व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय १५

“मी तुझ्या अनैतिक कामांचा अंत करीन”

“मी तुझ्या अनैतिक कामांचा अंत करीन”

यहेज्केल १६:४१

अध्याय कशाबद्दल आहे: यहेज्केल आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकात ज्या वेश्‍यांबद्दल सांगितलं आहे त्यांच्या उदाहरणातून आपल्याला काय शिकायला मिळतं

१, २. कोणत्या प्रकारच्या वेश्‍येबद्दल आपल्याला खूप घृणा वाटू शकते?

 कधी-कधी काही स्त्रिया आणि मुली आपलं चांगलं जीवन सोडून वेश्‍या बनतात. कदाचित आपण विचार करू की त्यांनी हे इतकं वाईट जीवन का निवडलं असेल. घरच्यांनी मारहाण केल्यामुळे किंवा लहानपणी त्यांच्यासोबत काही वाईट घडल्यामुळे त्यांनी हा मार्ग निवडला का? किंवा खूप गरिबीमुळे त्यांना स्वतःला विकायची पाळी आली का? किंवा त्यांचे पती त्यांना मारायचे का? या दुष्ट जगात आपल्याला अशा बऱ्‍याच घटनांबद्दल ऐकायला मिळतं. म्हणूनच, येशू जेव्हा पृथ्वीवर होता तेव्हा तो अशा स्त्रियांशी खूप प्रेमळपणे वागला. त्याने म्हटलं की जेव्हा लोक पश्‍चात्ताप करतात आणि आपला मार्ग बदलतात तेव्हा त्यांना एक चांगलं जीवन मिळू शकतं.—मत्त. २१:२८-३२; लूक ७:३६-५०.

आता एका अगदी वेगळ्या प्रकारच्या वेश्‍येबद्दल विचार करा. तिचा पती खूप चांगला आणि प्रामाणिक होता तरीही तिने मुद्दामहून हे जीवन निवडलं. तिला त्यात काहीच चुकीचं वाटत नाही, उलट तिला त्याबद्दल गर्व वाटतो. या कामातून मिळणाऱ्‍या पैशाची तिला खूप हाव आहे. आणि तिला वाटतं की ती दुसऱ्‍यांना आपल्या ताब्यात ठेवू शकते. या स्त्रीबद्दल आणि तिने ज्या प्रकारचं जीवन निवडलं आहे, त्याबद्दल आपल्याला फक्‍त घृणाच वाटू शकते. जशी घृणा आपल्याला त्या वेश्‍येबद्दल वाटते तशीच घृणा यहोवा देवाला खोट्या धर्माबद्दल वाटते. म्हणूनच खोट्या धर्माबद्दल बोलताना यहोवाने वारंवार वेश्‍येचं उदाहरण वापरलं.

३. या अध्यायात आपण यहेज्केलच्या पुस्तकातल्या कोणत्या दोन अहवालांवर चर्चा करणार आहोत?

इस्राएल आणि यहूदामधले लोक यहोवाशी किती अविश्‍वासूपणे वागले याचे दोन अहवाल आपल्याला यहेज्केलच्या पुस्तकात वाचायला मिळतात. यहोवाने त्यांच्या अविश्‍वासूपणाची तुलना वेश्‍येच्या कामांशी केली. (यहे. अध्या. १६२३) त्या दोन अहवालांवर चर्चा करण्याआधी आपण आणखी एका लाक्षणिक वेश्‍येबद्दल बोलू या. ही वेश्‍या यहेज्केलच्या आधीच्या काळापासून, इतकंच काय तर इस्राएल राष्ट्र बनण्याच्या आधीपासून वाईट कामं करत होती. आणि ती आज आणखी मोठ्या प्रमाणावर वाईट कामं करत आहे. या वेश्‍येबद्दल आपल्याला बायबलच्या शेवटच्या पुस्तकात, म्हणजे प्रकटीकरणाच्या पुस्तकात वाचायला मिळतं.

‘वेश्‍यांची आई’

४, ५. “मोठी बाबेल” कोणाला सूचित करते? आणि असं आपण का म्हणू शकतो? (सुरुवातीचं चित्र पाहा.)

पहिल्या शतकाच्या शेवटी येशूने प्रेषित योहानला जो दृष्टान्त दाखवला त्यात त्याला एक विलक्षण स्त्री दिसते. तिला ‘मोठी वेश्‍या’ आणि ‘मोठी बाबेल, वेश्‍यांची आई’ म्हणण्यात आलं आहे. (प्रकटी. १७:१, ५) ही वेश्‍या नेमकं कोणाला सूचित करते याबद्दल अनेक शतकांपर्यंत धार्मिक नेते आणि बायबलचे विद्वान विचार करत होते. अनेक लोकांचं याबद्दल वेगवेगळं मत आहे. काहींनी म्हटलं आहे की ती प्राचीन काळातल्या बाबेलला सूचित करते, तर काहींनी म्हटलं आहे की ती रोमला किंवा रोमन कॅथलिक चर्चला सूचित करते. पण गेल्या बऱ्‍याच वर्षांपासून यहोवाच्या साक्षीदारांना हे माहीत आहे, की ही ‘मोठी वेश्‍या’ नेमकं कोणाला सूचित करते. ती जगभरात पसरलेल्या खोट्या धर्माच्या साम्राज्याला सूचित करते. असं आपण का म्हणू शकतो?

या वेश्‍येने ‘पृथ्वीच्या राजांसोबत’ म्हणजे राजकीय शक्‍तींसोबत अनैतिक संबंध ठेवले. यावरून स्पष्टपणे कळतं की ती राजकीय शक्‍तींना सूचित करत नाही. प्रकटीकरणाच्या पुस्तकात असंही सांगितलं आहे की ‘पृथ्वीचे व्यापारी,’ म्हणजे व्यावसायिक जग मोठ्या बाबेलच्या नाशामुळे दुःख करेल. म्हणजेच मोठी बाबेल व्यावसायिक जगाला सूचित करत नाही. तर मग ती नक्की कोणाला सूचित करते? तिच्याबद्दल म्हटलं आहे की ती भूतविद्या, मूर्तिपूजा आणि लोकांची फसवणूक करते. या सर्व गोष्टी आजच्या भ्रष्ट धार्मिक संघटनांना लागू होत नाहीत का? हेसुद्धा लक्षात घ्या की ही वेश्‍या जंगली पशूवर, म्हणजे राजकीय शक्‍तींवर बसलेली आहे. याचाच अर्थ, जगातल्या राजकीय शक्‍तींवर तिचा काही प्रमाणात प्रभाव आहे. तिच्याबद्दल असंही म्हटलं आहे की ती देवाच्या लोकांचा छळ करते. (प्रकटी. १७:२, ३; १८:११, २३, २४) खोटा धर्म आजपर्यंत याच सर्व गोष्टी करत आलेला नाही का?

प्राचीन बाबेलमधून सर्व प्रकारच्या खोट्या धार्मिक रितीरिवाजांचा आणि धार्मिक संघटनांचा जन्म झाला (परिच्छेद ६ पाहा)

६. मोठी बाबेल कोणत्या अर्थाने ‘वेश्‍यांची आई’ आहे?

पण मोठ्या बाबेलला फक्‍त ‘मोठी वेश्‍याच’ नाही, तर ‘वेश्‍यांची आईसुद्धा’ का म्हटलं आहे? कारण खोट्या धर्माचे बरेच भाग आहेत. त्याच्यात असंख्य गट, समुदाय आणि पंथ आहेत. हे सगळे कसे निर्माण झाले? प्राचीन बाबेलमध्ये काय झालं याचा विचार करा. भाषेत गोंधळ झाला तेव्हा लोकांसोबतच खोटे धार्मिक रितीरिवाज जगभरात पसरत गेले. त्यामुळेच जगात नवनवीन धर्म सुरू झाले. म्हणूनच ‘मोठ्या बाबेलला’ तिचं नाव जुन्या बाबेल शहरावरून देण्यात आलं. कारण तिथूनच सगळ्या खोट्या धर्मांचा जन्म झाला. (उत्प. ११:१-९) यामुळे आपल्याला म्हणता येईल की हे सगळे धर्म एकाच संघटनेतून आले आहेत. जणू काय ते धर्म एकाच मोठ्या वेश्‍येच्या ‘मुली’ आहेत. अशाच धर्मांचा वापर करून सैतान लोकांना फसवतो. तो त्यांना मूर्तिपूजा आणि भूतविद्या करायला लावतो. तसंच, तो त्यांना देवाच्या नावाला कलंक लावणाऱ्‍या शिकवणी आणि रितीरिवाज पाळायला लावतो. जगभरात पसरलेल्या या भ्रष्ट संघटनेबद्दल देवाच्या लोकांना असा इशारा देण्यात आला आहे: “माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापांचे भागीदार होऊ नये आणि तुमच्यावर तिच्या कोणत्याही पीडा येऊ नयेत म्हणून तिच्यामधून बाहेर या.”प्रकटीकरण १८:४, ५ वाचा.

७. मोठ्या बाबेलमधून “बाहेर या,” या इशाऱ्‍याप्रमाणे आपण का चालतो?

‘मोठ्या बाबेलमधून बाहेर या,’ या देवाने दिलेल्या इशाऱ्‍याप्रमाणे तुम्ही चालत आहात का? खरंतर लोकांमध्ये “देवाच्या मार्गदर्शनाची भूक” असल्यामुळेच ते देवाचा शोध घेतात. (मत्त. ५:३) पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की यहोवानेच ही इच्छा त्यांच्यामध्ये टाकली आहे. त्यामुळे त्याची शुद्ध उपासना केल्यामुळेच ही गरज योग्य रितीने पूर्ण होऊ शकते. यहोवाला सोडून इतर कोणाचीही उपासना करणं हे त्याच्या नजरेत वेश्‍येसारखी कामं करण्यासारखं आहे. त्याचे सेवक या नात्याने आपल्याला ही गोष्ट माहीत आहे. त्यामुळे खोट्या उपासनेपासून दूर राहण्याच्या त्याच्या इशाऱ्‍याचं आपण पालन करतो. पण सैतान नेहमी देवाच्या लोकांना अशा प्रकारच्या खोट्या उपासनेत गुंतवण्याचा प्रयत्न करतो. आणि बऱ्‍याच वेळा तो यशस्वीसुद्धा झाला आहे. यहेज्केलच्या दिवसांपर्यंत, बऱ्‍याच काळापासून देवाचे लोक अशा खोट्या उपासनेत गुंतले होते. त्या इतिहासाचा आपण अभ्यास केला तर आपल्याला देवाच्या स्तरांबद्दल, त्याच्या न्यायाबद्दल आणि त्याच्या दयेबद्दल बरंच काही शिकायला मिळू शकतं.

“तू वेश्‍या बनलीस”

८-१०. (क) शुद्ध उपासनेबद्दल आपण कोणती महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवू शकतो? (ख) यहोवा खोट्या उपासनेला कोणत्या नजरेने पाहतो? उदाहरण देऊन समजवा.

आपल्या लोकांच्या अविश्‍वासूपणामुळे यहोवाला किती दुःख झालं हे दाखवण्यासाठी, त्याने यहेज्केलच्या पुस्तकात वेश्‍येच्या उदाहरणाचा वापर केला. यहेज्केलने देवाच्या प्रेरणेने जे अहवाल लिहिले, त्यांमध्ये या लोकांच्या अविश्‍वासूपणाचं आणि अनैतिक कामांचं वर्णन करण्यात आलं आहे. त्यांनी यहोवासोबत जो विश्‍वासघात केला त्यामुळे त्याला खूप वाईट वाटलं. पण त्याने त्यांची तुलना वेश्‍यांसोबत का केली?

याचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपण आधी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की शुद्ध उपासना करण्यासाठी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे. याबद्दल आपण ५ व्या अध्यायात चर्चा केली होती. इस्राएल राष्ट्राला दिलेल्या नियमशास्त्रात यहोवाने म्हटलं होतं, “माझ्याशिवाय [किंवा, “माझ्या विरोधात,” तळटीप] तुम्हाला इतर कोणतेही देव नसावेत. . . . मी तुमचा देव यहोवा आहे आणि तुम्ही फक्‍त माझीच उपासना करावी अशी मी अपेक्षा करतो.” (निर्ग. २०:३, ५) नंतर त्याने हीच गोष्ट एका वेगळ्या प्रकारे सांगितली. त्याने म्हटलं, “तुम्ही दुसऱ्‍या कोणत्याही देवापुढे वाकू नका, कारण फक्‍त आपलीच उपासना केली जावी, अशी अपेक्षा करणारा देव म्हणून यहोवाला ओळखलं जातं. खरोखर, फक्‍त आपलीच उपासना केली जावी अशी अपेक्षा करणारा तो देव आहे.” (निर्ग. ३४:१४) यहोवाने जे म्हटलं त्यावरून त्याला काय हवं आहे हे अगदी स्पष्टच होतं. यहोवा आपली उपासना तेव्हाच स्वीकारेल जेव्हा आपण फक्‍त त्याचीच उपासना करू.

१० हे आणखी चांगल्या प्रकारे समजण्यासाठी आपण पती-पत्नी यांच्यामध्ये असलेल्या नात्याचं उदाहरण घेऊ शकतो. आपल्या जोडीदाराने आपल्यावरच प्रेम करावं आणि आपल्यालाच विश्‍वासू राहावं अशी त्या दोघांचीही अपेक्षा असते. त्यांच्यापैकी एखाद्याने दुसऱ्‍या व्यक्‍तीवर प्रेम केलं किंवा तिच्यासोबत शरीरसंबध ठेवले तर त्याच्या जोडीदाराला ईर्ष्या वाटेल किंवा विश्‍वासघात केल्यासारखं वाटेल. (इब्री लोकांना १३:४ वाचा.) शुद्ध उपासनेच्या बाबतीतही हीच गोष्ट खरी आहे. जेव्हा यहोवाला समर्पित असलेले, त्याचे लोक दुसऱ्‍या देवांकडे वळतात, तेव्हा त्यालाही विश्‍वासघात झाल्यासारखं वाटतं. यहोवाला आपल्या लोकांच्या विश्‍वासघातामुळे किती दुःख झालं, याबद्दल त्याने यहेज्केलच्या १६ व्या अध्यायात सांगितलं आहे.

११. यहोवाने यरुशलेमबद्दल आणि तिच्या सुरुवातीबद्दल काय सांगितलं?

११ यहेज्केलच्या १६ व्या अध्यायात यहोवा त्याच्या दुःखाबद्दल खूप वेळ बोलला. हिब्रू शास्त्रातल्या मोठ्या भविष्यवाण्यांपैकी कोणत्याही भविष्यवाणीत यहोवा इतका वेळ बोललेला नाही. या अध्यायात तो विश्‍वासघातकी यहूदा राष्ट्राबद्दल बोलतो. यासाठी तो यरुशलेम नगरीचा इतिहास सांगतो, कारण यरुशलेम नगरी यहूदा राष्ट्राला सूचित करते. पुढे यहोवा सांगतो की यरुशलेम नगरीचा जन्म कसा झाला आणि तिने त्याच्यासोबत विश्‍वासघात कसा केला. तिचा जन्म झाला तेव्हा ती एका असहाय्य बाळासारखी होती. ती रक्‍तात लोळत पडली होती आणि तिला सांभाळणारं कोणी नव्हतं. तिचे आईवडील कनानी होते. भविष्यवाणीतली ही गोष्ट खरी आहे, कारण दावीदने यरुशलेम नगरी काबीज करण्याआधी ती कनानी वंशातल्या यबूसी लोकांच्या ताब्यात होती. यहोवाने या लहान बाळावर दया केली. तिला स्वच्छ केलं आणि तिला सांभाळलं. ती मोठी झाली तेव्हा जणू ती त्याची पत्नी बनली. हे इस्राएली लोकांनी यरुशलेमवर ताबा मिळवला तेव्हा घडलं. खरंतर इस्राएली लोकांनी दावीदच्या फार आधीच्या काळापासून, म्हणजे मोशेच्या दिवसांत यहोवासोबत करार करून एक नातं जोडलं होतं. (निर्ग. २४:७, ८) जसा एक श्रीमंत माणूस आपल्या पत्नीला दागदागिने देतो, तसंच यरुशलेम जेव्हा देशाची राजधानी बनली, तेव्हा यहोवाने तिला खूप धनदौलत, ऐश्‍वर्य आणि आशीर्वाद दिले. —यहे. १६:१-१४.

शलमोनने आपल्या विदेशी बायकांच्या दबावाखाली येऊन यरुशलेमला मूर्तिपूजेने भ्रष्ट केलं (परिच्छेद १२ पाहा)

१२. यरुशलेममध्ये अविश्‍वासूपणाची सुरुवात कशी झाली?

१२ पण यापुढे काय घडलं त्याकडे लक्ष द्या. यहोवा म्हणाला, “तू आपल्या सुंदरतेची घमेंड करू लागलीस आणि तुला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे तू वेश्‍या बनलीस. येणाऱ्‍या-जाणाऱ्‍या प्रत्येकासोबत तू उघड-उघड वेश्‍येची कामं केलीस, आणि आपलं सौंदर्य त्यांच्यावर उधळत राहिलीस.” (यहे. १६:१५) शलमोनच्या काळात यहोवाने आपल्या लोकांना इतके आशीर्वाद दिले, इतकी धनदौलत दिली की यरुशलेम त्या काळातली सर्वात वैभवशाली नगरी बनली. (१ राजे १०:२३, २७) पण इथूनच अविश्‍वासूपणाची सुरुवात झाली. शलमोन राजाने आपल्या बऱ्‍याच विदेशी बायकांना खूश करण्यासाठी यरुशलेममध्ये खोट्या दैवतांची उपासना सुरू केली. (१ राजे ११:१-८) पण शलमोननंतर येणाऱ्‍या राजांनी तर आणखीन वाईट कामं केली. त्यांनी संपूर्ण देशाला खोट्या उपासनेने भरून टाकलं. त्यांनी यहोवाच्या नजरेत वेश्‍येसारखी कामं केली होती. यहोवाला अशा विश्‍वासघाताबद्दल कसं वाटलं? तो म्हणाला, “अशा गोष्टी कधी घडायला नको होत्या, आणि पुढेही त्या कधी घडायला नकोत.” (यहे. १६:१६) पण दुःखाची गोष्ट म्हणजे, यहोवाचे लोक खोट्या उपसनेच्या दलदलीत आणखीनच खोल रुतत गेले!

काही इस्राएली लोकांनी मोलखसारख्या खोट्या दैवतांना त्यांच्या मुलांचा बळी दिला

१३. यरुशलेमच्या लोकांनी कोणता दुष्टपणा केला होता?

१३ आपल्या लोकांचा दुष्टपणा उघड करताना, यहोवाला किती दुःख झालं असेल आणि त्याला किती घृणा वाटली असेल याचा विचार करा. तो म्हणाला, “तुझी वेश्‍येची कामं काय कमी होती, म्हणून तू माझ्यासाठी जन्माला घातलेल्या तुझ्या मुलामुलींचाही मूर्तींपुढे बळी दिलास? तू माझ्या मुलांची कत्तल केलीस आणि त्यांचा आगीत होम केलास.” (यहे. १६:२०, २१) यरुशलेमच्या लोकांनी जी घृणास्पद कामं केली, त्यांवरून सैतान किती निर्दयी आणि दुष्ट आहे हे आपल्याला कळतं. देवाच्या लोकांना अशा वाईट कामांमध्ये फसवायला त्याला आवडतं. पण यहोवाच्या नजरेतून काहीच लपत नाही. तो लवकरच न्याय करेल आणि सैतानाच्या कामांमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करेल. ईयोब ३४:२४ वाचा.

१४. (क) यहोवाने दिलेल्या उदाहरणात यरुशलेमच्या दोन बहिणी कोण होत्या? (ख) आणि तिघींपैकी सर्वात दुष्ट कोण होती?

१४ खरंतर, यरुशलेमला आपल्या दुष्ट कामांबद्दल लाज वाटायला हवी होती, पण तिला तसं वाटलं नाही. तिने आपली वेश्‍येची कामं चालूच ठेवली. त्यामुळे यहोवाने म्हटलं, की ती तर इतर वेश्‍यांपेक्षासुद्धा निर्लज्ज आहे, कारण तिच्यासोबत वाईट कामं करणाऱ्‍या पुरुषांना तीच पैसे देत होती. (यहे. १६:३४) यहोवा म्हणाला यरुशलेम तिच्या ‘आईसारखीच’ आहे. कारण त्या देशात आधी राज्य करणाऱ्‍या मूर्तिपूजक लोकांसारखीच ती वागत होती. (यहे. १६:४४, ४५) कुटुंबातल्या नात्याचं उदाहरण देत यहोवा पुढे म्हणाला, की शोमरोन यरुशलेमची मोठी बहीण आहे. कारण तिने आधीच खोटी उपासना सुरू करून वेश्‍येसारखी कामं केली होती. यहोवाने पुढे आणखी एका बहिणीचा म्हणजे सदोमचा उल्लेख केला. कारण तिच्या घमेंडी वृत्तीमुळे आणि नीच कामांमुळे, बऱ्‍याच काळाआधी तिचा नाश करण्यात आला होता. यावरून यहोवाला असं म्हणायचं होतं, की दुष्ट कामं करण्यात यरुशलेमने आपल्या दोन्ही बहिणींना, म्हणजे शोमरोनला आणि सदोमलाही मागे टाकलं होतं. (यहे. १६:४६-५०) देवाने आपल्या लोकांना वारंवार इशारे दिले, पण ते यहोवाच्या आज्ञांविरुद्ध बंड करून वाईट कामं करतच राहिले.

१५. यहोवाने यरुशलेमवर न्यायदंड का आणला? आणि यामुळे पुढे देवाच्या लोकांना कोणती आशा मिळणार होती?

१५ आता यहोवा काय करणार होता? त्याने यरुशलेमला म्हटलं, “तू ज्यांना खूश केलंस त्या तुझ्या सगळ्या प्रियकरांना मी गोळा करीन,” आणि “मी तुला तुझ्या प्रियकरांच्या हाती देईन.” देवाच्या लोकांनी ज्या मूर्तिपूजक राष्ट्रांशी मैत्री केली होती, तीच राष्ट्रं जणू यरुशलेमचं सौंदर्य मातीला मिळवणार होती, तिची संपत्ती लुटून नेणार होती आणि तिचा नाश करणार होती. तो पुढे म्हणाला, “तुला दगडमार करून ते आपल्या तलवारींनी तुझी कत्तल करतील.” यहोवाने हा न्यायदंड का आणला? त्याला आपल्या लोकांचा पूर्णपणे नाश करायचा होता का? नाही. उलट त्याने म्हटलं, “मी तुझ्या अनैतिक कामांचा अंत करीन.” पुढे तो म्हणाला, “तेव्हाच तुझ्यावरचा माझा राग शांत होईल, आणि तुझ्यावर असलेला माझा क्रोध दूर होईल. मी शांत होईन आणि पुन्हा कधी माझा क्रोध तुझ्यावर भडकणार नाही.” आपण ९ व्या अध्यायात चर्चा केल्याप्रमाणे, आपल्या लोकांना त्यांच्या मायदेशात परत आणणं आणि शुद्ध उपासना पुन्हा सुरू करणं, हा यहोवाचा आधीपासूनचा उद्देश होता. पण त्याला त्यांना बंदिवासातून परत का आणायचं होतं? कारण त्याने म्हटलं होतं, “तू तरुण असताना मी तुझ्याशी जो करार केला होता, तो मी आठवणीत ठेवीन.” (यहे. १६:३७-४२, ६०) यहोवा त्याच्या लोकांसारखा विश्‍वासघातकी नव्हता, तर तो आपल्या लोकांना पूर्णपणे विश्‍वासू राहणार होता!—प्रकटीकरण १५:४ वाचा.

१६, १७. (क) अहला आणि अहलीबा या ख्रिस्ती धर्मजगताला सूचित करत नाहीत असं आता आपण का म्हणतो? (“वेश्‍या बनलेल्या दोन बहिणी” ही चौकट पाहा.) (ख) यहेज्केलच्या १६ व्या आणि २३ व्या अध्यायांतून आपल्याला कोणते व्यावहारिक धडे शिकायला मिळतात?

१६ यहेज्केलच्या १६ व्या अध्यायात यहोवाने जी मोठी आणि रोमांचक भविष्यवाणी केली, त्यावरून आपल्याला त्याच्या नीतिमान स्तरांबद्दल, त्याच्या न्यायाच्या गुणाबद्दल आणि त्याच्या अपार दयेबद्दल बरंच काही शिकायला मिळतं. यहेज्केलच्या २३ व्या अध्यायातही आपल्याला याच गोष्टी शिकायला मिळतात. यहोवाने वेश्‍येसारखी कामं करणाऱ्‍या आपल्या लोकांना ज्या गोष्टींबद्दल स्पष्टपणे बजावलं, त्या गोष्टींवर आज खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी गंभीरतेने विचार केला पाहिजे. यरुशलेमच्या आणि यहूदाच्या लोकांनी जसं यहोवाचं मन दुखावलं तसं आपण कधीच दुखावू नये. कारण याचे खूप वाईट परिणाम होऊ शकतात. म्हणून आपण सर्व प्रकारच्या मूर्तिपूजेपासून लांब राहिलं पाहिजे. लोभीपणा करणं आणि ऐशआरामाच्या गोष्टींच्या मागे लागणं हीसुद्धा एक प्रकारची मूर्तिपूजाच आहे. (मत्त. ६:२४; कलस्सै. ३:५) यहोवाने आपल्यावर दया करून शेवटच्या दिवसांत शुद्ध उपासना पुन्हा सुरू केली आहे, म्हणून आपण त्याचे खूप आभार मानले पाहिजे. तो या शुद्ध उपासनेला पुन्हा कधीच भ्रष्ट होऊ देणार नाही. कारण त्याने देवाच्या इस्राएलसोबत “सर्वकाळ टिकणारा करार” केला आहे. हा करार कधीच मोडला जाणार नाही कारण ‘देवाचं इस्राएल’ कधीच अविश्‍वासूपणे वागणार नाही किंवा खोटी उपासना करून वेश्‍येसारखी कामं करणार नाही. (यहे. १६:६०) त्यामुळे आपल्याला यहोवाच्या शुद्ध लोकांमध्ये राहण्याचा जो बहुमान मिळाला आहे, तो आपण नेहमी जपला पाहिजे.

१७ पण यहोवाने यहेज्केलच्या पुस्तकात त्या वेश्‍यांबद्दल जे म्हटलं त्यावरून आपल्याला ‘मोठ्या वेश्‍येबद्दल,’ म्हणजे मोठ्या बाबेलबद्दल काय शिकायला मिळतं?

“पुन्हा कधीच तिचा पत्ता लागणार नाही”

१८, १९. यहेज्केलच्या पुस्तकात सांगितलेल्या वेश्‍यांमध्ये आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकात सांगितलेल्या वेश्‍येमध्ये आपल्याला कोणत्या समानता पाहायला मिळतात?

१८ यहोवा कधीच बदलत नाही. (याको. १:१७) त्याला मोठ्या बाबेलबद्दल आधी जशी घृणा वाटायची तशीच आजही वाटते. त्यामुळे आपल्याला या गोष्टीचं आश्‍चर्य वाटत नाही, की यहोवाने यहेज्केलच्या पुस्तकातल्या वेश्‍यांना ज्या प्रकारचा न्यायदंड सुनावला, त्याच प्रकारचा न्यायदंड त्याने प्रकटीकरणाच्या पुस्तकातल्या ‘मोठ्या वेश्‍येलाही’ सुनावला आहे.

१९ उदाहरणार्थ, यहेज्केलच्या पुस्तकातल्या वेश्‍यांना कोणाकडून शिक्षा मिळाली याबद्दल विचार करा. त्यांना यहोवाकडून शिक्षा मिळाली का? नाही. ज्या राष्ट्रांसोबत मैत्री करून त्यांनी वेश्‍येसारखी कामं केली होती त्या राष्ट्रांकडूनच त्यांना शिक्षा मिळाली. त्याच प्रकारे, जगभरात पसरलेल्या खोट्या धर्माच्या साम्राज्याने ‘पृथ्वीच्या राजांसोबत’ मैत्री करून वेश्‍येसारखी कामं केली आहेत. मग या वेश्‍येला कोण शिक्षा देणार आहे? प्रकटीकरणाच्या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतं, की राजकीय शक्‍ती किंवा पृथ्वीवरचे राजे वेश्‍येचा “तिरस्कार करतील. ते तिला उद्ध्‌वस्त आणि नग्न करतील. तसंच, तिचं मांस खातील आणि तिला आगीत पूर्णपणे जाळून टाकतील.” पण जगातली सरकारं अचानक तिच्यावर हल्ला का करतील? कारण ‘देव आपला विचार पूर्ण करण्याचं त्यांच्या मनात घालणार आहे.’—प्रकटी. १७:१-३, १५-१७.

२०. मोठ्या बाबेलवर बजावण्यात आलेला न्यायदंड कायमसाठी असेल असं आपण का म्हणू शकतो?

२० यहोवा या जगातल्या राष्ट्रांचा वापर करून, खोट्या धर्मावर न्यायदंड बजावेल. त्यात ख्रिस्ती धर्मजगतसुद्धा सामील असतील. या न्यायदंडात कोणताही बदल होणार नाही, त्या धर्मांना कोणत्याही प्रकारे क्षमा केली जाणार नाही आणि त्यांना त्या वेळी बदलण्याची संधीही दिली जाणार नाही. प्रकटीकरणाच्या पुस्तकात मोठ्या बाबेलबद्दल म्हटलं आहे, “पुन्हा कधीच तिचा पत्ता लागणार नाही.” (प्रकटी. १८:२१) तिचा नाश होईल तेव्हा स्वर्गदूत आनंदाने म्हणतील, “याहची स्तुती करा! [मोठ्या बाबेलच्या] जळण्याचा धूर सदासर्वकाळ वर चढत राहतो.” (प्रकटी. १९:३) हा न्यायदंड कायमचा असेल, कारण पुन्हा कोणताही खोटा धर्म सुरू होणार नाही आणि शुद्ध उपासना भ्रष्ट करणार नाही. मोठ्या बाबेलवर न्यायदंड बजावून तिचा भयानक नाश झाल्यावर, एका अर्थाने तिच्या जळण्याचा धूर सदासर्वकाळ वर चढत राहील.

ज्या राष्ट्रांना मोठ्या बाबेलने भुरळ घातली होती आणि जी तिच्या प्रभावाखाली होती, तीच राष्ट्रं तिच्यावर हल्ला करून तिचा नाश करतील (परिच्छेद १९, २० पाहा)

२१. (क) खोट्या धर्माच्या नाशानंतर कशाची सुरुवात होईल? (ख) आणि त्या काळाच्या शेवटी काय होईल?

२१ जगातली सरकारं मोठ्या बाबेलवर हल्ला करतील, तेव्हा ती सरकारं देवाकडून असलेला न्यायदंड बजावत असतील. यहोवाचा उद्देश पूर्ण होण्यात ही एक महत्त्वाची घटना असेल. या घटनेने मोठ्या संकटाची सुरुवात होईल. हा काळ खरंच खूप भयानक असेल. (मत्त. २४:२१) मोठ्या संकटाच्या शेवटी हर्मगिदोनचं युद्ध होईल. हे दुष्ट व्यवस्थेच्या विरुद्ध यहोवाचं युद्ध असेल. (प्रकटी. १६:१४, १६) मोठ्या संकटादरम्यान कोणकोणत्या घटना घडतील, याबद्दल आपल्याला यहेज्केलच्या पुस्तकातून बरंच काही शिकायला मिळतं. यावर आपण येणाऱ्‍या अध्यायांमध्ये चर्चा करणार आहोत. पण यहेज्केलच्या १६ व्या आणि २३ व्या अध्यायांतून आपण जे शिकलो, त्यातले कोणते धडे आपण लक्षात ठेवले पाहिजेत आणि लागू केले पाहिजेत?

जगातली सरकारं मोठ्या बाबेलवर हल्ला करून देवाकडून असलेला न्यायदंड बजावतील (परिच्छेद २१ पाहा)

२२, २३. यहेज्केल आणि प्रकटीकरणातल्या वेश्‍यांबद्दल चर्चा केल्यावर आपल्याला कोणता धडा शिकायला मिळतो?

२२ सैतानाला शुद्ध उपासकांना खोट्या उपासनेच्या जाळ्यात अडकवायला आवडतं. यहेज्केलच्या पुस्तकातल्या वेश्‍यांनी खोट्या उपासनेचा जो मार्ग निवडला, त्याच मार्गावर सैतानाला आपल्यालाही वळवता आलं, तर त्याला खूप आनंद होईल. पण आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे, यहोवाची अशी अपेक्षा आहे की आपण फक्‍त त्याचीच उपासना करावी. उपासनेच्या बाबतीत तो कोणताही अविश्‍वासूपणा खपवून घेत नाही! (गण. २५:११) त्यामुळे आपण खोट्या धर्मापासून दूर राहिलं पाहिजे. तसंच, देवाच्या नजरेत ‘अशुद्ध असलेल्या कोणत्याही गोष्टीला’ स्पर्श करायचं टाळलं पाहिजे. (यश. ५२:११) म्हणूनच, आपण या जगाच्या राजनैतिक वादविवादांमध्ये आणि भांडणांमध्ये कोणाचीही बाजू घेत नाही. (योहा. १५:१९) देशभक्‍तीसुद्धा सैतान वाढवत असलेल्या खोट्या धर्मासारखीच आहे. आपण तिच्याशी संबंधित असलेल्या कोणत्याही कामांत भाग घेत नाही.

२३ पण आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की यहोवाच्या आध्यात्मिक मंदिरात शुद्ध उपासना करण्याची आपल्याला संधी मिळाली आहे. हा आपल्यासाठी खरंच खूप मोठा बहुमान आहे. यहोवाने आपल्याला शुद्ध उपासना करण्याचा जो आशीर्वाद दिला आहे, त्याची आपण कदर केली पाहिजे. आणि आपण आपला निर्धार आणखी पक्का केला पाहिजे, की खोट्या धर्मापासून आणि त्याच्या वेश्‍येसारख्या कामांपासून आपण नेहमी दूर राहू!