व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चौकट १९क

यहोवाकडून मिळणाऱ्‍या आशीर्वादांच्या नद्या

यहोवाकडून मिळणाऱ्‍या आशीर्वादांच्या नद्या

यहोवाकडून मिळणाऱ्‍या आशीर्वादांचं चित्र डोळ्यांसमोर उभं करण्यासाठी बायबलच्या काही वचनांमध्ये “नदीचं” आणि “पाण्याचं” उदाहरण वापरलं आहे. या वचनांवरून कळतं, की यहोवा कशा प्रकारे आपल्याला आशीर्वाद देतो. तर चला त्या वचनांवर चर्चा करू या.

योएल ३:१८ या भविष्यवाणीत सांगितलं आहे, की मंदिरातून पाण्याचा एक झरा वाहत आहे. पुढे तो ‘बाभळीच्या झाडांच्या खोऱ्‍याला पाणी पुरवतो.’ यावरून दिसून येतं, की योएल आणि यहेज्केल या दोघांनाही दृष्टान्तांत अशी एक नदी दिसते जिच्यामुळे पडीक, नापीक जमीन पुन्हा जिवंत आणि सुपीक बनते. दोन्ही भविष्यवाण्यांमध्ये हेच सांगितलं आहे, की नदी यहोवाच्या मंदिरातून वाहते.

जखऱ्‍या १४:८ एका दृष्टान्तात जखऱ्‍या संदेष्ट्याने पाहिलं, की यरुशलेम नगरातून “जिवंत पाण्याचे झरे” वाहत आहेत. त्यांतले अर्धे झरे पूर्व समुद्राकडे, म्हणजे मृत समुद्राकडे वाहतात, तर अर्धे पश्‍चिम समुद्राकडे, म्हणजे भूमध्य समुद्राकडे वाहतात. यरुशलेम हे “महान राजाचं,” यहोवाचं “नगर” होतं. (मत्त. ५:३५) जखऱ्‍याने त्या नगराबद्दल जे सांगितलं त्यावरून कळतं, की येणाऱ्‍या काळात यहोवा संपूर्ण पृथ्वीवर राज्य करेल. भविष्यवाणीत पाण्याबद्दल जे सांगितलं आहे त्यावरून आपल्याला समजतं, की येणाऱ्‍या नवीन जगात यहोवा विश्‍वासू मानवांच्या दोन गटांना आशीर्वाद देईल; जे मोठ्या संकटातून वाचतील त्यांना आणि ज्यांचं नंतर पुनरुत्थान होईल त्यांना.

प्रकटीकरण २२:१, २ यहेज्केलला दृष्टान्तात दिसली होती तशीच नदी प्रेषित योहानलाही दृष्टान्तात दिसली. फरक फक्‍त इतकाच आहे, की यहेज्केलने पाहिलेली नदी मंदिरातून वाहते, तर योहानने पाहिलेली नदी यहोवाच्या राजासनातून वाहते. यावरून दिसून येतं, की जखऱ्‍याच्या दृष्टान्ताप्रमाणेच, योहानचा हा दृष्टान्तसुद्धा ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या शासनकाळात मिळणाऱ्‍या आशीर्वादांवर भर देतो.

यहोवाच्या राज्यात मिळणारे आशीर्वाद आणि यहेज्केलच्या दृष्टान्तात सांगितलेले आशीर्वाद यांत किंचित फरक असला, तरी सगळे आशीर्वाद देणारा यहोवाच आहे आणि हे सगळे आशीर्वाद त्याच्या विश्‍वासू लोकांनाच मिळतात.

स्तोत्र ४६:४ लक्ष द्या, या एका वचनात उपासना आणि शासन या दोन्ही गोष्टींचा कशा प्रकारे उल्लेख करण्यात आला आहे. त्यात म्हटलं आहे, की एका नदीमुळे “देवाचं शहर” आणि “सर्वोच्च देवाचा महान आणि पवित्र उपासना मंडप” हे दोन्ही आनंदी होतात. “देवाचं शहर” त्याच्या राज्याला आणि शासनाला सूचित करतं, तर “पवित्र उपासना मंडप” शुद्ध उपासनेला सूचित करतो.

एकंदरीत पाहिलं, तर या सगळ्या वचनांवरून आपल्याला याची खातरी मिळते, की यहोवा त्याच्या विश्‍वासू लोकांना दोन मार्गांनी आशीर्वाद देईल. एक म्हणजे देवाच्या राज्याद्वारे, आणि दुसरा म्हणजे शुद्ध उपासनेच्या व्यवस्थेद्वारे. या दोन्ही मार्गांमुळे आपल्याला कायम फायदा होत राहील. त्यामुळे, यहोवाकडून आणि त्याच्या मुलाकडून मिळणारं “जीवनाचं पाणी” घेत राहण्याचा आपण आताच निर्धार करू या; म्हणजे, सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी ते प्रेमळपणे जी काही व्यवस्था करत आहेत त्यांचा लाभ घेत राहू या!—यिर्म. २:१३; योहा. ४:१०.

अध्याय १९, परिच्छेद ४ वर परत जाण्यासाठी