व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय ७

राष्ट्रांना “कळून येईल की मी यहोवा आहे”

राष्ट्रांना “कळून येईल की मी यहोवा आहे”

यहेज्केल २५:१७

अध्याय कशाबद्दल आहे: यहोवाची बदनामी करणाऱ्‍या राष्ट्रांसोबत इस्राएल राष्ट्राने जे संबंध ठेवले त्यातून आपण कोणते धडे घेऊ शकतो

१, २. (क) इस्राएल राष्ट्र क्रूर लांडग्यांच्या मधे एकट्या मेंढरासारखं होतं असं का म्हणता येईल? (सुरुवातीचं चित्र पाहा.) (ख) इस्राएलच्या लोकांनी आणि त्याच्या राजांनी काय केलं?

 शेकडो वर्षं इस्राएल राष्ट्र जसं काय भयंकर आणि क्रूर लांडग्यांच्या मधे एकट्या मेंढरासारखं होतं. त्याला चारही बाजूंनी शत्रूंनी घेरलं होतं. पूर्वेकडच्या सीमेवर अम्मोनी, मवाबी आणि अदोमी लोकांपासून त्याला धोका होता. पश्‍चिमेकडे पलिष्टी लोकांनी आपला जम बसवला होता आणि ते अनेक शतकांपासून इस्राएलचे शत्रू होते. उत्तरेला सोर नावाचं एक श्रीमंत आणि शक्‍तिशाली शहर होतं. ते दूरदूरच्या देशांसाठी व्यापाराचं केंद्र होतं. दक्षिणेकडे फारोचं राज्य असलेलं इजिप्तचं राष्ट्र होतं. आणि तिथले लोक फारोला देव मानायचे.

इस्राएली लोकांनी यहोवावर भरवसा ठेवला, तेव्हा त्याने शत्रूंपासून नेहमी त्यांचं संरक्षण केलं. पण इस्राएलच्या लोकांनी आणि त्याच्या राजांनी वारंवार आजूबाजूच्या राष्ट्रांसोबत संबंध ठेवले आणि ते भ्रष्ट झाले. अहाब असाच एक राजा होता. शत्रू राष्ट्रांच्या प्रभावाखाली येऊन तो यहोवाला विश्‍वासू राहिला नाही. त्या वेळी यहूदामध्ये यहोशाफाट राज्य करत होता आणि अहाब इस्राएलच्या दहा वंशानी बनलेल्या राष्ट्रावर राज्य करत होता. अहाबने इतरांच्या दबावाखाली येऊन खोट्या उपासनेला बढावा दिला. त्याने सीदोनच्या राजाची मुलगी, ईजबेल हिच्यासोबत लग्न केलं. सोर हे श्रीमंत शहर त्या राजाच्या ताब्यात होतं. ईजबेलने इस्राएलच्या कानाकोपऱ्‍यांत बआलची उपासना पसरवली. आणि तिच्या पतीलाही मोठ्या प्रमाणात खोटी उपासना करायचा बढावा दिला. याआधी खरी उपासना इतकी भ्रष्ट कधीच झाली नव्हती.—१ राजे १६:३०-३३; १८:४, १९.

३, ४. (क) यहेज्केलने नंतर कोणाबद्दल भविष्यवाणी केली? (ख) आता आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

यहोवाने त्याच्या लोकांना आधीच सांगितलं होतं, की विश्‍वासघात केल्याचे काय परिणाम होतील. पण आता ते इतके वाईट झाले होते की यहोवाचा धीर संपला होता. (यिर्म. २१:७, १०; यहे. ५:७-९) इ.स.पू. ६०९ मध्ये बाबेलचं सैन्य वचन दिलेल्या देशात तिसऱ्‍यांदा परत आलं. याच्या दहा वर्षांपूर्वीच त्यांनी या देशावर हल्ला केला होता. पण या वेळी त्यांनी यरुशलेम शहराच्या भिंती पाडल्या आणि ज्यांनी नबुखद्‌नेस्सरविरुद्ध बंड केलं होतं त्यांना मारून टाकलं. शहराला वेढा पडताच यहेज्केलच्या भविष्यवाण्यांमधली प्रत्येक गोष्ट पूर्ण व्हायला लागली. त्यानंतर आजूबाजूच्या राष्ट्रांचं काय होईल याबद्दल यहेज्केलने भविष्यवाणी केली.

ज्या राष्ट्रांनी यहोवाच्या नावाची बदनामी केली त्यांना त्याचे वाईट परिणाम भोगावेच लागले

यहोवाने यहेज्केलला सांगितलं, की यरुशलेमच्या नाशामुळे शेजारच्या राष्ट्रांना आनंद होईल आणि त्यातून वाचलेल्या लोकांचा ते छळ करतील. या राष्ट्रांनी यहोवाच्या नावाची बदनामी केली होती, त्याच्या लोकांचा छळ केला होता आणि त्यांना वाईट कामांमध्ये अडकवलं होतं. पण आता या राष्ट्रांना याचे परिणाम भोगावे लागणार होते. इस्राएलने त्या राष्ट्रांसोबत जे संबंध ठेवले आणि जी मैत्री वाढवली त्यातून आपण कोणते धडे घेऊ शकतो? यहेज्केलने त्या राष्ट्रांबद्दल केलेल्या भविष्यवाण्यांवरून आज आपल्याला कोणती आशा मिळते?

नातेवाईक इस्राएलची “थट्टा” करतात

५, ६. अम्मोनी लोकांचं इस्राएली लोकांसोबत काय नातं होतं?

अम्मोनी, मवाबी आणि अदोमी लोकांचं इस्राएलच्या लोकांसोबत रक्‍ताचं नातं होतं. ज्या पूर्वजांपासून ही राष्ट्रं आली होती ते पूर्वज एकमेकांचे नातेवाईक होते. तसंच खूप वर्षांपर्यंत ते एकमेकांसोबत राहत होते. पण नातेवाईक असूनही, या राष्ट्रांनी इस्राएली लोकांना वाईट वागणूक दिली आणि त्यांची “थट्टा” केली.—यहे. २५:६.

अम्मोनी लोक. हे लोक अब्राहामचा पुतण्या लोट याचे वंशज होते आणि ते त्याच्या धाकट्या मुलीपासून आले होते. (उत्प. १९:३८) त्यांची भाषा हिब्रू भाषेशी मिळती-जुळती असल्यामुळे इस्राएली लोकांना ती समजत असावी. इस्राएली आणि अम्मोनी लोक नातेवाईक होते, म्हणून यहोवाने इस्राएली लोकांना सांगितलं, की त्यांनी अम्मोनी लोकांशी लढू नये. (अनु. २:१९) तरीसुद्धा अम्मोनी लोक इस्राएली लोकांशी वाईट वागले. न्यायाधीशांच्या काळात त्यांनी मवाबी राजा एग्लोन याच्यासोबत मिळून इस्राएलचा छळ केला. (शास्ते ३:१२-१५, २७-३०) पुढे शौल राजा बनला तेव्हा अम्मोनी लोकांनी इस्राएलवर हल्ला केला. (१ शमु. ११:१-४) मग यहोशाफाट राजाच्या दिवसांत ते पुन्हा मवाबी सैन्यासोबत वचन दिलेल्या देशावर हल्ला करण्यासाठी आले.—२ इति. २०:१, २.

७. मवाबी लोक आपल्या इस्राएली नातेवाइकांशी कसे वागले?

मवाबी लोक. हेसुद्धा लोटचे वंशज होते आणि ते त्याच्या मोठ्या मुलीपासून आले होते. (उत्प. १९:३६, ३७) यहोवाने इस्राएली लोकांना सांगितलं होतं, की मवाबी लोकांसोबत लढू नका. (अनु. २:९) त्यामुळे इस्राएली लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला नाही. पण मवाबी लोकांनी चांगल्या गोष्टींनी त्यांची परतफेड केली नाही. इस्राएली लोक त्यांचे नातेवाईक होते. तरीसुद्धा इस्राएली लोक इजिप्त सोडून वचन दिलेल्या देशात जात होते तेव्हा मवाबी लोकांनी त्यांना मदत केली नाही. उलट त्यांना त्या देशात जाण्यापासून त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. मवाबी राजा बालाक याने बलामला इस्राएली लोकांना शाप देण्यासाठी पैसे दिले. बलामने इस्राएली लोकांना अनैतिक संबंधात आणि मूर्तिपूजेत कसं फसवायचं याची युक्‍ती बालाकला सांगितली. (गण. २२:१-८; २५:१-९; प्रकटी. २:१४) अनेक शतकांपर्यंत मवाबी लोकांनी इस्राएली लोकांचा, म्हणजेच त्यांच्या नातेवाइकांचा छळ केला. आणि असं ते यहेज्केलच्या काळापर्यंत करत राहिले.—२ राजे. २४:१, २.

८. अदोमी लोक इस्राएली लोकांचे भाऊ आहेत असं यहोवाने का म्हटलं? पण अदोमी लोक त्यांच्याशी कसे वागले?

अदोमी लोक. हे लोक याकोबचा जुळा भाऊ एसाव याचे वंशज होते. म्हणजेच ते इस्राएली लोकांचे जवळचे नातेवाईक होते. म्हणून यहोवाने अदोमी लोकांना इस्राएली लोकांचे भाऊ म्हटलं. (अनु. २:१-५; २३:७, ८) असं असलं तरी, इजिप्त सोडल्यापासून इ.स.पू. ६०७ पर्यंत, म्हणजेच यरुशलेमचा नाश होईपर्यंत ते इस्राएली लोकांचा विरोध करत राहिले. (गण. २०:१४, १८; यहे. २५:१२) नाशाच्या वेळी इस्राएली लोकांचं दुःख पाहून अदोमी लोकांना आनंद झाला. त्यांनी बाबेलच्या लोकांना यरुशलेम शहर उद्ध्‌वस्त करायला तर सांगितलंच, पण त्यासोबत त्यांनी पळून जाणाऱ्‍या इस्राएली लोकांना पकडून त्यांच्या शत्रूंच्या हातीही दिलं.—स्तो. १३७:७; ओब. ११,१४.

९, १०. (क) अम्मोनी, मवाबी आणि अदोमी लोकांचं काय झालं? (ख) या राष्ट्रांतले सगळेच लोक देवाच्या लोकांच्या विरोधात नव्हते असं का म्हणता येईल?

इस्राएली लोकांना वाईट वागणूक देणाऱ्‍या या सर्व राष्ट्रांना, म्हणजेच इस्राएलच्या नातेवाइकांना यहोवाने शिक्षा केली. त्याने म्हटलं, ‘मी अम्मोनी लोकांना पूर्वेकडच्या लोकांच्या ताब्यात देईन, तेव्हा कोणत्याही राष्ट्राला अम्मोनी लोकांची आठवण राहणार नाही.’ आणि मवाबी लोकांबद्दल त्याने म्हटलं, “मी मवाबी लोकांवर न्यायदंड बजावीन, तेव्हा त्यांना कळून येईल की मी यहोवा आहे.” (यहे. २५:१०, ११) या भविष्यवाण्या यरुशलेमच्या नाशानंतर जवळपास पाच वर्षांनी पूर्ण होऊ लागल्या. बाबेलच्या लोकांनी अम्मोनी आणि मवाबी लोकांवर विजय मिळवला. तर अदोमी लोकांच्या देशाबद्दल यहोवाने म्हटलं, की मी “त्याच्यामधून माणसांचा आणि गुराढोरांचा नाश करीन. मी त्याला ओसाड करून टाकीन.” (यहे. २५:१३) भविष्यवाणी केल्याप्रमाणे शेवटी अम्मोनी, मवाबी आणि अदोमी लोकांचं अस्तित्व मिटून गेलं.—यिर्म. ९:२५, २६; ४८:४२; ४९:१७, १८.

१० पण या शत्रू राष्ट्रांतल्या सर्वच लोकांनी देवाच्या लोकांचा विरोध केला नाही. काही लोक चांगलेसुद्धा होते. जसं की, दावीदच्या शूर योद्ध्यांपैकी अम्मोनी सेलेख आणि मवाबी इथ्मा. (१ इति. ११:२६, ३९, ४६; १२:१) तसंच, पुढे जाऊन यहोवाची उपासक बनलेली मवाबी रूथ.—रूथ १:४, १६, १७.

आपल्या स्तरांशी कधीच तडजोड करू नका

११. इस्राएली लोकांनी जी चूक केली त्यातून आपण कोणता धडा घेऊ शकतो?

११ इस्राएली लोकांनी त्या राष्ट्रांसोबत मैत्रीचे संबंध ठेवून जी चूक केली त्यातून आपण कोणता धडा घेऊ शकतो? जेव्हा इस्राएली लोक इतर राष्ट्रांपासून दूर राहिले नाहीत, तेव्हा त्या राष्ट्रांच्या खोट्या धार्मिक प्रथा हळूहळू इस्राएली लोकांमध्ये शिरू लागल्या. ते मवाबी लोकांच्या दैवताची, म्हणजे पौरच्या बआलची आणि अम्मोनी लोकांच्या दैवताची, मोलखची उपासना करू लागले. (गण. २५:१-३; १ राजे ११:७) इस्राएली लोकांसोबत जे घडलं ते आज आपल्यासोबतही घडू शकतं. सत्यात नसलेले आपले नातेवाईक कदाचित आपल्यावर चुकीच्या गोष्टी करायचा दबाव टाकतील. त्यांना कदाचित समजणार नाही, की आपण बर्थडे, न्यू इयर, इस्टर किंवा ख्रिस्मस यांसारखे सण का साजरे करत नाही. तसंच, सणासुदीच्या वेळी एकमेकांना भेटवस्तू का देत नाही, किंवा खोट्या धार्मिक शिकवणींशी संबंधित असलेल्या प्रथा का पाळत नाही. आपण आपल्या स्तरांशी थोडीफार तडजोड करावी असा ते आपल्यावर कदाचित दबाव आणतील. त्यांचे हेतू कदाचित वाईट नसतील, पण तरी आपण सावध राहिलं पाहिजे. आपण त्यांच्या दबावाला बळी पडणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. इस्राएल राष्ट्राच्या इतिहासातून आपल्याला शिकायला मिळतं, की एक छोटीशी चूकसुद्धा आपल्याला एका मोठ्या संकटात टाकू शकते, आणि यहोवासोबतचं आपलं नातं बिघडवू शकते.

१२, १३. कोणाकडून आपला विरोध होऊ शकतो? पण आपण यहोवाला एकनिष्ठ राहिलो तर काय होऊ शकतं?

१२ अम्मोनी, मवाबी आणि अदोमी लोक ज्या प्रकारे इस्राएली लोकांशी वागले त्यावरून आपण आणखी एक धडा घेऊ शकतो. सत्यात नसलेले कुटुंबातले लोक आपला कदाचित तीव्र विरोध करतील. येशूने आपल्याला आधीच इशारा दिला होता, की आपण जो संदेश सांगतो त्यामुळे काही वेळा कुटुंबामध्ये फूट पडू शकते. ‘मुलाविरुद्ध बाप आणि आईविरुद्ध मुलगी’ जाईल असं त्याने म्हटलं. (मत्त. १०:३५, ३६) यहोवाने इस्राएली लोकांना सांगितलं होतं, की त्यांचे नातेवाईक असलेल्या इतर राष्ट्रांसोबत त्यांनी वाद घालू नये. त्याचप्रमाणे आपण सत्यात नसलेल्या नातेवाइकांसोबत किंवा कुटुंबातल्या सदस्यांसोबत वाद घालत नाही. पण तरीही त्यांनी आपला विरोध केला, तर आपल्याला आश्‍चर्य वाटत नाही. कारण असं होईल हे येशूने आपल्याला आधीच सांगितलं होतं.—२ तीम. ३:१२.

१३ आपले नातेवाईक कदाचित आपला सरळसरळ विरोध करणार नाहीत. पण तरी आपण एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. यहोवापेक्षा त्यांचा आपल्यावर जास्त प्रभाव पडू नये हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. असं का? कारण यहोवा आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. (मत्तय १०:३७ वाचा.) जर आपण यहोवाला एकनिष्ठ राहिलो, तर आपण अशी अपेक्षा करू शकतो की सेलेख, इथ्मा आणि रूथसारखंच आपले नातेवाईकसुद्धा पुढे जाऊन शुद्ध उपासना करू लागतील. (१ तीम. ४:१६) मग त्यांनाही खरा देव यहोवा याची सेवा करायचा आनंद मिळेल. तसंच, यहोवाचं प्रेम आणि संरक्षण अनुभवायची संधीही त्यांना मिळेल.

यहोवा आपल्या शत्रूंना “कडक शिक्षा” देतो

१४, १५. पलिष्टी लोक इस्राएली लोकांशी कसे वागले?

१४ पलिष्टी लोक. हे लोक मुळात क्रेत बेटावर राहणारे होते, पण पुढे ते कनान देशात राहायला गेले. यहोवाने नंतर हा देश अब्राहाम आणि त्याच्या वंशजांना द्यायचं वचन दिलं. अब्राहाम आणि इसहाक यांचा काही वेळा पलिष्टी लोकांशी संबंध आला. (उत्प. २१:२९-३२; २६:१) इस्राएली लोक वचन दिलेल्या देशात आले तोपर्यंत पलिष्टी लोकांचं एक शक्‍तिशाली राष्ट्र बनलं होतं. तसंच, त्यांच्याकडे एक मोठं सैन्यही होतं. ते बआल-जबूब आणि दागोन यांसारख्या खोट्या दैवतांची उपासना करायचे. (१ शमु. ५:१-४; २ राजे १:२, ३) काही वेळा इस्राएली लोकांनीसुद्धा त्यांच्यासोबत मिळून या खोट्या दैवतांची उपासना केली.—शास्ते १०:६.

१५ इस्राएली लोक यहोवाला एकनिष्ठ राहिले नाहीत, म्हणून यहोवाने अनेक वर्षांपर्यंत पलिष्ट्यांना त्यांचा छळ करू दिला. (शास्ते १०:७, ८; यहे. २५:१५) त्यांनी इस्राएली लोकांवर खूप जुलूम केले, अनेक बंधनं घातली a आणि त्यांच्यापैकी बऱ्‍याच जणांची कत्तलही केली. (१ शमु. ४:१०) पण जेव्हा-जेव्हा इस्राएली लोक पश्‍चात्ताप करून यहोवाकडे परत यायचे तेव्हा-तेव्हा तो त्यांना वाचवायचा. त्याने आपल्या लोकांना वाचवण्यासाठी शमशोन, शौल आणि दावीद यांच्यासारख्या लोकांचा वापर केला. (शास्ते १३:५, २४; १ शमु. ९:१५-१७; १८:६, ७) पुढे बाबेलच्या लोकांनी आणि नंतर ग्रीक लोकांनी पलिष्टी लोकांचा देश काबीज केला. अशा प्रकारे, यहेज्केलने भविष्यवाणी केल्याप्रमाणे त्यांना “कडक शिक्षा” मिळाली.—यहे. २५:१५-१७.

१६, १७. पलिष्टी लोक जसं इस्राएली लोकांशी वागले त्यातून आपण कोणते धडे घेऊ शकतो?

१६ पलिष्टी लोक इस्राएली लोकांसोबत जसं वागले त्यातून आपण कोणते धडे घेऊ शकतो? आज आपल्या काळातसुद्धा काही शक्‍तिशाली राष्ट्रांनी यहोवाच्या लोकांचा विरोध केला आहे, त्यांच्यावर अत्याचार केले आहेत. पण इस्राएली लोकांसारखा आपण यहोवाचा विश्‍वासघात केलेला नाही, तर आपण नेहमी त्याला विश्‍वासू राहिलो आहोत. तरीसुद्धा, खऱ्‍या उपासनेचे शत्रू यशस्वी होत आहेत असं कधीकधी आपल्याला वाटेल. उदाहरणार्थ, १९१८ मध्ये अमेरिकेच्या सरकारने आपल्या संघटनेत पुढाकार घेणाऱ्‍या बांधवांना, अनेक वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि आपलं प्रचार कार्य बंद करायचा प्रयत्न केला. तर दुसऱ्‍या महायुद्धात जर्मनीतल्या नाझी सरकारने, साक्षीदारांना पूर्णपणे मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हजारो भाऊबहिणींना तुरुंगात डांबलं आणि शेकडोंना मारून टाकलं. आणि त्या युद्धानंतर सोव्हियत संघानेसुद्धा साक्षीदारांचा खूप वर्षं छळ केला. त्यांनी आपल्या अनेक बांधवांना सक्‍त मजुरीच्या छावण्यांमध्ये टाकलं, तर काहींना दूरच्या ओसाड देशात हद्दपार केलं.

१७ जगातली सरकारं कदाचित आपल्या प्रचार कार्यावर पुढेही बंदी घालतील, आपल्यापैकी काहींना तुरुंगात टाकतील किंवा काहींना ठारही मारून टाकतील. असं आपल्यासोबत घडेल या विचाराने आपण घाबरणार का किंवा आपला विश्‍वास कमी होणार का? अजिबात नाही. कारण यहोवा आपल्या विश्‍वासू सेवकांचं नेहमी रक्षण करतो. (मत्तय १०:२८-३१ वाचा.) आपण शक्‍तिशाली आणि निर्दयी सरकारं नाहीशी झालेली, पण त्याच वेळी यहोवाच्या लोकांची संख्या वाढत गेलेली पाहिलीच आहे. लवकरच पलिष्टी लोकांसोबत जे घडलं तेच सर्व मानवी सरकारांसोबत घडेल. शेवटी त्यांना हे मान्य करावंच लागेल, की यहोवा खूप शक्‍तिशाली आहे. आणि पलिष्टी लोकांसारखंच त्यांचंही अस्तित्व कायमचं मिटून जाईल.

“अफाट धनसंपत्तीमुळे” संरक्षण झालं नाही

१८. सोर शहराचा व्यापार कुठपर्यंत पसरला होता?

१८ सोर शहर. b प्राचीन काळात हे शहर व्यापाराचं खूप मोठं केंद्र होतं. सोरच्या पश्‍चिमेला भूमध्य समुद्र असल्यामुळे जहाजांद्वारे दूरदूरच्या देशांत माल पोहोचवला जायचा किंवा तिथून आणला जायचा. आणि पूर्वेकडून जमिनीच्या मार्गाने वेगवेगळ्या राज्यांसोबत व्यापार केला जायचा. अनेक शतकं या शहराने जगाच्या कानाकोपऱ्‍यांतून येणारी भरमसाठ संपत्ती साठवली होती. सोरचे व्यापारी आणि सौदागर इतके श्रीमंत झाले होते, की ते स्वतःला राजकुमार समजायचे.—यश. २३:८.

१९, २०. सोरच्या लोकांमध्ये आणि गिबोनी लोकांमध्ये काय फरक होता?

१९ दावीद आणि शलमोन राजाच्या काळात इस्राएल आणि सोर यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर व्यवहार चालायचा. सोरने दावीदचा राजमहाल आणि नंतर शलमोनचं मंदिर बांधण्यासाठी खूपसारं साहित्य आणि कारागीर पाठवले. (२ इति. २:१, ३, ७-१६) इस्राएली लोक यहोवाला एकनिष्ठ होते आणि यहोवाने त्यांना भरभरून आशीर्वाद दिला होता तो काळ सोरच्या लोकांनी स्वतः पाहिला होता. (१ राजे ३:१०-१२; १०:४-९) त्यामुळे कल्पना करा, सोरच्या लोकांकडे किती चांगली संधी होती! यहोवाबद्दल, शुद्ध उपासनेबद्दल ते कितीकाही शिकू शकत होते. तसंच, खऱ्‍या देवाची उपासना केल्यामुळे जे आशीर्वाद मिळतात ते प्रत्यक्षात अनुभवायची संधीही त्यांच्याकडे होती.

२० पण सोरच्या लोकांनी ही संधी गमावली, कारण ते धनसंपत्ती मिळवायच्या मागे लागले होते. ते कनानच्या गिबोनी लोकांसारखे मुळीच नव्हते. गिबोनी लोकांनी यहोवाच्या महान कामांबद्दल फक्‍त ऐकलं होतं आणि तेवढ्यावरूनच ते त्याचे सेवक बनले होते. (यहो. ९:२, ३, २२–१०:२) पण सोरचे लोक यांच्या अगदी उलट होते. त्यांनी देवाच्या लोकांचा विरोध तर केलाच, पण त्यांच्यापैकी काहींना गुलाम म्हणूनसुद्धा विकलं.—स्तो. ८३:२, ७; योए. ३:४, ६; आमो. १:९.

धनसंपत्ती एका भिंतीसारखं आपलं संरक्षण करेल असा आपण कधीच विचार करू नये

२१, २२. सोर शहराचं काय झालं आणि का?

२१ देवाच्या लोकांचा विरोध करणाऱ्‍या सोर शहराला यहोवाने यहेज्केलद्वारे म्हटलं: “हे सोर! बघ, मी तुझ्या विरोधात उठलोय. समुद्रात जशा मोठ्या लाटा उठतात, तसं मी पुष्कळ राष्ट्रांना तुझ्याविरुद्ध उठवीन. ती राष्ट्रं येतील आणि तुझ्या भिंती पाडून टाकतील. ते तुझे बुरूज जमीनदोस्त करतील. मी तुझ्यावरची माती खरडून काढीन आणि तुला उघडा, चकाकणारा खडक करून टाकीन.” (यहे. २६:१-५) सोरच्या लोकांनी संरक्षणासाठी आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवला होता. १५० फूट उंच भिंती ज्याप्रमाणे त्यांच्या शहराचं रक्षण करत होत्या, त्याचप्रमाणे आपली संपत्ती आपलं रक्षण करेल असं त्यांना वाटत होतं. पण हा त्यांचा खूप मोठा भ्रम होता. त्याऐवजी त्यांनी शलमोनने दिलेल्या चेतावणीकडे लक्ष दिलं असतं तर किती बरं झालं असतं! शलमोनने म्हटलं: “श्रीमंताची संपत्ती त्याच्यासाठी तटबंदी शहर असते; त्याच्या कल्पनेत ती संरक्षण देणाऱ्‍या भिंतीसारखी असते.”—नीति. १८:११.

२२ यहेज्केलने केलेली भविष्यवाणी पूर्ण झाली. आधी बाबेलच्या आणि नंतर ग्रीकच्या लोकांनी सोरच्या लोकांवर हल्ला केला. तेव्हा तिथल्या लोकांना समजलं की त्यांच्या उंच भिंती आणि त्यांची संपत्ती त्यांचं संरक्षण करू शकत नाही. यरुशलेमचा नाश केल्यानंतर बाबेलने सोरला १३ वर्षं वेढा घातला. (यहे. २९:१७, १८) नंतर इ.स.पू. ३३२ मध्ये, महान सिकंदरने यहेज्केलच्या भविष्यवाणीची एक खास गोष्ट पूर्ण केली. c त्याच्या सैनिकांनी जमिनीवर असलेल्या सोर शहराच्या अवशेषांचा ढिगारा म्हणजेच दगड-माती, लाकूड या सगळ्या गोष्टी समुद्रात फेकल्या आणि बेटावर असलेल्या सोर शहरावर जाण्यासाठी एक मार्ग तयार केला. (यहे. २६:४, १२) मग सिकंदर आणि त्याचे सैनिक भिंती फोडून शहरात शिरले, त्यांनी लूटमार केली, हजारो लोकांना आणि सैनिकांना मारून टाकलं, आणि आणखी कितीतरी हजारो लोकांना गुलाम म्हणून विकलं. शेवटी सोरला कळून चुकलं, की त्याची ‘अफाट संपत्ती’ त्याचं संरक्षण करू शकत नाही.—यहे. २७:३३, ३४.

सोर शहर कितीही मजूबत वाटत असलं, तरी यहेज्केलने सांगितल्याप्रमाणे त्याचा नाश झाला (परिच्छेद २२ पाहा)

२३. सोरच्या लोकांकडून आपण कोणता धडा घेऊ शकतो?

२३ सोरच्या लोकांकडून आपण कोणता धडा घेऊ शकतो? त्यांच्यासारखं आपण ‘पैशाच्या फसव्या ताकदीवर’ कधीच भरवसा ठेवणार नाही आणि भिंतींसारखं तो आपलं संरक्षण करेल असा आपण कधीच विचार करणार नाही. (मत्त. १३:२२) बायबल म्हणतं, की आपण “एकाच वेळी देवाची आणि धनाची सेवा करू शकत नाही.(मत्तय ६:२४ वाचा.) जे मनापासून यहोवाची सेवा करतात तेच खऱ्‍या अर्थाने सुरक्षित असतात. (मत्त. ६:३१-३३; योहा. १०:२७-२९) सोरच्या नाशाबद्दलच्या भविष्यवाणीतली जशी प्रत्येक गोष्ट पूर्ण झाली, तशीच या जगाच्या अंताबद्दलची भविष्यवाणीही पूर्ण होईल. यहोवा जेव्हा जगाच्या स्वार्थी आणि लोभी व्यापारी व्यवस्थेचा नाश करेल, तेव्हा धनसंपत्तीवर भरवसा ठेवणाऱ्‍यांना मान्य करावंच लागेल की यहोवाच सर्वात ताकदवान आहे.

‘वाळलेल्या गवताच्या काडीसारखी’ असलेली राजकीय शक्‍ती

२४-२६. (क) यहोवाने इजिप्तला “वाळलेल्या गवताची काडी” असं का म्हटलं? (ख) सिद्‌कीयाने यहोवाची आज्ञा कशी मोडली? आणि (ग) याचे परिणाम काय झाले?

२४ इजिप्त देश. या राजकीय शक्‍तीचा वचन दिलेल्या देशावर अनेक शतकांपर्यंत मोठा प्रभाव होता; म्हणजेच, योसेफच्या काळापासून ते यरुशलेमवर बाबेलचे लोक हल्ला करायला आले तोपर्यंत. खूप वर्षांपासून अस्तित्वात असल्यामुळे इजिप्त देश एका जुन्या आणि मजबूत झाडासारखा वाटत होता. पण खरंतर यहोवाच्या तुलनेत तो फक्‍त “एखाद्या वाळलेल्या गवताच्या काडीसारखा” कमजोर होता.”—यहे. २९:६.

२५ पण ही गोष्ट दुष्ट राजा सिद्‌कीयाच्या लक्षात आली नाही. यहोवाने यिर्मया संदेष्ट्याद्वारे त्याला सांगितलं होतं, की त्याने बाबेलच्या राजाला शरण जावं. (यिर्म. २७:१२) सिद्‌कीयाने ही गोष्ट मान्य केली आणि यहोवाच्या नावाने अशी शपथही घेतली, की तो नबुखद्‌नेस्सरविरुद्ध बंड करणार नाही. पण खरंतर त्याने यहोवाचं ऐकलं नाही. त्याने आपली शपथ मोडली आणि बाबेलसोबत लढण्यासाठी इजिप्तची मदत घेतली. (२ इति. ३६:१३; यहे. १७:१२-२०) पण ज्या इस्राएली लोकांनी इजिप्तच्या राजकीय शक्‍तीवर भरवसा ठेवला, त्यांनी स्वतःचंच नुकसान करून घेतलं. (यहे. २९:७) इजिप्त हे अशा एका ‘महाकाय समुद्री प्राण्यासारखं’ वाटत होतं ज्याला कोणीच काबूत आणू शकत नाही. (यहे. २९:३, ४) पण यहोवाने म्हटलं की शिकारी जसे नाईल नदीतल्या मगरींना पकडायचे तसं तो इजिप्त देशाला पकडून त्याचा नाश करेल. त्याने म्हटलं की तो इजिप्तच्या जबड्यात गळ अडकवून त्याला खेचून बाहेर काढेल. ही गोष्ट यहोवाने कशी पूर्ण केली? त्याने बाबेलच्या सैन्याला इजिप्तवर हल्ला करायला पाठवलं आणि ती पूर्ण केली.—यहे. २९:९-१२, १९.

२६ विश्‍वासघात करणाऱ्‍या सिद्‌कीयाचं काय झालं? त्याने यहोवाचं ऐकलं नाही, म्हणून यहेज्केलने त्याच्याबद्दल अशी भविष्यवाणी केली, की या ‘दुष्ट प्रधानाचा’ मुकुट काढून टाकला जाईल आणि त्याचं शासन संपेल. पण भविष्यवाणीत यहेज्केलने एक आशाही दिली. (यहे. २१:२५-२७) त्याने देवाच्या प्रेरणेने म्हटलं, की दावीदच्या शाही घराण्यातून असा एक राजा येईल, ज्याला राजासनावर बसण्याचा “कायदेशीर हक्क” असेल. तो राजा कोण होता हे आपण पुढच्या अध्यायात पाहू या.

२७. इस्राएलने इजिप्तवर भरवसा ठेवायची जी चूक केली त्यातून आपण कोणता धडा घेऊ शकतो?

२७ इस्राएलने इजिप्तवर भरवसा ठेवायची जी चूक केली त्यातून आपण कोणता धडा घेऊ शकतो? हाच, की आपण राजकीय शक्‍तींवर भरवसा ठेवू नये, कारण त्या आपलं संरक्षण करू शकत नाहीत. आपण ‘जगाचे भाग नाहीत’ हे आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टींतून आपण दाखवलं पाहिजे; अगदी आपल्या विचारांतूनसुद्धा. (योहा. १५:१९; याको. ४:४) सध्याची राजकीय व्यवस्था कितीही मजबूत आणि स्थिर वाटत असली, तरी प्राचीन इजिप्तप्रमाणेच ती ‘फक्‍त एखाद्या वाळलेल्या गवताच्या काडीसारखी’ आहे. त्यामुळे नाशवंत माणसांवर भरवसा ठेवणं नक्कीच मूर्खपणाचं ठरेल. त्याऐवजी आपण विश्‍वाचा सर्वोच्च अधिकारी यहोवा याच्यावर भरवसा ठेवला पाहिजे.—स्तोत्रं १४६:३-६ वाचा.

घराच्या चार भिंतींतही आपण राजकीय गोष्टींच्या बाबतीत कोणाचीही बाजू घेऊ नये (परिच्छेद २७ पाहा)

राष्ट्रांना “कळून येईल, की मी यहोवा आहे”

२८-३०. (क) यहोवा कोण आहे हे राष्ट्रांना कसं “कळून येईल?” (ख) पण आपण यहोवाला कशा प्रकारे ओळखतो?

२८ यहोवाने यहेज्केलच्या पुस्तकात बऱ्‍याचदा म्हटलं, राष्ट्रांना “कळून येईल, की मी यहोवा आहे.” (यहे. २५:१७) प्राचीन काळात यहोवाने अनेक वेळा आपल्या लोकांच्या शत्रूंना शिक्षा केली तेव्हा हे शब्द खरे ठरले. पण हीच गोष्ट आपल्या काळातसुद्धा आणखी मोठ्या प्रमाणावर पूर्ण होईल. ती कशी?

२९ प्राचीन काळातल्या इस्राएली लोकांसारखंच आज आपणसुद्धा चारही बाजूंनी क्रूर राष्ट्रांनी घेरलेले आहोत. त्या राष्ट्रांना वाटतं, की देवाचे लोक एकट्या, लाचार मेंढरासारखे आहेत. (यहे. ३८:१०-१३) लवकरच जगातली ही राष्ट्रं देवाच्या लोकांवर एक मोठा आणि भयंकर हल्ला करतील. याबद्दल जास्त माहिती आपण या पुस्तकाच्या १७ व्या आणि १८ व्या अध्यायात पाहणार आहोत. पण राष्ट्रं जेव्हा आपल्यावर हल्ला करतील तेव्हा खरी ताकद काय असते हे त्यांना समजेल. हर्मगिदोनच्या युद्धात यहोवा त्यांचा नाश करेल, तेव्हा यहोवा कोण आहे हे त्यांना कळून येईल. तोच सर्वोच्च अधिकारी आहे हे शेवटी त्यांना मान्य करावंच लागेल!—प्रकटी. १६:१६; १९:१७-२१.

३० पण याच्या अगदी उलट यहोवा आपल्याला सुरक्षित ठेवेल आणि पुढे भरभरून आशीर्वाद देईल. कारण आपण आतापासूनच त्याला ओळखतो. आपण हे कसं दाखवतो? त्याच्यावर भरवसा ठेवून, त्याच्या आज्ञा पाळून आणि त्याची शुद्ध उपासना करून.—यहेज्केल २८:२६ वाचा.

a उदाहरणार्थ, इस्राएलमध्ये कोणीही धातूकाम करू नये म्हणून पलिष्टी लोकांनी त्यांच्यावर बंदी घातली होती. त्यामुळे शेतीच्या अवजारांना धार लावण्यासाठी इस्राएली लोकांना पलिष्ट्यांकडे जावं लागायचं. या कामासाठी ते खूप मोठी किंमत लावायचे. ही किंमत बरेच दिवस काम करून कमवलेल्या मजुरीइतकी असायची.—१ शमु. १३:१९-२२.

b प्राचीन काळातलं सोर शहर मुळात एक बेट होतं. ते कर्मेल डोंगराच्या उत्तरेकडे जवळपास ५० किलोमीटरच्या अंतरावर होतं. हे बेट कदाचित समुद्रकिनाऱ्‍यापासून थोडसं दूर एका उंच खडकावर वसलेलं असावं. नंतर, आपल्या शहराच्या सीमा वाढवण्यासाठी सोरच्या लोकांनी जमिनीवर आणखी एक शहर बांधलं. हिब्रू भाषेत सोर या नावाचा अर्थ, “खडक” असा होतो.

c यशया, यिर्मया, योएल, आमोस आणि जखऱ्‍या या संदेष्ट्यांनीसुद्धा सोरच्या नाशाबद्दल भविष्यावाण्या केल्या. त्यांतली एकूणएक गोष्ट पूर्ण झाली.—यश. २३:१-८; यिर्म. २५:१५, २२, २७; योए. ३:४; आमो. १:१०; जख. ९:३, ४.