व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय १७

‘हे गोग, मी तुझ्या विरोधात उठलोय’

‘हे गोग, मी तुझ्या विरोधात उठलोय’

यहेज्केल ३८:३

अध्याय कशाबद्दल आहे: “गोग” कोण आहे याची आणि तो ज्या “देशावर” हल्ला करणार आहे त्या देशाची ओळख

१, २. (क) लवकरच कोणतं भयानक युद्ध सुरू होणार आहे? (ख) आणि त्या युद्धाबद्दल आपल्या मनात कोणते प्रश्‍न येऊ शकतात? (सुरुवातीचं चित्र पाहा.)

 हजारो वर्षांपासून या पृथ्वीवर युद्धांमुळे मानवांचं रक्‍त सांडलं आहे. यांमध्ये २० व्या शतकामधली दोन महायुद्धंसुद्धा सामील आहेत. कारण त्या युद्धांमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्‍तपात झाला होता. पण मानवी इतिहासात कधीही झालं नाही, इतकं भयानक युद्ध लवकरच सुरू होणार आहे. हे युद्ध पृथ्वीवरची राष्ट्रं स्वार्थासाठी एकमेकांसोबत लढतात तसं नसेल. याउलट हे युद्ध ‘सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाचं’ युद्ध असेल. (प्रकटी. १६:१४) पण या युद्धाची सुरुवात कशी होईल? हे युद्ध देवाच्या एका घमेंडी शत्रूमुळे सुरू होईल. कारण तो शत्रू देवाच्या मौल्यवान “देशावर” हल्ला करेल. या हल्ल्यामुळे सर्वोच्च प्रभू यहोवा आपली अफाट विनाशकारी शक्‍ती दाखवेल. याआधी यहोवाच्या शक्‍तीचं असं भयंकर रूप कोणीही पाहिलेलं नसेल.

साहजिकच आपल्या मनात काही प्रश्‍न येतील: हा शत्रू नेमका कोण आहे? तो कोणत्या “देशावर” हल्ला करणार आहे? तो केव्हा, का आणि कसा या “देशावर” हल्ला करणार आहे? भविष्यात होणाऱ्‍या घटनांमध्ये आपण सामील आहोत. त्यामुळे पृथ्वीवर यहोवाची शुद्ध उपासना करणारे या नात्याने, आपल्याला या प्रश्‍नांची उत्तरं जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आपल्याला या प्रश्‍नांची उत्तरं यहेज्केलच्या ३८ व्या आणि ३९ व्या अध्यायांत दिलेल्या रोमांचक भविष्यवाणीमध्ये मिळतील.

शत्रू—मागोगचा गोग

३. मागोच्या गोगबद्दलची यहेज्केलची भविष्यवाणी थोडक्यात सांगा.

  यहेज्केल ३८:१, २, ८, १६, १८; ३९:४, ११ वाचा. ही भविष्यवाणी थोडक्यात अशी आहे: “शेवटल्या काळात,” ‘मागोगचा गोग’ नावाचा शत्रू देवाच्या लोकांच्या “देशावर” हल्ला करेल. पण या हल्ल्यामुळे यहोवाचा “क्रोध भयंकर भडकेल.” यहोवा आपल्या लोकांच्या वतीने लढेल आणि गोगला हरवेल. a यहोवाचा विजय झाल्यावर तो आपल्या शत्रूला आणि त्याच्यासोबत असलेल्यांना, ‘सर्व प्रकारच्या शिकारी पक्ष्यांना आणि रानातल्या हिंस्र प्राण्यांना खायला देईल.’ शेवटी यहोवा गोगला एक “कबरस्थान” देईल. ही भविष्यवाणी लवकरच कशी पूर्ण होणार आहे? हे जाणून घेण्यासाठी, आपण आधी हे माहीत करून घेतलं पाहिजे की गोग नक्की कोण आहे.

४. मागोगचा गोग कोण आहे, याबद्दल आपण काय म्हणू शकतो?

मग, मागोगचा गोग नेमका कोण आहे? यहेज्केलने केलेल्या वर्णनावरून कळतं, की गोग हा शुद्ध उपासना करणाऱ्‍यांचा शत्रू आहे. पण शुद्ध उपासना करणाऱ्‍यांचा सर्वात मोठा शत्रू तर सैतान आहे. तर मग गोग सैतानाला सूचित करतो का? अनेक वर्षांपर्यंत आपल्या प्रकाशनांमध्ये असंच सांगितलं जात होतं. पण यहेज्केलच्या भविष्यवाणीचा आणखी खोलवर अभ्यास केल्यावर, आपण आपली समज बदलली. एका टेहळणी बुरूजमध्ये समजावण्यात आलं आहे, की मागोगचा गोग एखाद्या अदृश्‍य प्राण्याला नाही, तर एका मानवी शत्रूला सूचित करतो. तो शत्रू म्हणजे, शुद्ध उपासना करणाऱ्‍यांविरुद्ध लढायला येणारा राष्ट्रांचा समूह. b पण आपण आपली समज का बदलली? हे जाणून घेण्याआधी, आपण यहेज्केलच्या भविष्यवाणीतल्या दोन पुराव्यांवर विचार करू या. त्यांमुळे आपल्याला कळेल की गोग हा एखाद्या अदृश्‍य प्राण्याला का सूचित करत नाही.

५, ६. मागोगचा गोग अदृष्य प्राणी नाही, हे आपण यहेज्केलच्या भविष्यवाणीतल्या कोणत्या गोष्टींवरून म्हणू शकतो?

“मी तुझं प्रेत सर्व प्रकारच्या शिकारी पक्ष्यांना आणि रानातल्या हिंस्र प्राण्यांना खायला देईन.” (यहे. ३९:४) प्राचीन काळात, देवाने दुष्टांना शिक्षा करताना बऱ्‍याच वेळा असा इशारा दिला, की शिकारी पक्षी त्यांची प्रेतं फाडून खातील. यहोवाने असे इशारे इस्राएल राष्ट्राला, तसंच इतर राष्ट्रांनासुद्धा दिले होते. (अनु. २८:२६; यिर्म. ७:३३; यहे. २९:३, ५) पण लक्षात असू द्या, की देवाने हे इशारे अदृश्‍य प्राण्यांना नाही, तर हाडामांसाच्या माणसांना दिले होते. कारण शिकारी पक्षी आणि हिंस्र प्राणी फक्‍त हाडामांसाने बनलेल्या प्राण्यांनाच खाऊ शकतात, अदृष्य प्राण्यांना नाही. त्यामुळे यहेज्केलच्या भविष्यवाणीमध्ये दिलेल्या इशाऱ्‍यावरून कळतं, की गोग हा अदृष्य प्राण्याला सूचित करत नाही.

“मी गोगला इस्राएलमध्ये एक कबरस्तान देईन.” (यहे. ३९:११) अदृश्‍य प्राण्यांना पृथ्वीवर पुरलं जातं असं बायबलमध्ये कुठेही सांगितलेलं नाही. सैतान आणि त्याचे दुष्ट स्वर्गदूत अदृष्य प्राणी आहेत. त्यांच्याबद्दल बायबलमध्ये काय म्हटलं आहे ते पाहा. बायबलमध्ये म्हटलं आहे, की त्यांना १,००० वर्षांसाठी अथांग डोहात टाकून दिलं जाईल. मग त्यांना लाक्षणिक अर्थाने, अग्नीच्या सरोवरात फेकून दिलं जाईल. याचा अर्थ असा होतो, की त्यांचा कायमचा नाश केला जाईल. (लूक ८:३१; प्रकटी. २०:१-३, १०) पण गोगबद्दल असं म्हणण्यात आलं आहे, की त्याला या पृथ्वीवर “कबरस्थान” दिलं जाईल, आणि पृथ्वीवर तर फक्‍त मानवांना पुरलं जातं. यावरून आपण म्हणू शकतो, की गोग अदृश्‍य प्राण्याला सूचित करत नाही.

७, ८. ‘उत्तरेच्या राजासोबत’ आणि मागोगच्या गोगसोबत जे घडेल त्यात कोणती समानता आहे?

आता आपल्याला समजलं, की शुद्ध उपासना करणाऱ्‍यांवर शेवटचा हल्ला करणारा गोग, हा अदृश्‍य प्राण्याला सूचित का करत नाही. मग आपण कोणत्या आधारावर म्हणू शकतो, की मागोगचा गोग राष्ट्रांच्या समूहाला सूचित करतो? याचं उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण बायबलच्या दोन भविष्यवाण्यांवर चर्चा करू या.

“उत्तरेचा राजा.” (दानीएल ११:४०-४५ वाचा.) दानीएलने आपल्या भविष्यवाण्यांमध्ये, त्याच्या काळापासून आपल्या काळापर्यंत कोण-कोणत्या जागतिक महासत्ता येतील याबद्दल सांगितलं होतं. त्यांपैकी एका भविष्यवाणीत आपसांत लढणाऱ्‍या दोन राजांबद्दल सांगण्यात आलं आहे. ते राजे म्हणजे ‘दक्षिणेचा राजा’ आणि “उत्तरेचा राजा.” जगाच्या इतिहासात बरीच राष्ट्रं दुसऱ्‍यांवर वरचढ ठरण्यासाठी लढत आली आहेत. त्यामुळे ‘दक्षिणेचा राजा’ आणि “उत्तरेचा राजा,” हे वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या राजांना किंवा राष्ट्रांना सूचित करतात. दानीएल आपल्या भविष्यवाणीत उत्तरेच्या राजाच्या शेवटच्या हल्ल्याबद्दल सांगतो. त्याने असं म्हटलं, “अंताच्या समयी . . . अनेकांचा नाश करण्यासाठी आणि त्यांचं नामोनिशाण मिटवण्यासाठी तो मोठ्या संतापाने निघेल.” उत्तरेच्या राजाची नजर यहोवाची शुद्ध उपासना करणाऱ्‍यांवर आहे. c त्यामुळे तो त्यांच्यावर हल्ला करेल. मागोगच्या गोगप्रमाणेच उत्तरेच्या राजासोबतही घडेल. देवाच्या लोकांवरचा त्याचा हल्ला अपयशी ठरल्यावर त्याचा “नाश होईल.”

९. मागोगच्या गोगसोबत आणि ‘संपूर्ण पृथ्वीवरच्या राजांसोबत” जे होईल त्यात कोणती समानता आहे?

‘संपूर्ण पृथ्वीवरचे राजे.’ (प्रकटीकरण १६:१४, १६; १७:१४; १९:१९, २० वाचा.) प्रकटीकरणाच्या पुस्तकात आधीच सांगितलं आहे, की “पृथ्वीवरचे राजे” ‘राजांच्या राजावर,’ म्हणजे येशूवर हल्ला करायचा प्रयत्न करतील. पण ते स्वर्गापर्यंत पोहोचू शकत नाहीत. म्हणून ते पृथ्वीवर देवाच्या राज्याला पाठिंबा देणाऱ्‍यांवर हल्ला करतील. पण पृथ्वीवरचे राजे हर्मगिदोनचं युद्ध हरतील आणि त्यांचा नाश होईल. लक्ष द्या, की या राजांचा शेवट देवाच्या लोकांवर हल्ला केल्यानंतर होईल. मागोगच्या गोगबद्दलही असंच म्हणण्यात आलं आहे. d

१०. यहेज्केलच्या भविष्यवाणीचा अभ्यास केल्यावर, मागोगचा गोग कोण आहे याबद्दल आपण काय म्हणू शकतो?

१० आपण आतापर्यंत जे पाहिलं त्यावरून आपण गोगबद्दल काय म्हणू शकतो? पहिली गोष्ट म्हणजे गोग अदृश्‍य प्राण्याला सूचित करत नाही. दुसरी गोष्ट, गोग पृथ्वीवरच्या राष्ट्रांच्या समूहाला सूचित करतो. ही राष्ट्रं लवकरच देवाच्या लोकांवर हल्ला करणार आहेत. पण, त्यासाठी या राष्ट्रांना एकत्र यावं लागेल. का? कारण देवाचे लोक जगभरात आहेत. त्यामुळे कोणत्याही एका राष्ट्राला जगभरात पसरलेल्या यहोवाच्या सेवकांवर हल्ला करणं शक्य नाही. (मत्त. २४:९) लक्षात असू द्या, की हा हल्ला जरी ही राष्ट्रं करणार असली, तरी त्यामागे दुष्ट सैतानाचा हात असेल. फार पूर्वीपासून सैतान जगातल्या राष्ट्रांना खऱ्‍या उपासनेविरुद्ध भडकवत आला आहे. (१ योहा. ५:१९; प्रकटी. १२:१७) असं असलं तरी यहेज्केलच्या भविष्यवाणीवरून कळतं, की मागोगचा गोग हा सैतानाला सूचित करत नाही. तर तो यहोवाच्या लोकांवर हल्ला करणाऱ्‍या पृथ्वीवरच्या राष्ट्रांच्या समूहाला सूचित करतो. e

“देश”—कशाला सूचित करतो?

११. गोग ज्या देशावर हल्ला करणार आहे, त्या देशाबद्दल यहेज्केलच्या भविष्यवाणीत काय सांगितलं आहे?

११  परिच्छेद ३ मध्ये आपण पाहिलं होतं की, मागोगचा गोग यहोवासाठी मौल्यवान असलेल्या देशावर हल्ला करून त्याचा क्रोध भडकवेल. पण हा “देश” नेमकं कशाला सूचित करतो? हे जाणून घेण्यासाठी आपण पुन्हा यहेज्केलच्या भविष्यवाणीवर चर्चा करू या. (यहेज्केल ३८:८-१२ वाचा.) त्या भविष्यवाणीत असं म्हटलं आहे, की गोग ‘वाचवून परत आणलेल्या’ आणि ‘राष्ट्रांतून परत गोळा करून आणलेल्या’ लोकांवर हल्ला करेल. हेसुद्धा लक्षात घ्या की या देशात राहणाऱ्‍या उपासकांबद्दल भविष्यवाणीत काय म्हटलं आहे. त्यांच्याबद्दल असं म्हटलं आहे, की ते ‘सुरक्षितपणे राहत असतील’ आणि त्यांच्या वस्त्यांना, ‘भिंती, दरवाजे आणि अडसर नसतील.’ तसंच, ते ‘भरपूर धनसंपत्ती जमा करत असतील.’ आज यहोवाची शुद्ध उपासना करणारे जगभरातले लोक, या “देशात” राहतात. पण हा देश नेमकं कशाला सूचित करतो?

१२. प्राचीन इस्राएल देशात देवाच्या लोकांना परत कसं आणण्यात आलं आणि मग त्यांनी काय केलं?

१२ प्राचीन इस्राएल देशात देवाच्या लोकांना परत कसं आणण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी काय केलं यावर विचार करा. त्या देशात यहोवाचे लोक शेकडो वर्षांपासून राहत होते, काम करत होते आणि त्याची उपासना करत होते. पुढे इस्राएली लोक अविश्‍वासू बनले. तेव्हा यहोवाने यहेज्केलद्वारे सांगितलं, की त्यांचा देश उद्ध्‌वस्त केला जाईल आणि तो उजाड पडेल. (यहे. ३३:२७-२९) पण बाबेलच्या सैन्याने यरुशलेमला उजाड केल्यानंतर पुढे काय होईल याबद्दलही यहोवाने आणखी एक भविष्यवाणी केली. ती कोणती? ती म्हणजे, ज्या बंदिवानांना बाबेलमध्ये नेलं जाईल, त्यांच्यापैकी काहींना, म्हणजे पश्‍चाताप करणाऱ्‍यांना यरुशलेमला परत यायची संधी मिळेल. आणि ते देशात शुद्ध उपासना पुन्हा सुरू करू शकतील. यहोवाच्या आशीर्वादाने इस्राएल देश “एदेन बागेसारखा” सुंदर होणार होता आणि बहरून जाणार होता. (यहे. ३६:३४-३६) याची सुरुवात इ.स.पू. ५३७ मध्ये झाली. त्या वेळी यहुदी बंदिवान आपल्या मायदेशी, म्हणजे यरुशलेमला परत आले. आणि त्यांनी शुद्ध उपासना पुन्हा सुरू केली.

१३, १४. (क) आध्यात्मिक देश म्हणजे काय? (ख) आणि तो देश यहोवासाठी का मौल्यवान आहे?

१३ देवाच्या लोकांना शुद्ध उपासना करता यावी, म्हणून आज आपल्या काळातही त्याने त्यांना अशाच प्रकारे मदत केली आहे. आपण ९ व्या अध्यायात पाहिलं होतं, की बऱ्‍याच काळापर्यंत मोठ्या बाबेलच्या बंदिवासात असलेल्या देवाच्या लोकांची सुटका १९१९ मध्ये करण्यात आली. त्या वर्षी यहोवाने आपल्या उपासकांना आध्यात्मिक देशात आणलं. तो देश म्हणजे आपलं आध्यात्मिक नंदनवन. म्हणजेच अशी स्थिती किंवा वातावरण ज्यामध्ये आपण खऱ्‍या देवाची उपासना करतो. या देशात आपण सुरक्षित आहोत आणि एकत्र मिळून शांतीने आणि सुखासमाधानाने राहतो. (नीति. १:३३) या देशात, आपल्याला भरपूर प्रमाणात आध्यात्मिक अन्‍न मिळतं. आणि देवाच्या राज्याचा संदेश सांगण्यात मेहनत करून आपल्याला खूप आनंद मिळतो. खरंच, नीतिवचनांमध्ये दिलेल्या या शब्दांचा आपण स्वतः अनुभव घेतो, “यहोवाच्या आशीर्वादानेच माणूस श्रीमंत होतो आणि तो त्यासोबत दुःख देत नाही.” (नीति. १०:२२) आपण पृथ्वीवर कुठेही राहत असलो, तरी आपण या देशात म्हणजे आध्यात्मिक नंदनवनात राहू शकतो. पण त्यासाठी आपल्याला आपल्या वागण्या-बोलण्यातून, शुद्ध उपासनेला नेहमी आवेशाने पाठिंबा देत राहावं लागेल.

१४ हा आध्यात्मिक देश यहोवासाठी खूप मौल्यवान आहे. पण का? कारण तिथले रहिवासी, त्याच्यासाठी ‘सर्व राष्ट्रांतून आणलेल्या मौल्यवान वस्तूंसारखे’ आहेत. त्याने त्यांना शुद्ध उपासना करण्यासाठी स्वतःकडे आणलं आहे. (हाग्ग. २:७; योहा. ६:४४) ते रहिवासी नवीन व्यक्‍तिमत्त्व निर्माण करण्यासाठी, म्हणजे यहोवासारखे गुण स्वतःमध्ये वाढवण्यासाठी खूप मेहनत घेतात. (इफिस. ४:२३, २४; ५:१, २) यहोवाची शुद्ध उपासना करणारे त्याच्यावर मनापासून प्रेम करतात. म्हणून त्याचा महिमा करण्यासाठी ते आवेशाने त्याची सेवा करतात. (रोम. १२:१, २; १ योहा. ५:३) या आध्यात्मिक देशाला सुंदर बनवण्यासाठी हे उपासक खूप मेहनत घेतात. हे बघून यहोवाला खरंच किती आनंद होत असेल! विचार करा, आपण शुद्ध उपासनेला जीवनात पहिली जागा देतो, तेव्हा आपण फक्‍त या आध्यात्मिक नंदनवनाला सुंदरच बनवत नाही, तर यहोवाचं मनही आनंदी करतो.—नीति. २७:११.

आपण पृथ्वीवर कुठेही राहत असलो, तरी आपण आध्यात्मिक देशात राहू शकतो. पण त्यासाठी आपल्याला नेहमी आवेशाने शुद्ध उपासनेला पाठिंबा द्यावा लागेल (परिच्छेद १३, १४ पाहा)

“देशावर”—गोग केव्हा, का आणि कसा हल्ला करेल?

१५, १६. मागोगचा गोग आपल्या आध्यात्मिक देशावर कधी हल्ला करेल?

१५ विचार करा, आपल्या या मौल्यवान आध्यात्मिक देशावर लवकरच पृथ्वीवरच्या राष्ट्रांचा समूह हल्ला करणार आहे. आपण यहोवाची शुद्ध उपासना करतो म्हणून आपल्याला या हल्ल्याचा सामना करावा लागेल. त्यामुळे त्या हल्ल्याबद्दल आपण आणखी माहिती घेतली पाहिजे. म्हणून आता आपण पुढे दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करू या.

१६ मागोगचा गोग आध्यात्मिक देशावर कधी हल्ला करेल? या भविष्यवाणीत म्हटलं आहे, की मागोगचा गोग “शेवटल्या काळात” देवाच्या लोकांवर हल्ला करेल. (यहे. ३८:१६) यावरून कळतं की हा या दुष्ट व्यवस्थेच्या अंताचा काळ असेल. लक्षात असू द्या की मोठ्या बाबेलच्या नाशानंतर, म्हणजे जगभरात पसरलेल्या खोट्या धर्माच्या नाशानंतर मोठं संकट सुरू होईल. सर्व खोट्या धार्मिक संघटनांचा नाश झाल्यानंतर आणि हर्मगिदोन सुरू होण्याच्या आधी, गोग खऱ्‍या उपासकांवर शेवटचा हल्ला करेल.

१७, १८. मोठ्या संकटाच्या वेळी यहोवा कसं कार्य करेल?

१७ गोग यहोवाची शुद्ध उपासना करणाऱ्‍यांच्या देशावर का हल्ला करेल? यहेज्केलच्या भविष्यवाणीवरून आपल्याला याची दोन कारणं कळतात. एक म्हणजे, यहोवा कार्य करेल. दुसरं म्हणजे, गोगचे वाईट हेतू.

१८ यहोवा कार्य करेल. (यहेज्केल ३८:४, १६ वाचा.) यहोवा गोगला काय म्हणतो ते पाहा. ‘मी तुझ्या जबड्यात आकडे टाकीन’ आणि “मी तुला माझ्या देशाविरुद्ध घेऊन येईन.” यहोवा राष्ट्रांना आपल्याच उपासकांवर हल्ला करायला भाग पाडेल असा या शब्दांचा अर्थ होतो का? नक्कीच नाही. यहोवा कधीच आपल्या लोकांवर संकट आणत नाही. (ईयो. ३४:१२) यहोवाला माहीत आहे, की गोगला शुद्ध उपासकांचा राग आहे. आणि त्यांचं नामोनिशाण मिटवण्याची एकही संधी तो सोडणार नाही. (१ योहा. ३:१३) त्यामुळे घटना यहोवाच्या इच्छेप्रमाणे घडाव्यात, आणि त्याला हव्या त्या वेळेला घडाव्यात याची तो खातरी करेल. मोठ्या बाबेलच्या नाशानंतर यहोवा एका अर्थाने गोगच्या जबड्यामध्ये आकडे टाकेल. म्हणजेच, गोगच्या मनात जे आधीपासून आहे ते करण्यासाठी यहोवा त्याला भाग पाडेल. गोगला वाटेल की देवाच्या लोकांवर हल्ला करण्याची आणि त्यांचा नाश करण्याची चांगली संधी आहे. पण गोगच्या हल्ल्यामुळे पृथ्वीवरच्या सगळ्यात मोठ्या युद्धाची, म्हणजे हर्मगिदोनची सुरुवात होईल. त्या वेळी यहोवा आपल्या लोकांचा जीव वाचवेल, त्यालाच राज्य करायचा अधिकार आहे हे सिद्ध करेल आणि आपलं नाव पवित्र करेल.—यहे. ३८:२३.

राष्ट्रं आपल्याला शुद्ध उपासना करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतील. कारण शुद्ध उपासनेबद्दल आणि ती करणाऱ्‍यांबद्दल त्यांच्या मनात खूप द्वेष आहे

१९. गोग कशामुळे आपली धनसंपत्ती लुटण्याचा प्रयत्न करेल?

१९ गोगचे वाईट हेतू. ‘राष्ट्रं एक कट रचतील.’ त्यांच्या मनात बऱ्‍याच काळापासून यहोवाच्या उपासकांबद्दल जो राग आहे, तो राग ते काढण्याचा प्रयत्न करतील. त्यांना वाटेल यहोवाचे उपासक कमजोर आहेत. जणू ते “भिंती, दरवाजे आणि अडसर नसलेल्या वस्त्यांमध्ये राहत आहेत.” त्यामुळे ही राष्ट्रं यहोवाच्या लोकांवर म्हणजे, ‘भरपूर धनसंपत्ती जमा करणाऱ्‍यांवर’ हल्ला करतील. आणि ती ‘लूटमार करायचा आणि भरपूर माल जमा करायचा’ प्रयत्न करतील. (यहे. ३८:१०-१२) पण नक्की कोणती “धनसंपत्ती?” यहोवाच्या उपासकांकडे भरपूर आध्यात्मिक धनसंपत्ती आहे. आणि आपली सर्वात मौल्यवान धनसंपत्ती म्हणजे, आपण फक्‍त यहोवाची शुद्ध उपासना करतो. राष्ट्रं आपली शुद्ध उपासना लुटायचा प्रयत्न करतील. म्हणजेच आपली शुद्ध उपासना थांबवण्यासाठी ती काहीही करायला तयार होतील. पण शुद्ध उपासनेला राष्ट्रं मौल्यवान समजतात म्हणून ती असं करतील का? नाही. उलट, शुद्ध उपासनेबद्दल आणि ती करणाऱ्‍यांबद्दल राष्ट्रांच्या मनात खूप द्वेष आहे, म्हणून ती असं करतील.

गोग शुद्ध उपासनेचं नामोनिशाण मिटवण्यासाठी ‘एक कट रचेल,’ पण तो यशस्वी होणार नाही (परिच्छेद १९ पाहा)

२०. गोग आध्यात्मिक देशावर किंवा नंदनवनावर कसा हल्ला करेल?

२० गोग आपल्या आध्यात्मिक देशावर किंवा नंदनवनावर कसा हल्ला करेल? राष्ट्रं आपल्या आध्यात्मिक गोष्टींमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील किंवा आपली उपासना बंद करण्याचा प्रयत्न करतील. असं करण्यासाठी कदाचित ती राष्ट्रं आध्यात्मिक अन्‍न आपल्यापर्यंत पोहोचू देणार नाहीत, आपल्या सभांवर बंदी घालतील, आपली एकता तोडण्याचा प्रयत्न करतील, आणि आनंदाचा संदेश सांगण्यापासून आपल्याला रोखतील. कारण या सर्व गोष्टी आपल्या आध्यात्मिक नंदनवनाचा भाग आहेत. सैतानाच्या भडकवण्यामुळे राष्ट्रं या पृथ्वीवरून शुद्ध उपासनेचं आणि शुद्ध उपासना करणाऱ्‍यांचं नामोनिशाण मिटवून टाकण्याचा प्रयत्न करतील.

२१. तुम्ही यहोवाचे आभारी का आहात?

२१ मागोगचा गोग लवकरच जो हल्ला करणार आहे, त्याचा सामना आध्यात्मिक देशात राहणाऱ्‍या सर्व शुद्ध उपासकांना करावा लागेल. लवकरच जे घडणार आहे त्याबद्दल यहोवाने आपल्याला आधीच सांगितलं आहे. त्यामुळे खरंच आपण यहोवाचे आभार मानले पाहिजेत. मोठ्या संकटाची वाट पाहत असताना आपण हा पक्का निश्‍चय केला पाहिजे, की आपण शुद्ध उपासना करत राहू आणि तिला आपल्या जीवनात पहिली जागा देऊ. असं केल्यामुळे या आध्यात्मिक देशाला आपण आतापासूनच आणखीन सुंदर बनवत असू. आणि त्यामुळे लवकरच येणाऱ्‍या भविष्यात आपल्याला एक मोठी रोमांचक घटना पाहायला मिळेल. ती म्हणजे, हर्मगिदोनच्या युद्धात यहोवा आपल्या लोकांच्या बाजूने कसा उभा राहील आणि त्याचं नाव कसं पवित्र करेल हे आपल्याला पाहायला मिळेल. आणि याबद्दल आपण पुढच्या अध्यायात पाहू.

a मागोगच्या गोगवर यहोवाचा भयंकर क्रोध केव्हा आणि कसा भडकेल आणि शुद्ध उपासना करणाऱ्‍यांसाठी याचा काय अर्थ होतो, यावर आपण पुढच्या अध्यायात चर्चा करणार आहोत.

b १५ मे २०१५ च्या टेहळणी बुरूजमध्ये पृ. २९-३० वर “वाचकांचे प्रश्‍न” पाहा.

c दानीएल ११:४५ वरून कळतं, की उत्तरेचा राजा देवाच्या लोकांवर हल्ला करेल. कारण तिथे म्हटलं आहे, की हा राजा, “मोठा समुद्र [भूमध्य समुद्र] आणि ‘सुंदर देशाचा’ पवित्र डोंगर [जिथे एकेकाळी देवाचं मंदिर होतं आणि देवाचे लोक उपासना करायचे], यांच्या मधे तो आपले शाही तंबू ठोकेल.”

d बायबलमध्ये सांगितलं आहे की एक ‘अश्‍शूरी’ आधुनिक काळात देवाच्या लोकांचा नाश करायचा प्रयत्न करेल. (मीखा ५:५) बायबलच्या भविष्यवाण्यांमध्ये देवाच्या लोकांवर होणाऱ्‍या चार हल्ल्यांबद्दल सांगितलं आहे. म्हणजेच मागोगच्या गोगचा, उत्तरेच्या राजाचा, पृथ्वीवरच्या राजांचा आणि अश्‍शूऱ्‍याचा हल्ला. हे चारही हल्ले कदाचित एकाच हल्ल्याला सूचित करू शकतात.

e प्रकटीकरण २०:७-९ मध्ये सांगितलेला ‘मागोगचा गोग’ कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी या पुस्तकातला अध्याय २२ पाहा.