व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय २२

“देवाची उपासना कर”

“देवाची उपासना कर”

प्रकटीकरण २२:९

अध्याय कशाबद्दल आहे: यहेज्केलच्या पुस्तकातल्या महत्त्वाच्या विषयांची उजळणी आणि ते आज आणि भविष्यात आपल्याला कसे लागू होतात यावर चर्चा

१, २. (क) आपल्या सगळ्यांना कोणती निवड करायची आहे? (ख) योहानने एका स्वर्गदूताची उपासना करायचा प्रयत्न केला तेव्हा स्वर्गदूताने काय केलं?

 आपल्यापैकी प्रत्येकाला एका महत्त्वाच्या प्रश्‍नाचं उत्तर द्यायचं आहे. तो म्हणजे, आपण कोणाची उपासना करणार? काही लोक म्हणतील की हा एक किचकट प्रश्‍न आहे. कारण जगात इतके धर्म आहेत आणि इतके देव आहेत की कोणाची उपासना करायची हे ठरवणं कठीण आहे. पण खरं पाहिलं तर ही निवड करणं अगदी सरळ आणि सोपं आहे. आपण एकतर यहोवा देवाची उपासना करू शकतो किंवा मग सैतानाची.

सैतानाला लोकांकडून उपासना मिळवण्याची हाव आहे. जेव्हा त्याने येशूसमोर प्रलोभनं आणली, तेव्हा ही गोष्ट अगदी स्पष्ट झाली. आपण पहिल्या अध्यायात पाहिलं, की सैतानाने येशूला मोठमोठ्या गोष्टी द्यायचं वचन देऊन मोहात टाकण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणजे, येशूला पृथ्वीवरच्या सर्व राज्यांवर अधिकार द्यायचं वचन त्याने दिलं. पण सैतानाला बदल्यात काय हवं होतं? तो येशूला म्हणाला, “तू एकदा माझ्या पाया पडून माझी उपासना” कर. (मत्त. ४:९) पण याउलट आणखी एका प्रसंगात एका स्वर्गदूताने काय केलं यावर विचार करा. हा स्वर्गदूत जेव्हा प्रेषित योहानला दृष्टान्त दाखवायला आला, तेव्हा योहानने त्याच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला. पण त्या स्वर्गदूताने योहानला रोखलं. (प्रकटीकरण २२:८, ९ वाचा.) योहानने जेव्हा त्या स्वर्गदूताची उपासना करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या स्वर्गदूताने नम्रपणे म्हटलं, “नको! असं करू नकोस!” त्या स्वर्गदूताने, ‘माझी उपासना कर’ असं म्हणण्याऐवजी, योहानला म्हटलं “देवाची उपासना कर!”

३. (क) या संपूर्ण पुस्तकाचा उद्देश काय होता? (ख) आता आपण कशाची उजळणी करणार आहोत?

त्या स्वर्गदूताने म्हटल्याप्रमाणे, आपण फक्‍त यहोवा देवाची उपासना केली पाहिजे. आणि या संपूर्ण पुस्तकाचा उद्देश हाच होता, की फक्‍त यहोवाची उपासना करण्याचा आपला निश्‍चय आणखी पक्का व्हावा. (अनु. १०:२०; मत्त. ४:१०) यहेज्केलच्या भविष्यवाण्यांमधून आणि दृष्टान्तांमधून आपण शुद्ध उपासनेबद्दल काय शिकलो त्याची आता थोडक्यात उजळणी करू या. आणि मग बायबलच्या वचनांच्या आधाराने आपण भविष्यातल्या एका अशा काळाबद्दल पाहू, जेव्हा पृथ्वीवरच्या प्रत्येक व्यक्‍तीला एका शेवटच्या परीक्षेचा सामना करावा लागेल. जे लोक ही परीक्षा पार करतील, त्यांना सर्वकाळ जगण्याची आणि संपूर्ण पृथ्वीवर कायम यहोवाची शुद्ध उपासना होताना पाहण्याची संधी मिळेल.

यहेज्केलच्या पुस्तकातले तीन महत्त्वाचे विषय

४. यहेज्केलच्या पुस्तकात कोणत्या तीन मुख्य विषयांवर चर्चा करण्यात आली आहे?

यहेज्केलच्या पुस्तकातून आपल्याला शिकायला मिळतं, की शुद्ध उपासना करणं म्हणजे रितीरिवाज पाळल्यासारखं फक्‍त वरवर सेवा करणं नाही. तर, शुद्ध उपासना करण्यासाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत: (१) फक्‍त यहोवाची उपासना करणं, (२) एकीने शुद्ध उपासना करणं आणि (३) इतरांवर प्रेम करणं. या प्रकाशनात यहेज्केलच्या भविष्यवाण्यांवर आणि दृष्टान्तांवर जी चर्चा करण्यात आली आहे, त्यातून हे तीन विषय कसे स्पष्ट होतात ते आता पाहू या.

पहिला विषय: फक्‍त यहोवाचीच उपासना करणं

५-९. फक्‍त यहोवाची उपासना करण्याबद्दल आपण काय शिकलो?

अध्याय ३: a या अध्यायात आपण एका रोमांचक दृष्टान्तावर चर्चा केली. या दृष्टान्तात, यहोवाच्या सभोवती मेघधनुष्य आहे आणि तो शक्‍तिशाली करुबांवर स्वार आहे. यावरून आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळाली. ती म्हणजे, सर्वोच्च देव यहोवा याचीच आपण उपासना केली पाहिजे.—यहे. १:४, १५-२८.

अध्याय ५: या अध्यायात आपण एका धक्कादायक दृष्टान्ताबद्दल पाहिलं. यहेज्केलला दिसलं की यहोवाचं मंदिर भ्रष्ट करण्यात आलं आहे. या दृष्टान्तावरून कळतं, की यहोवाच्या नजरेपासून कोणतीच गोष्ट लपू शकत नाही. त्याचे लोक जेव्हा त्याला सोडून मूर्तिपूजा करू लागतात तेव्हा त्यांना वाटू शकतं, की त्यांना कोणीच पाहत नाही. पण यहोवा त्यांना पाहत असतो. अशा वाईट कामांमुळे त्याला खूप दुःख होतं आणि जे अशी कामं करतात त्यांना तो शिक्षा देतो.—यहे. ८:१-१८.

अध्याय ७: या अध्यायात आपण पाहिलं, की जेव्हा आसपासच्या राष्ट्रांनी इस्राएलची ‘वाईट दशा पाहून त्याची थट्टा केली,’ तेव्हा यहोवाने त्या राष्ट्रांवर न्यायदंड सुनावला. यावरून आपल्याला कळतं, की जे यहोवाच्या लोकांना वाईट वागणूक देतात, त्यांच्याकडून तो हिशोब घेतो. (यहे. २५:६) पण इस्राएलने आसपासच्या राष्ट्रांसोबत जे संबंध ठेवले, त्यावरून आपल्याला आणखी एक धडा शिकायला मिळतो. आपण इतर कोणापेक्षाही जास्त यहोवाला एकनिष्ठ असलं पाहिजे. आपले जे नातेवाईक यहोवाची उपासना करत नाहीत, त्यांना खुश करण्यासाठी आपण बायबलच्या स्तरांशी तडजोड करणार नाही. तसंच, आपण आपल्या संपत्तीवर किंवा पैशावर भरवसा ठेवणार नाही. किंवा, आपण यहोवाऐवजी मानवी सरकारांना पाठिंबा देणार नाही, तर नेहमी निष्पक्ष राहू.

अध्याय १३ आणि १४: उंच पर्वतावर असलेल्या मंदिराच्या दृष्टान्तावरून आपल्याला शिकायला मिळतं, की आपण यहोवाच्या उच्च स्तरांप्रमाणे जगलं पाहिजे. कारण तो इतर सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे.—यहे. ४०:१–४८:३५.

अध्याय १५: या अध्यायात आपण पाहिलं, की यहोवाने अविश्‍वासू इस्राएल आणि यहूदा राष्ट्रांची तुलना वेश्‍यांसोबत केली. यावरून आपल्याला कळतं, की यहोवाला सोडून इतर कोणाचीही उपासना करणं त्याच्या नजरेत किती घृणास्पद आहे. त्याच्या दृष्टीने ते वेश्‍येसारखी कामं करण्यासारखं आहे.—यहे. अध्या. १६, २३.

दुसरा विषय: एकीने शुद्ध उपासना करणं

१०-१४. एकीने शुद्ध उपासना करण्याबद्दल आपण काय शिकलो?

१० अध्याय ८: आपल्या लोकांची काळजी घेण्यासाठी यहोवाने “एक मेंढपाळ” नेमण्याबद्दल भविष्यवाण्या केल्या होत्या. यावरून आपल्याला कळतं, की आपण येशूच्या मार्गदर्शनाखाली एकत्र काम केलं पाहिजे आणि शांतीने राहिलं पाहिजे.—यहे. ३४:२३, २४; ३७:२४-२८.

११ अध्याय ९: देवाच्या लोकांची बाबेलच्या बंदिवासातून सुटका केली जाईल आणि त्यांना त्यांच्या मायदेशात परत आणलं जाईल, याबद्दल यहेज्केलने भविष्यवाण्या केल्या होत्या. आज ज्यांना यहोवाला खूश करायचं आहे, त्यांच्यासाठी या भविष्यवाण्यांमध्ये एक महत्त्वाचा संदेश आहे. तो म्हणजे, ज्यांना यहोवाची शुद्ध उपासना करायची आहे, त्यांनी खोट्या धर्माशी नातं तोडून टाकलं पाहिजे आणि त्याच्या वाईट प्रभावापासून दूर राहिलं पाहिजे. आपण जरी वेगवेगळ्या देशांतून, संस्कृतींतून, समाजांतून किंवा वंशांमधून आलो असलो, तरी आपण आपली एकी टिकवून ठेवली पाहिजे. कारण यावरूनच दिसून येईल की आपण देवाचे लोक आहोत.—यहे. ११:१७, १८; १२:२४; योहा. १७:२०-२३.

१२ अध्याय १०: खडखडीत वाळून गेलेली हाडं पुन्हा जिवंत होण्याबद्दलच्या दृष्टान्तावरूनही एकीचं महत्त्व दिसून येतं. यहोवाने आज आपल्या उपासकांचं एक मोठं सैन्य उभं केलं आहे. आणि देवाच्या लोकांसोबत मिळून एकत्र उपासना करणं, हा आपल्यासाठी खरंच खूप मोठा बहुमान आहे.—यहे. ३७:१-१४.

१३ अध्याय १२: दोन काठ्या मिळून एक होण्याबद्दलच्या दृष्टान्तावरून एकीचं महत्त्व आणखी स्पष्ट होतं. आज आपण अभिषिक्‍त जनांना आणि दुसऱ्‍या मेंढराच्या लोकांना ही भविष्यवाणी पूर्ण करताना बघतो, तेव्हा आपला विश्‍वास खरंच खूप मजबूत होतो. आज या जगातले लोक धर्मांमुळे आणि राजकारणामुळे विभागलेले आहेत आणि एकमेकांचे शत्रू बनले आहेत. याउलट आपण आपल्या भाऊबहिणींवर प्रेम करतो आणि त्यांना विश्‍वासू राहतो, म्हणून आपल्यामध्ये एकता आहे.—यहे. ३७:१५-२३.

१४ अध्याय १६: सचिवाची दौत असलेल्या माणसाच्या आणि चुराडा करण्यासाठी हातात शस्त्र घेतलेल्या माणसांच्या दृष्टान्तावरून आपल्याला एक गंभीर इशारा मिळतो. ‘मोठ्या संकटाच्या’ वेळी जे यहोवाची शुद्ध उपासना करत असतील, फक्‍त त्यांच्यावरच नाशातून वाचण्यासाठी खूण केली जाईल.—मत्त. २४:२१; यहे. ९:१-११.

तिसरा विषय: इतरांवर प्रेम करणं

१५-१८. आपण इतरांवर प्रेम का करत राहिलं पाहिजे? आणि आपण ते कसं करू शकतो?

१५ अध्याय ४: चार जिवंत प्राण्यांच्या दृष्टान्तावरून आपल्याला यहोवाच्या गुणांबद्दल शिकायला मिळतं. प्रेम हा त्यांतला सर्वात महत्त्वाचा गुण आहे. आपण जेव्हा आपल्या वागण्या-बोलण्यातून प्रेम दाखवतो, तेव्हा आपण हे सिद्ध करतो की यहोवा आपला देव आहे.—यहे. १:५-१४; १ योहा. ४:८.

१६ अध्याय ६ आणि ११: देवाचं लोकांवर प्रेम असल्यामुळे त्याने यहेज्केलसारखे पहारेकरी नेमले. तो लवकरच या पृथ्वीवरून सैतानाच्या राज्याचा नाश करणार आहे. पण बायबल म्हणतं की देव प्रेम आहे. त्यामुळे या नाशात कोणाचाही जीव जाऊ नये अशी देवाची इच्छा आहे. (२ पेत्र ३:९) आजच्या काळातल्या पहारेकऱ्‍याच्या कामात जेव्हा आपण मदत करतो, तेव्हा आपण देवासारखंच प्रेम दाखवतो. आणि हा आपल्यासाठी खूप मोठा बहुमान आहे.—यहे. ३३:१-९.

१७ अध्याय १७ आणि १८: यहोवाला माहीत आहे, की बरेच लोक पश्‍चात्ताप करणार नाहीत आणि त्याच्या दयेची कदर करणार नाहीत. ते त्याच्या विश्‍वासू सेवकांचं नामोनिशाण मिटवून टाकण्याचा प्रयत्न करतील. पण यहोवाचं आपल्या सेवकांवर खूप प्रेम आहे. त्यामुळे, जेव्हा ‘मागोग देशाचा गोग’ यहोवाच्या सेवकांवर हल्ला करेल, तेव्हा तो आपल्या लोकांच्या बाजूने लढेल. आपलंसुद्धा लोकांवर प्रेम आहे, त्यामुळे आपण शक्य तितक्या लोकांना एक महत्त्वाचा इशारा देतो. तो म्हणजे, जे लोक यहोवाच्या सेवकांवर अत्याचार करतात, त्यांचा तो लवकरच नाश करणार आहे.—यहे. ३८:१–३९:२०; २ थेस्सलनी. १:६, ७.

१८ अध्याय १९, २० आणि २१: यहोवाचं आपल्या लोकांवर किती प्रेम आहे, हे या अध्यायांमध्ये चर्चा केलेल्या दोन दृष्टान्तांवरून अगदी स्पष्टपणे दिसून येतं. ते दृष्टान्त म्हणजे, जीवन देणाऱ्‍या पाण्याच्या नदीचा दृष्टान्त आणि जमिनीच्या वाटणीचा दृष्टान्त. यहोवाने आपल्यावर असलेल्या त्याच्या प्रेमाचा सर्वात मोठा पुरावा दिला. तो म्हणजे, त्याने आपल्यासाठी आपल्या प्रिय मुलाचं बलिदान दिलं. या बलिदानामुळे कोणकोणत्या गोष्टी शक्य होणार आहेत, हे आपल्याला त्या दोन दृष्टान्तांवरून कळतं. आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळते आणि भविष्यात देवाच्या कुटुंबात परिपूर्ण जीवन जगण्याची संधी मिळते. मग, आपलं लोकांवर प्रेम आहे, हे आपण कसं दाखवू शकतो? याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे, जे यहोवाच्या मुलावर विश्‍वास ठेवतात, त्यांना पुढे एक सुंदर भविष्य मिळणार आहे, हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणं.—यहे. ४५: १-७; ४७:१–४८:३५; प्रकटी. २१: १-४; २२:१७.

हजार वर्षांच्या राज्यानंतर नम्रतेचं एक सुंदर उदाहरण

१९. हजार वर्षांच्या राज्यात येशू काय करेल? (“शेवटच्या परीक्षेचा सामना” ही चौकट पाहा.)

१९ येशूच्या हजार वर्षांच्या राज्यात तो करोडो लोकांना पुन्हा जिवंत करेल. आणि असं करून आपल्या ‘शत्रूमुळे,’ म्हणजे ‘मृत्यूमुळे’ आपल्याला जे दुःख सोसावं लागत आहे, ते तो काढून टाकेल. (१ करिंथ. १५:२६; मार्क ५:३८-४२; प्रे. कार्यं २४:१५) मानवी इतिहास हा निराशेने आणि शोकाने भरलेल्या एका दुःखद कहाणीसारखा आहे. पण जसजसं एकेका पिढीला पुन्हा जिवंत केलं जाईल, तसतसं येशू एका अर्थाने ती दुःखद कहाणी पुसून टाकेल. आणि पुन्हा जिवंत झालेल्या या लोकांना तो जणू एक नवीन आनंदी कहाणी लिहायची संधी देईल. आजारपण, महामाऱ्‍या, युद्ध आणि दुष्काळ यांमुळे झालेलं नुकसान, येशू आपल्या खंडणी बलिदानाच्या आधारावर भरून काढेल. इतकंच काय तर, दुःखाचं जे मूळ कारण आहे तेच तो आपल्यामधून काढून टाकेल. ते म्हणजे आदामकडून आपल्याला वारशाने मिळालेलं पाप. (रोम. ५:१८, १९) येशू “सैतानाची कार्यं” पूर्णपणे उद्ध्‌वस्त करेल. (१ योहा. ३:८) मग यानंतर काय होईल?

पुन्हा जिवंत झालेल्या लोकांना एक आनंदी कहाणी लिहायची संधी मिळेल

२०. येशू आणि त्याचे १,४४,००० सहराजे नम्रतेचं एक सुंदर उदाहरण कसं देतील? समजावून सांगा. (सुरुवातीचं चित्र पाहा.)

२० १ करिंथकर १५:२४-२८ वाचा. येशूच्या हजार वर्षांच्या राज्यात, मानवांना परिपूर्ण केलं जाईल आणि यहोवाच्या मूळ उद्देशाप्रमाणे पृथ्वीला नंदनवन बनवलं जाईल. त्या हजार वर्षांनंतर येशू आणि त्याचे १,४४,००० सहराजे नम्रतेचं एक सुंदर उदाहरण मांडतील. म्हणजे, ते राज्य यहोवाच्या हाती सोपवतील. हजार वर्षं त्यांच्याकडे राज्य करण्याचा जो अधिकार होता, तो ते आनंदाने यहोवाकडे सोपवतील. आणि त्यांच्या राज्यात ज्या गोष्टी केल्या जातील त्या कायम टिकतील.

शेवटची परीक्षा

२१, २२. (क) हजार वर्षांच्या शेवटी जगाची परिस्थिती कशी असेल? (ख) यहोवा सैतानाला आणि त्याच्या दुष्ट स्वर्गदूतांना का सोडेल?

२१ त्यानंतर यहोवा अशी एक अनोखी गोष्ट करेल, ज्यामुळे त्याचा आपल्या सेवकांवर किती विश्‍वास आहे हे दिसून येईल. सैतानाला आणि त्याच्या दुष्ट स्वर्गदूतांना ज्या अथांग डोहात हजार वर्षं बंद करण्यात आलं होतं, त्यांना तो तिथून सोडण्याची आज्ञा देईल. (प्रकटीकरण २०:१-३ वाचा.) ते जेव्हा बाहेर येतील तेव्हा त्यांना दिसेल की लोक आणि परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. हर्मगिदोनच्या आधी त्यांनी बहुतेक लोकांना बहकवलं होतं. तसंच, लोकांमध्ये द्वेष आणि भेदभाव पसरवून त्यांनी त्यांच्यामध्ये फूट पाडली होती. (प्रकटी. १२:९) पण हजार वर्षांच्या शेवटी सगळे मानव एका कुटुंबाप्रमाणे, एकीने यहोवाची उपासना करत असतील. आणि नवीन जगात सगळीकडे शांतीचं वातावरण असेल.

२२ पण सैतानासारख्या आणि दुष्ट स्वर्गदूतांसारख्या गुन्हेगारांना यहोवा त्या सुंदर वातावरणात का सोडेल? विचार करा, हजार वर्षांच्या शेवटी जे जिवंत असतील, त्यांपैकी बऱ्‍याच जणांच्या विश्‍वासाची परीक्षा कधीच झालेली नसेल. कारण यहोवाला ओळखण्याआधी त्यांचा मृत्यू झाला होता आणि नंतर त्यांना नवीन जगात पुन्हा जिवंत केलं गेलं. यहोवाने त्यांना फक्‍त जिवंतच केलं नाही, तर त्यांच्या शारीरिक आणि आध्यात्मिक गरजासुद्धा पुरवल्या. त्यांच्या आसपास नेहमी चांगलीच माणसं असल्यामुळे त्यांच्यावर कोणताच वाईट प्रभाव पडलेला नसेल. कारण त्यांच्या आजूबाजूला असेच लोक असतील, जे यहोवावर प्रेम करतात आणि त्याची सेवा करतात. पुन्हा जिवंत झालेल्या लोकांवर सैतान कदाचित तोच आरोप लावेल, जो त्याने ईयोबवर लावला होता. तो म्हणजे, ते फक्‍त देवाची सेवा यासाठी करतात, कारण तो त्यांना सुरक्षित ठेवतो आणि त्यांना आशीर्वाद देतो. (ईयो. १:९, १०) आणि म्हणूनच, आपली नावं जीवनाच्या पुस्तकात कायमची लिहून ठेवण्याआधी यहोवा आपल्याला एक संधी देईल. कशाची संधी? आपल्या पित्याला, सर्वोच्च प्रभूला आपण कायम विश्‍वासू राहू की नाही, हे सिद्ध करण्याची संधी.—प्रकटी. २०:१२, १५.

२३. प्रत्येकाला कोणत्या परीक्षेचा सामना करावा लागेल?

२३ काही काळासाठी, सैतानाला लोकांना बहकवण्याची संधी दिली जाईल. आणि तो त्यांना देवापासून दूर नेण्याचा प्रयत्न करेल. ती देवाच्या लोकांसाठी एक परीक्षाच असेल. पण कशा प्रकारची? ज्या प्रकारच्या परीक्षेचा आदाम आणि हव्वाला सामना करावा लागला, त्याच प्रकारच्या परीक्षेचा प्रत्येक व्यक्‍तीला सामना करावा लागेल. म्हणजे प्रत्येकाला हे ठरवावं लागेल, की तो यहोवाच्या स्तरांप्रमाणे चालेल का? त्याच्या राज्याला पाठिंबा देईल का? आणि त्याची उपासना करेल का? की तो देवाच्या विरुद्ध बंड करून सैतानाला पाठिंबा देईल?

२४. हजार वर्षांच्या शेवटी जे लोक बंड करतील त्यांनासुद्धा गोग आणि मागोग का म्हणण्यात आलं आहे?

२४ प्रकटीकरण २०:७-१० वाचा. लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे, हजार वर्षांच्या शेवटी जे बंड करतील त्यांना ‘गोग’ आणि ‘मागोग’ म्हणण्यात आलं आहे. कारण त्यांची वृत्तीसुद्धा त्या बंडखोरांसारखीच असेल जे मोठ्या संकटाच्या वेळी देवाच्या लोकांवर हल्ला करतील. ही गोष्ट आपल्याला यहेज्केलच्या भविष्यवाणीवरून कळते. मोठ्या संकटाच्या वेळी यहोवाच्या विरोधात जाणाऱ्‍या लोकांच्या गटाला ‘मागोग देशाचा गोग’ म्हणण्यात आलं आहे. आणि हा गट वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये विभागलेला आहे. (यहे. ३८:२) त्याचप्रमाणे, ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्याच्या शेवटी जे बंड करतील त्यांनासुद्धा ‘राष्ट्रं’ म्हणण्यात आलं आहे. पण हे कसं शक्य आहे? कारण हजार वर्षांच्या राज्यामध्ये तर लोक आजच्यासारखे राष्ट्रांमध्ये विभागलेले नसतील. सगळे लोक एकाच सरकाराच्या, म्हणजेच देवाच्या राज्याच्या अधीन असतील. तर मग त्या बंडखोर लोकांना ‘गोग’ आणि ‘मागोग,’ तसंच ‘राष्ट्रं’ म्हटल्यामुळे कोणती गोष्ट आपल्याला कळते? भविष्यवाणीवरून आपल्याला कळतं, की सैतान देवाच्या काही लोकांमध्ये फूट पाडण्यात यशस्वी होईल. पण यहोवाची बाजू घ्यायची की सैतानाची, यासाठी कोणत्याही व्यक्‍तीवर जबरदस्ती केली जाणार नाही. त्या वेळी सगळेच परिपूर्ण असतील आणि प्रत्येक व्यक्‍तीला स्वतःचा निर्णय घ्यावा लागेल.

बंड करणाऱ्‍यांना ‘गोग’ आणि ‘मागोग’ म्हटलं आहे (परिच्छेद २४ पाहा)

२५, २६. (क) सैतानाच्या बाजूने किती लोक होतील? (ख) आणि त्यांचं काय होईल?

२५ किती लोक सैतानाच्या बाजूने होतील? बायबलमध्ये म्हटलं आहे की “त्यांची संख्या समुद्राच्या वाळूइतकी” असेल. पण याचा अर्थ असा होत नाही की भरपूर लोक बंड करतील. आपण असं का म्हणू शकतो? अब्राहामला यहोवाने जे वचन दिलं होतं त्यावर विचार करा. यहोवाने म्हटलं होतं की अब्राहामची संतती “समुद्रकिनाऱ्‍यावर असलेल्या वाळूच्या कणांसारखी” वाढेल. (उत्प. २२:१७, १८) पण शेवटी त्याची संतती १,४४,००१ इतकीच झाली. (गलती. ३:१६, २९) हा आकडा जरी मोठा वाटत असला तरी पृथ्वीवर आजपर्यंत जन्माला आलेल्या मानवांच्या संख्येच्या तुलनेत तो खूप छोटा आहे. त्याचप्रमाणे, सैतानाच्या बाजूने जाणाऱ्‍यांची संख्या जरी जास्त वाट असली, तरी ती खूप जास्त नसेल. या बंडखोरांमुळे यहोवाच्या विश्‍वासू लोकांना कोणताच धोका नसेल.

२६ जे यहोवाविरुद्ध बंड करतील त्यांचा लगेच नाश केला जाईल. सैतान आणि त्याच्या दुष्ट स्वर्गदूतांसोबत त्यांचंसुद्धा नामोनिशाण कायमचं मिटून जाईल. त्यांना पुन्हा कधीच जीवन मिळणार नाही. फक्‍त त्यांनी घेतलेले वाईट निर्णय आणि त्या निर्णयांचे परिणाम कायम लक्षात ठेवले जातील.—प्रकटी. २०:१०.

२७-२९. जे शेवटची परीक्षा पार करतील त्यांना कोणते आशीर्वाद मिळतील?

२७ याउलट, जे शेवटची परीक्षा पार करतील त्यांची नावं “जीवनाच्या पुस्तकात” कायमसाठी लिहून ठेवण्यात येतील. (प्रकटी. २०:१५) ते लोक यहोवाची विश्‍वासू मुलं आणि मुली होतील आणि एका कुटुंबाप्रमाणे एकत्र राहून त्याची उपासना करतील. कारण उपासना मिळण्याचा हक्क फक्‍त त्यालाच आहे.

२८ भविष्याची कल्पना करा. तुमच्याकडे असं जीवन असेल जे कधीच संपणार नाही; असं काम असेल ज्यामुळे तुम्हाला मनापासून समाधान मिळेल. आणि तुमच्या मित्रांसोबत तुम्ही आनंदाने राहू शकाल. मग तुम्हाला आणि तुमच्या प्रिय लोकांना कधीच दुःख सोसावं लागणार नाही. आपल्यामधून पाप पूर्णपणे काढून टाकलं जाईल. त्यामुळे पुन्हा आपल्याला खंडणी बलिदानाची गरज भासणार नाही. आणि आपण आपल्या नीतिमान कामांमुळे देवापुढे उभे राहू शकू. प्रत्येकाची देवासोबत जवळची मैत्री असेल आणि कोणाच्याही मध्यस्थीची गरज पडणार नाही. तसंच, सर्वात महत्त्वाचं म्हणजे, स्वर्गात आणि पृथ्वीवर यहोवाच्या स्तरांप्रमाणे त्याची उपासना केली जाईल. त्या वेळी खऱ्‍या अर्थाने सगळीकडे यहोवाची शुद्ध उपासना होत आहे असं म्हणता येईल.

परिपूर्ण झाल्यावर तुमच्यात पाप नसेल; तुम्हाला खंडणी बलिदानाची गरज भासणार नाही; तुम्हाला तुमच्याच नीतिमान कामांच्या आधारावर देवापुढे उभं राहता येईल (परिच्छेद २८ पाहा)

२९ हे सर्व पाहण्यासाठी तुम्ही तिथे असाल का? यहेज्केलच्या पुस्तकातून शिकलेले तीन महत्त्वाचे धडे जर तुम्ही लागू करत राहिलात, तर तुम्हीसुद्धा तिथे असू शकता. ते तीन धडे म्हणजे: फक्‍त यहोवाची उपासना करा, एकीने शुद्ध उपासना करा आणि इतरांवर प्रेम करत राहा. पण यहेज्केलच्या भविष्यवाण्यांमधून आपल्याला एक शेवटचा आणि महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो. तो कोणता?

शेवटी, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्वजण एकीने शुद्ध उपासना करतील तेव्हा किती आनंदाचं वातावरण असेल याचा विचार करा (परिच्छेद २७-२९ पाहा)

“मी यहोवा आहे”

३०, ३१. “तेव्हा त्यांना समजून येईल, की मी यहोवा आहे” या घोषणेचा (क) देवाच्या शत्रूंसाठी काय अर्थ होतो? (ख) देवाच्या लोकांसाठी काय अर्थ होतो?

३० यहेज्केलच्या पुस्तकातल्या भविष्यवाण्यांमधून, “तेव्हा त्यांना समजून येईल, की मी यहोवा आहे” आणि ‘तेव्हा त्यांना कळून येईल की मी यहोवा आहे’ या घोषणा वारंवार ऐकायला मिळतात. (यहे. ६:१०; ३९:२८) यहोवाच्या त्याच्या शत्रूंशी युद्ध करेल आणि त्यांचं नामोनिशाण मिटवून टाकेल त्या वेळी या घोषणेचा अर्थ त्यांना समजेल. यहोवा अस्तित्वात आहे ही गोष्ट त्यांना मान्य करावीच लागेल. “सैन्यांचा देव यहोवा” जेव्हा एका ‘बलवान योद्ध्यासारखा’ त्यांच्याशी युद्ध करेल, तेव्हा त्याच्या नावाबद्दल त्यांना एक महत्त्वाचा धडा शिकायला मिळेल. (१ शमु. १७:४५; निर्ग. १५:३) तो म्हणजे, त्याच्या महान नावाचा अर्थ होतो “तो व्हायला लावतो.” यहोवाबद्दल त्यांना एक महत्त्वाचं सत्य कळून येईल. ते म्हणजे, त्याचा उद्देश पूर्ण करण्यापासून कोणतीही गोष्ट त्याला रोखू शकत नाही. पण त्यांच्यासाठी आता फार उशीर झालेला असेल.

३१ पण, “तेव्हा त्यांना समजून येईल, की मी यहोवा आहे,” या घोषणेचा देवाच्या लोकांसाठी काय अर्थ होतो? याचा अर्थ होतो, त्यांना शांतीने राहता येईल आणि सर्वकाळाचं जीवन मिळेल. आपण पाहिलं होतं, की यहोवाच्या नावाचा अर्थ, “तो व्हायला लावतो,” असा आहे. म्हणून त्याच्या मूळ उद्देशाप्रमाणे आपण त्याची मुलं आणि मुली होऊ. आणि परिपूर्ण असल्यामुळे आपल्याला त्याच्यासारखे गुण पूर्णपणे दाखवता येतील. (उत्प. १:२६) आजही, यहोवा आपला प्रेमळ पिता आणि संरक्षण करणारा मेंढपाळ आहे. आणि लवकरच तो आपल्यासाठी लढणारा राजा बनेल. पण तो दिवस येण्याआधी आपण यहेज्केलच्या भविष्यवाण्यांमधून मिळणाऱ्‍या संदेशावर गंभीरतेने विचार करू या. यहोवा कोण आहे आणि तो कशा प्रकारचा देव आहे ही गोष्ट आपल्याला माहीत आहे हे आपण आपल्या रोजच्या वागण्या-बोलण्यातून दाखवून देऊ या. मग, जेव्हा मोठ्या संकटाचे विनाशकारी वारे वाहू लागतील, तेव्हा आपल्याला भीती वाटणार नाही. उलट, आपण आपलं डोकं वर करून ताठ उभे राहू, कारण आपल्या सुटकेची वेळ जवळ आलेली असेल. (लूक २१:२८) उपासना मिळण्याचा हक्क फक्‍त यहोवालाच आहे. त्यामुळे तो दिवस येईपर्यंत आपण सगळ्यांना आपल्या प्रेमळ पित्याबद्दल जाणून घ्यायला मदत करत राहू या. कारण सर्व नावांमध्ये महान आणि श्रेष्ठ नाव ‘यहोवा’ हेच आहे.—यहे. २८:२६.

a इथे दिलेले अध्यायांचे क्रमांक याच प्रकाशनातले आहेत.