व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय १२

‘मी त्यांचं एक राष्ट्र बनवीन’

‘मी त्यांचं एक राष्ट्र बनवीन’

यहेज्केल ३७:२२

अध्याय कशाबद्दल आहे: दोन काठ्यांबद्दलची भविष्यवाणी देऊन यहोवा आपल्या लोकांना एकत्र आणायचं अभिवचन देतो

१, २. (क) बंदिवासात असलेल्या लोकांना भीती का वाटली असेल? (ख) पण त्यांना आश्‍चर्य का होतं? (ग) आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

 यहेज्केलने बाबेलच्या बंदिवासात असलेल्या लोकांना देवाच्या प्रेरणेने चिन्हांच्या रूपात अनेक भविष्यवाण्या सांगितल्या. अभिनयाच्या रूपात केलेल्या पहिल्या भविष्यवाणीत त्याने न्यायदंडाचा संदेश दिला. मग दुसऱ्‍या, तिसऱ्‍या आणि नंतर कितीतरी भविष्यावाण्यांमध्ये त्याने हाच संदेश दिला. (यहे. ३:२४-२६; ४:१-७; ५:१; १२:३-६) खरंतर यहेज्केलने आतापर्यंत जितक्या भविष्यवाण्या केल्या आहेत त्यांत त्याने हेच सांगितलं, की यहुद्यांना कठोर शिक्षा मिळेल.

त्यामुळे कल्पना करा, जेव्हा यहेज्केल अभिनयाच्या रूपात भविष्यवाणी सांगायला पुन्हा एकदा त्यांच्यासमोर उभा राहिला तेव्हा त्या लोकांना किती भीती वाटली असेल. ‘आता कोणता भयकंर संदेश हा सांगणार आहे?’ असा प्रश्‍न त्यांच्या मनात आला असेल. पण आश्‍चर्य म्हणजे, या वेळी यहेज्केल ज्या भविष्यवाणीचा अभिनय करतो ती खूप वेगळी आहे. त्यात न्यायदंडाचा नाही, तर उज्ज्वल भविष्याचा संदेश आहे. (यहे. ३७:२३) मग प्रश्‍न येतो, की यहेज्केल त्या बंदिवानांना नेमकं काय सांगतो? त्याचा काय अर्थ होतो? आणि आज देवाच्या सेवकांसाठी त्याचा काय अर्थ आहे? चला यावर आता आपण चर्चा करू या.

“ते माझ्या हातात एक होतील”

३. (क) “यहूदासाठी” असं लिहिलेली काठी कोणाला सूचित करत होती? (ख) “एफ्राईमची काठी” दहा वंशांनी बनलेल्या इस्राएलच्या राज्याला सूचित करत होती असं का म्हणता येईल?

यहोवाने यहेज्केलला दोन काठ्या घ्यायला सांगितल्या. मग त्याने त्याला एका काठीवर “यहूदासाठी” आणि दुसऱ्‍या काठीवर, ‘योसेफसाठी एफ्राईमची काठी’ असं लिहायला सांगितलं. (यहेज्केल ३७:१५, १६ वाचा.) या दोन काठ्या कशाला सूचित करत होत्या? ज्या काठीवर “यहूदासाठी” असं लिहिलं होतं ती यहूदा आणि बन्यामीन या दोन वंशांनी बनलेल्या राज्याला सूचित करते. यहूदाच्या घराण्यातून आलेले राजे या दोन वंशांनी बनलेल्या राज्यावर राज्य करायचे. या राजांसोबत याजकांचाही जवळचा संबंध होता. कारण याजक यहूदामध्ये राहायचे आणि यरुशलेमच्या मंदिरात सेवा करायचे. (२ इति. ११:१३, १४; ३४:३०) अशा प्रकारे यहूदाच्या राज्यात दावीदच्या घराण्यातल्या राजांसोबतच लेवी वंशातले याजकही राहायचे. ‘एफ्राईमची काठी’ दहा वंशांनी बनलेल्या इस्राएलच्या राज्याला सूचित करते. असं का म्हणता येईल? कारण दहा वंशांनी बनलेल्या इस्राएल राज्याचा पहिला राजा यराबाम हा एफ्राईम वंशातला होता. पुढे एफ्राईमचा वंश इस्राएलमध्ये सर्वात शक्‍तिशाली वंश बनला. (अनु. ३३:१७; १ राजे ११:२६) पण लक्ष द्या, दहा वंशांनी बनलेल्या इस्राएलच्या राज्यात दावीदच्या घराण्यातले राजे किंवा लेवी वंशातले याजक नव्हते.

४. यहेज्केलने त्या दोन काठ्यांच्या बाबतीत नंतर जे केलं ते कशाला सूचित करतं? (सुरुवातीचं चित्र पाहा.)

पुढे यहोवाने यहेज्केलला त्या दोन्ही काठ्या एकत्र जोडून धरायला सांगितल्या, म्हणजे “त्यांची एकच काठी होईल.” यहेज्केल जेव्हा हे सर्व करत होता तेव्हा बंदिवासातले लोक अगदी बेचैन होऊन त्याच्याकडे पाहत होते. शेवटी त्यांनी त्याला विचारलं: “या सगळ्या गोष्टींचा काय अर्थ होतो हे आम्हाला सांगशील का?” तेव्हा यहेज्केलने त्यांना सांगितलं की त्याने अभिनयाच्या रूपात जे काही केलं होतं, ते अशा एका गोष्टीला सूचित करतं जी खरंतर यहोवा स्वतः करणार होता. तो नेमकं काय करणार होता? याबद्दल यहोवाने म्हटलं: “मी त्यांना एक काठी करीन, आणि ते माझ्या हातात एक होतील.”—यहे. ३७:१७-१९.

५. यहेज्केलने जो अभिनय केला त्याचा अर्थ यहोवाने कसा समजावून सांगितला? (“दोन काठ्या जोडल्या जातात” ही चौकट पाहा.)

नंतर, त्या दोन काठ्या एकत्र जोडून धरण्याचा काय अर्थ होतो ते यहोवाने समजावून सांगितलं. (यहेज्केल ३७:२१, २२ वाचा.) त्याने म्हटलं, दोन वंशांनी बनलेल्या यहूदाच्या राज्याचे बंदिवान आणि दहा वंशांनी बनलेल्या इस्राएलच्या राज्याचे (एफ्राईमचे) बंदिवान परत इस्राएल देशात येतील आणि तिथे त्यांचं “एक राष्ट्र” होईल.—यिर्म. ३०:१-३; ३१:२-९; ३३:७.

६. यहेज्केल ३७ व्या अध्यायातल्या कोणत्या दोन भविष्यवाण्या एकमेकांशी चांगल्या प्रकारे जुळतात?

यहेज्केलच्या ३७ व्या अध्यायात शुद्ध उपासना पुन्हा सुरू होण्याबद्दल दोन भविष्यवाण्या दिल्या आहेत: एक, ‘वाळून गेलेल्या हाडांबद्दलची’ भविष्यवाणी, तर दुसरी ‘दोन काठ्यांबद्दलची’ भविष्यवाणी. या दोन्ही भविष्यवाण्या एकमेकांशी खूप चांगल्या प्रकारे जुळतात असं म्हणता येईल. कारण त्यांवरून कळतं, की यहोवा आपल्या लोकांना बंदिवासातून फक्‍त सोडवूच शकत नाही (वचनं १-१४), तर आपल्या विखुरलेल्या लोकांना एकत्रही आणू शकतो (वचनं १५-२८). या दोन भविष्यवाण्यांतून लोकांना हा आनंदाचा संदेश देण्यात आला, की बंदिवासातून सुटका होणं आणि विखुरलेल्या लोकांना एकत्र आणणं शक्य आहे.

यहोवाने त्यांना कसं ‘गोळा केलं’?

७. “देवाला सगळं काही शक्य आहे” या गोष्टीचा पुरावा १ इतिहास ९:२, ३ या वचनांतून कसा मिळतो?

मानवी दृष्टिकोनातून पाहिलं, तर बंदिवासातून यहुद्यांची सुटका होणं आणि त्यांना एकत्र आणणं अगदीच अशक्य होतं. a पण “देवाला सगळं काही शक्य आहे.” (मत्त. १९:२६) आणि खरंच यहोवाने तसं करूनही दाखवलं. त्याने आपली भविष्यवाणी पूर्ण केली. इ.स.पू. ५३७ मध्ये बाबेलच्या बंदिवासात असलेल्या यहुद्यांची सुटका झाली. त्यानंतर यहूदा आणि इस्राएल या दोन्ही राज्यांतले काही लोक यरुशलेममध्ये परत आले आणि त्यांनी शुद्ध उपासना पुन्हा सुरू करण्यासाठी हातभार लावला. आणि या गोष्टीचा पुरावा आपल्याला बायबलमध्ये मिळतो. त्यात म्हटलं आहे: ‘यहूदा, बन्यामीन, एफ्राईम आणि मनश्‍शे यांच्या वंशजांपैकी काही जण यरुशलेममध्ये राहायला आले.’ (१ इति. ९:२, ३; एज्रा ६:१७) खरंच, यहोवाने जे म्हटलं होतं तसंच घडलं. दहा वंशांनी बनलेल्या इस्राएलच्या राज्यातले काही लोक आणि दोन वंशांनी बनलेल्या यहूदाच्या राज्यातले काही लोक एकत्र आले.

८. (क) यशया संदेष्ट्याने कोणती भविष्यवाणी केली होती? (ख) यहेज्केल ३७:२१ मध्ये कोणत्या दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत?

बंदिवासातून सुटका झाल्यानंतर इस्राएलला आणि यहूदाला कशा प्रकारे एकत्र आणलं जाईल याबद्दल जवळजवळ २०० वर्षांआधी यशया संदेष्ट्यानेसुद्धा सांगितलं होतं. त्याने म्हटलं होतं, की यहोवा “इस्राएलच्या विखुरलेल्या लोकांना,” तसंच “पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांतून यहूदाच्या पांगलेल्या लोकांना” आणि ‘अश्‍शूरमध्ये’ विखुरलेल्या लोकांना गोळा करून एकत्र आणेल. (यश. ११:१२, १३, १६) आणि अगदी तसंच झालं. ‘ज्या सर्व राष्ट्रांमध्ये इस्राएली लोक गेले होते तिथून’ यहोवाने त्यांना बाहेर आणलं. (यहे. ३७:२१) इथे दोन महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या: एक म्हणजे, यहोवा त्यांना “यहूदा” आणि “एफ्राईम” असं म्हणत नाही, तर त्यांना एकच गट म्हणून “इस्राएली लोक” असं म्हणतो. दुसरी गोष्ट म्हणजे, इस्राएली लोक फक्‍त एका राष्ट्रातून, म्हणजे फक्‍त बाबेलमधून नाही, तर अनेक राष्ट्रांमधून परत येणार होते. खरंतर, ते पृथ्वीच्या “चारही दिशांहून” परत येणार होते.

९. यहोवाने मायदेशात परत आलेल्या इस्राएली लोकांना एकीने राहायला कशी मदत केली?

इस्राएली लोक आपल्या मायदेशात परत आले तेव्हा यहोवाने त्यांना एकीने राहायला कशी मदत केली? त्याने त्यांच्यावर चांगले मेंढपाळ नेमले. जसं की, जरूब्बाबेल, महायाजक यहोशवा, एज्रा आणि नहेम्या. इतकंच नाही तर त्याने हाग्गय, जखऱ्‍या आणि मलाखी या संदेष्ट्यांनाही नेमलं. या सगळ्या विश्‍वासू पुरुषांनी भरपूर मेहनत घेऊन त्या राष्ट्राला यहोवाच्या सूचनांचं पालन करायचं प्रोत्साहन दिलं. (नहे. ८:२, ३) याशिवाय यहोवाने शत्रूंचे कट निष्फळ ठरवून इस्राएल राष्ट्राचं संरक्षणही केलं.—एस्ते. ९:२४, २५; जख. ४:६.

आपल्या लोकांमध्ये एकी आणण्यासाठी यहोवाने त्यांच्यावर चांगले मेंढपाळ नेमले (परिच्छेद ९ पाहा)

१०. सैतान काय करण्यात यशस्वी ठरला?

१० यहोवाने इस्राएली लोकांसाठी खूप काही केलं होतं, पण तरीसुद्धा त्यांच्यापैकी बरेच लोक शुद्ध उपासना सोडून वाईट कामं करू लागले. त्यांनी जी वाईट कामं केली त्यांबद्दल आपल्याला एज्रा आणि नहेम्याच्या पुस्तकांत वाचायला मिळतं. (एज्रा ९:१-३; नहे. १३:१, २, १५) इस्राएली लोकांना आपल्या मायदेशात येऊन शंभर वर्षंही झाली नव्हती तोच ते शुद्ध उपासनेपासून भरकटले; इतके, की यहोवाला अक्षरशः त्यांना विनवणी करून म्हणावं लागलं: “आता माझ्याकडे परत या.” (मला. ३:७) पुढे येशू पृथ्वीवर आला तोपर्यंत यहुदी धर्मात बरेच गट तयार झाले होते आणि अविश्‍वासू मेंढपाळ त्यांचं नेतृत्व करत होते. (मत्त. १६:६; मार्क ७:५-८) देवाच्या लोकांमधली एकी मोडण्यात सैतान बऱ्‍याच प्रमाणात यशस्वी झाला होता. मग याचा अर्थ असा होता का, की आपल्या लोकांमध्ये एकी आणण्याची देवाची भविष्यवाणी निष्फळ ठरली? नाही, असं मुळीच नाही. ही भविष्यवाणी पुढे नक्कीच पूर्ण होणार होती. ती कशी, ते आता आपण पाहू या.

“माझा सेवक दावीद त्यांचा राजा बनेल”

११. (क) आपल्या लोकांमध्ये एकी आणण्याबद्दलच्या भविष्यवाणीविषयी यहोवाने काय सांगितलं? (ख) सैतानाला स्वर्गातून काढून टाकल्यावर त्याने पुन्हा काय करायचा प्रयत्न केला?

११ यहेज्केल ३७:२४ वाचा. आपल्या लोकांमध्ये एकी आणण्याबद्दलच्या भविष्यवाणीची मोठी पूर्णता केव्हा होईल याबद्दल यहोवाने सांगितलं. त्याने म्हटलं त्याचा “सेवक दावीद” म्हणजे येशू, राजा म्हणून राज्य करू लागेल त्यानंतर ही भविष्यवाणी पूर्ण होईल. आणि आपल्याला माहीत आहे की येशू १९१४ मध्ये राजा बनला. b (२ शमु. ७:१६; लूक १:३२) तोपर्यंत इस्राएल राष्ट्राच्या जागी ‘देवाच्या इस्राएलची,’ म्हणजे अभिषिक्‍त जनांची निवड करण्यात आली होती. (यिर्म. ३१:३३; गलती. ३:२९; ६:१६) सैतानाला स्वर्गातून काढून टाकल्यानंतर त्याने पुन्हा देवाच्या लोकांमधली एकी मोडण्याचा प्रयत्न केला. (प्रकटी. १२:७-१०) उदाहरणार्थ, १९१६ मध्ये बंधू रस्सलचा मृत्यू झाला तेव्हा सैतानाने धर्मत्यागी लोकांचा उपयोग करून अभिषिक्‍त लोकांमध्ये फूट पाडायचा प्रयत्न केला. पण काही काळातच ते धर्मत्यागी लोक स्वतःहून संघटना सोडून गेले. पण सैतान तेवढ्यावरच थांबला नाही. संघटनेत पुढाकार घेणाऱ्‍या बांधवांना तुरुंगात टाकण्यात तो यशस्वी झाला. पण एवढं सगळं करूनही तो देवाच्या लोकांचं अस्तित्व मिटवू शकला नाही. जे अभिषिक्‍त बांधव यहोवाला विश्‍वासू होते त्यांनी आपल्यातली एकी टिकवून ठेवली.

१२. सैतानाला अभिषिक्‍त जनांमधली एकी मोडण्यात यश का आलं नाही?

१२ तर आतापर्यंत आपण पाहिलं की ‘देवाचं इस्राएल,’ म्हणजे अभिषिक्‍त जन हे इस्राएल राष्ट्रासारखे नव्हते. त्यांच्यातली एकी मोडण्याचे सैतानाने बरेच प्रयत्न केले, तरी त्याचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरले. कारण अभिषिक्‍त जनांनी यहोवाच्या स्तरांनुसार जीवन जगण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. आणि त्यामुळे सैतानावर विजय मिळवणारा त्यांचा राजा येशू ख्रिस्त त्यांचं संरक्षण करत आहे.—प्रकटी. ६:२.

यहोवा आपल्या उपासकांना “एक” व्हायला मदत करतो

१३. दोन काठ्यांबद्दलच्या भविष्यवाणीतून आपल्याला कोणतं महत्त्वाचं सत्य शिकायला मिळतं?

१३ दोन काठ्यांबद्दलच्या भविष्यवाणीचा आपल्यासाठी काय अर्थ होतो? लक्षात घ्या, भविष्यवाणीचा मुख्य मुद्दा हा होता, की दोन गटांना कसं एकत्र आणलं जाईल. पण सगळ्यात मुख्य मुद्दा हा होता, की यहोवा स्वतः त्यांना एकत्र आणणार होता. तर मग दोन काठ्यांबद्दलच्या भविष्यवाणीतून शुद्ध उपासनेबद्दलचं कोणतं महत्त्वाचं सत्य आपल्याला शिकायला मिळतं? थोडक्यात सांगायचं तर, यहोवा स्वतः आपल्या लोकांना ‘एक करेल’ हे आपल्याला शिकायला मिळतं.—यहे. ३७:१९.

१४. दोन काठ्यांबद्दलच्या भविष्यवाणीची १९१९ पासून मोठी पूर्णता कशी होऊ लागली?

१४ १९१९ पासून देवाच्या लोकांना शुद्ध करण्यात आलं आणि ते आध्यात्मिक नंदनवनात येऊ लागले. तेव्हापासून दोन काठ्यांबद्दलच्या भविष्यवाणीची मोठी पूर्णता होऊ लागली. त्या वेळी ज्यांना एकत्र आणण्यात आलं त्यांच्यापैकी बहुतेकांना स्वर्गात राजे आणि याजक म्हणून सेवा करण्याची आशा होती. (प्रकटी. २०:६) एका अर्थी हे अभिषिक्‍त जन “यहूदासाठी” असलेल्या काठीसारखे, म्हणजे दावीदच्या घराण्यातले राजे आणि लेवी वंशातले याजक असलेल्या राज्यातले होते. पण काळ सरत गेला तसं पृथ्वीवरची आशा असणारे जास्तीत जास्त लोक या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांसोबत मिळून देवाची सेवा करू लागले. ते ‘एफ्राईमच्या काठीसारखे,’ म्हणजे दावीदच्या घराण्यातले राजे आणि लेवी वंशातले याजक नसलेल्या राज्यातले होते. या दोन्ही गटांचा एकच राजा आहे, येशू ख्रिस्त. त्याच्या अधिकाराखाली राहून ते एकत्र मिळून यहोवाची सेवा करत आहेत.—यहे. ३७:२४.

“ते माझे लोक होतील”

१५. यहेज्केल ३७:२६, २७ मधले शब्द आज कसे पूर्ण होत आहेत?

१५ यहेज्केलच्या भविष्यवाणीतूनही आपल्याला हेच कळतं, की अनेक जण अभिषिक्‍त जनांसोबत मिळून शुद्ध उपासना करतील. या लोकांबद्दल यहोवाने म्हटलं: ‘मी त्यांची संख्या वाढवीन’ आणि “माझा तंबू त्यांच्यावर असेल.” (यहे. ३७:२६, २७; तळटीप) यहेज्केलच्या या भविष्यवाणीवरून आपल्याला प्रेषित योहानने पाहिलेला दृष्टान्त आठवतो. यहेज्केलच्या मृत्यूनंतर जवळजवळ ७०० वर्षांनी योहानने म्हटलं: ‘राजासनावर जो बसला आहे तो मोठ्या लोकसमुदायावर आपला तंबू पसरवेल.’ (प्रकटी. ७:९, १५) आज अभिषिक्‍त जन आणि मोठ्या लोकसमुदायातले लोक एक राष्ट्र म्हणून यहोवाच्या तंबूमध्ये सुरक्षित आहेत.

१६. जखऱ्‍याने अभिषिक्‍त जन आणि पृथ्वीवरच्या जीवनाची आशा असलेले यांच्यातल्या एकीबद्दल काय भविष्यवाणी केली होती?

१६ अभिषिक्‍त जनांना, म्हणजे ‘देवाच्या इस्राएलला’ आणि पृथ्वीवरच्या जीवनाची आशा असलेल्या लोकांना एकत्र केलं जाईल याबद्दल जखऱ्‍या संदेष्ट्यानेसुद्धा भविष्यवाणी केली होती. बंदिवासातून परत आलेल्या यहुद्यांपैकी तोसुद्धा एक होता. त्याने म्हटलं: “सर्व राष्ट्रांमधून दहा माणसं एका यहुदी माणसाच्या झग्याचा काठ घट्ट धरतील आणि म्हणतील: ‘आम्हालाही तुमच्याबरोबर यायचंय. कारण आम्ही ऐकलंय, की देव तुमच्यासोबत आहे.’” (जख. ८:२३) लक्ष द्या, इथे “तुझ्याबरोबर” असं म्हटलेलं नाही, तर “तुमच्याबरोबर” असं म्हटलं आहे. यावरून कळतं, की वचनात उल्लेख केलेला ‘एक यहुदी माणूस’ एका व्यक्‍तीला नाही, तर लोकांच्या एका गटाला सूचित करतो. हा गट म्हणजे, पृथ्वीवर उरलेले अभिषिक्‍त जन, किंवा ‘देवाचं इस्राएल.’ (रोम. २:२८, २९) आणि भविष्यवाणीत सांगितलेली “दहा माणसं,” पृथ्वीवरच्या जीवनाची आशा असलेल्या लोकांना सूचित करतात. ते एका अर्थाने अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या ‘झग्याचा काठ घट्ट धरून त्यांच्याबरोबर जातात.’ (यश. २:२, ३; मत्त. २५:४०) “झग्याचा काठ घट्ट धरतील” आणि “तुमच्याबरोबर यायचंय” या शब्दांवरून कळतं, की या दोन्ही गटांमधलं एकीचं बंधन किती मजबूत आहे.

१७. आज आपल्यामध्ये जी एकी आहे त्याचं येशूने कसं वर्णन केलं?

१७ येशूने स्वतःची तुलना एका मेंढपाळाशी केली आणि म्हटलं की त्याच्या नेतृत्वाखाली त्याची मेंढरं (अभिषिक्‍त जन) आणि ‘दुसरी मेंढरं’ (पृथ्वीवरच्या जीवनाची अशा असलेले लोक) यांचा मिळून “एक कळप” होईल. त्याने असं म्हटलं तेव्हा त्याच्या मनात कदाचित यहेज्केलने एकीबद्दल केलेली भविष्यवाणी असावी. (योहा. १०:१६; यहे. ३४:२३; ३७:२४, २५) येशूच्या आणि प्राचीन काळातल्या संदेष्ट्यांच्या शब्दांवरून कळतं, की आपल्याला स्वर्गातल्या जीवनाची आशा असो किंवा पृथ्वीवरच्या जीवनाची, आपल्यातली एकता खरंच खूप अनोखी आहे! एकीकडे आज खोट्या धर्मात असंख्य गट तयार होऊन त्यात फूट पडत आहे. पण तेच, आपल्यामध्ये कमालीची एकी आहे. खरंच, हा एक चमत्कारच आहे!

आज अभिषिक्‍त जन आणि ‘दुसरी मेंढरं,’ “एक कळप” म्हणून यहोवाची उपासना करत आहेत (परिच्छेद १७ पाहा))

‘माझं मंदिर कायम त्यांच्यामध्ये राहील’

१८. यहेज्केल ३७:२८ मध्ये सांगितल्याप्रमाणे देवाच्या लोकांनी “जगाचा भाग” का असू नये?

१८ आपल्यातली ही एकी कधीच का मोडली जाऊ शकत नाही याचं कारण यहेज्केल आपल्या भविष्यवाणीत शेवटी सांगतो. (यहेज्केल ३७:२८ वाचा.) आज यहोवाच्या लोकांमध्ये एकी आहे, कारण शुद्ध उपासनेला सूचित करणारं त्याचं मंदिर “त्यांच्यामध्ये” आहे. आणि जोपर्यंत ते स्वतःला शुद्ध, किंवा सैतानाच्या जगापासून वेगळं ठेवतात तोपर्यंत यहोवाचं मंदिर त्यांच्यामध्ये राहील. (१ करिंथ. ६:११; प्रकटी. ७:१४) जगाचा भाग नसणं किती महत्त्वाचं आहे यावर येशूने भर दिला. आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री त्याने शिष्यांसाठी कळकळून अशी प्रार्थना केली: ‘पवित्र बापा, त्यांना सांभाळ. म्हणजे जसं आपण एक आहोत, तसं त्यांनीही एक व्हावं. ते जगाचा भाग नाहीत. सत्याद्वारे त्यांना पवित्र कर.’ (योहा. १७:११, १६, १७) लक्ष द्या, इथे शिष्यांनी “एक व्हावं” असं म्हणताना येशूने असंही म्हटलं, की “ते जगाचा भाग नाहीत.”

१९. (क) आपण ‘देवाचं अनुकरण’ कसं करू शकतो? (ख) आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री येशूने एकीबद्दल कोणती महत्त्वाची गोष्ट सांगितली?

१९ संपूर्ण बायबलमध्ये या एकाच ठिकाणी येशूने देवाला “पवित्र बापा” असं म्हटलं आहे. यहोवा पूर्णपणे शुद्ध आणि पवित्र आहे. आणि त्याने इस्राएली लोकांना अशी आज्ञा दिली होती की “तुम्ही पवित्र असलं पाहिजे, कारण मी पवित्र आहे.” (लेवी. ११:४५) आपण ‘देवाचं अनुकरण’ करणारे आहोत, त्यामुळे आपलंही वागणं-बोलणं नेहमी पवित्र असलं पाहिजे. (इफिस. ५:१; १ पेत्र १:१४, १५) बायबलमध्ये “पवित्र” हा शब्द जेव्हा माणसांच्या बाबतीत वापरण्यात आला आहे, तेव्हा त्याचा अर्थ “स्वतःला वेगळं करणं” असा होतो. म्हणूनच आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री केलेल्या प्रार्थनेत येशूने या गोष्टीवर भर दिला, की जोपर्यंत त्याचे शिष्य स्वतःला जगापासून वेगळं ठेवतात आणि आपसांत फूट पडू देत नाहीत तोपर्यंत त्यांच्यातली एकी टिकून राहील.

“त्या दुष्टापासून त्यांना सांभाळ”

२०, २१. (क) यहोवा आपलं संरक्षण करेल यावरचा आपला भरवसा कशामुळे वाढतो? (ख) तुम्ही काय करायचा निर्धार केला आहे?

२० आज जगभरातल्या यहोवाच्या साक्षीदारांमध्ये असलेल्या अनोख्या एकीवरून आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते. ती म्हणजे, ‘त्या दुष्टापासून शिष्यांना सांभाळ,’ या येशूच्या विनंतीचं यहोवाने उत्तर दिलं आहे. (योहान १७:१४, १५ वाचा.) देवाच्या लोकांमधली एकी मोडण्यात सैतान अपयशी ठरला आहे. त्यामुळे, यहोवा कायम आपलं संरक्षण करेल यावरचा आपला भरवसा आणखी वाढतो. यहेज्केलच्या भविष्यवाणीत यहोवाने म्हटलं होतं, की त्या दोन काठ्या त्याच्या हातात एक होतील. यावरून कळतं, की यहोवाच्या लोकांमधली एकी यहोवामुळेच शक्य झाली आहे. आणि त्याचे शक्‍तिशाली हात आपलं संरक्षण करत असल्यामुळे सैतान आपलं काहीच नुकसान करू शकत नाही.

२१ तर मग, आपला निर्धार काय असला पाहिजे? हाच, की आपल्यातली ही अनोखी एकी वाढवण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने सतत प्रयत्न केला पाहिजे. पण आपल्याला हे कोणत्या एका महत्त्वाच्या मार्गाने करता येईल? त्यासाठी आपण यहोवाच्या लाक्षणिक मंदिरात नियमितपणे शुद्ध उपासना केली पाहिजे. यात कोणत्या गोष्टी सामील आहेत त्यांबद्दल आपण पुढच्या दोन अध्यायांमध्ये पाहणार आहोत.

a दहा वंशांनी बनलेल्या इस्राएलच्या राज्यातल्या (‘एफ्राईमची काठी’) लोकांना, अश्‍शूरी लोक बंदी बनवून घेऊन गेले त्याच्या सुमारे २०० वर्षांनंतर ही भविष्यवाणी यहेज्केलला सांगण्यात आली.—२ राजे १७:२३.

b या पुस्तकाच्या ८ व्या अध्यायात या भविष्यवाणीबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.