व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय १

“तू फक्‍त तुझा देव यहोवा याचीच उपासना कर”

“तू फक्‍त तुझा देव यहोवा याचीच उपासना कर”

मत्तय ४:१०

अध्याय कशाबद्दल आहे: शुद्ध उपासना पुन्हा सुरू करण्याची गरज का आहे

१, २. येशू यहूदीयाच्या ओसाड रानात कसा पोहोचतो? आणि तिथे काय घडतं? (सुरुवातीचं चित्र पाहा.)

 इ.स. २९ चा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिना असावा. येशू मृत समुद्राच्या उत्तरेकडे असलेल्या यहूदीयाच्या ओसाड रानात आहे. येशूचा बाप्तिस्मा आणि अभिषेक झाल्यानंतर पवित्र शक्‍ती त्याला इथे घेऊन आली. हा दऱ्‍याखोऱ्‍यांचा, खडकाळ आणि ओसाड प्रदेश आहे. येशू तिथे ४० दिवस राहिला. त्या शांत वातावरणात त्याने उपवास केला, प्रार्थना केली आणि मनन केलं. कदाचित या काळात यहोवा आपल्या मुलाशी बोलला असेल आणि पुढे येणाऱ्‍या परीक्षांचा सामना करण्यासाठी त्याने त्याला तयार केलं असेल.

येशूने बरेच दिवस काहीच खाल्लं नव्हतं, त्यामुळे तो खूप कमजोर झाला होता. त्याच वेळी सैतान तिथे येतो. पुढे जे घडतं त्यावरून आपल्याला एका महत्त्वाच्या वादविषयाबद्दल कळतं. यात शुद्ध उपासना करणारे सगळे सामील आहेत, अगदी तुम्हीसुद्धा.

“तू जर देवाचा मुलगा असशील, तर . . . ”

३, ४. (क) सैतानाने येशूची पहिली आणि दुसरी परीक्षा घेतली तेव्हा त्याने काय बोलून सुरुवात केली? (ख) त्याला येशूच्या मनात कोणती शंका निर्माण करायची होती? (ग) आजसुद्धा सैतान अशा युक्त्यांचा वापर कसा करत आहे?

मत्तय ४:१-७ वाचा. सैतानाने येशूची पहिली आणि दुसरी परीक्षा घेतली तेव्हा त्याने कशी सुरुवात केली? तो अगदी चलाखीने येशूला म्हणाला: “तू जर देवाचा मुलगा असशील, तर . . . ” इथे येशू देवाचा मुलगा आहे याबद्दल सैतानाला काही शंका होती का? नाही. सैतान स्वतः एक स्वर्गदूत असल्यामुळे त्याला चांगलं माहीत होतं, की येशू देवाचा पहिला जन्मलेला मुलगा आहे. (कलस्सै. १:१५) शिवाय, येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी यहोवाने म्हटलं होतं: “हा माझा मुलगा मला प्रिय आहे. त्याने माझं मन आनंदित केलंय.” ही गोष्टसुद्धा सैतानाला माहीत होती. (मत्त. ३:१७) पण त्याला येशूच्या मनात शंका निर्माण करायची असेल की यहोवा खरंच भरवशालायक आहे का? त्याला त्याची काळजी आहे का? ‘दगडांना भाकरी व्हायला सांग’ असं म्हणून सैतानाने जेव्हा येशूची परीक्षा घेतली, तेव्हा खरंतर त्याला असं म्हणायचं होतं: ‘तू तर देवाचा मुलगा आहेस ना, मग तुझ्या पित्याने तुला या ओसाड रानात उपाशी का ठेवलंय?’ आणि दुसऱ्‍या परीक्षेच्या वेळी सैतानाने येशूला मंदिरावरून खाली उडी टाकायला सांगितली, तेव्हा खरंतर त्याला असं म्हणायचं होतं: ‘तू तर देवाचा मुलगा आहेस ना, मग तुला भरवसा नाही का की तुझा पिता तुला वाचवेल?’

आजसुद्धा सैतान असेच डावपेच किंवा युक्त्या वापरतो. (२ करिंथ. २:११) देवाचे लोक कधी कमजोर किंवा निराश होतात याची तो वाटच पाहत असतो आणि मग अगदी चलाखीने त्यांच्यावर हल्ला करतो. (२ करिंथ. ११:१४) तो आपल्याला विचार करायला लावतो की यहोवाचं आपल्यावर प्रेम नाही, आपण त्याच्यासाठी कितीही काही केलं तरी तो खूश होणार नाही. शिवाय तो भरवशालायक नाही आणि त्याने दिलेली वचनं तो कधीच पूर्ण करणार नाही. पण हे साफ खोटं आहे. (योहा. ८:४४) तर मग, असे चुकीचे विचार आपण कसे टाळू शकतो?

५. येशूने पहिल्या दोन परीक्षांचा सामना कसा केला?

येशूने पहिल्या दोन परीक्षांचा सामना कसा केला याचा विचार करा. आपल्या पित्याचं आपल्यावर किती प्रेम आहे याबद्दल त्याला जराही शंका नव्हती आणि आपल्या पित्यावर त्याचा पूर्ण भरवसा होता. म्हणून जेव्हा सैतानाने येशूची परीक्षा घेतली तेव्हा त्याने लगेच त्याचा विरोध केला आणि अशा वचनांचा उल्लेख केला ज्यांत यहोवाचं नाव आहे. (अनु. ६:१६; ८:३) अशा प्रकारे देवाच्या नावाचा वापर करून त्याने दाखवून दिलं, की त्याला आपल्या पित्यावर पूर्ण भरवसा आहे. कारण यहोवाच्या नावाचा अर्थच असा आहे, की तो जी काही वचनं देतो ती तो नक्की पूर्ण करतो. a

६, ७. सैतानाच्या जाळ्यात अडकण्यापासून आपण कसं वाचू शकतो?

येशूसारखंच आपण देवाच्या वचनावर विसंबून राहिलो आणि त्याच्या नावाचा काय अर्थ होतो यावर मनन केलं तर आपण सैतानाच्या जाळ्यात अडकणार नाही. बायबलमधून आपल्याला कळतं की यहोवा त्याच्या सेवकांवर, खासकरून जे निराश असतात त्यांच्यावर खूप प्रेम करतो. त्यामुळे यहोवाचं आपल्यावर प्रेम नाही आणि आपण काहीही केलं तरी तो खूश होत नाही, असं जे सैतान म्हणतो त्यावर आपण कधीच विश्‍वास ठेवणार नाही. (स्तो. ३४:१८; १ पेत्र ५:८) तसंच, यहोवा त्याच्या नावाच्या अर्थाप्रमाणे नेहमी काम करतो हे जर आपण लक्षात ठेवलं, तर आपण त्याच्यावर कधीच शंका घेणार नाही. उलट तो आपलं प्रत्येक वचन पूर्ण करेल असा आपण कायम भरवसा ठेवू.—नीति. ३:५, ६.

पण मुळात सैतानाचा हेतू काय आहे? त्याला आपल्याकडून नेमकं काय हवं आहे? याचं उत्तर, सैतानाने येशूची तिसरी परीक्षा घेतली त्यातून मिळतं.

‘तू एकदा माझ्या पाया पडून माझी उपासना कर’

८. सैतानाचा नेमका हेतू काय आहे हे तिसऱ्‍या परीक्षेच्या वेळी कसं समोर आलं?

मत्तय ४:८-११ वाचा. तिसऱ्‍या परीक्षेच्या वेळी सैतान फिरवून-फिरवून बोलायचं सोडून थेट मुद्यावर आला. त्याला नेमकं काय हवं होतं हे उघड झालं. सैतानाने येशूला (कदाचित एका दृष्टान्तात) “जगातली सर्व राज्यं आणि त्यांचं वैभव दाखवलं.” पण त्यांचा खोटेपणा, भ्रष्टाचार मात्र त्याने दाखवला नाही. मग तो येशूला म्हणाला, “तू एकदा माझ्या पाया पडून माझी उपासना केलीस, तर हे सगळं मी तुला देईन.” b येशूने आपली उपासना करावी अशी सैतानाची इच्छा होती. हाच खरंतर त्याचा हेतू होता. सैतानाला वाटत होतं, की येशूने त्याच्या पित्याला सोडून आपल्याला देव मानावं. सैतान येशूला आमिष दाखवून एक सोपा मार्ग सुचवत होता. दुसऱ्‍या शब्दांत तो येशूला सांगत होता की त्याला जगातली धनसंपत्ती, सत्ता, वैभव सगळं मिळेल आणि त्यासाठी त्याला कोणतंच दुःख सहन करावं लागणार नाही; म्हणजेच, त्याला काट्यांचा मुकुट घालावा लागणार नाही, चाबकांचा मार आणि वधस्तंभावर मरण सोसावं लागणार नाही. सैतानाने आणलेली ही परीक्षा खरी होती असं म्हणता येईल. कारण जगातली सगळी सरकारं सैतानाच्या मुठीत आहेत ही गोष्ट येशूने नाकारली नाही. (योहा. १२:३१; १ योहा. ५:१९) येशूने आपल्या पित्याला आणि शुद्ध उपासनेला सोडून द्यावं यासाठी सैतान त्याला काहीही द्यायला तयार होता.

९. (क) सैतानाला खऱ्‍या उपासकांकडून काय हवं आहे? (ख) तो आपल्याला कशा प्रकारे मोहात पाडायचा प्रयत्न करतो? (ग) आपल्या उपासनेत कोणकोणत्या गोष्टी सामील आहेत? (“उपासना म्हणजे काय?” ही चौकट पाहा.)

आजसुद्धा सैतानाची हीच इच्छा आहे की आपण त्याचीच उपासना करावी; मग ती कोणत्याही मार्गाने का असेना. सैतान हा ‘जगाच्या व्यवस्थेचा देव’ असल्यामुळे तो आज खोट्या धर्माचं पालन करणाऱ्‍यांकडून आपली उपासना करवून घेत आहे. पण तरीही या लाखो-करोडो लोकांच्या उपासनेवर त्याचं समाधान होत नाही. (२ करिंथ. ४:४) मुळात त्याला खऱ्‍या उपासकांना त्याच्याकडे वळवायचं आहे. त्यासाठी तो त्यांना मोहात पाडायचा प्रयत्न करतो. तो आपल्याला जगातली धनसंपत्ती, अधिकार, सत्ता यांचं आमिष दाखवतो. आपण ‘न्यायनीतीने वागून दुःख सोसण्याऐवजी’ या जगातला पैसा, धनसंपत्ती, अधिकार मिळवायच्या मागे लागावं अशी त्याची इच्छा आहे. (१ पेत्र ३:१४) आपण जर अशा प्रकारच्या मोहांना बळी पडलो आणि शुद्ध उपासना सोडून सैतानाच्या जगाचा भाग बनलो, तर एका अर्थाने आपण सैतानाच्या पाया पडून त्याची उपासना करत असू; त्यालाच आपला देव मानत असू. पण अशा मोहांपासून आपण कसं वाचू शकतो?

१०. तिसऱ्‍या परीक्षेच्या वेळी येशू सैतानाला काय बोलला? आणि तो असं का बोलला?

१० येशूने तिसऱ्‍या परीक्षेचा सामना कसा केला याकडे लक्ष द्या. येशू यहोवाला पूर्णपणे एकनिष्ठ होता, म्हणून त्याने लगेच सैतानाला उत्तर दिलं: “अरे सैताना, चालता हो!” पहिल्या दोन परीक्षांच्या वेळी येशूने जे केलं तेच त्याने आताही केलं. त्याने बायबलमधल्या अनुवाद पुस्तकातल्या अशा एका वचनाचा उल्लेख केला ज्यात देवाचं नाव आहे. त्याने म्हटलं: “असं लिहिलंय: ‘तू फक्‍त तुझा देव यहोवा याचीच उपासना कर आणि फक्‍त त्याचीच पवित्र सेवा कर.’” (मत्त. ४:१०; अनु. ६:१३) या जगात दुःख सहन न करता मोठं नाव कमवायचं आणि सुखी जीवन जगायचं आमिष त्याने नाकारलं. कारण त्याला माहीत होतं की या गोष्टी फक्‍त काही काळासाठीच आहेत. येशूला माहीत होतं, की आपण फक्‍त आपल्या पित्याचीच उपासना केली पाहिजे. तसंच, त्याला हेसुद्धा माहीत होतं की त्याने जर सैतानाच्या पाया पडून ‘एकदा जरी त्याची उपासना केली,’ तरी त्याचा अर्थ आपण सैतानाला आपला देव मानत आहोत असा होईल. आणि म्हणून येशूने ठामपणे त्या दुष्टाचा विरोध केला. येशूसमोर आपलं काही चालत नाही हे पाहिल्यानंतर “सैतान त्याला सोडून निघून गेला.” c

“अरे सैताना, चालता हो!” (परिच्छेद १० पाहा)

११. आपण सैतानाचा आणि त्याच्या प्रलोभनांचा विरोध कसा करू शकतो?

११ आपण सैतानाचा आणि या दुष्ट जगातल्या प्रलोभनांचा नक्कीच विरोध करू शकतो. कारण यहोवाने आपल्याला इच्छा स्वातंत्र्याची एक खूप मौल्यवान भेट दिली आहे. त्यामुळे काय करायचं याची निवड आपण स्वतः करू शकतो. कोणतीही व्यक्‍ती, अगदी तो दुष्ट आणि ताकदवान सैतानसुद्धा आपल्याला शुद्ध उपासना सोडायला भाग पाडू शकत नाही. आपण जेव्हा “विश्‍वासात दृढ राहून” सैतानाचा विरोध करतो तेव्हा एका अर्थी आपण त्याला म्हणत असतो: “अरे सैताना, चालता हो!” (१ पेत्र ५:९) लक्षात घ्या, की येशूने सैतानाला ठामपणे नाकारलं तेव्हा सैतान तिथून निघून गेला. बायबलही आपल्याला हेच सांगतं, “सैतानाचा विरोध करा म्हणजे तो तुमच्यापासून दूर पळेल.”—याको. ४:७.

सैतानाचं जग आपल्याला बहकवण्याचा प्रयत्न करतं, पण आपण त्याचा विरोध करू शकतो (परिच्छेद ११, १९)

शुद्ध उपासनेचा शत्रू

१२. सैतान शुद्ध उपासनेचा शत्रू आहे हे त्याने पहिल्यांदा कसं दाखवून दिलं?

१२ तिसऱ्‍या परीक्षेनंतर हे सिद्ध झालं, की सैतानानेच शुद्ध उपासनेचा विरोध करायला सुरुवात केली होती. यहोवाला मिळणाऱ्‍या उपासनेची सैतानाला किती चीड आहे हे त्याने हजारो वर्षांआधी एदेन बागेत पहिल्यांदा दाखवून दिलं. सगळ्यात आधी त्याने हव्वाला मोहात पाडलं आणि तिला यहोवाची आज्ञा मोडायला लावली. नंतर हव्वाने आदामला यहोवाची आज्ञा मोडायला लावली. अशा प्रकारे, सैतानाने त्या दोघांनाही त्याच्या अधिकाराखाली आणलं. (उत्पत्ती ३:१-५ वाचा, २ करिंथ. ११:३, प्रकटी. १२:९) आपल्याला फसवणारा नेमका कोण आहे हे जरी आदाम-हव्वाला माहीत नसलं, तरी सैतान आता त्यांचा देव बनला होता आणि ते त्याचे उपासक बनले होते. एदेन बागेत सैतानाने विद्रोहाची सुरुवात करून यहोवाच्या सर्वोच्च अधिकारावर प्रश्‍न तर उभा केलाच, पण त्यासोबतच शुद्ध उपासनेवर हल्ला करायलाही सुरुवात केली. पण त्याने हे कसं केलं?

१३. शुद्ध उपासना आणि सर्वोच्च अधिकाराचा वादविषय यांचा एकमेकांशी काय संबंध आहे?

१३ सर्वोच्च अधिकाराचा वादविषय आणि शुद्ध उपासना या दोन गोष्टींचा एकमेकांशी खूप जवळचा संबंध आहे. यहोवानेच “सर्व गोष्टी निर्माण केल्या” आहेत, त्यामुळे तोच विश्‍वाचा सर्वोच्च अधिकारी आहे. आणि म्हणून आपण फक्‍त त्याचीच उपासना केली पाहिजे. (प्रकटी. ४:११) आपल्याला माहीत आहे की यहोवाने पहिल्या मानवी जोडप्याला बनवलं आणि त्यांना राहण्यासाठी एदेन नावाची सुंदर बाग दिली. त्याचा असा उद्देश होता, की संपूर्ण पृथ्वी त्यांच्यासारख्या परिपूर्ण मानवांनी भरून जावी आणि सगळ्यांनी अगदी शुद्ध मनाने त्याचीच उपासना करावी. (उत्प. १:२८) पण सैतानाने यहोवाच्या सर्वोच्च अधिकारावर प्रश्‍न उभा केला, कारण उपासना मिळण्याचा जो हक्क फक्‍त यहोवाला आहे तो त्याला हवा होता.—याको. १:१४, १५.

१४. शुद्ध उपासना नाहीशी करण्यात सैतान यशस्वी झाला का? समजावून सांगा.

१४ मग शुद्ध उपासना नाहीशी करण्यात सैतान यशस्वी झाला का? नाही. हे खरं आहे की सैतानाने आदाम-हव्वाला देवापासून दूर नेलं. तेव्हापासून सैतान शुद्ध उपासनेचा विरोध करत आहे आणि जास्तीत जास्त लोकांना यहोवापासून दूर न्यायचा प्रयत्न करत आहे. येशूच्या जन्माआधीच्या काळातही त्याने खऱ्‍या उपासकांना बहकवण्याचा प्रयत्न केला. तसंच, पहिल्या शतकात त्याने ख्रिस्ती मंडळीत धर्मत्यागाचं बीज पेरलं आणि ख्रिस्ती मंडळी दूषित होऊ लागली. त्यामुळे असं वाटत होतं, की शुद्ध उपासना पूर्णपणे नाहीशी झाली आहे. (मत्त. १३:२४-३०, ३६-४३; प्रे. कार्यं २०:२९, ३०) मग दुसऱ्‍या शतकापासून खरे ख्रिस्ती बऱ्‍याच काळापर्यंत आध्यात्मिक रितीने मोठ्या बाबेलच्या (खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याच्या) बंदिवासात होते. पण शुद्ध उपासना नाहीशी करण्यात सैतान यशस्वी ठरला नाही. सुरुवातीपासूनच यहोवाचा हा उद्देश होता, की संपूर्ण पृथ्वीवर फक्‍त त्याचीच उपासना केली जावी आणि तो पूर्ण होण्यापासून कोणतीच गोष्ट त्याला रोखू शकत नाही. (यश. ४६:१०; ५५:८-११) कारण या संपूर्ण वादविषयात देवाचं नाव गोवलेलं आहे आणि त्या नावाच्या अर्थाप्रमाणेच तो नेहमी काम करतो. त्यामुळे काहीही झालं तरी यहोवा आपला उद्देश पूर्ण करतोच!

शुद्ध उपासनेचा प्रमुख समर्थक

१५. (क) आपल्या विरोधात जाणाऱ्‍यांसोबत यहोवाने काय केलं? (ख) आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी यहोवाने काय केलं?

१५ आपल्या विरोधात जाणाऱ्‍यांवर यहोवाने लगेच कार्यवाही केली. (उत्पत्ती ३:१४-१९ वाचा.) आदाम-हव्वा एदेन बागेत असतानाच त्याने तिन्ही विरोधकांना शिक्षा सुनावली. ज्याने पहिलं पाप केलं त्याला त्याने आधी शिक्षा सुनावली; म्हणजे सगळ्यात आधी सैतानाला, मग हव्वाला आणि शेवटी आदामला. तसंच यहोवाने आपला उद्देश पूर्ण करण्यासाठीही लगेच पाऊल उचललं. सैतानाला शिक्षा सुनावताना त्याने असं म्हटलं, की पुढे एक अशी “संतती” येईल जी विद्रोहामुळे झालेले सगळे वाईट परिणाम काढून टाकेल. ही संतती शुद्ध उपासनेबद्दलचा यहोवाचा उद्देश पूर्ण करण्यात एक महत्त्वाची भूमिका बजावणार होती.

१६. यहोवा आपला उद्देश पुढे कसा पूर्ण करत गेला?

१६ एदेन बागेत झालेल्या विद्रोहानंतर आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी यहोवाने पुढेही अनेक पावलं उचलली. अपरिपूर्ण मानवांना योग्य पद्धतीने आपली उपासना करता यावी म्हणून त्याने बऱ्‍याच व्यवस्था केल्या. त्यांबद्दल पुढच्या अध्यायात आपण शिकणारच आहोत. (इब्री ११:४-१२:१) तसंच, शुद्ध उपासना पुन्हा कशी सुरू होईल याबद्दलच्या रोमांचक भविष्यवाण्या लिहिण्यासाठीही त्याने यशया, यिर्मया आणि यहेज्केलसारख्या लेखकांना प्रेरित केलं. शुद्ध उपासना पुन्हा सुरू होणं हा बायबलमधला एक महत्त्वाचा विषय आहे. याबद्दलच्या सगळ्या भविष्यवाण्या वचन दिलेल्या “संततीद्वारे” पूर्ण होणार होत्या आणि येशू त्या संततीचा मुख्य भाग असणार होता. (गलती. ३:१६) येशूने तिसऱ्‍या परीक्षेच्या वेळी सैतानाला जे उत्तर दिलं त्यावरून कळतं, की तो शुद्ध उपासनेचा प्रमुख समर्थक आहे. म्हणून त्याबद्दलच्या भविष्यवाण्या पूर्ण करण्यासाठी यहोवाने येशूलाच निवडलं आहे. (प्रकटी. १९:१०) येशू देवाच्या लोकांना खोट्या धर्माच्या बंदिवासातून सोडवणार होता आणि शुद्ध उपासना पुन्हा सुरू करण्यात एक महत्त्वाची भूमिका बजावणार होता.

तुम्ही काय कराल?

१७. शुद्ध उपासनेच्या भविष्यवाण्यांबद्दल आपल्याला इतकी उत्सुकता का आहे?

१७ शुद्ध उपासना पुन्हा सुरू होण्याबद्दल बायबलमध्ये दिलेल्या भविष्यवाण्यांचा आपण अभ्यास केला तर आपल्याला रोमांचक माहिती मिळेल आणि आपला विश्‍वास आणखी मजबूत होईल. या भविष्यवाण्यांबद्दल आपल्याला खूप उत्सुकता आहे. कारण आपण त्या काळाची आतुरतेने वाट पाहत आहोत जेव्हा स्वर्गात आणि पृथ्वीवर सगळे एकत्र मिळून सर्वोच्च प्रभू यहोवाची उपासना करतील. या भविष्यवाण्यांमधून आपल्याला आशासुद्धा मिळते, कारण त्यांत अशी अभिवचनं दिली आहेत ज्यांची आपण कल्पनाही केली नसेल; जसं की, आपण ज्यांना मृत्यूमुळे गमावलं आहे ते आपल्याला परत भेटतील, संपूर्ण पृथ्वी एका सुंदर बागेसारखी होईल, सगळ्यांना चांगलं आरोग्य आणि सर्वकाळाचं जीवन मिळेल. देवाची ही सगळी वचनं पूर्ण होण्याची आपण सगळेच खूप आतुरतेने वाट पाहत आहोत, नाही का?—यश. ३३:२४; ३५:५, ६; प्रकटी. २०:१२, १३; २१:३, ४.

१८. या प्रकाशनात आपण काय पाहणार आहोत?

१८ या प्रकाशनात आपण बायबलमधल्या यहेज्केलच्या पुस्तकात दिलेल्या रोमांचक भविष्यवाण्या पाहणार आहोत. यांपैकी बऱ्‍याचशा भविष्यवाण्या शुद्ध उपासना पुन्हा कशी सुरू होईल याबद्दलच्या आहेत. तसंच यहेज्केलच्या भविष्यवाण्यांचा इतर भविष्यवाण्यांशी काय संबंध आहे, येशू त्या कशा पूर्ण करेल आणि आपली त्यांत काय भूमिका आहे हेसुद्धा आपण पाहणार आहोत.​—“यहेज्केल पुस्तकाची झलक,” ही चौकट पाहा.

१९. तुम्ही काय करायचा निर्धार केला आहे, आणि का?

१९ येशूने शुद्ध उपासना सोडून द्यावी म्हणून सैतानाने अनेक शतकांपूर्वी खूप प्रयत्न केले. पण त्यात तो यशस्वी झाला नाही. आज आपल्या बाबतीतही सैतान तेच करायचा प्रयत्न करत आहे. (प्रकटी. १२:१२, १७) त्यामुळे त्याचा विरोध करायचा आपण पक्का निर्धार करू या. आणि त्यासाठी हे प्रकाशन आपल्याला नक्कीच मदत करेल. तसंच, आपल्या वागण्या-बोलण्यातून आपण दाखवून देऊ या, की आपण फक्‍त आपला “देव यहोवा याचीच उपासना” करतो. मग स्वर्गात आणि पृथ्वीवर सगळे मिळून यहोवाची उपासना करतील, हा त्याचा महान उद्देश पूर्ण झालेला आपल्याला पाहता येईल. कारण शुद्ध उपासना मिळण्याचा हक्क यहोवालाच आहे!

a काहींचं असं म्हणणं आहे, की ‘यहोवा’ या नावाचा अर्थ, “तो व्हायला लावतो” असा होतो. हा अर्थ योग्यच आहे. कारण यहोवा सगळ्या गोष्टींचा निर्माणकर्ता आणि आपले सगळे उद्देश पूर्ण करणारा आहे.

b सैतानाच्या या शब्दांबद्दल एका पुस्तकात म्हटलं आहे: ‘आदाम-हव्वा ज्या परीक्षेत अपयशी ठरले, त्यात त्यांना निवड करायची होती की ते सैतानाची इच्छा पूर्ण करतील की देवाची. पण मुळात प्रश्‍न हा होता, की ते कोणाची “उपासना” करतील? सैतानाची की देवाची? येशूच्या बाबतीतही खरा मुद्दा उपासनेबद्दलच होता. खरंच, सैतान अतिशय घमेंडी आहे आणि त्याला खऱ्‍या देवाची जागा हवी आहे.’

c लूकच्या शुभवर्तमानात परीक्षांचा क्रम वेगळा दिला आहे. पण मत्तयच्या अहवालात परीक्षा ज्या क्रमाने घेतल्या गेल्या त्याच क्रमाने लिहिल्या असाव्यात. असं का म्हणता येईल याची तीन कारणं पाहू या. (१) दुसऱ्‍या परीक्षेबद्दल लिहिताना मत्तयने सुरुवातीला “मग” हा शब्द वापरला. यावरून कळतं, की याआधीही एक परीक्षा होऊन गेली होती. (२) ज्या दोन परीक्षा घेताना सैतानाने, “तू जर देवाचा मुलगा असशील, तर” असं म्हटलं त्या त्याने आधी घेतल्या असतील. कारण, या शब्दांवरून कळतं, की दोन्ही परीक्षांच्या वेळी सैतानाने येशूला चलाखीने फसवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांत अपयशी ठरल्यावर त्याने थेट येशूला दहा आज्ञांमधली पहिली आज्ञा मोडायला लावायचा प्रयत्न केला. (निर्ग. २०:२, ३) (३) “अरे सैताना, चालता हो!” असं जे येशूने म्हटलं ते तिसऱ्‍या आणि शेवटच्या परीक्षेनंतरच म्हटलं असेल असं म्हणणं तर्काला पटण्यासारखं आहे.—मत्त. ४:५, १०, ११.