदर गुणांबद्दल जास्त जाणून घेतल्यामुळे आपण त्याच्या आणखी जवळ जाऊ. तसंच आपल्याला पूर्ण मनाने आणि पूर्ण शक्‍तीने यहोवाची सेवा आणि स्तुती करायला मदत होईल.—लूक १०:२७.

आपण कुठेही असलो तरी यहोवाचं एकनिष्ठ प्रेम अनुभवू शकतो (परिच्छेद १६ पाहा)

१७. पुढच्या अध्यायांमध्ये आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

१७ दु:खाची गोष्टी म्हणजे, यहेज्केलच्या दिवसांत शुद्ध उपासना भ्रष्ट झाली होती. पण हे कसं घडलं? शुद्ध उपासना भ्रष्ट झाल्यावर यहोवाने काय केलं? आणि तेव्हा घडलेल्या घटनांबद्दल जाणून घेणं आज आपल्यासाठी का महत्त्वाचं आहे? या सर्व प्रश्‍नांची उत्तरं आपण पुढच्या काही अध्यायांमध्ये पाहू या.

a यहेज्केलने ज्या प्रकारे या प्राण्यांचं वर्णन केलं आहे त्यावरून आपल्याला ‘यहोवा’ या नावाचा काय अर्थ होतो ते आठवतं. त्याचा अर्थ, “तो व्हायला लावतो” असा होतो. पण त्यात आणखी एक गोष्ट सामील आहे; ती म्हणजे, यहोवा आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी आपल्या सृष्टीलाही पाहिजे ते व्हायला लावू शकतो.—नवे जग भाषांतर यातला अतिरिक्‍त लेख क४ पाहा.

b आजपर्यंत आपल्या प्रकाशनांमध्ये यहोवाच्या जवळजवळ ५० गुणांबद्दल चर्चा करण्यात आली आहे.—यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक यात, “यहोवा देव” या शीर्षकाखाली “यहोवाचे गुण” पाहा.

c एका बायबल विद्वानाचं असं म्हणणं आहे, की “‘तिथे’ या एकाच शब्दावरून कळतं, की देव तिथे म्हणजे बाबेलमध्येही आहे आणि या गोष्टीचं यहेज्केलला खरंच खूप आश्‍चर्य वाटलं असेल. तसंच त्यामुळे त्याला नक्कीच दिलासा मिळाला असेल.”