व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चौकट १४क

यहेज्केलच्या दृष्टान्तातल्या मंदिरातून शिकण्यासारखे धडे

यहेज्केलच्या दृष्टान्तातल्या मंदिरातून शिकण्यासारखे धडे

शुद्ध उपासनेला सर्वोच्च स्थान मिळतं आणि भ्रष्ट होण्यापासून तिचं संरक्षण होतं

दृष्टान्तातलं मंदिर (१) “एका अतिशय उंच डोंगरावर” आहे. आपणही शुद्ध उपासनेला सर्वोच्च स्थान, म्हणजे आपल्या जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व देतो का?

मंदिराच्या चारही बाजूंना (२) एक भिंत आहे. मंदिर (३) एका मोठ्या मोकळ्या जागेच्या मधोमध आहे. यांवरून आपल्याला काय शिकायला मिळतं? आपल्याला हे शिकायला मिळतं, की आपण कोणत्याही गोष्टीमुळे शुद्ध उपासना भ्रष्ट होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. जर जीवनातल्या “सामान्य” गोष्टीही शुद्ध उपासनेपासून दूर ठेवायच्या आहेत, तर विचार करा, अशुद्ध किंवा अनैतिक वागणं यांपासून आपण किती दूर राहिलं पाहिजे!—यहे. ४२:२०.

कधीही न संपणारे आशीर्वाद

मंदिराच्या पवित्रस्थानातून पाण्याचा एक छोटासा प्रवाह वाहतो. पुढे तो वाढत जाऊन त्याची (४) एक मोठी, खोल नदी होते. ती जिथे-जिथे वाहते तिथे-तिथे जीवन घेऊन येते आणि देशाची जमीन सुपीक करते. या आशीर्वादांबद्दल १९ व्या अध्यायात चर्चा केली जाईल.

सगळ्यांसाठी एकसारखेच स्तर

(५) बाहेरच्या उंच प्रवेश-इमारती आणि (९) आतल्या उंच प्रवेश-इमारती यांवरून आपल्याला काय शिकायला मिळतं? हेच, की शुद्ध उपासना करणाऱ्‍या सगळ्यांसाठी यहोवाने वागण्या-बोलण्याच्या बाबतीत एकसारखेच स्तर ठरवले आहेत. लक्षात घ्या, की बाहेरच्या प्रवेश-इमारतींचं आणि आतल्या प्रवेश-इमारतींचं माप एकंदरीत एकसारखं आहे. यावरून आपण हे शिकतो, की यहोवाने त्याच्या सर्वच सेवकांसाठी, मग ते कोणत्याही जबाबदाऱ्‍या सांभाळत असोत किंवा कोणत्याही स्वरूपाची सेवा करत असोत, त्या सगळ्यांसाठी त्याने एकसारखेच स्तर ठरवले आहेत.

यहोवासोबत बसून जेवणाचा आनंद

(८) जेवणाच्या खोल्यांवरून आपल्याला याची आठवण होते, की प्राचीन काळात लोक मंदिरात जी बलिदानं आणायचे त्यांपैकी काही प्रकारच्या बलिदानांचे काही भाग ते खाऊ शकत होते. एका अर्थी, जणू ते यहोवासोबत बसून जेवणाचा आनंद घेत होते. पण आज आपण ज्या महान लाक्षणिक मंदिरात उपासना करतो तिथे आपण अशी बलिदानं देत नाही. कारण आपल्यासाठी सर्वकाळासाठी “एकदाच बलिदान अर्पण” करण्यात आलं आहे. (इब्री १०:१२) पण असं असलं, तरी आपण यहोवाला “स्तुतीचं बलिदान” अर्पण करतो.—इब्री १३:१५.

यहोवाकडून पक्की खातरी

दृष्टान्तात मोजमापांबद्दल दिलेली बारीकसारीक माहिती समजणं आपल्याला कदाचित कठीण वाटेल. पण त्यावरून आपल्याला एक खूप महत्त्वाचा मुद्दा शिकायला मिळतो. तो म्हणजे: ज्या प्रकारे मंदिराची मापं अचूक होती आणि कोणीही ती बदलू शकत नव्हतं, त्याच प्रकारे शुद्ध उपासना पुन्हा सुरू करण्याचा देवाचा उद्देश कधीही बदलणार नाही; तो अगदी अचूकपणे पूर्ण होईल. दृष्टान्तात यहेज्केलला माणसं दिसली असा त्याने कुठेही उल्लेख केला नाही. पण यहोवाने याजकांना, प्रधानांना आणि लोकांना कडक शब्दांत सल्ला दिल्याचा तो उल्लेख करतो. यावरून आपण हे शिकतो, की देवाच्या सर्व सेवकांनी त्याच्या नीतिमान स्तरांप्रमाणे चालणं खूप महत्त्वाचं आहे.

अध्याय १४, परिच्छेद १३, १४ वर परत जाण्यासाठी