व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नवीन समज—सारांश

नवीन समज—सारांश

गेल्या काही वर्षांमध्ये यहेज्केलच्या भविष्यवाण्यांबद्दल आपल्याला टेहळणी बुरूज  मासिकातून सुधारित समज मिळाली. आता, शेवटी संपूर्ण जगात यहोवाची शुद्ध उपासना!  या पुस्तकात यहेज्केलच्या इतर काही भविष्यवाण्यांबद्दल नवीन समज दिली आहे. पुढे दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं तुम्हाला आठवतात का ते पाहा.

जिवंत प्राण्यांची चार तोंडं कशाला सूचित करतात?

जुनी समज: जिवंत प्राण्यांची किंवा करुबांची चार तोंडं यहोवाच्या चार उल्लेखनीय गुणांना सूचित करतात.

नवीन समज: हे खरं आहे की जिवंत प्राण्यांच्या चार तोंडांपैकी प्रत्येक तोंड, यहोवाच्या चार उल्लेखनीय गुणांपैकी एका गुणाला सूचित करतं. पण ती चार तोंडं एकत्रितपणे यहोवाच्या सर्व गुणांना सूचित करतात. तसंच, चार तोंडांवरून आपल्याला कळतं की यहोवाची शक्‍ती आणि वैभव अतुलनीय आहे.

समज बदलण्याचं कारण: बायबलमध्ये सहसा चार ही संख्या एखाद्या गोष्टीच्या पूर्णतेला सूचित करते. त्यामुळे ही चार तोंडं एकत्रितपणे यहोवाच्या फक्‍त चार गुणांना नाही, तर त्याच्या सगळ्या गुणांना सूचित करतात. तसंच, जिवंत प्राण्यांचं प्रत्येक तोंड म्हणजे सिंह, बैल, गरुड आणि मानव हे वैभव, ताकद आणि शक्‍ती या गुणांना दर्शवतात. हे करूब खूप शक्‍तिशाली असले तरी ते यहोवाच्या राजासनाच्या खाली आहेत. यावरून दिसून येतं की यहोवा सर्वोच्च अधिकारी आहे.

सचिवाची दौत असलेला माणूस कोणाला सूचित करतो?

जुनी समज: सचिवाची दौत असलेला माणूस पृथ्वीवर उरलेल्या अभिषिक्‍त जनांना सूचित करतो. प्रचाराचं आणि शिष्य बनवण्याचं काम करून अभिषिक्‍त जन ‘मोठ्या लोकसमुदायातल्या’ लोकांच्या कपाळावर लाक्षणिक अर्थाने खूण करत आहेत.—प्रकटी. ७:९.

नवीन समज: सचिवाची दौत असलेला माणूस येशू ख्रिस्ताला सूचित करतो. ‘मोठ्या संकटाच्या’ वेळी तो लोकांचा न्याय करेल आणि कोण मेंढरांसारखे आहेत हे ठरवेल. हे जणू काय त्यांच्या कपाळावर खूण करण्यासारखं असेल.—मत्त. २४:२१.

समज बदलण्याचं कारण: यहोवाने न्याय करण्याची जबाबदारी आपल्या मुलावर सोपवली आहे. (योहा. ५:२२, २३) मत्तय २५:३१-३३ या वचनांमध्ये सांगितल्याप्रमाणे, ‘मेंढरांसारखे’ लोक कोण आहेत आणि ‘बकऱ्‍यांसारखे’ लोक कोण आहेत याबद्दलचा शेवटचा निर्णय येशू घेईल.

अहला आणि अहलीबा नावाच्या वेश्‍या ख्रिस्ती धर्मजगताला सूचित करतात का? या बहिणींपैकी एक कॅथलिक चर्चला आणि दुसरी प्रोटेस्टंट चर्चला सूचित करते का?

जुनी समज: मोठी बहीण अहला (इस्राएलची राजधानी, शोमरोन) कॅथलिक चर्चला सूचित करते; तर लहान बहीण अहलीबा (यरुशलेमची राजधानी, यहूदा) प्रोटेस्टंट चर्चला सूचित करते.

नवीन समज: वेश्‍या असलेल्या या दोन बहिणी ख्रिस्ती धर्मजगताच्या कोणत्याही भागाला सूचित करत नाहीत. यहोवाला विश्‍वासू असलेले लोक जेव्हा खोटी उपासना करून त्याचा विश्‍वासघात करतात, तेव्हा त्याला कसं वाटतं हे समजवण्यासाठी या वेश्‍यांचं उदाहरण वापरण्यात आलं आहे. सर्व प्रकारच्या खोट्या उपासनेबद्दल यहोवाला अशीच घृणा वाटते.

समज बदलण्याचं कारण: अहला आणि अहलीबा ख्रिस्ती धर्मजगताला सूचित करतात असं बायबलमध्ये कुठेही सांगितलेलं नाही. एकेकाळी इस्राएल आणि यहूदा ही राज्यं यहोवाचीच उपासना करायचे. त्याच्यासाठी ते जणू काही विश्‍वासू पत्नींसारखे होते. पण ख्रिस्ती धर्मजगताने यहोवाची कधीच उपासना केली नाही आणि त्याच्यासाठी ते कधीच एका विश्‍वासू पत्नीसारखं नव्हतं. शिवाय, यहेज्केल पुस्तकाच्या १६ व्या आणि २३ व्या अध्यायांत इस्राएल आणि यहूदाच्या लोकांना एक आशा देण्यात आली आहे. त्यात सांगितलं आहे की ते पश्‍चात्ताप करून पुन्हा यहोवाची उपासना करू लागतील. पण मोठ्या बाबेलचा भाग असलेल्या ख्रिस्ती धर्मजगताला कोणतीही आशा नाही.

प्राचीन काळातलं धर्मत्यागी यरुशलेम आजच्या काळातल्या ख्रिस्ती धर्मजगताला सूचित करतं का?

जुनी समज: अविश्‍वासू यरुशलेम ख्रिस्ती धर्मजगताला सूचित करतं. त्यामुळे जसा यरुशलेमचा नाश झाला, तसाच ख्रिस्ती धर्मजगताचाही नाश होईल.

नवीन समज: प्राचीन यरुशलेममध्ये मूर्तिपूजा आणि भ्रष्टाचार जसा सर्रासपणे चालायचा, तसाच आजच्या ख्रिस्ती धर्मजगतातही पाहायला मिळतो. पण प्राचीन काळातलं धर्मत्यागी यरुशलेम आजच्या काळातल्या ख्रिस्ती धर्मजगताला सूचित करतं असं आता आपण मानत नाही.

समज बदलण्याचं कारण: प्राचीन यरुशलेम शहर ख्रिस्ती धर्मजगताला सूचित करतं याचा कोणताही भक्कम पुरावा आपल्याला बायबलमध्ये मिळत नाही. प्राचीन यरुशलेम शहर एकेकाळी यहोवाची उपासना करायचं. पण ख्रिस्ती धर्मजगताने कधीच शुद्ध उपासना केली नाही. यहोवाने यरुशलेम शहराला एकेकाळी माफ केलं होतं, पण ख्रिस्ती धर्मजगताला तो कधीच माफ करणार नाही.

वाळून गेलेल्या हाडांबद्दलची भविष्यवाणी कशी पूर्ण झाली?

जुनी समज: १९१८ मध्ये अभिषिक्‍त जनांचा छळ सुरू झाला आणि ते मोठ्या बाबेलच्या बंदिवासात गेले. त्यांचं काम जवळजवळ बंदच पडलं होतं आणि त्यामुळे त्यांची अवस्था एखाद्या मेलेल्या माणसासारखी झाली होती. पण ते जास्त काळ बंदिवासात राहिले नाहीत, कारण १९१९ मध्ये ते पुन्हा राज्याचा संदेश सांगू लागले; जणू काय यहोवाने त्यांना पुन्हा जिवंत केलं.

नवीन समज: अभिषिक्‍त जन १९१८ मध्ये नाही, तर त्याच्या बऱ्‍याच काळाआधी लाक्षणिक अर्थाने बंदिवासात गेले. आणि हा बंदिवास पुढे बऱ्‍याच काळापर्यंत राहिला. त्यांचा बंदिवास दुसऱ्‍या शतकापासून सुरू झाला आणि १९१९ मध्ये संपला. येशूने गहू आणि जंगली गवताचं जे उदाहरण दिलं होतं त्यात असंच काहीतरी सांगितलं आहे. त्यात म्हटलं आहे, की गहू आणि जंगली गवत हे दोन्ही एका मोठ्या काळापर्यंत सोबत वाढत राहतील.

समज बदलण्याचं कारण: प्राचीन इस्राएल राष्ट्र बऱ्‍याच काळापर्यंत बंदिवासात होतं. त्यांचा बंदिवास इ.स.पू. ७४० मध्ये सुरू झाला आणि इ.स.पू. ५३७ मध्ये संपला. यहेज्केलच्या भविष्यवाणीत म्हटलं आहे, की हाडं “खडखडीत वाळून गेली आहेत.” यावरून कळतं की इस्राएली लोकांची अवस्था बऱ्‍याच काळापर्यंत मेलेल्या लोकांसारखी होती. पुढे ती हाडं हळूहळू जिवंत होणार होती आणि त्यासाठी बराच काळ लागणार होता.

दोन काठ्या एकत्र जोडण्याचा काय अर्थ होतो?

जुनी समज: पहिल्या महायुद्धादरम्यान विश्‍वासू अभिषिक्‍त जनांमध्ये काही काळासाठी फूट पडली होती. पण १९१९ मध्ये ते पुन्हा एक झाले.

नवीन समज: यहोवा आपल्या सेवकांमध्ये एकी कशी आणेल यावर या भविष्यवाणीमध्ये भर दिला आहे. १९१९ नंतर पृथ्वीवरच्या जीवनाची आशा असलेले बरेच लोक अभिषिक्‍त जनांसोबत मिळून यहोवाची उपासना करू लागले. तेव्हापासून हे दोन्ही गट एकीने यहोवाची सेवा करत आहेत.

समज बदलण्याचं कारण: भविष्यवाणीत असं म्हटलेलं नाही, की एका काठीचे दोन तुकडे करण्यात आले आणि मग ते जोडण्यात आले; तर, दोन काठ्या जोडून त्या एक कशा केल्या जातात हे सांगितलं आहे. म्हणजेच, भविष्यवाणीत असं सांगितलेलं नाही की एका गटाचे दोन गट होतील आणि मग ते पुन्हा एक होतील, तर दोन गट कसे एक होतील हे त्यात सांगितलं आहे.

मागोगचा गोग कोण आहे?

जुनी समज: सैतानाला स्वर्गातून काढून टाकल्यानंतर त्याला मागोगचा गोग हे नाव देण्यात आलं. त्यामुळे गोग हा सैतानच आहे असं आपण समजत होतो.

नवीन समज: मागोगचा गोग राष्ट्रांच्या समूहाला सूचित करतो आणि ही राष्ट्रं मोठ्या संकटाच्या वेळी शुद्ध उपासना करणाऱ्‍यांवर हल्ला करतील.

समज बदलण्याचं कारण: गोगबद्दल असं सांगण्यात आलं होतं की शिकारी पक्षी त्याचं प्रेत फाडून खातील आणि त्याला पृथ्वीवर एक कबरस्तान दिलं जाईल. यावरून कळतं की गोग एक अदृष्य प्राणी नाही. शिवाय, पृथ्वीवरची राष्ट्रं देवाच्या लोकांवर कशा प्रकारे हल्ला करतील याबद्दल दानीएल आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकात जे सांगितलं आहे, तेच गोगच्या हल्ल्याबद्दलही सांगितलं आहे.—दानी. ११:४०, ४४, ४५; प्रकटी. १७:१४; १९:१९.

यहेज्केलने दृष्टान्तात पाहिलेलं मंदिर हे तेच महान लाक्षणिक मंदिर आहे का ज्याचा पुढे पौलने उल्लेख केला?

जुनी समज: यहेज्केलने दृष्टान्तात पाहिलेलं मंदिर हे तेच महान लाक्षणिक मंदिर आहे ज्याचा पुढे पौलने उल्लेख केला.

नवीन समज: यहेज्केलने दृष्टान्तात पाहिलेलं मंदिर हे इ.स. २९ मध्ये अस्तित्वात आलेलं महान लाक्षणिक मंदिर नव्हतं. तर यहुदी लोक मायदेशात परतल्यावर मोशेच्या नियमशास्त्रानुसार शुद्ध उपासना पुन्हा कशी सुरू होईल एवढंच त्याने दृष्टान्तात पाहिलं होतं. लाक्षणिक मंदिराच्या अहवालात, सगळ्यात मोठ्या महायाजकाने, ख्रिस्ताने इ.स. २९ ते ३३ पर्यंत केलेल्या कार्यावर पौल आपलं लक्ष केंद्रित करतो. पण, यहेज्केलने पाहिलेल्या मंदिराच्या दृष्टान्तात कुठेही महायाजकाचा उल्लेख केलेला नाही. याऐवजी शुद्ध उपासना पुन्हा कशी सुरू झाली यावर यहेज्केलचा दृष्टान्त आपलं लक्ष केंद्रित करतो; आणि दृष्टान्तातली ही भविष्यवाणी १९१९ पासून पूर्ण होऊ लागली. त्यामुळे दृष्टान्तातल्या मंदिरातली प्रत्येक बारीकसारीक माहिती आणि मोजमाप कोणत्या गोष्टीला सूचित करतं हे शोधण्याचा आपण प्रयत्न करत नाही; तर शुद्ध उपासनेसाठी यहोवाने जे स्तर ठरवले आहेत ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतो.

समज बदलण्याचं कारण: यहेज्केलने दृष्टान्तात पाहिलेलं मंदिर आणि महान लाक्षणिक मंदिर यांत मोठा फरक आहे. उदाहरणार्थ, यहेज्केलने पाहिलेल्या मंदिरात प्राण्यांची बरीच बलिदानं देण्यात आली. पण लाक्षणिक मंदिरामध्ये ‘सर्वकाळासाठी एकदाच’ बलिदान दिलं गेलं. (इब्री ९:११, १२) यहेज्केलच्या दिवसापर्यंत महान लाक्षणिक मंदिराबद्दलची सत्यं सांगायची देवाची वेळ अजून आली नव्हती, कारण ख्रिस्त अनेक शतकांनंतर येणार होता.