अध्याय २०
‘वारसा म्हणून देशाच्या जमिनीची वाटणी करा’
अध्याय कशाबद्दल आहे: देशाच्या जमिनीची वाटणी करण्याचा काय अर्थ होतो
१, २. (क) यहोवाने यहेज्केलला काय सांगितलं? (ख) आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत?
यहेज्केलने नुकताच एक दृष्टान्त पाहिला आहे. तो पाहून त्याला मोशे आणि यहोशवा यांच्या दिवसांची आठवण झाली असेल. जवळजवळ ९०० वर्षांपूर्वी यहोवाने मोशेला सांगितलं होतं, की वचन दिलेला देश कुठून कुठपर्यंत असेल. आणि नंतर त्याने यहोशवाला त्या देशाची इस्राएलच्या वंशामध्ये वाटणी करायला सांगितलं होतं. (गण. ३४:१-१५; यहो. १३:७; २२:४, ९) पण आता इ.स.पू. ५९३ मध्ये, यहोवा पुन्हा एकदा यहेज्केलला आणि त्याच्यासोबत बंदिवासातल्या यहुद्यांना वचन दिलेल्या देशाची इस्राएलच्या वंशांमध्ये वाटणी करायला सांगतो.—यहे. ४५:१; ४७:१४; ४८:२९.
२ यहेज्केल आणि बंदिवासात असलेल्या यहुद्यांसाठी या दृष्टान्ताचा काय अर्थ होता? आज देवाच्या लोकांना या दृष्टान्तातून प्रोत्साहन कसं मिळतं? आणि दृष्टान्ताच्या रूपात दिलेल्या या भविष्यवाणीची पुढे एक मोठी पूर्णता होईल का?
दृष्टान्तातली चार अभिवचनं
३, ४. (क) यहेज्केलच्या दृष्टान्तातून बंदिवासात असलेल्या यहुद्यांना कोणती चार अभिवचनं देण्यात आली? (ख) या अध्यायात आपण कोणत्या अभिवचनावर चर्चा करणार आहोत?
३ यहेज्केलने पाहिलेला हा शेवटचा दृष्टान्त आपल्याला त्याने लिहिलेल्या पुस्तकाच्या शेवटच्या नऊ अध्यायांमध्ये वाचायला मिळतो. (यहे. ४०:१–४८:३५) या दृष्टान्तातून, बंदिवासात असलेल्या यहुद्यांना चार अभिवचनं देण्यात आली. ते आपल्या मायदेशात परत गेल्यावर त्यांना कोण-कोणते आशीर्वाद मिळतील ते सांगण्यात आलं. पहिलं अभिवचन म्हणजे, देवाच्या मंदिरात पुन्हा शुद्ध उपासना केली जाईल. दुसरं, देवाच्या नीतिमान स्तरांप्रमाणे चालणारे याजक आणि मेंढपाळ राष्ट्राचं नेतृत्व करतील. तिसरं, इस्राएल देशात परत येणाऱ्या प्रत्येकाला जमिनीचा वाटा मिळेल. आणि चौथं, यहोवा त्यांच्यासोबत म्हणजे त्यांच्यामध्ये राहील.
४ या पुस्तकाच्या १३ व्या आणि १४ व्या अध्यायात आपण पाहिलं, की पहिली दोन अभिवचनं कशा प्रकारे पूर्ण होतील; म्हणजे शुद्ध उपासना पुन्हा कशी सुरू होईल आणि नीतिमान मेंढपाळ देवाच्या लोकांचं कसं नेतृत्व करतील. आता या अध्यायात आपण तिसऱ्या अभिवचनावर, म्हणजे जमिनीच्या वाटणीवर चर्चा करणार आहोत. आणि यहोवा कशा प्रकारे लोकांमध्ये राहील या चौथ्या अभिवचनाबद्दल आपण पुढच्या अध्यायात पाहू या.—यहे. ४७:१३-२१; ४८:१-७, २३-२९.
‘हा देश तुम्हाला वारसा म्हणून दिला जातोय’
५, ६. (क) यहेज्केलला कोणता देश वाटून द्यायला सांगितला होता? (सुरुवातीचं चित्र पाहा.) (ख) जमिनीची वाटणी कशी केली जाईल हे दृष्टान्तात का दाखवण्यात आलं?
५ यहेज्केल ४७:१४ वाचा. दृष्टान्तात यहोवाने यहेज्केलला एक जागा दाखवली, जी लवकरच ‘एदेन बागेसारखी’ बनणार होती. (यहे. ३६:३५) मग यहोवाने यहेज्केलला म्हटलं: “हा देश इस्राएलच्या १२ वंशांना त्यांचा वारसा म्हणून वाटून द्या.” (यहे. ४७:१३) हा कोणता देश होता? इस्राएली लोक बंदिवासातून परत आल्यावर जिथे राहणार होते तो “हा देश” होता. मग यहेज्केल ४७:१५-२१ मध्ये दिल्याप्रमाणे, यहोवाने अगदी स्पष्टपणे सांगितलं की देशाच्या सीमा उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिमेकडे कुठून कुठपर्यंत असतील.
६ पण जमिनीची वाटणी कशी केली जाईल ते यहेज्केलला दृष्टान्तात का दाखवण्यात आलं? कारण यहोवाला बंदिवासातल्या यहुद्यांना आणि यहेज्केलला याचं आश्वासन द्यायचं होतं, की एक ना एक दिवस ते पुन्हा आपल्या देशात जाऊन राहतील. देशाच्या सीमा कुठून कुठपर्यंत असतील आणि देशाची जमीन सगळ्या वंशांमध्ये कशा प्रकारे वाटली जाईल हे ऐकल्यानंतर, कल्पना करा की यहुद्यांचं मन आनंदाने किती भरून गेलं असेल! पण प्रश्न आहे, की हे खरंच घडलं का? त्यांच्या सगळ्या आशा पूर्ण झाल्या का? ते आपल्या मायदेशात परत गेले तेव्हा प्रत्येकाला जमिनीचा वाटा मिळाला का? हो नक्कीच.
७. (क) इ.स.पू. ५३७ पासून काय होऊ लागलं? (ख) आपल्या काळातही काय घडलं आहे? (ग) आपण आधी कोणत्या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत?
७ यहेज्केलला हा दृष्टान्त मिळाला त्याच्या जवळजवळ ५६ वर्षांनंतर, म्हणजे इ.स.पू. ५३७ पासून बंदिवासात असलेले हजारो यहुदी लोक इस्राएल देशात परत येऊन राहू लागले. आज आपल्या काळातही असंच काहीसं घडलं आहे. यहोवाने आपल्या लोकांना खरोखरचा नाही, तर एक आध्यात्मिक देश वारसा म्हणून दिला आला. म्हणजे यहोवाने त्यांना नंदनवनासारख्या वातावरणात राहायची संधी दिली आहे. प्राचीन काळात वचन दिलेल्या देशाची जी वाटणी करण्यात आली त्यावरून आज आध्यात्मिक देशाबद्दल आपण बरंच काही शिकू शकतो. पण ते जाणून घेण्याआधी आपण एका प्रश्नाचं उत्तर पाहू या. तो म्हणजे, आज यहोवाचे लोक आध्यात्मिक देशात राहत आहेत असं आपण का म्हणू शकतो?
८. (क) यहोवाने मूळ इस्राएल राष्ट्राच्या जागी कोणाची निवड केली? (ख) आध्यात्मिक देश काय आहे? (ग) तो कधी अस्तित्वात आला, आणि तिथे कोण राहत आहेत?
८ यहोवाने खूप आधी यहेज्केलला आणखी एक दृष्टान्त दाखवला होता. त्यात यहोवाने सांगितलं होतं, की यहुदी लोक परत आपल्या मायदेशात येण्याबद्दलच्या भविष्यवाण्यांची पुढे एक मोठी पूर्णता होईल. ही पूर्णता देवाचा “सेवक दावीद,” म्हणजे येशू ख्रिस्त राज्य करू लागल्यानंतर होणार होती. (यहे. ३७:२४) आपल्याला माहीत आहे, की येशू १९१४ मध्ये राजा बनला. यहोवाने १९१४ च्या बऱ्याच शतकांआधी मूळ इस्राएल राष्ट्राला नाकारलं, आणि त्यांच्या जागी अभिषिक्त ख्रिश्चनांनी बनलेल्या आध्यात्मिक इस्राएल राष्ट्राला निवडलं. (मत्तय २१:४३; १ पेत्र २:९ वाचा.) तसंच, यहोवाने त्यांना खरोखरच्या इस्राएल देशात नाही, तर एका आध्यात्मिक देशात आणलं होतं. (यश. ६६:८) हा आध्यात्मिक देश काय आहे? या पुस्तकाच्या १७ व्या अध्यायात आपण पाहिलं होतं, की आध्यात्मिक देशाचा अर्थ नंदनवनासारखं वातावरण जिथे यहोवाचे सेवक सुरक्षित आहे. १९१९ पासून अभिषिक ख्रिस्ती या आध्यात्मिक देशात यहोवाची उपासना करत आहेत. (“१९१९ हे वर्षच का?,” ही ९ख चौकट पाहा.) पुढे ‘दुसऱ्या मेंढरांतले’ लोकही, म्हणजे ज्यांना पृथ्वीवरच्या जीवनाची आशा आहे तेसुद्धा या देशात येऊन राहू लागले. (योहा. १०:१६) या आध्यात्मिक देशाच्या सीमा दिवसेंदिवस वाढतच आहेत आणि तिथे आपल्याला भरपूर आशीर्वाद मिळत आहेत. पण हर्मगिदोननंतर जेव्हा संपूर्ण पृथ्वीच खरोखर नंदनवन बनेल, तेव्हा आपल्याला पूर्ण अर्थाने आशीर्वाद मिळतील.
देशाच्या जमिनीची समान आणि अचूक वाटणी
९. देशाच्या जमिनीची वाटणी करण्याबद्दल यहोवाने काय सांगितलं?
९ यहेज्केल ४८:१, २८ वाचा. इस्राएल देशाच्या सीमा कुठून कुठपर्यंत असतील हे सांगितल्यावर, प्रत्येक वंशाचा जमिनीचा हिस्सा कुठून कुठपर्यंत असेल हेसुद्धा यहोवा स्पष्टपणे सांगतो. त्याने म्हटलं, की उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत इस्राएलच्या १२ वंशांमध्ये देशाच्या जमिनीची योग्य वाटणी केली जावी. देशाच्या उत्तरेच्या टोकाला दान वंशाला जमिनीचा हिस्सा देण्यात यावा. त्यानंतर एक-एक करून प्रत्येक वंशाला जमीन वाटून देण्यात यावी. आणि शेवटी सगळ्यात खाली, दक्षिणेच्या टोकाला गाद वंशाला जमिनीचा हिस्सा देण्यात यावा. अशा प्रकारे, इस्राएलच्या १२ वंशांमध्ये देशाच्या जमिनीची पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, म्हणजे महासागरापर्यंत (भूमध्य समुद्रापर्यंत) वाटणी करायची होती.—यहे. ४७:२०; “देशाच्या जमिनीची वाटणी,” या चौकटीतला नकाशा पाहा.
१०. या दृष्टान्तावरून यहुद्यांना कोण-कोणत्या गोष्टींचं आश्वासन मिळालं असेल?
१० या दृष्टान्तावरून बंदिवासात असलेल्या यहुद्यांना कोणत्या गोष्टींचं आश्वासन मिळालं असेल? जमिनीच्या वाटणीबद्दल यहेज्केलने दिलेली बारीकसारीक आणि स्पष्ट माहिती ऐकून त्यांना याचं आश्वासन मिळालं असेल, की जमिनीची वाटणी अगदी सुव्यवस्थितपणे केली जाईल. दृष्टान्तात हेही सांगितलं होतं, की इस्राएलच्या १२ वंशांना कुठून कुठपर्यंत जमिनीचा हिस्सा दिला जाईल. त्यामुळे बंदिवासात असलेल्या यहुद्यांना याचंही आश्वासन मिळालं, की ते जेव्हा आपल्या मायदेशात परत जातील तेव्हा प्रत्येकाला जमिनीचा एक हिस्सा नक्की मिळेल. कोणीही बेघर नसेल, प्रत्येकाकडे स्वतःच्या हक्काची जमीन असेल.
११. या दृष्टान्तामुळे आज आपला विश्वास कसा वाढतो? (“देशाच्या जमिनीची वाटणी,” ही चौकट पाहा.)
११ या दृष्टान्तामुळे आज आपला विश्वास कसा वाढतो? यहुदी लोक वचन दिलेल्या देशात परत जाऊन राहू लागले तेव्हा फक्त याजकांना, लेव्यांना आणि प्रधानांनाच नाही, तर १२ वंशातल्या सगळ्या लोकांना जमिनाचा देण्यात आला होता. (यहे. ४५:४, ५, ७, ८) त्याचप्रमाणे, आज आध्यात्मिक देशात फक्त अभिषिक्त जनांना आणि ‘मोठ्या लोकसमुदायातल्या’ नेतृत्व करणाऱ्यांनाच नाही, तर त्यातल्या इतर सर्व लोकांनाही जागा आहे. a (प्रकटी. ७:९) यहोवाच्या संघटनेत आपली भूमिका कितीही लहान असली, तरी प्रत्येकाची सेवा मौल्यवान आहे आणि संघटनेत प्रत्येकाला एक महत्त्वाची जागा आहे. हे जाणून खरंच किती आनंद होतो!
दोन खास फरक—यांचा आपल्यासाठी काय अर्थ होतो?
१२, १३. जमिनीच्या वाटणीबद्दल यहोवाने कोणत्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या?
१२ जमिनीची वाटणी करण्याबद्दल यहोवाने दिलेल्या काही सूचना ऐकून यहेज्केल कदाचित गोंधळात पडला असेल. कारण बऱ्याच वर्षांपूर्वी यहोवाने मोशेला ज्या सूचना दिल्या होत्या त्यांपेक्षा या सूचना फार वेगळ्या होत्या. त्या कशा प्रकारे वेगळ्या होत्या याची दोन उदाहरणं आता आपण पाहू या. एक म्हणजे, जमिनीच्या बाबतीत आणि दुसरं म्हणजे, तिथे राहणाऱ्या लोकांच्या बाबतीत.
१३ पहिला फरक, जमिनीच्या बाबतीत. यहोवाने मोशेला सांगितलं होतं की त्याने मोठ्या वंशांना जास्त जमीन आणि छोट्या वंशांना कमी जमीन वाटून द्यावी. (गण. २६:५२-५४) पण यहेज्केलच्या दृष्टान्तात यहोवाने अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं, की सगळ्या वंशांना जमिनीचा ‘एकसारखा वाटा’ दिला जावा. (यहे. ४७:१४) अशा प्रकारे प्रत्येक वंशाला मिळालेल्या जमिनीच्या वाट्याच्या उत्तरेकडेची सीमा आणि दक्षिणेकडची सीमा यांच्यामधलं अंतर सारखंच असणार होतं. याचा अर्थ सर्व लोकांना, मग ते कोणत्याही वंशातले असोत, त्यांना वचन दिलेल्या देशातल्या सुपीक जमिनीचा आणि तिथल्या मुबलक पाण्याचा एकसारखा फायदा होणार होता.
१४. यहोवाने विदेश्यांच्या बाबतीत दिलेली सूचना, मोशेच्या नियमशास्त्रात दिलेल्या सूचनेपेक्षा वेगळी कशी होती?
१४ दुसरा फरक, तिथे राहणाऱ्या लोकांच्या बाबतीत. मोशेच्या नियमशास्त्रामध्ये विदेशी लोकांचं संरक्षण करण्यासाठी काही नियम दिले होते. तसंच, ते लोक देवाची उपासना करू शकत होते. पण देशाच्या जमिनीचा मात्र त्यांना हिस्सा मिळायचा नाही. (लेवी. १९:३३, ३४) अशा प्रकारे इस्राएली लोकांमध्ये आणि विदेशी लोकांमध्ये एक मोठा फरक होता. पण यहोवा आता यहेज्केलला अशी सूचना देतो, जी मोशेच्या नियमशास्त्रात दिलेल्या सूचनांपासून अगदी वेगळी आहे. यहोवाने त्याला म्हटलं: “विदेशी माणूस ज्या वंशाच्या प्रदेशात राहतोय, त्याच प्रदेशात त्याला वारसा दिला जावा.” यामुळे ‘इस्राएल घराण्यात जन्मलेल्या’ लोकांमध्ये आणि विदेशी लोकांमध्ये असलेला फरक नाहीसा झाला. (यहे. ४७:२२, २३) दृष्टान्तात यहेज्केलने पाहिलं, की लोक आपल्या मायदेशात परत आल्यावर सगळ्यांना एकसारखी वागणूक दिली जात आहे आणि ते सगळे एकत्र मिळून यहोवाची उपासना करत आहेत.—लेवी. २५:२३.
१५. यहोवाने दिलेल्या दोन महत्त्वाच्या सूचनांवरून आपल्याला कोणत्या गोष्टीचा पुरावा मिळतो?
१५ जमिनीच्या बाबतीत आणि तिथे राहणाऱ्या लोकांच्या बाबतीत यहेज्केलला ज्या दोन महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या, ते ऐकून बंदिवासात असलेल्या यहुद्यांना खरंच खूप आनंद झाला असेल. त्यांना याची खातरी मिळाली, की यहोवाची उपासना करणाऱ्या सगळ्यांना देशाच्या जमिनीचा एकसारखा वाटा मिळेल, मग ते इस्राएली असोत किंवा विदेशी. (एज्रा ८:२०; नहे. ३:२६; ७:६, २५; यश. ५६:३, ८) या सूचनांवरून आणखी एका गोष्टीचा पुरावा मिळाला; तो म्हणजे, यहोवाच्या नजरेत त्याचे सगळे सेवक खूप मौल्यवान आहेत. (हाग्गय २:७ वाचा.) आणि हे कधीही न बदलणारं सत्य आहे. आपल्याला स्वर्गातल्या जीवनाची आशा असो किंवा पृथ्वीवरच्या जीवनाची, यहोवाचं आपल्या सगळ्यांवर खूप प्रेम आहे.
१६, १७. (क) देशाच्या जमिनीबद्दल आणि तिथे राहणाऱ्यांबद्दल आपण जे पाहिलं त्यावरून आपण काय शिकतो? (ख) पुढच्या अध्यायात आपण कशावर चर्चा करणार आहोत?
१६ देशाच्या जमिनीबद्दल आणि तिथे राहणाऱ्या लोकांबद्दल आपण आतापर्यंत जे काही पाहिलं त्यावरून आपण काय शिकतो? हेच, की जगभरातली आपली एकी आणि आपण आपल्या सगळ्या भाऊबहिणींशी एकसारखंच वागतो हे ठळकपणे दिसून आलं पाहिजे. यहोवा कधीही भेदभाव करत नाही. त्यामुळे आपण स्वतःला विचारलं पाहिजे: ‘मीसुद्धा यहोवाप्रमाणेच सगळ्यांशी एकसारखं वागतो का? मी कोणीशी भेदभाव तर करत नाही ना? यहोवाच्या प्रत्येक सेवकाचा मी मनापासून आदर करतो का, मग त्याची भाषा, परिस्थिती किंवा देश कोणता का असेना?’ (रोम. १२:१०) आपल्याला या गोष्टीचा आनंद आहे, की आपला स्वर्गातला पिता, यहोवा आपल्या सगळ्यांनाच आध्यात्मिक नंदनवनात राहण्याची संधी देतो. इथे आपण मनापासून त्याची उपासना करतो आणि त्याच्याकडून मिळणाऱ्या आशीर्वादांचा आनंद घेतो.—गलती. ३:२६-२९; प्रकटी. ७:९.
१७ यहेज्केलने पाहिलेल्या शेवटच्या दृष्टान्ताच्या शेवटच्या भागात यहोवा असं अभिवचन देतो, की तो त्याच्या लोकांसोबत, त्यांच्यामध्ये राहील. या अभिवचनातून आपण काय शिकू शकतो ते आपण पुढच्या अध्यायात पाहणार आहोत.
a यहोवाने आध्यात्मिक देशात याजकांना आणि प्रधानांना कोणतं खास स्थान आणि जबाबदारी नेमून दिली ते जाणून घेण्यासाठी या पुस्तकातला १४ वा अध्याय वाचा.