व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय १०

“तुम्ही परत जिवंत व्हाल”

“तुम्ही परत जिवंत व्हाल”

यहेज्केल ३७:५

अध्याय कशाबद्दल आहे: ‘वाळून गेलेल्या हाडांना’ पुन्हा कसं जिवंत केलं जातं याबद्दलचा दृष्टान्त आणि याची मोठी पूर्णता

१-३. बाबेलमधले यहुदी लोक दुःखी का आहेत? (सुरुवातीचं चित्र पाहा.)

 एका वाईट बातमीमुळे बाबेलमधले यहुदी खूप दुःखात आहेत. यहेज्केल जवळजवळ पाच वर्षांपासून यरुशलेमचा नाश होईल याबद्दल भविष्यवाणी करत होता. पण यहुद्यांचा त्यावर विश्‍वास बसत नव्हता. यहेज्केलने अभिनयाच्या रूपात भविष्यवाण्या सांगितल्या, बरीच उदाहरणं दिली, संदेश सांगितले. पण यहोवा यरुशलेमचा नाश होऊ देईल ही गोष्ट ते मानायलाच तयार नव्हते. इतकंच काय, तर बाबेलच्या लोकांनी यरुशलेमला वेढा घातला आहे हे जेव्हा त्यांना समजलं तेव्हासुद्धा त्यांना असंच वाटत होतं, की यरुशलेममधल्या लोकांना काहीच होणार नाही. ते सुरक्षित राहतील.

पण यरुशलेमला वेढा पडला त्याच्या दोन वर्षांनंतर, एक माणूस यरुशलेममधून निसटून बाबेलला बातमी घेऊन येतो, की “शहरावर कब्जा करण्यात आलाय!” ही बातमी ऐकून यहुद्यांच्या पायांखालची जमीनच सरकते. त्यांचा विश्‍वासच बसत नाही, की त्यांचं शहर, पवित्र मंदिर आणि त्यांचा मायदेश यांपैकी आता काहीच राहणार नाही. यरुशलेम कायम टिकून राहील या त्यांच्या आशेची पार निराशा होते.—यहे. २१:७; ३३:२१.

पण नेमकं याच वेळी यहेज्केलला देवाकडून आशा देणारा एक जबरदस्त दृष्टान्त मिळतो. दुःखात बुडालेल्या यहुदी बंदिवानांना या दृष्टान्तातून कोणता संदेश मिळाला? या दृष्टान्ताचा आज देवाच्या लोकांशी काय संबंध आहे? आणि त्यातून आपल्या प्रत्येकाला काय फायदा होऊ शकतो? या प्रश्‍नांची उत्तरं मिळवण्यासाठी यहोवा यहेज्केलला दृष्टान्तात काय दाखवतो ते पाहू या.

“या हाडांबद्दल भविष्यवाणी कर” आणि “वाऱ्‍याला भविष्यवाणी कर”

४. यहेज्केलला दृष्टान्तात कोणत्या दोन गोष्टी ठळकपणे जाणवल्या?

यहेज्केल ३७:१-१० वाचा. दृष्टान्तात यहोवा यहेज्केलला एका खोऱ्‍याच्या मधोमध घेऊन येतो. हे खोरं पूर्णपणे हाडांनी भरलेलं आहे. यहेज्केलला तो दृष्टान्त चांगल्या प्रकारे समजावा म्हणून यहोवा त्याला “त्या हाडांमधून सगळीकडे फिरायला” लावतो. खोऱ्‍यातून फिरताना यहेज्केलला त्या हाडांबद्दल दोन गोष्टी अगदी ठळकपणे जाणवतात. एक म्हणजे त्यांची संख्या आणि दुसरी म्हणजे त्यांची स्थिती. यहेज्केलने पाहिलं की “सगळीकडे हाडंच-हाडं पसरली आहेत आणि ती खडखडीत वाळून गेली आहेत.”

५. (क) यहोवाने यहेज्केलला कोणत्या दोन आज्ञा दिल्या? (ख) आणि यहेज्केलने त्या आज्ञांप्रमाणे केलं तेव्हा काय झालं?

मग यहोवाने यहेज्केलला अशा दोन आज्ञा दिल्या, ज्यांमुळे त्या हाडांमध्ये हळूहळू जीव येणार होता. पहिली आज्ञा म्हणजे, ‘या हाडांबद्दल भविष्यवाणी कर आणि त्यांना जिवंत व्हायला सांग.’ (यहे. ३७:४-६) या आज्ञेप्रमाणे यहेज्केलने भविष्यवाणी करताच त्याला “हाडांच्या खडखडण्याचा आवाज आला. आणि ती हाडं एकमेकांना जुळू लागली.” मग त्याने पाहिलं, की “त्यांच्यावर स्नायू, मांस आणि त्वचा चढत आहे.” (यहे. ३७:७, ८) दुसरी आज्ञा म्हणजे, ‘वाऱ्‍याला भविष्यवाणी कर आणि त्याला त्या मेलेल्या लोकांवर वाहायला सांग.’ यहेज्केलने हे केलं “तेव्हा त्यांच्यामध्ये श्‍वास आला आणि ते जिवंत होऊन आपल्या पायांवर उभे राहू लागले. पाहता-पाहता एक अतिशय मोठं सैन्य तयार झालं.”—यहे. ३७:९, १०.

“आपली हाडं वाळून गेली आहेत. आपल्याला काहीच आशा नाही”

६. यहोवाने यहेज्केलला दृष्टान्ताचा अर्थ कसा समजावून सांगितला?

या दृष्टान्ताचा अर्थ काय आहे, हे यहोवाने यहेज्केलला समजावून सांगितलं. त्याने म्हटलं, “ही हाडं म्हणजे इस्राएलचं संपूर्ण घराणं.” खरंच, बंदिवासात असलेल्या यहुद्यांनी जेव्हा यरुशलेमच्या नाशाची बातमी ऐकली, तेव्हा त्यांना खूप दुःख झालं; इतकं, की आपण जिवंत असून एखाद्या मेलेल्या माणसासारखे आहोत असं त्यांना वाटलं. त्यामुळे ते म्हणाले, “आपली हाडं वाळून गेली आहेत. आपल्याला काहीच आशा नाही. आपला पूर्णपणे नाश झालाय.” (यहे. ३७:११; यिर्म. ३४:२०) पण या दृष्टान्तातून यहोवाने त्या दुःखी लोकांना सांगितलं, की जसं त्या हाडांमध्ये जीव आला, तशी त्यांची स्थितीही बदलेल आणि त्यांना एक उज्ज्वल भविष्य मिळेल.

७. (क) यहेज्केल ३७:१२-१४ यांत सांगितल्याप्रमाणे यहोवाने यहेज्केलला काय सांगितलं? (ख) आणि यामुळे बंदिवासात असलेल्या यहुद्यांना कोणती खातरी मिळाली?

यहेज्केल ३७:१२-१४ वाचा. या दृष्टान्ताद्वारे यहोवाने बंदिवासात असलेल्या यहुद्यांना आश्‍वासन दिलं की तो त्यांना एका अर्थी पुन्हा जिवंत करेल, त्यांना परत त्यांच्या मायदेशात घेऊन जाईल आणि ते तिथे आनंदाने राहतील. तसंच, यहोवाने त्यांना आधीसारखं, “माझ्या लोकांनो!” असंही म्हटलं. जरा विचार करा, हे शब्द ऐकून निराश झालेल्या बंदिवासातल्या त्या लोकांना किती आनंद झाला असेल. पण हे अभिवचन नक्की पूर्ण होईल अशी ते खातरी का ठेवू शकत होते? कारण ते अभिवचन स्वतः यहोवाने दिलं होतं. त्याने म्हटलं, “मी यहोवा स्वतः हे बोललोय आणि मी ते पूर्णही केलंय.”

८. (क) ‘संपूर्ण इस्राएल घराण्याची’ अवस्था मेलेल्या लोकांसारखी कशी झाली होती? (ख) इस्राएली लोकांचा मृत्यू कसा झाला हे यहेज्केल ३७:९ या वचनातून कसं कळतं? (तळटीप पाहा.)

प्राचीन इस्राएल राष्ट्राची अवस्था दृष्टान्तातल्या निर्जीव हाडांसारखी कशी झाली होती? इ.स.पू. ७४० मध्ये दहा वंशांनी बनलेल्या इस्राएलच्या राज्याचा नाश झाला आणि तिथल्या लोकांना बंदिवासात नेण्यात आलं. तेव्हा, यहोवासोबत असलेलं त्यांचं नातं जवळजवळ तुटलंच होतं; जणू त्यांचा मृत्यूच झाला होता. मग याच्या जवळपास १३० वर्षांनंतर, दोन वंशांनी बनलेल्या यहूदाच्या लोकांनासुद्धा कैद करून नेण्यात आलं. अशा प्रकारे “इस्राएलचं संपूर्ण घराणं” बंदिवासात गेलं. (यहे. ३७:११) एका अर्थाने, बंदिवासात गेलेले हे सगळे लोक यहेज्केलच्या दृष्टान्तातल्या वाळून गेलेल्या हाडांसारखे निर्जीव झाले होते. a तसंच हेसुद्धा लक्षात घ्या, की यहेज्केलने पाहिलेली हाडं “खडखडीत वाळून गेली” होती. यावरून कळतं, की इस्राएली लोकांची अवस्था बऱ्‍याच काळापर्यंत मेलेल्या लोकांसारखी होती. आणि इतिहासही हेच दाखवतो, की इस्राएल आणि यहूदा ही दोन्ही राज्यं २०० पेक्षा जास्त वर्षं, म्हणजे इ.स.पू. ७४० ते इ.स.पू. ५३७ पर्यंत बंदिवासात होती.—यिर्म. ५०:३३.

९. प्राचीन इस्राएल आणि ‘देवाचं इस्राएल’ यांच्या बाबतीत कोणत्या सारख्या घटना घडल्या?

प्राचीन इस्राएलमध्ये “सगळ्या गोष्टी पुन्हा पूर्वीसारख्या” होण्याबद्दल यहेज्केलने ज्या भविष्यवाण्या केल्या होत्या, त्यांची पुढे मोठ्या प्रमाणात पूर्णता झाली. (प्रे. कार्यं ३:२१) जसं प्राचीन इस्राएल राष्ट्राची “कत्तल” करण्यात आली आणि ते बऱ्‍याच काळापर्यंत निर्जीव अवस्थेत होतं, तसंच ‘देवाचं इस्राएल,’ म्हणजे अभिषिक्‍त ख्रिस्ती मंडळीचीही लाक्षणिक अर्थाने कत्तल करण्यात आली आणि ती बऱ्‍याच काळापर्यंत निर्जीव अवस्थेत होती. दुसऱ्‍या शब्दांत, ती बंदिवासात होती. (गलती. ६:१६) आणि ती इतक्या काळापर्यंत बंदिवासात होती, की तिची अवस्था ‘खडखडीत वाळून गेलेल्या हाडांसारखी’ झाली होती; म्हणजेच तिचं यहोवासोबतचं नातं तुटून गेलं होतं. (यहे. ३७:२) आधीच्या अध्यायात पाहिल्याप्रमाणे, अभिषिक्‍त ख्रिस्ती मंडळी दुसऱ्‍या शतकापासून लाक्षणिक अर्थाने बंदिवासात गेली आणि हा बंदिवास पुढे बऱ्‍याच शतकांपर्यंत राहिला. येशूनेसुद्धा गहू आणि जंगली गवताच्या उदाहरणात याबद्दल सांगितलं होतं.—मत्त. १३:२४-३०.

दृष्टान्तातली हाडं “खडखडीत वाळून” गेली होती त्यावरून कळतं, की यहोवाचे अभिषिक्‍त जन बऱ्‍याच काळापर्यंत बंदिवासात निर्जीव अवस्थेत होते (परिच्छेद ८, ९ पाहा)

“ती हाडं एकमेकांना जुळू लागली”

१०. (क) यहेज्केल ३७:७, ८ या वचनांमध्ये देवाच्या लोकांबद्दल काय सांगण्यात आलं होतं? (ख) कोणत्या गोष्टींमुळे यहुदी बंदिवांनाचा विश्‍वास हळूहळू वाढत गेला असेल?

१० प्राचीन काळात देवाचे लोक जेव्हा निर्जीव अवस्थेत होते, तेव्हा यहोवाने त्यांना सांगितलं की हळूहळू “ते जिवंत होतील.” (यहे. ३७:७-१०) देवाची भीती बाळगणारे यहुदी लोक एक दिवस परत आपल्या मायदेशात जाणार होते. पण यावरचा त्यांचा विश्‍वास कोणत्या गोष्टींमुळे हळूहळू वाढत गेला? यहेज्केलच्या आधीच्या संदेष्ट्यांनी ज्या भविष्यवाण्या केल्या होत्या त्यांमुळे त्यांचा विश्‍वास वाढला असावा; उदाहरणार्थ, यशयाने सांगितलं होतं की एक “पवित्र संतती,” म्हणजेच यहुद्यांपैकी काही उरलेले लोक त्यांच्या मायदेशात परत जातील. (यश. ६:१३; ईयो. १४:७-९) तसंच, यहेज्केलने शुद्ध उपासना पुन्हा सुरू होण्याबद्दल ज्या भविष्यवाण्या लिहून ठेवल्या होत्या, त्यांमुळेसुद्धा त्यांची आशा पक्की झाली असेल. शिवाय, दानीएल संदेष्ट्यासारखे विश्‍वासू लोक बाबेलमध्ये राहत होते. त्यांनीही त्यांची आशा जिवंत ठेवली असेल. आणि एक मोठी गोष्ट म्हणजे, इ.स.पू. ५३९ मध्ये बाबेल शहराचा अचानक झालेला नाश त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला होता. यामुळेसुद्धा त्यांना खातरी मिळाली असेल की ते आपल्या देशात नक्की परत जातील.

११, १२. (क) ‘देवाचं इस्राएल’ हळूहळू एका अर्थाने पुन्हा कसं जिवंत झालं? (“शुद्ध उपासना—हळूहळू पुन्हा सुरू होते,” ही चौकटसुद्धा पाहा.) (ख) यहेज्केल ३७:१० मध्ये जे म्हटलं आहे आहे त्यावरून कोणता प्रश्‍न उभा राहतो?

११ ‘देवाचं इस्राएल,’ म्हणजे अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांची मंडळीसुद्धा एका अर्थाने पुन्हा हळूहळू जिवंत कशी झाली? ती मंडळी अनेक शतकं लाक्षणिक अर्थाने बंदिवासात निर्जीव अवस्थेत होती. पण नंतर “हाडांच्या खडखडण्याचा आवाज” ऐकू आला. म्हणजेच देवाची भीती बाळगणाऱ्‍या काही लोकांनी शुद्ध उपासना पुन्हा सुरू करण्यासाठी काही पावलं उचलली. जसं की, १६ व्या शतकात विल्यम टिंडेल यांनी इंग्रजीत बायबलचं भाषांतर केलं. आता सर्वच लोक बायबल वाचू शकतात हे जेव्हा रोमन कॅथलिक चर्चच्या पाळकांना कळलं तेव्हा ते खूप चिडले. यामुळे टिंडेल यांना ठार मारण्यात आलं. असं असलं तरी इतर जण न घाबरता बायबलचं भाषांतर वेगवेगळ्या भाषांमध्ये करत राहिले. आणि या अंधाऱ्‍या जगात देवाच्या वचनाचा प्रकाश हळूहळू चमकू लागला.

१२ पुढे, चार्ल्स रस्सल आणि त्यांचे सोबती मोठ्या आवेशाने बायबलमधली सत्यं शोधू लागले; जणू काय निर्जीव हाडांवर पुन्हा ‘स्नायू आणि मांस’ चढू लागलं. त्यांनी झायन्स वॉच टावर आणि इतर प्रकाशनं तयार केली. त्यामुळे प्रामाणिक मनाच्या लोकांना बायबलची सत्यं समजू लागली आणि तेही अभिषिक्‍त सेवकांसोबत मिळून देवाची सेवा करू लागले. मग २० व्या शतकाच्या सुरुवातीला “फोटो ड्रामा ऑफ क्रिएशन” हा चलचित्रपट आणि द फिनिश्‍ड मिस्ट्री हे पुस्तक, यांसारख्या साधनांमुळे अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचा आवेश आणखीनच वाढला. याच्या काही काळानंतरच, देवाने आपल्या लोकांना ‘त्यांच्या पायांवर उभं’ केलं. (यहे. ३७:१०) पण हे केव्हा आणि कसं घडलं? बाबेलमध्ये ज्या घटना घडल्या त्यांवरून आपल्याला या प्रश्‍नाचं उत्तर मिळतं.

“ते जिवंत होऊन आपल्या पायांवर उभे राहू लागले”

१३. (क) यहेज्केल ३७:१०, १४ मधली भविष्यवाणी इ.स.पू. ५३७ पासून कशी पूर्ण होऊ लागली? (ख) दहा वंशांनी बनलेल्या राज्यातून काही लोक इस्राएलला परत आले हे कोणत्या काही वचनांतून कळतं?

१३ बाबेलमध्ये राहणाऱ्‍या यहुद्यांनी इ.स.पू. ५३७ पासून या दृष्टान्ताची पूर्णता होताना पाहिली. त्या वेळी नेमकं काय घडलं? यहोवाने त्यांना बंदिवासातून सोडवलं आणि इस्राएलमध्ये परत आणलं. एका अर्थाने, यहोवाने त्यांना जिवंत केलं आणि ‘त्यांच्या पायांवर उभं केलं.’ बंदिवासातून परत आलेल्यांमध्ये ४२,३६० इस्राएली आणि जवळपास ७,००० गैर-इस्राएली लोक होते. त्या सगळ्यांनी यरुशलेम शहर आणि तिथलं मंदिर पुन्हा बांधलं आणि ते इस्राएल देशात राहू लागले. (एज्रा १:१-४; २:६४, ६५; यहे. ३७:१४) पुढे जवळजवळ ७० वर्षांनंतर एज्रा यरुशलेमला परत आला तेव्हा त्याच्यासोबत बाबेलमधून जवळपास १,७५० लोकही आले. (एज्रा ८:१-२०) अशा प्रकारे ४४,००० हून जास्त यहुदी, म्हणजे “एक मोठं सैन्य” यरुशलेमला परत आलं. (यहे. ३७:१०) बायबलमधल्या काही वचनांवरून आपल्याला कळतं, की यांच्याशिवाय, दहा वंशांनी बनलेल्या इस्राएल राज्याचेही काही लोक मंदिर बांधायला मदत करण्यासाठी परत आले. इ.स.पू. ७४० मध्ये अश्‍शूरी लोकांनी ज्या इस्राएली लोकांना कैद करून नेलं होतं त्यांचे हे वंशज होते.—१ इति. ९:३; एज्रा ६:१७; यिर्म. ३३:७; यहे. ३६:१०.

१४. (क) यहेज्केलच्या भविष्यवाणीच्या काही भागाची मोठी पूर्णता केव्हा होईल हे यहेज्केल ३७:२४ मधून कसं कळतं? (ख) १९१९ मध्ये काय घडलं? (“‘वाळून गेलेली हाडं’ आणि ‘दोन साक्षीदार’—यांचा एकमेकांशी काय संबंध आहे?” ही चौकटसुद्धा पाहा.)

१४ यहोवाचे लोक जिवंत होतील, स्वतःच्या पायांवर उभे राहतील आणि पुढे जाऊन त्यांचं एक मोठं सैन्य तयार होईल ही भविष्यवाणी मोठ्या प्रमाणात कशी पूर्ण झाली? हे समजवण्यासाठी यहोवाने यहेज्केलला आणखी एक भविष्यवाणी सांगितली. त्यात म्हटलं होतं की महान दावीद, म्हणजे येशू ख्रिस्त राज्य करू लागेल, त्याच्या काही काळानंतर ही भविष्यवाणी मोठ्या प्रमाणावर पूर्ण होईल. b (यहे. ३७:२४) आणि १९१९ मध्ये नेमकं तेच घडलं. यहोवाने आपल्या लोकांना पवित्र शक्‍ती देऊन मदत केली. त्यामुळे ते एका अर्थी जिवंत झाले आणि मोठ्या बाबेलच्या बंदिवासातून त्यांची सुटका झाली. (यश. ६६:८) त्यानंतर यहोवाने त्यांना त्यांच्या ‘देशात,’ म्हणजेच आध्यात्मिक नंदनवनात आणलं. पण आधुनिक काळातल्या यहोवाच्या सेवकांचं एक “मोठं सैन्य” कसं तयार झालं?

१५, १६. (क) आधुनिक काळात यहोवाच्या लोकांचं “मोठं सैन्य” कसं तयार झालं? (ख) यहेज्केलची ही भविष्यवाणी आपल्याला कठीण काळाचा सामना करायला कशी मदत करते? (“‘आपल्या पायांवर उभं राहायला’ यहोवा आपल्याला बळ देईल,” ही चौकटसुद्धा पाहा.)

१५ येशू ख्रिस्ताने १९१९ मध्ये विश्‍वासू दासाला नेमलं. त्यानंतर काही काळाने देवाच्या सेवकांनी जखऱ्‍याच्या एका भविष्यवाणीची पूर्णता पाहिली. बंदिवासातून परत आलेल्यांमध्ये जखऱ्‍याही होता. त्याने भविष्यवाणी केली होती, की “मोठमोठी राष्ट्रं आणि राष्ट्रा-राष्ट्रांतले लोक यरुशलेमध्ये सैन्यांचा देव यहोवा याची सेवा करायला” येतील. जखऱ्‍याने या लोकांची तुलना ‘दहा माणसांशी’ केली. ती “वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्‍या सर्व राष्ट्रांमधून” येणार होती. ही दहा माणसं “एका यहुदी माणसाच्या,” म्हणजे ‘देवाच्या इस्राएलच्या’ झग्याचा काठ घट्ट धरून म्हणतील, “आम्हालाही तुमच्याबरोबर यायचंय. कारण आम्ही ऐकलंय, की देव तुमच्यासोबत आहे.”—जख. ८:२०-२३, गलती. ६:१६.

१६ आज ‘देवाचं इस्राएल’ (पृथ्वीवर उरलेले अभिषिक्‍त ख्रिस्ती) आणि “दहा माणसं” (दुसरी मेंढरं) यांचं मिळून “एक अतिशय मोठं सैन्य तयार झालं” आहे. कारण त्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. (यहे. ३७:१०) आणि ती दिवसेंदिवस वाढतच आहे. येशूचे सैनिक या नात्याने आपण त्याच्या मार्गदर्शनाचं जवळून पालन करतो. कारण, आपला राजा येशू आपल्याला भविष्यात मिळणाऱ्‍या आशीर्वादांच्या दिशेने घेऊन जात आहे.—स्तो. ३७:२९; यहे. ३७:२४; फिलिप्पै. २:२५; १ थेस्सलनी. ४:१६, १७.

१७. पुढच्या अध्यायात आपण कशाबद्दल चर्चा करणार आहोत?

१७ शुद्ध उपासना पुन्हा सुरू झाल्यामुळे देवाच्या लोकांवर एक खास जबाबदारी आली. ती कोणती? या प्रश्‍नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी, आपल्याला यरुशलेमचा नाश होण्याआधी यहोवाने यहेज्केलला जी जबाबदारी दिली होती त्यावर चर्चा करावी लागेल. आणि पुढचा अध्याय त्याबद्दलच आहे.

a यहेज्केलने दृष्टान्तात अशा लोकांची हाडं पाहिली ज्यांचा मृत्यू वय झाल्यामुळे किंवा नैसर्गिक कारणामुळे झाला नव्हता, तर त्यांची “कत्तल” करण्यात आली होती. (यहे. ३७:९) दहा वंशांनी बनलेल्या इस्राएल राज्याच्या लोकांना जेव्हा अश्‍शूरचे लोक बंदी बनवून घेऊन गेले आणि नंतर दोन वंशांनी बनलेल्या यहूदा राज्याच्या लोकांना बाबेलचे लोक बंदी बनवून घेऊन गेले, तेव्हा ‘इस्राएलच्या संपूर्ण घराण्याची’ जणू कत्तल करण्यात आली, म्हणजेच त्यांचं यहोवासोबतचं नातं तुटलं.

b मसीहाविषयीच्या या भविष्यवाणीबद्दल आपण या पुस्तकाच्या ८ व्या अध्यायात चर्चा केली होती.