व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय ५

“लोक किती वाईट आणि घृणास्पद कामं करत आहेत ते बघ”

“लोक किती वाईट आणि घृणास्पद कामं करत आहेत ते बघ”

यहेज्केल ८:९

अध्याय कशाबद्दल आहे: यहूदाच्या लोकांची उपासना भ्रष्ट होते आणि त्यांच्या नैतिकतेची पातळी घसरते

१-३. यहेज्केलने मंदिरात कोणत्या गोष्टी पाहाव्यात असं यहोवाला वाटत होतं? आणि का? (भाग २ चे सुरुवातीचे शब्द आणि चित्र पाहा.)

 यहेज्केल संदेष्टा हा याजकाचा मुलगा असल्यामुळे मोशेचं नियमशास्त्र त्याला चांगलं माहीत होतं. त्याला यरुशलेममधल्या मंदिराबद्दल आणि तिथे यहोवाची शुद्ध उपासना व्हायला हवी हेही माहीत होतं. (यहे. १:३; मला. २:७) पण आता इ.स.पू. ६१२ मध्ये यहोवाच्या मंदिरात जे काही चाललं होतं ते पाहून कोणत्याही विश्‍वासू यहुद्याला धक्काच बसला असता. आणि यहेज्केलच्या बाबतीतही तसंच झालं.

मंदिरात ज्या घृणास्पद गोष्टी घडत होत्या त्या यहेज्केलने पाहाव्यात आणि यहूदाच्या सगळ्या ‘वडीलजनांना’ सांगाव्यात अशी यहोवाची इच्छा होती. त्याच्यासोबत बंदिवासात असलेले हे वडीलजन तेव्हा यहेज्केलच्या घरात बसले होते. (यहेज्केल ८:१-४ वाचा; यहे. ११:२४, २५; २०:१-३) त्या वेळी यहेज्केल बाबेलमध्ये खबार नदीजवळ तेल-अबीबमध्ये राहत होता. तेव्हा यहोवाची पवित्र शक्‍ती त्याला दृष्टान्तात शेकडो मैल दूर पश्‍चिमेकडे यरुशलेममध्ये घेऊन जाते. तिथे यहोवा त्याला मंदिराच्या आतल्या अंगणाच्या उत्तरेकडे असलेल्या दरवाजाजवळ आणतो. तिथून सुरुवात करून यहोवा त्याला मंदिरात काय-काय घडत आहे ते दाखवतो.

मंदिरात यहेज्केल चार धक्कादायक दृश्‍यं पाहतो. त्यांवरून यहूदा राष्ट्राची उपासना किती खालच्या थराला गेली आहे ते कळतं. पण यहोवाची शुद्ध उपासना भ्रष्ट कशी झाली? आणि या दृष्टान्तातून आज आपल्याला कोणता इशारा मिळतो? चला, मंदिरात काय-काय घडत आहे हे आता आपण यहेज्केलसोबत पाहू या. पण त्याआधी आपण पाहू या की यहोवा आपल्या उपासकांकडून काय अपेक्षा करतो.

“तुम्ही फक्‍त माझीच उपासना करावी अशी मी अपेक्षा करतो”

४. यहोवा आपल्या सेवकांकडून काय अपेक्षा करतो?

यहेज्केलच्या काळाच्या जवळपास ९०० वर्षांपूर्वी यहोवाने अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं, की तो त्याच्या उपासकांकडून काय अपेक्षा करतो. दहा आज्ञांपैकी दुसऱ्‍या आज्ञेत त्याने इस्राएली लोकांना a सांगितलं होतं: “मी तुमचा देव यहोवा आहे आणि तुम्ही फक्‍त माझीच उपासना करावी अशी मी अपेक्षा करतो.” (निर्ग. २०:५) याचा अर्थ, त्याच्या सेवकांनी दुसऱ्‍या कोणत्याही दैवताची उपासना केलेली त्याला चालणार नव्हती. या प्रकाशनाच्या दुसऱ्‍या अध्यायात आपण पाहिलं होतं, की शुद्ध उपासनेत सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपण फक्‍त यहोवाची उपासना केली पाहिजे. त्याच्या सेवकांनी त्यालाच आपल्या जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व दिलं पाहिजे. (निर्ग. २०:३) थोडक्यात, यहोवा आपल्या सेवकांकडून अशी अपेक्षा करतो की त्यांनी आपली उपासना शुद्ध ठेवावी; खोटी उपासना करून त्यात भेसळ करू नये. इ.स.पू. १५१३ मध्ये जेव्हा यहोवाने इस्राएली लोकांसोबत नियमशास्त्राचा करार केला तेव्हा त्यांनी तो आनंदाने स्वीकारला. असं करून त्यांनी कबूल केलं, की ते फक्‍त यहोवाचीच उपासना करतील. (निर्ग. २४:३-८) यहोवा एकनिष्ठ देव आहे आणि तो आपले सगळे करार पाळतो. त्यामुळे आपल्या सेवकांनीही एकनिष्ठ असावं आणि त्याच्यासोबत केलेला करार पाळावा अशी अपेक्षा तो करतो.—अनु. ७:९, १०; २ शमु. २२:२६.

५, ६. इस्राएली लोकांनी फक्‍त आपलीच उपासना करावी अशी यहोवाने त्यांच्याकडून अपेक्षा का केली?

इस्राएली लोकांनी फक्‍त आपली उपासना करावी ही यहोवाची अपेक्षा योग्य होती का? नक्कीच. कारण तोच सगळ्यात शक्‍तिशाली देव आणि सर्वोच्च अधिकारी आहे. इतकंच नाही, तर त्यानेच आपल्याला जीवन दिलं आहे आणि त्याच्यामुळेच आपण चालतो-फिरतो. (स्तो. ३६:९; प्रे. कार्यं १७:२८) यहोवाच इस्राएली लोकांचा तारणकर्ता होता. दहा आज्ञा देताना त्याने त्यांना याची आठवण करून दिली, की “मी तुमचा देव यहोवा आहे. मीच तुम्हाला इजिप्त देशातून, तुमच्या गुलामगिरीच्या घरातून बाहेर आणलं.” (निर्ग. २०:२) यावरून स्पष्ट होतं, की इस्राएली लोकांनी फक्‍त यहोवाची मनापासून उपासना करायची होती. आणि यहोवाने अशी अपेक्षा करणं मुळीच चुकीचं नव्हतं.

यहोवा कधीही बदलत नाही. (मला. ३:६) आधीसारखंच तो आजही आपल्या सेवकांकडून हीच अपेक्षा करतो, की त्यांनी फक्‍त त्याचीच उपासना करावी. त्यामुळे कल्पना करा, ती चार घृणास्पद दृश्‍यं पाहून यहोवाला किती त्रास झाला असेल! नंतर ही दृश्‍यं तो यहेज्केलला दृष्टान्तात दाखवतो.

पहिलं दृश्‍य: ईर्ष्येला पेटवणारी मूर्ती

७. (क) इस्राएली लोक मंदिराच्या उत्तरेकडच्या प्रवेशाजवळ काय करत होते? आणि त्यामुळे यहोवाला कसं वाटलं? (सुरुवातीचं चित्र पाहा.) (ख) यहोवाला कोणत्या अर्थाने ईर्ष्या वाटली? (तळटीप २ पाहा.)

यहेज्केल ८:५, ६ वाचा. यहेज्केलने जे बघितलं त्यामुळे त्याला धक्काच बसला असेल! त्याने पाहिलं की मंदिराच्या उत्तरेकडे असलेल्या दरवाजाजवळ धर्मत्यागी यहुदी एका मूर्तीची (कदाचित पूजेच्या खांबाची) उपासना करत आहेत. ती आशेरा देवीला सूचित करत होती. कनानी लोक असं मानायचे की अशेरा ही बआल दैवताची पत्नी आहे. ती मूर्ती कोणाची का असेना, पण तिची उपासना करून इस्राएली लोकांनी यहोवासोबत केलेला करार मोडला. जी उपासना फक्‍त यहोवालाच मिळायला पाहिजे आणि जिच्यावर फक्‍त त्याचाच हक्क आहे ती उपासना त्यांनी त्या मूर्तीला दिली. असं करून त्यांनी यहोवाला ईर्ष्येला पेटवलं आणि त्याचा क्रोध भडकवला. b (अनु. ३२:१६; यहे. ५:१३) जरा विचार करा, ४०० पेक्षा जास्त वर्षांपासून हे मंदिर यहोवाचं निवासस्थान मानलं जायचं. (१ राजे ८:१०-१३) पण आता मंदिराच्या आवारातच मूर्तिपूजा करून इस्राएली लोकांनी यहोवाला त्याच्याच “मंदिरापासून दूर जायला” लावलं.

८. ख्रिस्ती धर्मजगतामध्ये आज आपल्याला काय पाहायला मिळतं?

पहिल्या दृश्‍यात यहेज्केलने बघितलं, की लोक ईर्ष्येला पेटवणाऱ्‍या मूर्तीची उपासना करत आहेत. आजही आपल्याला त्यासारखंच चित्र कसं पाहायला मिळतं? यहुदाच्या धर्मत्यागी लोकांप्रमाणेच आज ख्रिस्ती धर्मजगतातले लोकही वागत आहेत. त्यांच्या चर्चमध्ये मोठ्या प्रमाणात मूर्तिपूजा केली जाते. त्यामुळे ते कितीही भक्‍ती करत असले तरी ती व्यर्थच आहे. आपल्याला माहीत आहे, की यहोवा बदलत नाही. त्यामुळे आपण हे खातरीने म्हणू शकतो, की यहुदातल्या धर्मत्यागी लोकांप्रमाणेच ख्रिस्ती धर्मजगतातल्या लोकांनीही यहोवाचा क्रोध भडकवला आहे. (याको. १:१७) खऱ्‍या उपासनेचा नुसता दिखावा करणाऱ्‍या ख्रिस्ती धर्मजगतापासून यहोवा नक्कीच फार दूर आहे.

९, १०. मंदिरात मूर्तिपूजा करणाऱ्‍या यहुद्यांकडून आपण कोणता धडा शिकतो?

मंदिरात मूर्तिपूजा करणाऱ्‍या यहुद्यांकडून आपण कोणता धडा शिकतो? हाच, की आपल्याला फक्‍त यहोवाची उपासना करायची असेल तर आपण ‘मूर्तिपूजेपासून दूर पळालं पाहिजे.’ (१ करिंथ. १०:१४) आपण कदाचित म्हणू, ‘यहोवाच्या उपासनेत मी मूर्तींचा किंवा प्रतिकांचा उपयोग करायचा विचारपण करू शकत नाही.’ पण मूर्तिपूजेचे आणखीनही बरेच प्रकार आहेत. आणि त्यांतले काही तर मूर्तिपूजेसारखे मुळीच वाटणार नाहीत. बायबलबद्दल माहिती देणाऱ्‍या एका पुस्तकात असं म्हटलं आहे, की ‘आपण जर एखाद्या गोष्टीला आपल्या जीवनात देवापेक्षा जास्त महत्त्व दिलं, तर ते मूर्तिपूजा करण्यासारखंच आहे.’ म्हणून, आपण जर धनसंपत्ती, पैसा, शारीरिक संबंध, मनोरंजन किंवा अशा कोणत्याही गोष्टीला यहोवापेक्षा जास्त महत्त्व दिलं, तर आपण फक्‍त यहोवाची उपासना करत आहोत असं म्हणता येणार नाही. (मत्त. ६:१९-२१, २४; इफिस. ५:५; कलस्सै. ३:५) त्यामुळे आपण सर्व प्रकारच्या मूर्तिपूजेपासून दूर राहिलं पाहिजे, कारण यहोवा अशी अपेक्षा करतो की आपण मनापासून फक्‍त त्याचीच उपासना करावी.—१ योहा. ५:२१.

१० यहोवाने यहेज्केलला जे पहिलं दृश्‍य दाखवलं त्यात इस्राएली लोक अतिशय “भयंकर आणि घृणास्पद कामं” करत होते. तरी आपल्या या विश्‍वासू संदेष्ट्याला यहोवा म्हणतो: “आता तू यांपेक्षाही जास्त भयंकर आणि घृणास्पद गोष्टी बघशील.” मग ईर्ष्येला पेटवणाऱ्‍या त्या मूर्तीपेक्षा आणखी घृणास्पद काय असणार होतं?

दुसरं दृश्‍य: ७० वडीलजन खोट्या दैवतांपुढे धूप जाळत आहेत

११. मंदिराच्या आतल्या अंगणात प्रवेश केल्यावर यहेज्केलला कोणत्या धक्कादायक गोष्टी दिसल्या?

११ यहेज्केल ८:७-१२ वाचा. यहेज्केल भिंत खणतो आणि मंदिराच्या आतल्या अंगणात प्रवेश करतो. तिथे जवळच वेदी आहे. आत गेल्यानंतर त्याला भिंतींवर ‘सर्व प्रकारच्या सरपटणाऱ्‍या प्राण्यांच्या, किळसवाण्या जनावरांच्या आणि सगळ्या घृणास्पद मूर्तींच्या प्रतिमा c कोरलेल्या दिसतात.’ भिंतींवर कोरलेल्या त्या प्रतिमा खोट्या दैवतांच्या होत्या. पण यानंतर यहेज्केल याहून धक्कादायक काहीतरी पाहतो. ‘इस्राएलच्या घराण्यातल्या वडीलजनांपैकी ७० जण अंधारात उभे होते’ आणि ते खोट्या दैवतांपुढे धूप जाळत होते. खरंतर नियमशास्त्राप्रमाणे सुगंधी धूप हा देवाच्या विश्‍वासू सेवकांनी त्याला केलेल्या प्रार्थनांना सूचित करायचा आणि त्या प्रार्थना यहोवा स्वीकारायचा. (स्तो. १४१:२) पण ते ७० वडीलजन खोट्या दैवतांना धूप दाखवत होते. त्यामुळे यहोवाला तो अपवित्र आणि किळसवाणा वाटला. त्यांच्या प्रार्थना त्याच्यासाठी सहन न होणाऱ्‍या घाणेरड्या वासासारख्या होत्या. (नीति. १५:८) “यहोवा आपल्याला बघत नाही” असं म्हणून ते स्वतःला फसवत होते. पण यहोवाला सर्वकाही दिसत होतं, मंदिरात ते काय-काय करत होते ते त्याने जसंच्या तसं यहेज्केलला दाखवलं.

“अंधारात” केलेलं कोणतंही घृणास्पद काम यहोवाच्या नजरेतून लपत नाही (परिच्छेद ११ पाहा)

१२. (क) आपण ‘अंधारातसुद्धा’ यहोवाला विश्‍वासू का राहिलं पाहिजे? (ख) आणि या बाबतीत खासकरून कोणी एक चांगलं उदाहरण मांडलं पाहिजे?

१२ खोट्या दैवतांना धूप दाखवणाऱ्‍या इस्राएलच्या त्या ७० वडीलजनांकडून आपण कोणता धडा घेऊ शकतो? हाच, की यहोवाने आपली प्रार्थना ऐकावी आणि आपली उपासना शुद्ध असावी असं जर आपल्याला वाटत असेल, तर आपण ‘अंधारातही’ त्याला विश्‍वासू राहिलं पाहिजे. (नीति. १५:२९) यहोवाच्या नजरेतून कोणतीही गोष्ट लपत नाही हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. यहोवा खरंच अस्तित्वात आहे हे जर आपण मानत असू तर आपण असं कोणतंही काम करणार नाही ज्यामुळे त्याला वाईट वाटेल. (इब्री ४:१३) बायबलची तत्त्वं पाळण्यात खासकरून मंडळीतल्या वडिलांनी एक चांगलं उदाहरण मांडलं पाहिजे. (१ पेत्र ५:२, ३) भाऊबहिणींचीसुद्धा अशी अपेक्षा असते, की जे वडील आपल्याला सभांमध्ये शिकवतात आणि खऱ्‍या उपासनेत पुढाकार घेतात त्यांनी ‘अंधारातसुद्धा,’ म्हणजे कोणीही त्यांना पाहत नसतं तेव्हासुद्धा बायबलच्या तत्त्वांनुसार जीवन जगावं.—स्तो. १०१:२, ३.

तिसरं दृश्‍य: ‘तम्मूज दैवतासाठी बायका शोक करत आहेत’

१३. मंदिराच्या एका दरवाजाजवळ धर्मत्यागी बायका काय करत असल्याचं यहेज्केलला दिसलं?

१३ यहेज्केल ८:१३, १४ वाचा. यहेज्केलला दोन घृणास्पद दृश्‍यं दाखवल्यानंतर यहोवा पुन्हा त्याला म्हणतो: “ते ज्या घृणास्पद गोष्टी करत आहेत, त्यांपेक्षाही जास्त भयंकर गोष्टी तू आता बघशील.” पुढे यहेज्केलने काय पाहिलं? त्याने पाहिलं की ‘यहोवाच्या मंदिराच्या उत्तरेकडे असलेल्या दरवाजाच्या प्रवेशाजवळ तम्मूज दैवतासाठी बायका शोक करत’ आहेत. तम्मूज हा मेसोपटेम्याचा एक देव होता आणि तो इश्‍तार या प्रजनन देवीचा पती असल्याचं मानलं जायचं. d असं दिसतं, की त्या इस्राएली बायका तम्मूज दैवताच्या मृत्यूशी संबंधित एक धार्मिक विधी पाळत होत्या. त्यात त्या त्याच्यासाठी शोक करत होत्या. यहोवाचं मंदिर हे शुद्ध उपासनेचं एक खास ठिकाण होतं. पण या बायका तिथेच खोट्या धर्माची प्रथा पाळत होत्या. यहोवाच्या मंदिरात हा खोट्या धर्माचा विधी पाळल्यामुळे तो विधी काही पवित्र होणार नव्हता. कारण यहोवा म्हणतो की त्या बायका “घृणास्पद” गोष्टी करत होत्या.

१४. धर्मत्यागी बायका करत असलेल्या गोष्टींबद्दल यहोवाला जे वाटलं त्यावरून आपण काय शिकू शकतो?

१४ त्या बायका करत असलेल्या घृणास्पद गोष्टींबद्दल यहोवाला जे वाटलं त्यावरून आपण काय शिकू शकतो? हेच, की आपली उपासना शुद्ध असण्यासाठी आपण त्यात खोट्या धार्मिक प्रथांची भेसळ करू नये. त्यामुळे आपण असे कोणतेही सण किंवा उत्सव साजरे करू नये ज्यांची सुरुवात खोट्या धर्मातून झाली आहे. पण एखाद्या सणाची सुरुवात खोट्या धर्मातून झाली असेल तर त्याने काही फरक पडतो का? हो फरक पडतो. आज ख्रिसमस, इस्टर, न्यू इयर किंवा बर्थडे यांसारख्या दिवसांशी संबंधित असलेले रितीरिवाज पाळण्यात काहीच गैर नाही असं कदाचित आपल्याला वाटेल. पण आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, की अशा सणवारांची सुरुवात एकेकाळी खोट्या धर्मातून कशी झाली ते यहोवाने स्वतः पाहिलं आहे. ते बऱ्‍याच काळापासून पाळले जात असले किंवा शुद्ध उपासनेत त्यांना मिसळण्याचा प्रयत्न केला जात असला, तरी यहोवाच्या नजरेत ते घृणास्पदच आहेत. तो ते मुळीच स्वीकारत नाही.—२ करिंथ. ६:१७; प्रकटी. १८:२, ४.

चौथं दृश्‍य: ‘२५ माणसं सूर्याला नमन करत आहेत’

१५, १६. (क) मंदिराच्या आतल्या अंगणात २५ माणसं काय करत होती? (ख) आणि ती माणसं जे करत होती त्यामुळे यहोवाला खूप दुःख का झालं?

१५ यहेज्केल ८:१५-१८ वाचा. यहोवा यहेज्केलला चौथं आणि शेवटचं दृश्‍य दाखवतो. आणि तो पुन्हा एकदा त्याला म्हणतो, “तू यापेक्षाही जास्त घृणास्पद आणि भयंकर गोष्टी पाहशील.” ते ऐकून यहेज्केलला प्रश्‍न पडला असेल, ‘मी आत्तापर्यंत जे काही पाहिलं तेच इतकं भयंकर होतं, तर त्यापेक्षा भयंकर आणखी काय असेल?’ या वेळी यहेज्केल मंदिराच्या आतल्या अंगणात होता. तिथे मंदिराच्या प्रवेशाजवळ त्याने पाहिलं, की २५ माणसं ‘पूर्वेकडे तोंड करून सूर्याला नमन करत होती.’ ही माणसं यहोवाचा घोर अपमान करत होती. ते कसं?

१६ यहेज्केलने जे दृश्‍य पाहिलं ते डोळ्यांपुढे आणा. यहोवाच्या मंदिराचं प्रवेशद्वार पूर्वेकडे उघडायचं. त्यामुळे मंदिरात आत येताना उपासकांची तोंडं पश्‍चिमेकडे असायची आणि त्यांची पाठ सूर्य उगवण्याच्या दिशेला, म्हणजेच पूर्वेला असायची. पण दृष्टान्तातल्या त्या २५ माणसांनी याच्या अगदी उलट केलं. त्यांनी ‘आपली पाठ मंदिराकडे केली होती,’ कारण ते पूर्वेकडे तोंड करून सूर्याची उपासना करत होते. खरंतर ते ‘मंदिर यहोवाचं’ होतं, त्यामुळे मंदिराकडे पाठ करून त्यांनी मुळात यहोवाकडेच पाठ फिरवली होती. (१ राजे ८:१०-१३) ही २५ माणसं धर्मत्यागी होती. त्यांनी यहोवाकडे साफ दुर्लक्ष केलं आणि अनुवाद ४:१५-१९ मध्ये दिलेली आज्ञा मोडली. असं करून त्यांनी खरंच यहोवाचा किती मोठा अपमान केला!

आपल्या सेवकांनी फक्‍त आपली उपासना करावी अशी अपेक्षा यहोवा करतो, कारण ती मिळण्याचा हक्क त्यालाच आहे

१७, १८. (क) मंदिरात सूर्याची उपासना करणाऱ्‍यांकडून आपण कोणता धडा घेऊ शकतो? (ख) धर्मत्यागी इस्राएली लोकांचं नातं कोणासोबत बिघडलं आणि कशामुळे ते बिघडलं?

१७ सूर्याची उपासना करणाऱ्‍या माणसांकडून आपण कोणता धडा घेऊ शकतो? आपल्याला जर आपली उपासना शुद्ध ठेवायची असेल तर आपण यहोवाकडे समज आणि बुद्धी मागितली पाहिजे. लक्षात असू द्या, यहोवाच आपला सूर्य आहे आणि त्याचं वचन ‘आपल्या मार्गासाठी प्रकाशासारखं आहे.’ (स्तो. ८४:११; ११९:१०५) यहोवा त्याच्या वचनाद्वारे आणि संघटनेच्या प्रकाशनांद्वारे आपल्याला बुद्धी देतो. त्यामुळे आपण असे निर्णय घेऊ शकतो ज्यांमुळे आपण आता आनंदी राहू शकतो आणि भविष्यातही आपल्याला सर्वकाळाचं जीवन मिळेल. पण याच्या उलट, मार्गदर्शनासाठी आपण जगाकडे वळलो तर एका अर्थी आपण यहोवाकडेच पाठ फिरवत असू. आणि आपण जर असं केलं तर यहोवा खूप दुःखी होईल, त्याला खूप वाईट वाटेल. आणि आपल्या देवाचं मन दुखवायची आपली मुळीच इच्छा नाही. यहेज्केलच्या या दृष्टान्तातून आपल्याला आणखी एक इशारा मिळतो. तो हा, की जे लोक सत्याकडे पाठ फिरवतात अशांसोबत, म्हणजेच धर्मत्यागी लोकांसोबत आपण कोणतेही संबंध ठेवू नयेत. कारण ते देवाची निंदा करणारे आहेत.—नीति. ११:९.

१८ आतापर्यंत आपण पाहिलं की यहेज्केलने दृष्टान्तात मूर्तिपूजेची आणि खोट्या धर्माची चार धक्कादायक दृश्‍यं पाहिली. त्यावरून दिसून आलं की यहूदाच्या धर्मत्यागी लोकांची उपासना किती घृणास्पद झाली होती आणि किती खालच्या थराला गेली होती. त्यांनी खोट्या दैवतांची उपासना केल्यामुळे यहोवासोबतचं त्यांचं नातं खराब झालं होतं. आणि जेव्हा कधी अशा प्रकारे उपासना भ्रष्ट होते तेव्हा लोकांचे नैतिक स्तरसुद्धा घसरतात. म्हणूनच धर्मत्यागी इस्राएली लोकांनी सर्व प्रकारची वाईट कामं केली. आणि याचा परिणाम म्हणजे, यहोवासोबत त्यांचं नातं तर बिघडलंच, पण इतरांसोबतही बिघडलं. पुढे यहोवाने यहेज्केल संदेष्ट्याला दृष्टान्तात दाखवलं, की यहूदाचे धर्मत्यागी लोक नैतिक रितीने किती खालच्या थराला गेले होते. याबद्दलच आता आपण पाहू या.

नैतिक अशुद्धता—“ते तुझ्यामध्ये राहून अश्‍लील वर्तन करतात”

१९. इस्राएली लोकांचे नैतिक स्तर किती घसरले होते याचं यहेज्केलने कसं वर्णन केलं?

१९ यहेज्केल २२:३-१२ वाचा. मोठमोठ्या अधिकाऱ्‍यांपासून सामान्य माणसापर्यंत प्रत्येक जण भ्रष्ट होता. लोकांचे “प्रधान” म्हणजेच पुढारी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून निर्दोष लोकांचं रक्‍त सांडत होते. त्यांना बघून सामान्य लोकसुद्धा देवाच्या नियमशास्त्राचा अनादर करत होते. जसं की, मुलं आईवडिलांना ‘तुच्छ लेखत’ होती आणि बरेच जण कुटुंबातल्या लोकांसोबतच शरीर संबंध ठेवत होते. तसंच, बंडखोर इस्राएली लोक त्यांच्यामध्ये राहणाऱ्‍या विदेशी लोकांना फसवत होते. ते अनाथ मुलांना आणि विधवांना वाईट वागणूक देत होते. इस्राएली माणसं शेजाऱ्‍यांच्या बायकांसोबत घाणेरडी कामं करत होती. लोक इतके लालची झाले होते, की ते इतरांना लुबाडत होते, लाच घेत होते आणि भरमसाठ व्याज वसूल करत होते. खरंतर नियमशास्त्र देण्यामागचा उद्देश हा होता, की इस्राएली लोकांनी एकमेकांवर प्रेम करावं. पण ते या गोष्टीकडे दुर्लक्ष करून नियमशास्त्र पायांखाली तुडवत होते. हे पाहून यहोवाला खरंच किती दुःख झालं असेल! त्यामुळेच त्याने यहेज्केलद्वारे त्यांना असं म्हटलं: ‘तुम्ही मला पूर्णपणे विसरून गेला आहात!’

ख्रिस्ती धर्मजगताच्या प्रभावामुळे सध्याचं हे जग हिंसा आणि अनैतिक कामं करण्यात दिवसेंदिवस आणखीनच खालच्या थराला चाललं आहे (परिच्छेद २० पाहा)

२०. सध्याच्या जगाची नैतिक स्थिती यहूदासारखीच कशी आहे?

२० धर्मत्यागी यहूदाप्रमाणेच सध्याचं हे जगसुद्धा नैतिक रितीने अगदी खालच्या थराला गेलं आहे. आपल्याला सहसा पाहायला मिळतं की राजकारणातले लोक त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करतात आणि सामान्य लोकांवर जुलूम करतात. तसंच आज बहुतेक धर्मगुरू आणि खासकरून ख्रिस्ती धर्मजगतातले पाळक युद्ध करणाऱ्‍या राष्ट्रांवर देवाचा आशीर्वाद मागतात. पण खरंतर या युद्धांमध्ये लाखो लोकांचे जीव जातात. हेच पाळक आज बायबलच्या स्पष्ट आणि शुद्ध नैतिक स्तरांमध्ये भेसळ करून त्यांचं महत्त्वही कमी करत आहेत. याचा परिणाम असा झाला आहे, की जगाचे नैतिक स्तर दिवसेंदिवस आणखीनच घसरत आहेत. त्यामुळे यहोवाने धर्मत्यागी यहूदाला जे म्हटलं होतं तेच तो आता ख्रिस्ती धर्मजगतालाही म्हणेल: ‘तुम्ही मला पूर्णपणे विसरून गेला आहात!’

२१. यहूदा राष्ट्राच्या नैतिक अशुद्धतेवरून आपण कोणता धडा घेऊ शकतो?

२१ प्राचीन यहूदाच्या नैतिक अशुद्धतेवरून आज आपण कोणता धडा घेऊ शकतो? हाच, की यहोवाने आपली उपासना स्वीकारावी असं जर आपल्याला वाटत असेल, तर आपलं वागणं-बोलणं नेहमी शुद्ध असलं पाहिजे. हे खरं आहे, की सध्याच्या या भ्रष्ट जगात शुद्ध राहणं इतकं सोपं नाही. (२ तीम. ३:१-५) पण सर्व प्रकारच्या घाणेरड्या आणि अनैतिक कामांबद्दल यहोवाला कसं वाटतं हे आपल्याला माहीत आहे. (१ करिंथ. ६:९, १०) आपलं यहोवावर आणि त्याच्या नियमांवर प्रेम आहे. म्हणून आपण यहोवाच्या नैतिक स्तरांप्रमाणे जीवन जगतो. (स्तो. ११९:९७; १ योहा. ५:३) पण आपण जर अनैतिक कामं केली तर याचा अर्थ असा होईल, की आपल्या शुद्ध आणि पवित्र देवावर आपलं प्रेम नाही. त्यामुळे आपण असं काहीही करणार नाही ज्यामुळे यहोवा आपल्याला म्हणेल: ‘तुम्ही मला पूर्णपणे विसरून गेला आहात!’

२२. (क) तुम्ही काय करायचा निर्धार केला आहे? (ख) पुढच्या अध्यायात आपण काय पाहणार आहोत?

२२ आतापर्यंत आपण हे पाहिलं, की यहोवाने यहूदाची भ्रष्ट उपासना आणि त्यांची वाईट कामं कशी उघड केली. तसंच, त्यांतून आपण अनेक मौल्यवान धडेही शिकलो. आणि त्यामुळे फक्‍त यहोवाची उपासना करायचा आपला निर्धार आणखी पक्का झाला आहे; कारण उपासना मिळण्याचा हक्क त्यालाच आहे. आपण सर्व प्रकारच्या मूर्तिपूजेपासून दूर राहिलं पाहिजे आणि नैतिक रितीने शुद्ध असलं पाहिजे. पण प्रश्‍न येतो, की यहोवाने यहूदाच्या त्या बंडखोर लोकांचं काय केलं? यहोवाने यहेज्केलला मंदिरातली दृश्‍यं दाखवल्यानंतर त्याला अगदी स्पष्ट शब्दांत म्हटलं: “मी त्यांच्यावर माझ्या क्रोधाचा वर्षाव करीन.” (यहे. ८:१७, १८) यहोवाने अविश्‍वासू यहूदा राष्ट्राला काय शिक्षा दिली हे आपण जाणून घेतलं पाहिजे. कारण तीच शिक्षा तो या दुष्ट जगालाही देणार आहे. पुढच्या अध्यायात आपण पाहू या, की यहोवाने यहूदाला काय शिक्षा द्यायची भविष्यवाणी केली आणि ती कशी पूर्ण झाली.

a यहेज्केलच्या पुस्तकात ‘इस्राएल’ हा शब्द बऱ्‍याच वेळा यहूदा आणि यरुशलेममध्ये राहणाऱ्‍या लोकांना सूचित करण्यासाठी वापरला आहे.—यहे. १२:१९, २२; १८:२; २१:२,३.

b “ईर्ष्या” या शब्दावरून कळतं, की यहोवासाठी विश्‍वासूपणा खूप महत्त्वाचा आहे. आपल्या सेवकांनी आपल्याला विश्‍वासू राहावं असं त्याला वाटतं. उदाहरणार्थ, एक पत्नी जेव्हा आपल्या पतीशी अविश्‍वासूपणे वागते तेव्हा त्या पतीला ईर्ष्या वाटते, खूप राग येतो. अगदी तसंच यहोवाला त्याच्या लोकांबद्दल वाटतं. (नीति. ६:३४) यहोवाने इस्राएली लोकांशी एक करार केला होता. पण मूर्तिपूजा करून ते त्याच्याशी अविश्‍वासूपणे वागले, तेव्हा एका पतीला जसा राग येतो तसाच राग त्यालाही आला. बायबलबद्दल माहिती देणाऱ्‍या एका पुस्तकात म्हटलं आहे, की ‘देव पवित्र असल्यामुळे त्याला ईर्ष्या वाटते. तो एकटाच पवित्र देव असल्यामुळे त्याला सोडून दुसऱ्‍या कोणाचीही किंवा कशाचीही उपासना केलेली त्याला चालत नाही.’—निर्ग. ३४:१४.

c ‘घृणास्पद मूर्ती’ यासाठी असलेला हिब्रू शब्द, “विष्ठा” या अर्थाच्या शब्दाशी संबंधित आहे. एखादी गोष्ट किती किळसवाणी आहे हे दाखवण्यासाठी तो शब्द वापरला जातो.

d सुमेरियन लिखाणांत तम्मूजला दुमुझी म्हटलं आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की निम्रोद हे तम्मूजचं आणखी एक नाव आहे. पण याला काही पुरावा नाही.