व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय १८

“माझा क्रोध भयंकर भडकेल”

“माझा क्रोध भयंकर भडकेल”

यहेज्केल ३८:१८

अध्याय कशाबद्दल आहे: गोगच्या हल्ल्यामुळे यहोवाचा क्रोध भडकतो आणि हर्मगिदोनच्या युद्धामध्ये यहोवा आपल्या लोकांच्या वतीने लढतो

१-३. (क) यहोवाचा “क्रोध भयंकर” भडकल्यामुळे काय होईल? (सुरुवातीचं चित्र पाहा.) (ख) आपण कोणत्या प्रश्‍नावर चर्चा करणार आहोत?

 कल्पना करा, की काही भाऊबहिणी आणि लहान मुलं एका ठिकाणी जमून राज्यगीत गात आहेत. मग एक वडील मनापासून यहोवाला प्रार्थना करतात. यहोवाने सगळ्यांना सुरक्षित ठेवावं म्हणून ते त्याला कळकळून विनंती करतात. सगळ्या भाऊबहिणींना खातरी आहे, की यहोवा नक्की त्यांना सांभाळेल. पण ते थोडे घाबरले आहेत म्हणून त्यांना सांत्वनाची गरज आहे. बाहेरून लोकांच्या ओरडण्याचा, किंचाळण्याचा आवाज ऐकू येत आहे. कारण हर्मगिदोनचं युद्ध सुरू झालं आहे!—प्रकटी. १६:१४, १६.

हर्मगिदोनच्या युद्धामध्ये यहोवाचा ‘क्रोध भयंकर भडकलेला’ असला, तरी तो लोकांचा अंदाधुंदपणे नाश करणार नाही. (यहेज्केल ३८:१८ वाचा.) यहोवाच्या भयानक क्रोधाची झळ फक्‍त एखाद्या राष्ट्राला किंवा सैन्याला सोसावी लागणार नाही, तर पृथ्वीवरच्या असंख्य लोकांना ती सोसावी लागेल. “त्या दिवशी, यहोवाच्या हातून मेलेले लोक पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्‍या टोकापर्यंत” पडलेले असतील.—यिर्म. २५:२९, ३३.

पण यहोवा तर “दयाळू, करुणामय आणि सहनशील देव” आहे. मग अचानक त्याचा ‘भयंकर क्रोध’ का भडकेल? (निर्ग. ३४:६; १ योहा. ४:१६) या प्रश्‍नाचं उत्तर जाणून घेतल्यामुळे आपल्याला खूप सांत्वन आणि धैर्य मिळू शकतं. तसंच, प्रचारकार्य करण्यासाठी आज आपल्याला प्रोत्साहनही मिळू शकतं.

यहोवाचा ‘भयंकर क्रोध’ का भडकेल?

४, ५. देवाच्या क्रोधामध्ये आणि माणसांच्या क्रोधामध्ये कोणता फरक आहे?

सर्वात आधी आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे, की यहोवाचा क्रोध हा माणसांच्या क्रोधासारखा नसतो. एखादा माणूस रागाच्या भरात पाऊल उचलतो, तेव्हा त्याचा स्वतःवर ताबा राहत नाही. आणि त्यामुळे तो जे काही करतो त्याचे परिणाम नेहमी वाईटच होतात. उदाहरणार्थ, यहोवाने आदामच्या पहिल्या मुलाचं, म्हणजे काइनचं अर्पण नाकारलं. पण त्याने हाबेलचं अर्पण स्वीकारलं. यामुळे काइनला “खूप राग आला.” याचा परिणाम काय झाला? काइनने आपल्या भावाला मारून टाकलं. (उत्प. ४:३-८; इब्री ११:४) दावीदसोबत काय घडलं याचासुद्धा विचार करा. तो यहोवाच्या मनासारखा वागणारा होता. (प्रे. कार्यं १३:२२) पण दावीदसारख्या चांगल्या माणसाच्या हातूनसुद्धा गुन्हा घडला असता. त्याने जेव्हा ऐकलं, की नाबालने त्याचा आणि त्याच्या माणसांचा अपमान केला आहे, तेव्हा तो खूप भडकला. मग त्याने आणि त्याच्या माणसांनी, “तलवारी घेतल्या” आणि ते नाबालला मारायला निघाले. दावीदने फक्‍त नाबाललाच नाही, तर त्याच्या घराण्यातल्या प्रत्येक पुरुषाला मारायचं ठरवलं होतं. पण नाबालच्या बायकोने, म्हणजे अबीगईलने दावीदला आणि त्याच्या सैनिकांना सूड घेण्यापासून थांबवलं. (१ शमु. २५:९-१४, ३२, ३३) यावरून कळतं, की यहोवाने बायबलमध्ये याकोबला जे लिहिण्याची प्रेरणा दिली ते योग्यच आहे. याकोबने लिहिलं, “रागाच्या आहारी जाणारा माणूस देवाच्या नीतिमत्त्वाप्रमाणे कार्य करू शकत नाही.”—याको. १:२०.

यहोवाचं त्याच्या क्रोधावर नियंत्रण असतं आणि तो क्रोधात असला तरी अनीतीने वागत नाही

माणसाचं स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण नसतं. त्याच्या क्रोधाचे काय परिणाम होतील, हे त्यालासुद्धा माहीत नसतं. याउलट यहोवाचं त्याच्या क्रोधावर नियंत्रण असतं. आणि त्याला क्रोध का आला आहे हे नेहमी स्पष्ट असतं. यहोवाचा क्रोध कितीही भडकला तरी तो कधीही अनीतीने वागत नाही. यहोवा आपल्या शत्रूंसोबत लढतो, तेव्हा तो कधीच ‘दुष्टांसोबत नीतिमान लोकांचा नाश करत नाही.’ (उत्प. १८:२२-२५) शिवाय, यहोवाचा क्रोध योग्य कारणांमुळेच भडकतो. त्यांपैकी दोन कारणं कोणती आहेत आणि त्यांपासून आपण कोणते धडे शिकू शकतो, हे आता आपण पाहू या.

६. यहोवाच्या नावाला कलंक लावला जातो तेव्हा त्याला कसं वाटतं आणि तो काय करतो?

पहिलं कारण: जेव्हा यहोवाच्या नावाला कलंक लावला जातो, तेव्हा त्याचा क्रोध भडकतो. काही लोक दावा करतात, की ते यहोवाचे लोक आहेत. पण ते वाईट कामं करतात आणि त्याच्या नावाला कलंक लावतात. यामुळे यहोवाचा क्रोध भडकतो आणि ते योग्यच आहे. (यहे. ३६:२३) या आधीच्या अध्यायांमध्ये आपण पाहिलं होतं, की इस्राएल राष्ट्राने यहोवाच्या नावावर खूप मोठा कलंक लावला. इस्राएली लोकांच्या वाईट वृत्तीमुळे आणि कामांमुळे यहोवा त्यांच्यावर रागावला. पण त्याचा स्वतःवरचा ताबा कधीच सुटला नाही. त्याने त्यांना प्रमाणाबाहेर शिक्षा केली नाही, तर योग्य प्रमाणात शिस्त लावली. (यिर्म. ३०:११) आणि एकदा का यहोवाचा शिक्षा देण्याचा उद्देश पूर्ण झाला, की त्याच्या मनात राग राहत नाही.—स्तो. १०३:९.

७, ८. यहोवा इस्राएली लोकांसोबत ज्या प्रकारे वागला त्यावरून आपल्याला कोणते धडे शिकायला मिळतात?

धडे: यहोवा ज्या प्रकारे इस्राएली लोकांसोबत वागला, त्यावरून आपल्याला एक गंभीर इशारा मिळतो. लक्षात घ्या, की इस्राएली लोकांप्रमाणेच आपल्यालासुद्धा यहोवाच्या नावाने ओळखलं जाण्याचा बहुमान मिळाला आहे. आपण यहोवाचे साक्षीदार आहोत. (यश. ४३:१०) आपल्या वागण्या-बोलण्यामुळे एकतर देवाच्या नावाचा महिमा होऊ शकतो, किंवा त्याच्या नावाला कलंक लागू शकतो. यहोवाच्या नावाला कलंक लागेल अशी कोणतीही वाईट कामं आपण कधीच करू नयेत. आपण जर जाणूनबुजून वाईट कामं करत राहिलो, तर यहोवाचा क्रोध नक्की भडकेल. आणि त्याच्या नावाला लागलेला कलंक दूर करण्यासाठी तो आज ना उद्या नक्की पाऊल उचलेल.—इब्री ३:१३, १५; २ पेत्र २:१, २.

यहोवाचा ‘क्रोध भयंकर’ भडकू शकतो, हे कळल्यामुळे त्याच्यासोबत जवळचं नातं जोडायची आपल्याला भीती वाटली पाहिजे का? नक्कीच नाही. आपल्याला माहीत आहे, की यहोवा धीर धरतो आणि दया दाखवतो. (यश. ५५:७; रोम. २:४) पण वेळ आल्यावर तो शिक्षाही देतो. जे सतत वाईट गोष्टी करत राहतात अशा लोकांवर त्याचा क्रोध भडकतो. आणि अशांना तो त्याच्या लोकांमध्ये राहू देत नाही. हे कळल्यावर आपल्या मनात यहोवाबद्दल गाढ आदर निर्माण होतो. (१ करिंथ. ५:११-१३) यहोवाने आपल्याला स्पष्टपणे सांगितलं आहे, की त्याला कशामुळे राग येतो. त्यामुळे यहोवाचा क्रोध भडकेल अशा प्रकारचे विचार आणि कामं आपण टाळली पाहिजेत.—योहा. ३:३६; रोम. १:२६-३२; याको. ४:८.

९, १०. शत्रू जेव्हा यहोवाच्या विश्‍वासू लोकांच्या जिवावर उठतात तेव्हा तो काय करतो? उदाहरणं द्या.

दुसरं कारण: शत्रू जेव्हा यहोवाच्या लोकांच्या जिवावर उठतात तेव्हा त्याचा क्रोध भडकतो. जे लोक यहोवाला विश्‍वासू राहतात आणि त्याचा आश्रय घेतात, त्यांना तो सांभाळतो. आणि त्याच्या लोकांवर जर शत्रूंनी हल्ला केला तर त्याचा क्रोध भडकतो. इस्राएली लोकांनी इजिप्त सोडलं, तेव्हा फारोने आणि त्याच्या मोठ्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला. इस्राएली लोक जेव्हा तांबड्या समुद्राजवळ थांबले होते, तेव्हा फारोला कदाचित वाटलं असेल की ते लाचार आहेत. त्यांची मदत करणारं कोणीही नाही आणि तो त्यांचा सहज नाश करू शकेल. इस्राएली लोक तांबड्या समुद्रातून पलीकडे जाऊ लागले, तेव्हा इजिप्तचं सैन्यसुद्धा त्यांच्या मागे गेलं. पण यहोवाने त्यांच्या रथाची चाकं काढून टाकली आणि इजिप्तच्या सैन्याला समुद्रात फेकून दिलं. बायबलमध्ये सांगितलं आहे, की “त्यांच्यापैकी एकही जण जिवंत वाचला नाही.” (निर्ग. १४:२५-२८) आपल्या लोकांवर असलेल्या “एकनिष्ठ प्रेमामुळे” यहोवाचा क्रोध इजिप्तच्या लोकांवर भडकला.—निर्गम १५:९-१३ वाचा.

जसं हिज्कीयाच्या काळात एका स्वर्गदूताने देवाच्या लोकांचं अश्‍शूरी सैनिकांपासून संरक्षण केलं, तसंच स्वर्गदूत आपलंसुद्धा संरक्षण करतील (परिच्छेद १०, २३ पाहा)

१० आणखी एक उदाहरण पाहू या. आपल्या लोकांवर असलेल्या प्रेमामुळे यहोवाने हिज्कीया राजाच्या काळातही असंच केलं. त्या काळात अश्‍शूरी लोक खूप शक्‍तिशाली होते आणि त्यांचं सैन्य अतिशय क्रूर होतं. हे अश्‍शूरी सैन्य यरुशलेमवर चालून आलं आणि त्यांनी यरुशलेमला वेढा घातला. यहोवाच्या लोकांना धमकावण्यात आलं, की त्यांना बऱ्‍याच काळापर्यंत हाल सोसावे लागतील आणि त्यांचा वाईट रितीने नाश होईल. (२ राजे १८:२७) तेव्हा यहोवाने काय केलं? यहोवाने आपल्या एका स्वर्गदूताला पाठवलं. या स्वर्गदूताने एका रात्रीत १,८५,००० अश्‍शूरी सैनिकांना मारून टाकलं. (२ राजे १९:३४, ३५) दुसऱ्‍या दिवशी सकाळी अश्‍शूरी लोकांच्या छावणीत कसं दृश्‍य असेल, याचा विचार करा. तलवारी, भाले आणि ढाली जशाच्या तशा पडल्या होत्या. माणसांना उठवण्यासाठी कोणीही कर्णे वाजवत नव्हतं. हल्ला करण्यासाठी सैनिकांना कोणीही आज्ञा देत नव्हतं. सगळ्या तंबूंमध्ये भयाण शांतता पसरली होती. कारण संपूर्ण छावणीमध्ये प्रेतंच प्रेतं पडली होती.

११. प्राचीन काळात यहोवाने आपल्या लोकांसाठी जे केलं, त्याबद्दलच्या उदाहरणांवरून आपल्याला धैर्य आणि सांत्वन कसं मिळतं?

११ धडे: शत्रू जेव्हा यहोवाच्या लोकांच्या जिवावर उठतात, तेव्हा तो काय करतो, हे आपण या उदाहरणांमधून पाहिलं. या उदाहरणांमुळे देवाच्या लोकांच्या शत्रूंना एक कडक इशारा मिळतो. तो म्हणजे देवाचा क्रोध भडकतो, तेव्हा “जिवंत देवाच्या हातात सापडणं ही भयंकर गोष्ट आहे.” (इब्री १०:३१) पण याच उदाहरणांमुळे आपल्याला सांत्वन मिळतं आणि आपलं धैर्य वाढतं. आपला सर्वात मोठा शत्रू सैतान आपल्याविरुद्ध कधीही यशस्वी होणार नाही, हे कळल्यामुळे आपल्याला खरंच खूप सांत्वन मिळतं. या जगावर राज्य करण्यासाठी त्याच्याकडे “फार कमी वेळ उरला आहे.” आणि लवकरच त्याच्या राज्याचा शेवट होणार आहे. (प्रकटी. १२:१२) पण तोपर्यंत आपण धैर्याने यहोवाची सेवा करू शकतो. कारण आपल्याला माहीत आहे, की कोणतीही व्यक्‍ती, संघटना किंवा सरकार आपल्याला त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्यापासून रोखू शकत नाही. (स्तोत्र ११८:६-९ वाचा.) प्रेषित पौलला जशी खातरी होती तशीच आपल्यालाही आहे. देवाच्या प्रेरणेने त्याने म्हटलं, “जर देव आपल्या बाजूने आहे, तर आपल्या विरोधात कोण उभं राहू शकतं?”—रोम. ८:३१.

१२. मोठ्या संकटाच्या वेळी यहोवाचा क्रोध का भडकेल?

१२ यहोवाने इस्राएली लोकांना इजिप्तच्या सैन्याच्या तावडीतून सोडवलं, आणि यहुदी लोकांना अश्‍शूरी सैन्यापासून वाचवलं. त्याचप्रमाणे मोठ्या संकटाच्या वेळी आपलं संरक्षण करण्यासाठी तो कार्य करेल. यहोवाचं आपल्यावर खरंच खूप प्रेम आहे. म्हणून, शत्रू आपला नाश करण्यासाठी आपल्यावर हल्ला करतील तेव्हा यहोवाचा क्रोध भडकेल. जे आपल्यावर हल्ला करण्याचा मूर्खपणा करतील, ते एका अर्थाने यहोवाच्या डोळ्याच्या बुबुळाला हात लावत असतील. तेव्हा यहोवा वेळ न घालवता लगेच कार्य करेल आणि त्यांचा नाश करेल. (जख. २:८, ९) आधी कधीही झाली नाही, इतक्या मोठ्या प्रमाणावर कत्तल होईल. पण यहोवाचा क्रोध त्याच्या शत्रूंवर भडकेल तेव्हा ते असं म्हणू शकणार नाहीत, की त्यांना याबद्दल आधी सावध करण्यात आलं नव्हतं. आपण असं का म्हणू शकतो?

यहोवाने आधीपासून कोणते इशारे दिले आहेत?

१३. यहोवाने कोणते इशारे दिले आहेत?

१३ यहोवा “सहनशील” आहे. जे लोक त्याचा विरोध करतात आणि त्याच्या लोकांच्या जिवावर उठतात त्यांना त्याने आधीपासून भरपूर इशारे दिले आहेत. (निर्ग. ३४:६, ७) यहोवाने येणाऱ्‍या मोठ्या युद्धाबद्दल लोकांना आधीपासूनच सावध केलं आहे. त्याने यिर्मया, यहेज्केल, दानीएल, येशू ख्रिस्त यांसारख्या संदेष्यांद्वारे आणि पेत्र, योहान, पौल यांसारख्या प्रेषितांद्वारे हे इशारे दिले.—“येणाऱ्‍या मोठ्या युद्धाबद्दल यहोवा इशारा देतो” ही चौकट पाहा.

१४, १५. यहोवाने कोणत्या गोष्टी घडवून आणल्या आहेत आणि का?

१४ यहोवाने हे इशारे बायबलमध्ये लिहून ठेवलेले आहेत. आज बायबलचं भाषांतर असंख्य भाषांमध्ये करण्यात आलं आहे. आणि मानवी इतिहासातलं ते सगळ्यात जास्त वाटप करण्यात आलेलं पुस्तक आहे. हे सगळं यहोवानेच घडवून आणलं आहे. त्याने जगभरात त्याच्या सेवकांचं एक मोठं सैन्यं उभं केलं आहे. हे सेवक लोकांना त्याच्यासोबत जवळचं नातं जोडायला मदत करतात. तसंच ते त्यांना ‘यहोवाच्या येणाऱ्‍या मोठ्या दिवसाबद्दल’ इशाराही देतात. (सफ. १:१४; स्तो. २:१०-१२; ११०:३) यहोवाच्या प्रेरणेमुळे त्याच्या लोकांनी बायबलवर आधारित प्रकाशनांचं शेकडो भाषांमध्ये भाषांतर केलं आहे. तसंच, त्याने दिलेल्या अभिवचनांबद्दल आणि इशाऱ्‍यांबद्दल सांगण्यासाठी ते दरवर्षी करोडो तास खर्च करतात.

१५ यहोवाने हे सगळं केलं, कारण “कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सगळ्यांनी पश्‍चात्ताप करावा असं त्याला वाटतं.” (२ पेत्र ३:९) आपल्या प्रेमळ आणि सहनशील देवाच्या नावाने ओळखलं जाण्याचा आपल्याला बहुमान मिळाला आहे. त्यामुळे, त्याचा संदेश लोकांना सांगण्यात आपला जो छोटासा वाटा आहे, त्याची आपण मनापासून कदर करतो. पण जे लोक आज या संदेशाकडे लक्ष देत नाहीत, त्यांना पुढे स्वतःमध्ये बदल करण्याची संधी मिळणार नाही.

यहोवाचा क्रोध केव्हा “भडकेल?”

१६, १७. शेवटच्या युद्धासाठी यहोवाने दिवस ठरवलेला आहे का? समजावून सांगा.

१६ शेवटच्या युद्धासाठी यहोवाने एक दिवस ठरवलेला आहे. त्याच्या लोकांवर कधी हल्ला केला जाईल हे त्याला माहीत आहे. (मत्त. २४:३६) पण यहोवाचे शत्रू हा हल्ला कधी करतील हे त्याला कसं माहीत?

१७ या आधीच्या अध्यायात आपण पाहिलं, की यहोवा गोगला म्हणतो, ‘मी तुझ्या जबड्यात आकडे टाकीन.’ यहोवा गोगला, म्हणजे राष्ट्रांच्या समूहाला देवाच्या लोकांवर हल्ला करायला भाग पाडेल आणि त्यानंतर हर्मगिदोनचं युद्ध सुरू होईल. (यहे. ३८:४) पण याचा अर्थ असा होतो का, की हे युद्ध यहोवा सुरू करेल? किंवा, तो त्याच्या शत्रूंना त्यांच्या इच्छेविरुद्ध युद्ध करायला लावेल? नाही. उलट याचा अर्थ असा होतो, की लोकांच्या मनात काय आहे हे यहोवाला माहीत असतं. आणि ठरावीक परिस्थितींमध्ये त्याचे शत्रू काय करतील हेसुद्धा त्याला ठाऊक असतं.—स्तो. ९४:११; यश. ४६:९, १०; यिर्म. १७:१०.

१८. नाशवंत माणसं सर्वशक्‍तिमान देवाविरुद्ध युद्ध का करतील?

१८ आपण आताच पाहिलं, की यहोवा हे युद्ध सुरू करणार नाही. किंवा राष्ट्रांना त्यांच्या इच्छेविरुद्ध हे युद्ध सुरू करायला भाग पाडणार नाही. मग सर्वशक्‍तिमान देवासोबत युद्ध करण्याचा मूर्खपणा ही नाशवंत माणसं का करतील? एक कारण म्हणजे, कदाचित त्या वेळेपर्यंत त्यांनी स्वतःची अशी समजूत करून घेतली असेल, की देव अस्तित्वातच नाही, किंवा त्याला माणसांशी काही घेणंदेणं नाही. पृथ्वीवरच्या सर्व खोट्या धार्मिक संघटनांचा त्यांनी नुकताच नाश केला असल्यामुळे त्यांना कदाचित असं वाटेल. जर देव अस्तित्वात असता तर त्याने या संघटनांना नक्की वाचवलं असतं असा ते कदाचित विचार करतील. कारण आपल्याला देवाची मान्यता आहे असा दावा या संघटना करायच्या. पण या राष्ट्रांना ही गोष्ट समजणार नाही, की या संघटनांचा नाश करायचा विचार देवानेच त्यांच्या मनात घातला होता. कारण त्या देवाच्या नावाला कलंक लावत होत्या.—प्रकटी. १७:१६, १७.

१९. खोट्या धर्माचा नाश झाल्यानंतर कदाचित काय होईल?

१९ खोट्या धर्माचा नाश झाल्याच्या काही काळानंतर, यहोवा कदाचित आपल्या लोकांना एक कठोर संदेश द्यायला सांगेल. प्रकटीकरणाच्या पुस्तकात म्हटलं आहे, की हा संदेश गारांच्या पीडेसारखा असेल. आणि प्रत्येक गारेचं वजन २० किलो इतकं असेल. (प्रकटी. १६:२१) हा कठोर संदेश कशाबद्दल असेल? या संदेशात कदाचित अशी घोषणा केली जाईल, की या जगातल्या राजकीय आणि व्यापारी व्यवस्थेचा लवकरच अंत होणार आहे. हा संदेश या राष्ट्रांना अजिबात सहन होणार नाही आणि ती देवाची निंदा करायला लागतील. आणि कदाचित याच संदेशामुळे, देवाच्या लोकांना कायमचं गप्प करण्यासाठी राष्ट्रं त्यांच्यावर शेवटचा हल्ला करतील. त्यांना कदाचित वाटेल की यहोवाचे लोक स्वतःला वाचवू शकत नाही, आणि ती त्यांचा सहज नाश करू शकतील. पण हा त्या राष्ट्रांचा किती मोठा मूर्खपणा ठरेल!

यहोवाचा क्रोध भडकेल तेव्हा तो काय करेल?

२०, २१. गोग कोण आहे आणि त्याचं काय होईल?

२० आपण १७ व्या अध्यायात पाहिलं होतं, की यहेज्केलने आपल्या भविष्यवाणीत राष्ट्रांच्या समूहाला सूचित करण्यासाठी, ‘मागोग देशाचा गोग’ हे नाव वापरलं होतं. (यहे. ३८:२) ही राष्ट्रं देवाच्या लोकांवर हल्ला करण्यासाठी एकत्र येतील. पण या राष्ट्रांच्या समूहामध्ये फक्‍त नावापुरतीच एकता असेल. वरून जरी त्यांच्यात एकी दिसत असली तरी त्यांच्यामध्ये चढाओढीची, गर्वाची आणि देशाभिमानाची भावना असेल. म्हणून या राष्ट्रांना एकमेकांविरुद्ध करणं यहोवासाठी सोपं असेल. जणू त्यांच्यातला, “प्रत्येक जण आपल्या भावावर तलवार चालवेल.” (यहे. ३८:२१) पण राष्ट्रांवर येणारं हे संकट माणसांद्वारे येणार नाही.

२१ आपल्या शत्रूंचा, म्हणजे राष्ट्रांच्या समूहाचा नाश होण्याआधी त्यांना ‘मनुष्याच्या मुलाचं चिन्ह’ दिसेल. हे कदाचित यहोवाची आणि येशूची शक्‍ती प्रकट करणारं अद्‌भुत दृश्‍य असेल. आपल्या विरोधकांना कदाचित अशा गोष्टी दिसतील, ज्यांमुळे त्यांच्या जिवाचं पार पाणी-पाणी होईल. येशूने आधीच म्हटलं होतं, की “भीतीमुळे आणि संपूर्ण पृथ्वीवर येणार असलेल्या गोष्टींच्या धास्तीमुळे लोकांचे हातपाय गळून जातील.” (लूक २१:२५-२७) आपल्या शत्रूंना हे कळेल, की त्यांनी यहोवाच्या लोकांवर हल्ला करून फार मोठी चूक केली आहे. तो सृष्टीकर्ता आहे ही गोष्ट त्यांना मान्य करावीच लागेल. त्यांना हेही मान्य करावं लागेल, की तो सैन्यांचा देव यहोवा आहे आणि त्याच्या अधिकाराखाली स्वर्गातलं विशाल सैन्य आहे. (स्तो. ४६:६-११; यहे. ३८:२३) तो आपल्या स्वर्गातल्या सैन्याचा आणि नैसर्गिक शक्‍तींचा वापर करून आपल्या शत्रूंचा पूर्णपणे नाश करेल, पण तो आपल्या विश्‍वासू सेवकांना वाचवेल.—२ पेत्र २:९ वाचा.

जेव्हा शत्रू देवाच्या लोकांच्या जिवावर उठतील, तेव्हा यहोवा आपल्या स्वर्गातल्या सैन्याद्वारे आपला क्रोध प्रकट करेल (परिच्छेद २१ पाहा)

२२, २३. देवाच्या लोकांचं संरक्षण कोण करतील? आणि त्यांच्या कामाबद्दल त्यांना कसं वाटेल?

यहोवाच्या दिवसाबद्दल आपल्याला माहीत असल्यामुळे आपण आतापासूनच काय केलं पाहिजे?

२२ देवाच्या शत्रूंचा नाश करण्यासाठी येशू आवेशाने पुढाकार घेईल. तसंच, जे त्याच्या पित्यावर प्रेम करतात आणि त्याची सेवा करतात त्यांना वाचवण्यासाठीही तो आतुर असेल. त्या वेळी अभिषिक्‍त जनांमध्येही किती आवेश असेल याचा विचार करा. हर्मगिदोन सुरू होण्याच्या काही काळाआधी, पृथ्वीवर उरलेल्या अभिषिक्‍त जनांना स्वर्गात घेतलं जाईल. त्यामुळे सगळ्या १,४४,००० जणांना येशूसोबत या युद्धात भाग घेता येईल. (प्रकटी. १७:१२-१४) आज या शेवटच्या दिवसांत, हे अभिषिक्‍त जन दुसऱ्‍या मेंढरांसोबत मिळून सेवा करत आहेत. त्यामुळे त्यांची नक्कीच दुसऱ्‍या मेंढरांमधल्या लोकांसोबत खूप जवळची मैत्री झाली आहे. हे भाऊबहीण अभिषिक्‍त जनांना या कठीण काळात मनापासून पाठिंबा देत आहेत. पण हर्मगिदोनच्या वेळी या भाऊबहिणींचं संरक्षण करण्यासाठी अभिषिक्‍त जनांकडे शक्‍ती आणि अधिकार दोन्ही असेल.—मत्त. २५:३१-४०.

२३ येशूच्या सैन्यात स्वर्गदूतसुद्धा असतील. (२ थेस्सलनी. १:७; प्रकटी. १९:१४) सैतानाला आणि त्याच्या दुष्ट दूतांना स्वर्गातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी आधीच येशूची मदत केलेली आहे. (प्रकटी. १२:७-९) तसंच, ज्यांना पृथ्वीवर यहोवाची उपासना करायची इच्छा आहे, त्यांना गोळा करायचं कामसुद्धा ते करत आहेत. (प्रकटी. १४:६, ७) त्यामुळे हर्मगिदोनच्या युद्धात यहोवाच्या शत्रूंविरुद्ध लढण्यासाठी हे स्वर्गदूतसुद्धा आतुर असतील. म्हणूनच आपल्या विश्‍वासू सेवकांचं संरक्षण करण्यासाठी यहोवा या स्वर्गदूतांचा वापर करेल. पण, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यहोवाच्या सैन्यातल्या प्रत्येकाला एका गोष्टीचा अभिमान असेल. ती म्हणजे, यहोवाच्या शत्रूंचा नाश करून ते त्याचं नाव पवित्र करू शकतील आणि त्याच्या नावाचा महिमा करू शकतील.—मत्त. ६:९, १०.

२४. हर्मगिदोनच्या वेळी मोठ्या लोकसमुदायाच्या लोकांना कसं वाटेल?

२४ तर, मोठ्या लोकसमुदायातल्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी इतकं शक्‍तिशाली आणि आवेशी सैन्य तयार आहे. त्यामुळे मोठ्या लोकसमुदायाला घाबरण्याची अजिबात गरज नाही. उलट, ‘ते डोकं वर करून ताठ उभे राहतील कारण त्यांच्या सुटकेची वेळ जवळ येत आहे.’ (लूक २१:२८) खरंच, आपला पिता खूप दयाळू आहे आणि तो आपलं संरक्षण करतो. म्हणून यहोवाचा दिवस येण्याआधी आपण जास्तीत जास्त लोकांना त्याच्यासोबत जवळचं नातं जोडायला आणि त्याच्यावर प्रेम करायला मदत केली पाहिजे.—सफन्या २:२, ३ वाचा.

हर्मगिदोनच्या युद्धामध्ये देवाचे लोक लढणार नाहीत. स्वर्गदूत देवाच्या लोकांचं संरक्षण करतील आणि शत्रू आपसांतच लढू लागतील.—यहे. ३८:२१ (परिच्छेद २२-२४ पाहा)

२५. पुढच्या अध्यायात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

२५ मानवी युद्ध संपल्यावर सगळीकडे गोंधळ माजलेला असतो. आणि शोकाचं, दुःखाचं वातावरण पसरलेलं असतं. याउलट, हर्मगिदोननंतर सगळीकडे चांगली व्यवस्था असेल आणि सुखशांतीचं वातावरण असेल. पण यहोवाचा क्रोध शांत झाल्यावर, त्याच्या सैनिकांनी तलवारी म्यानात परत ठेवल्यावर आणि त्या मोठ्या युद्धाचे पडसाद ऐकू येईनासे झाल्यावर काय होईल? त्या मोठ्या युद्धानंतर आपल्याला जे सुंदर भविष्य मिळणार आहे, त्याबद्दल आपण पुढच्या अध्यायात चर्चा करू.