व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय ९

“मी त्या सगळ्यांचं हृदय एक करीन”

“मी त्या सगळ्यांचं हृदय एक करीन”

यहेज्केल ११:१९

अध्याय कशाबद्दल आहे: शुद्ध उपासना पुन्हा कशी सुरू होते हे यहेज्केलच्या भविष्यवाण्यांमध्ये टप्प्याटप्प्याने सांगितलं आहे

१-३. बाबेलचे लोक यहोवाच्या उपासकांची कशी थट्टा करतात आणि का?

 अशी कल्पना करा की तुम्ही इतर विश्‍वासू यहुद्यांसोबत बाबेल शहरामध्ये राहत आहात. तुम्हाला बंदिवासात येऊन आता पन्‍नासएक वर्षं झाली आहेत. नेहमीप्रमाणे शब्बाथाच्या दिवशी तुम्ही यहोवाची उपासना करण्यासाठी इतर यहुद्यांना भेटायला चालला आहात. शहराच्या गजबजलेल्या रस्त्यांवरून वाट काढत जाताना तुम्हाला कितीतरी मोठमोठी मंदिरं आणि देवस्थानं दिसतात. तिथे मार्दूकसारख्या खोट्या दैवतांची पूजा करण्यासाठी लोकांची गर्दी लोटली आहे. त्या दैवतांना लोक अर्पणं देत आहेत आणि त्यांच्यासाठी भजनं गात आहेत.

लोकांच्या गर्दीपासून दूर एकत्र जमलेल्या काही यहुद्यांना तुम्ही जाऊन भेटता. a मग यहोवाला प्रार्थना करण्यासाठी, स्तोत्रं गाण्यासाठी आणि त्याचं वचन वाचण्यासाठी तुम्ही सगळे एक शांत ठिकाण शोधता. शेवटी शहराच्या कालव्याजवळ तुम्हाला अशी जागा सापडते. आजूबाजूला इतकी शांतता आहे, की तुम्ही प्रार्थना करत असताना किनाऱ्‍याला बांधलेल्या नावांचा हलकासा करकर आवाजही तुम्हाला ऐकू येतो. यहोवाची उपासना करण्यासाठी तुम्हाला एक शांत ठिकाण सापडलं याचा तुम्हाला आनंद वाटतो. पण तुमच्या मनात थोडीशी भीतीपण आहे. नेहमीसारखं शहरातल्या लोकांनी इथे येऊन गोंधळ घालून आपल्याला त्रास देऊ नये असं तुम्हाला वाटतं. पण शहरातले लोक असं का करतात?

बाबेलचा इतिहास दाखवतो, की तिथल्या लोकांनी बरीच युद्धं जिंकली आहेत. आणि आपल्या दैवतांमुळेच आपलं शहर इतकं ताकदवान झालं आहे असं त्यांना वाटतं. यरुशलेमचा नाश केल्यावर त्यांना वाटतं की त्यांचा देव मार्दूक, यहोवापेक्षा खूप शक्‍तिशाली आहे. त्यामुळे ते तुमच्या देवाची आणि तुमची थट्टा करतात. काही वेळा तर तुमची चेष्टा करत ते म्हणतात: “आमच्यासाठी सीयोनचं एखादं गाणं गा.” (स्तो. १३७:३) ते असं का करतात? कारण बऱ्‍याचशा स्तोत्रांमध्ये सीयोन किंवा यरुशलेमने यहोवाच्या शत्रूंवर विजय मिळवल्याबद्दल आनंद व्यक्‍त केला आहे. पण आता अगदी उलटच घडलं आहे; यरुशलेमचे लोकच आता बाबेलच्या बंदिवासात आहेत. त्यामुळे अशा स्तोत्रांची थट्टा करायला बाबेलच्या लोकांना खूप आवडत असावं. पण इतर काही स्तोत्रांमध्ये बाबेलच्या लोकांनी यरुशलेमवर मिळवलेल्या विजयांबद्दलही सांगितलं आहे. जसं की एका स्तोत्रात म्हटलं आहे: “यरुशलेमला त्यांनी दगडमातीचा ढिगारा करून टाकलंय. . . . आमच्या आसपासचे लोक आमची थट्टा करतात आणि आम्हाला टोमणे मारतात.” यहुद्यांची थट्टा करण्यासाठी ते कदाचित अशा स्तोत्रांचाही वापर करत असावेत.—स्तो. ७९:१, ३, ४.

४, ५. (क) यहेज्केलच्या भविष्यवाणीतून यहुद्यांना कोणती आशा मिळाली? (सुरुवातीचं चित्र पाहा.) (ख) या लेखात आपण काय पाहणार आहोत?

पण फक्‍त बाबेलचे लोकच नाही, तर काही धर्मत्यागी यहुदीसुद्धा तुमची थट्टा करतात. कारण तुम्ही यहोवावर आणि त्याच्या संदेष्ट्यांवर विश्‍वास ठेवता. पण असं असूनही यहोवाची शुद्ध उपासना केल्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप सांत्वन मिळतं. एकत्र मिळून प्रार्थना केल्यामुळे, स्तोत्रं गायल्यामुळे आणि देवाचं वचन वाचल्यामुळे तुमच्या मनाला दिलासा मिळतो. (स्तो. ९४:१९; रोम. १५:४) कल्पना करा, की शब्बाथाच्या या दिवशी तुमच्यातल्या एकाने एक खास गोष्ट आणली आहे; त्याने यहेज्केलची भविष्यवाणी असलेली एक गुंडाळी आणली आहे. त्या भविष्यवाणीत यहोवाने आपल्या लोकांना वचन दिलं आहे की तो त्यांना त्यांच्या मायदेशात परत घेऊन जाईल. आशा देणारी ही भविष्यवाणी मोठ्याने वाचून दाखवली जाते तेव्हा तुमचं मन आनंदाने भरून जातं. तुम्ही आपल्या कुटुंबासोबत यरुशलेमला जाऊन शुद्ध उपासना पुन्हा सुरू करण्यात हातभार लावाल, तो दिवस किती रोमांचक असेल याची तुम्ही कल्पना करता.

यहेज्केलच्या भविष्यवाणीत शुद्ध उपासना पुन्हा सुरू होण्याबद्दलची अशी अभिवचनं आपल्याला वारंवार वाचायला मिळतात. तर चला, आपल्याला आशा देणाऱ्‍या या विषयाबद्दल आता आपण चर्चा करू या. आपण पाहू, की बंदिवासात असलेल्या यहुद्यांच्या बाबतीत ही अभिवचनं किंवा भविष्यवाण्या कशा पूर्ण झाल्या? आणि आपल्या काळात त्या कशा पूर्ण होऊ लागल्या? तसंच, त्यांपैकी काहींची भविष्यात शेवटची पूर्णता कशी होईल?

“ते बंदिवासात आणि गुलामीत जातील”

६. यहोवाने आपल्या लोकांना वारंवार कशा प्रकारे इशारा दिला होता?

यहुदी लोक बंडखोरपणे वागत राहिले तर यहोवा त्यांना कशा प्रकारे शिक्षा देईल हे त्याने यहेज्केलद्वारे सांगितलं होतं. त्याने स्पष्ट शब्दांत म्हटलं होतं: “ते बंदिवासात आणि गुलामीत जातील.” (यहे. १२:११) शिवाय, आपण या पुस्तकाच्या ६ व्या अध्यायात पाहिलं होतं, की यहेज्केलने ही शिक्षा अभिनयाच्या रूपातही करून दाखवली होती. पण यहोवा काही पहिल्यांदाच त्यांना इशारा देत होता असं नाही. अगदी मोशेच्या काळापासून, म्हणजे जवळजवळ एक हजार वर्षांपासून, यहोवाने आपल्या लोकांना बजावलं होतं की ते जर असंच बंडखोरपणे वागत राहिले, तर एक दिवस ते नक्की बंदिवासात जातील. (अनु. २८:३६, ३७) पुढे यशया आणि यिर्मयासारख्या संदेष्ट्यांनीसुद्धा अशाच प्रकारे लोकांना इशारा दिला होता.—यश. ३९:५-७; यिर्म. २०:३-६.

७. यहोवाने आपल्या लोकांना कशा प्रकारे शिक्षा केली?

पण दुःखाची गोष्ट म्हणजे यहोवा देत असलेल्या इशाऱ्‍यांकडे यहुद्यांनी लक्ष दिलं नाही; त्यांनी एका कानाने ऐकलं आणि दुसऱ्‍या कानाने सोडून दिलं. दुष्ट मेंढपाळांच्या प्रभावाखाली येऊन त्यांनी यहोवाचा विश्‍वासघात केला, ते बंडखोरपणे वागू लागले, मूर्तिपूजा करू लागले आणि भ्रष्ट कामं करत राहिले. त्यामुळे यहोवाला खूप वाईट वाटलं आणि म्हणून त्यांच्यावर दुष्काळ आला तेव्हा त्याने त्यांना वाचवलं नाही. ते लोक ज्या देशात राहत होते तो खरंतर “दूध आणि मध वाहत” असलेला देश मानला जायचा. त्यामुळे दुष्काळाचं हे संकट येणं ही खरंच त्यांच्यासाठी एक अपमानाची गोष्ट होती. (यहे. २०:६, ७) मग, यहोवाने फार आधी सांगितल्याप्रमाणे त्याने या भरकटलेल्या लोकांना बंदिवासात पाठवून शिक्षा केली. इ.स.पू. ६०७ मध्ये बाबेलच्या नबुखद्‌नेस्सर राजाने यरुशलेमवर शेवटचा हल्ला केला. त्याने शहराचा आणि तिथल्या मंदिराचा नाश केला. त्या नाशातून वाचलेल्या हजारो यहुद्यांना बंदी बनवून नेण्यात आलं. आणि या अध्यायाच्या सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे, तिथे त्यांची थट्टा करण्यात आली आणि त्यांना विरोधाचा सामना करावा लागला.

८, ९. देवाने ख्रिस्ती मंडळीला धर्मत्यागाबद्दल कशा प्रकारे इशारा दिला होता?

यहुदी लोक जसं बाबेलच्या बंदिवासात गेले तसंच काहीसं पुढे ख्रिस्ती मंडळीच्या बाबतीतही घडलं. प्राचीन काळातल्या यहुद्यांप्रमाणेच ख्रिस्ताच्या अनुयायांनासुद्धा खूप आधीपासूनच एक इशारा देण्यात आला होता. जसं की, आपल्या सेवाकार्याच्या सुरुवातीला येशूने म्हटलं होतं, “खोट्या संदेष्ट्यांपासून जपून राहा. कारण ते मेंढरांच्या वेषात तुमच्याकडे येतात, पण आतून ते क्रूर लांडगे आहेत.” (मत्त. ७:१५) पुढे अनेक वर्षांनंतर प्रेषित पौलनेसुद्धा देवाच्या प्रेरणेने असाच इशारा दिला होता. त्याने म्हटलं: “मला माहीत आहे, की मी गेल्यानंतर क्रूर लांडगे तुमच्यात शिरतील आणि ते कळपाशी दयाळूपणे वागणार नाहीत. तुमच्यामधूनच काही माणसं उठतील आणि शिष्यांना आपल्याकडे ओढून घेण्यासाठी चुकीच्या गोष्टी शिकवतील.”—प्रे. कार्यं २०:२९, ३०.

अशा धोकादायक माणसांना कसं ओळखायचं आणि त्यांच्यापासून दूर कसं राहायचं, हे ख्रिश्‍चनांना शिकवण्यात आलं होतं. ख्रिस्ती वडिलांना सांगण्यात आलं होतं, की त्यांनी मंडळीतून धर्मत्यागी लोकांना काढून टाकावं. (१ तीम. १:१९; २ तीम. २:१६-१९; २ पेत्र २:१-३; २ योहा. १०) पण प्रेमळपणे दिलेल्या या इशाऱ्‍यांकडे, प्राचीन इस्राएल आणि यहूदाच्या लोकांप्रमाणेच बरेच ख्रिस्ती हळूहळू दुर्लक्ष करू लागले. त्यामुळे पहिलं शतक संपेपर्यंत ख्रिस्ती मंडळीत धर्मत्याग पसरला होता. त्या वेळी प्रेषितांपैकी फक्‍त योहानच जिवंत होता. ख्रिस्ती मंडळी कशी भ्रष्ट होत होती आणि मंडळीत बंडखोरपणा कसा पसरत होता हे त्याने स्वतः पाहिलं होतं. या सगळ्यापासून मंडळीचं संरक्षण करणारा तो एकटाच उरला होता. (२ थेस्सलनी. २:६-८; १ योहा. २:१८) पण त्याच्या मृत्यूनंतर काय झालं?

१०, ११. येशूने गहू आणि जंगली गवताबद्दल जे म्हटलं होतं ते दुसऱ्‍या शतकापासून कसं पूर्ण होऊ लागलं?

१० गहू आणि जंगली गवताबद्दल येशूने जे उदाहरण दिलं होतं ते योहानच्या मृत्यूनंतर पूर्ण व्हायला लागलं. (मत्तय १३:२४-३० वाचा.) येशूने आधी सांगितल्याप्रमाणे, सैतानाने ख्रिस्ती मंडळीत “जंगली गवताचं बी” पेरलं, म्हणजेच मंडळीत नकली ख्रिश्‍चन येऊ लागले आणि त्यामुळे ती खूप वेगाने भ्रष्ट होऊ लागली. मूर्तिपूजा आणि खोट्या धर्माशी संबंध असलेले सणवार आणि रितीरिवाज यांनी ख्रिस्ती मंडळी दूषित होऊ लागली. तसंच देवाला न मानणाऱ्‍या तत्त्वज्ञानी लोकांच्या आणि खोट्या धर्माच्या शिकवणीसुद्धा मंडळीत पसरू लागल्या. हे सगळं पाहून यहोवाला खरंच किती वाईट वाटलं असेल! कारण ख्रिस्ती मंडळीची सुरुवात त्याच्या मुलाने केली होती. मग यहोवाने काय केलं? त्याने बंडखोर इस्राएली लोकांप्रमाणेच या ख्रिश्‍चनांनाही बंदिवासात जाऊ दिलं. दुसऱ्‍या शतकापासून (इ.स. १०० पासून) पुढे नकली ख्रिश्‍चन इतके वाढले होते, की ‘गव्हासारखे’ खरे ख्रिश्‍चन ओळखणं कठीण झालं होतं. एका अर्थाने, खरी ख्रिस्ती मंडळी मोठ्या बाबेलच्या, म्हणजे खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याच्या बंदिवासात गेली होती; तर नकली ख्रिश्‍चन पूर्णपणे त्याचा भाग बनले होते. अशा प्रकारे नकली ख्रिश्‍चन वाढत गेले आणि ख्रिस्ती धर्मजगत अस्तित्वात आलं.

११ पुढे अनेक शतकांपर्यंत ख्रिस्ती धर्मजगताचं वर्चस्व राहिलं. पण आध्यात्मिक अंधाराच्या त्या काळात, येशूच्या उदाहरणातले “गहू” म्हणजेच काही खरे ख्रिश्‍चन अस्तित्वात होते. यहेज्केल ६:९ मध्ये सांगितलेल्या बंदिवासातल्या यहुद्यांप्रमाणेच या खऱ्‍या ख्रिश्‍चनांनीसुद्धा यहोवाची आठवण केली. काहींनी ख्रिस्ती धर्मजगताच्या खोट्या शिकवणींचा धैर्याने विरोध केला. त्यामुळे त्यांची थट्टा आणि छळ करण्यात आला. पण यहोवा आपल्या लोकांना कायम या आध्यात्मिक अंधारात राहू देणार होता का? मुळीच नाही! त्याने यहुद्यांच्या बाबतीत जे केलं तेच यांच्या बाबतीतही केलं. त्याने योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेपर्यंतच त्यांना शिक्षा केली. (यिर्म. ४६:२८) शिवाय त्याने आपल्या लोकांना एक आशाही दिली. चला आता आपण परत बाबेलमधल्या यहुद्यांबद्दल चर्चा करू या, आणि पाहू या की यहोवाने त्यांना बंदिवासातून बाहेर येण्याची आशा कशी दिली.

मोठ्या बाबेलने बऱ्‍याच शतकांपर्यंत खऱ्‍या ख्रिश्‍चनांचा छळ केला (परिच्छेद १०, ११ पाहा)

“माझा राग शांत होईल”

१२, १३. बंदिवासातल्या लोकांबद्दल असलेला यहोवाचा राग शेवटी शांत का होणार होता?

१२ यहोवाने आपल्या लोकांना स्पष्ट शब्दांत सांगितलं की त्याचा राग त्यांच्यावर भडकेल. पण त्याच वेळी त्याने असंही आश्‍वासन दिलं की तो कायम त्यांच्याबद्दल मनात राग धरणार नाही. त्याने म्हटलं: “माझा राग शांत होईल, त्यांच्यावर भडकलेला माझा क्रोध कमी होईल आणि माझं समाधान होईल. त्यांच्यावर माझ्या क्रोधाचा वर्षाव करून झाल्यावरच त्यांना कळून येईल, की मी यहोवा हे बोललोय. कारण, फक्‍त माझीच उपासना केली जावी अशी अपेक्षा मी करतो.” (यहे. ५:१३) पण काही काळाने यहोवाचा राग शांत का होणार होता?

१३ पहिलं कारण म्हणजे, अविश्‍वासू यहुद्यांसोबत काही विश्‍वासू यहुद्यांनासुद्धा बाबेलच्या बंदिवासात नेण्यात आलं होतं. दुसरं कारण म्हणजे, अविश्‍वासू यहुद्यांपैकी काही जण पश्‍चात्ताप करतील असं देवाने आधीच सांगितलं होतं. त्याने म्हटलं होतं की त्यांना आपली वाईट आणि घृणास्पद कामं आठवून स्वतःचीच लाज वाटेल आणि त्याबद्दल ते माफी मागतील. (यहे. ६:८-१०; १२:१६) बंदिवासात गेलेल्या यहुद्यांमध्ये यहेज्केल, दानीएल आणि त्याचे तीन मित्र यांसारखे विश्‍वासू लोकसुद्धा होते. दानीएल खरंतर बराच काळ जगला; त्याने बंदिवासाची सुरुवात आणि शेवटसुद्धा पाहिला. इस्राएली लोकांनी केलेल्या पापांबद्दल यहोवाने त्यांना क्षमा करावी म्हणून त्याने कळकळून देवाला प्रार्थना केली. त्याची ही प्रार्थना दानीएलच्या ९ व्या अध्यायात आपल्याला वाचायला मिळते. त्या प्रार्थनेतून दिसून येतं, की बंदिवासात असलेले हजारो यहुदी यहोवाच्या माफीसाठी खूप आसुसलेले होते आणि त्याने आपल्याला पुन्हा आशीर्वाद द्यावा अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे यहोवा बंदिवासातून आपली सुटका करेल आणि शुद्ध उपासना पुन्हा सुरू होईल, याबद्दल यहेज्केलच्या भविष्यवाण्या त्यांनी ऐकल्या तेव्हा त्यांना खरंच किती प्रोत्साहन मिळालं असेल!

१४. यहोवा आपल्या लोकांना त्यांच्या मायदेशात परत का आणणार होता?

१४ यहुदी लोक पश्‍चात्ताप करतील फक्‍त याच कारणामुळे यहोवा त्यांची बंदिवासातून सुटका करून शुद्ध उपासना पुन्हा सुरू करणार होता का? नाही. तर याहून महत्त्वाचं आणखी एक कारण होतं; ते म्हणजे, यहोवाला पुन्हा एकदा सर्व राष्ट्रांसमोर आपलं नाव पवित्र करायचं होतं. (यहे. ३६:२२) यामुळे बाबेलच्या लोकांना एकदाच आणि शेवटचं कळणार होतं, की सर्वोच्च प्रभू यहोवा याच्यासमोर मार्दूकसारखे खोटे देव काहीच नाहीत; ते अगदीच कवडीमोलाचे आहेत. आता आपण, बंदिवासात असलेल्या यहुद्यांना यहोवाने जी अभिवचनं दिली होती त्यांबद्दल पाहू या. यहेज्केलद्वारे यहोवाने त्यांना पाच अभिवचनं दिली होती. सगळ्यात आधी आपण हे पाहू, की यातलं प्रत्येक अभिवचन विश्‍वासू यहुद्यांच्या बाबतीत कसं पूर्ण झालं. नंतर आपण हे बघू, की ही अभिवचनं पुढे मोठ्या प्रमाणात कशी पूर्ण झाली.

१५. मायदेशात परत येणाऱ्‍या यहुद्यांच्या उपासनेत कोणते बदल होणार होते?

१५ पहिलं अभिवचन. मूर्तिपूजा किंवा खोट्या धर्माशी संबंधित घृणास्पद कामं पुन्हा कधी केली जाणार नाहीत. (यहेज्केल ११:१८; १२:२४ वाचा.) या पुस्तकाच्या ५ व्या अध्यायात आपण पाहिलं होतं, की यहुदी लोक बंदिवासात जाण्याआधी यरुशलेम आणि तिथलं मंदिर मूर्तिपूजेसारख्या खोट्या धार्मिक कामांनी दूषित झालं होतं. लोक भ्रष्ट झाले होते आणि यहोवापासून दूर गेले होते. यहेज्केलद्वारे यहोवाने बंदिवासात असलेल्या विश्‍वासू यहुद्यांना असं सांगितलं होतं, की एक दिवस ते शुद्ध उपासना पुन्हा सुरू करतील आणि त्यांची उपासना खोट्या धर्मामुळे दूषित होणार नाही. देवाची शुद्ध उपासना पुन्हा सुरू होणं हा खूप महत्त्वाचा मुद्दा होता, कारण त्यामुळेच यहुद्यांना इतर आशीर्वाद मिळणार होते.

१६. यहोवाने यहुद्यांना त्यांच्या मायदेशाबद्दल कोणतं अभिवचन दिलं?

१६ दुसरं अभिवचन. ते आपल्या मायदेशात परत येतील. बंदिवासात असलेल्या विश्‍वासू यहुद्यांना यहोवाने म्हटलं होतं, की ‘मी तुम्हाला इस्राएल देश देईन.’ (यहे. ११:१७) हे खरंच एक अनोखं अभिवचन होतं कारण बाबेलचे लोक देवाच्या लोकांना टोमणे तर मारायचेच, पण ते आपल्या कोणत्याही बंदिवांनाना कधीच त्यांच्या मायदेशात परत जाऊ द्यायचे नाहीत. (यश. १४:४, १७) मायदेशात परत आल्यावर यहुदी लोक यहोवाला विश्‍वासू राहिले तर त्यांना अनेक आशीर्वाद मिळणार होते. त्यांची जमीन सुपीक राहणार होती आणि ती भरपूर पीक देणार होती. शिवाय त्यांच्याकडे समाधान देणारं काम असणार होतं आणि त्यांना कधीच खाण्यापिण्याची कमी पडणार नव्हती. याचाच अर्थ, दुष्काळामुळे पुन्हा कधीच त्यांना अपमान सहन करावा लागणार नव्हता.—यहेज्केल ३६:३० वाचा.

१७. अर्पणं देण्याच्या बाबतीत यहोवाने कोणतं अभिवचन दिलं होतं आणि ते कसं पूर्ण होणार होतं?

१७ तिसरं अभिवचन. यहोवाच्या वेदीवर पुन्हा अर्पणं दिली जातील. या पुस्तकाच्या २ ऱ्‍या अध्यायात आपण पाहिलं होतं, कि मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे बलिदानं आणि अर्पणं देणं हा शुद्ध उपासनेचा खूप महत्त्वपूर्ण भाग होता. मायदेशात परत आल्यावर यहुद्यांनी जर यहोवाचं ऐकलं आणि फक्‍त त्याचीच उपासना केली तर तो आनंदाने त्यांची अर्पणं स्वीकारणार होता. अशा प्रकारे त्यांच्या पापांची क्षमा होणार होती आणि यहोवासोबत त्यांचं जवळचं नातं असणार होतं. यहोवाने त्यांना असं अभिवचन दिलं होतं की ‘इस्राएलच्या घराण्यातले सगळे लोक देशात माझी सेवा करतील.’ तसंच त्याने हेही म्हटलं होतं, “तिथे मी तुमचा स्वीकार करीन, आणि तिथे तुम्ही माझ्यासाठी तुमच्या सर्व पवित्र वस्तू, म्हणजे तुमची दानं आणि सगळ्यात चांगली अर्पणं आणावीत अशी मी अपेक्षा करीन.” (यहे. २०:४०) अशा प्रकारे शुद्ध उपासना खऱ्‍या अर्थाने पुन्हा सुरू होणार होती आणि देवाच्या लोकांना अनेक आशीर्वाद मिळणार होते.

१८. यहोवा आपल्या लोकांची काळजी कशी घेणार होता?

१८ चौथं अभिवचन. दुष्ट मेंढपाळ नसतील. बंदिवासात जाण्याआधी यहुदी लोक खूप वाईट कामं करत होते, कारण त्यांचं नेतृत्व करणारेच मुळात भ्रष्ट होते. त्या दुष्ट मेंढपाळांबद्दल यहोवाने म्हटलं होतं, “मी त्यांच्याकडून माझ्या मेंढरांना चारायचं काम काढून घेईन . . . मी त्यांच्या तोंडांतून माझी मेंढरं सोडवीन.” पण त्याने आपल्या विश्‍वासू लोकांना आश्‍वासन दिलं, “मी माझ्या मेंढरांची काळजी घेईन.” (यहे. ३४:१०, १२) यहोवा हे कसं करणार होता? तो आपल्या मेंढरांची काळजी घेण्यासाठी विश्‍वासू आणि प्रामाणिक मेंढपाळांना नेमणार होता.

१९. यहोवाने आपल्या लोकांना एकीबद्दल काय अभिवचन दिलं?

१९ पाचवं अभिवचन. यहोवाच्या उपासकांमध्ये एकी असेल. बंदिवासात जाण्याआधी देवाच्या लोकांमध्ये मुळीच एकी राहिली नव्हती. हे पाहून विश्‍वासू उपासकांना किती वाईट वाटलं असेल याचा विचार करा. खोट्या संदेष्ट्यांच्या आणि भ्रष्ट मेंढपाळांच्या प्रभावामुळे लोक यहोवाच्या विश्‍वासू संदेष्ट्यांविरुद्ध बंड करत होते. लोकांमध्ये फूट पडून वेगवेगळे गटही तयार झाले होते. त्यामुळे यहोवाने जेव्हा यहेज्केलद्वारे यहुद्यांना असं अभिवचन दिलं, की “मी त्या सगळ्यांचं हृदय एक करीन आणि त्यांच्यामध्ये नवीन मनोवृत्ती निर्माण करीन” तेव्हा त्यांना खरंच खूप आनंद झाला असेल. (यहे. ११:१९) मायदेशात परत आलेले यहुदी जोपर्यंत यहोवासोबत आणि एकमेकांसोबत एकीने राहणार होते, तोपर्यंत कोणताही शत्रू त्यांना हरवू शकणार नव्हता. यापुढे ते यहोवाच्या नावाचा अपमान आणि बदनामी करणार नव्हते, तर एक राष्ट्र म्हणून त्याच्या नावाचा गौरव करू शकणार होते.

२०, २१. मायदेशात परत आलेल्या यहुद्यांच्या बाबतीत देवाची अभिवचनं कशी पूर्ण झाली?

२० बंदिवासातून परत आलेल्या यहुद्यांच्या बाबतीत ही पाच अभिवचनं पूर्ण झाली का? प्राचीन काळातल्या विश्‍वासू सेवकाने, यहोशवाने काय म्हटलं होतं ते आठवा. त्याने म्हटलं होतं, “तुमचा देव यहोवा याने चांगल्या गोष्टींबद्दल जितकी अभिवचनं दिली होती त्यांपैकी एकही अभिवचन निष्फळ ठरलेलं नाही; प्रत्येक अभिवचन तुमच्या बाबतीत पूर्ण झालंय. त्यातला एकही शब्द अपुरा राहिलेला नाही.” (यहो. २३:१४) यहोशवाच्या काळात यहोवाने जशी आपली सगळी अभिवचनं पूर्ण केली होती, तशीच तो यहुद्यांच्या बाबतीतही पूर्ण करणार होता.

२१ यहुदी लोकांनी मूर्तिपूजा आणि खोट्या धर्माशी संबंध असलेली इतर घृणास्पद कामं सोडून दिली. आधी याच कामांमुळे ते यहोवापासून दूर गेले होते. आणि जी गोष्ट अगदीच अशक्य वाटत होती ती त्यांच्या बाबतीत घडली. शेवटी ते आपल्या मायदेशात परत आले. तिथे ते मळे लावू लागले, शेती करू लागले आणि आनंदाने राहू लागले. परत आल्यावर सगळ्यात आधी त्यांनी यरुशलेममधली यहोवाची वेदी पुन्हा बांधली आणि नियमशास्त्रात सांगितलं होतं त्याप्रमाणे ते अर्पणं देऊ लागले. (एज्रा ३:२-६) यहोवाने त्यांची काळजी घेण्यासाठी चांगले आणि विश्‍वासू मेंढपाळ नेमले; जसं की विश्‍वासू याजक आणि शास्त्री एज्रा, राज्यपाल नहेम्या आणि जरूब्बाबेल. तसंच धैर्यवान संदेष्टे हाग्गय, जखऱ्‍या आणि मलाखी. जोपर्यंत लोकांनी यहोवाकडून मिळणाऱ्‍या मार्गदर्शनाकडे आणि सूचनांकडे लक्ष दिलं तोपर्यंत त्यांच्यामध्ये एकी टिकून राहिली. खरंतर खूप काळानंतर ते अशी एकी अनुभवत होते.—यश. ६१:१-४; यिर्मया ३:१५ वाचा.

२२. यहुद्यांच्या बाबतीत पूर्ण झालेल्या भविष्यवाण्या पुढे होणाऱ्‍या मोठ्या पूर्णतेची फक्‍त एक झलक होती असं का म्हणता येईल?

२२ शुद्ध उपासना पुन्हा सुरू होण्याबद्दल यहोवाने दिलेली अभिवचनं यहुद्यांच्या बाबतीत पूर्ण झाली, तेव्हा त्यांना नक्कीच खूप प्रोत्साहन मिळालं असेल. पण ही पुढे होणाऱ्‍या मोठ्या पूर्णतेची फक्‍त एक झलक होती. असं आपण का म्हणू शकतो? कारण यहोवाने जेव्हा यहुद्यांना अभिवचनं दिली तेव्हा त्याने त्यांना काय म्हटलं होतं ते आठवा. त्याने त्यांना म्हटलं होतं, की जोपर्यंत ते त्याच्या आज्ञेत राहतील तोपर्यंत अभिवचनातले आशीर्वाद त्यांना मिळत राहतील. सुरुवातीला यहुद्यांनी यहोवाचं ऐकलं, त्याच्या आज्ञा पाळल्या. पण काही काळानंतर ते त्याच्याविरुद्ध बंड करू लागले. मग यहोवाच्या अभिवचनांच्या पूर्णतेबद्दल काय? यहोवाची अभिवचनं नेहमी पूर्ण होतात असं यहोशवाने म्हटलं होतं. म्हणून आपण म्हणू शकतो, की खरंतर या अभिवचनांची एक मोठी पूर्णता होणार होती आणि लोकांना कायम टिकणारे आशीर्वाद मिळणार होते. ती अभिवचनं कशी पूर्ण होणार होती ते आता आपण पाहू या.

“मी तुमचा स्वीकार करीन”

२३, २४. “सगळ्या गोष्टी पुन्हा पूर्वीसारख्या” केव्हापासून आणि कशा होऊ लागल्या?

२३ बायबलच्या अभ्यासातून आपल्याला समजतं की १९१४ पासून या दुष्ट जगाचा शेवटचा काळ सुरू झाला. पण ही देवाच्या लोकांसाठी दुःखाची गोष्ट नाही. उलट बायबलमधून आपल्याला समजतं की १९१४ पासून एका रोमांचक काळाची, म्हणजे ‘सगळ्या गोष्टी पुन्हा पूर्वीसारख्या होतील’ त्या काळाची सुरुवात झाली. (प्रे. कार्यं ३:२१) कारण त्या वर्षी येशू स्वर्गात देवाच्या राज्याच्या राजा बनला. आधी चर्चा केल्याप्रमाणे देवाने दावीद राजाला वचन दिलं होतं, की राज्य करण्याचा अधिकार कायम त्याच्या घराण्यात राहील. (१ इति. १७:११-१४) पण इ.स.पू. ६०७ मध्ये काही काळासाठी त्यात खंड पडला. कारण त्या वेळी बाबेलच्या लोकांनी यरुशलेमचा नाश केला आणि दावीदच्या घराण्यातून राज्य करणाऱ्‍या राजांचं शासन संपलं.

२४ येशू दावीदच्या वंशातून आला होता. त्यामुळे ‘मनुष्याच्या मुलाला,’ येशूला दावीदच्या राजासनावर बसण्याचा कायदेशीर हक्क मिळाला. (मत्त. १:१; १६:१३-१६; लूक १:३२, ३३) पुढे १९१४ मध्ये यहोवाने येशूला स्वर्गात राजा बनवलं आणि तेव्हापासून “सगळ्या गोष्टी पुन्हा पूर्वीसारख्या” व्हायला सुरुवात झाली. आता या परिपूर्ण राजाचा उपयोग करून यहोवा शुद्ध उपासना पुन्हा सुरू करण्याचं काम पुढे चालू ठेवणार होता.

२५, २६. (क) मोठ्या बाबेलमधला बंदिवास कधी संपला? (ख) आणि आपण असं का म्हणू शकतो? (“१९१९ हे वर्षच का?” ही चौकटसुद्धा पाहा.) (ग) १९१९ पासून काय होऊ लागलं?

२५ राजा बनल्यानंतर येशूने आपल्या पित्यासोबत मिळून पृथ्वीवर असलेल्या शुद्ध उपासनेच्या व्यवस्थेची पाहणी केली. (मला. ३:१-५) येशूने एका उदाहरणात सांगितल्याप्रमाणे बऱ्‍याच काळापर्यंत गहू आणि जंगली गवत, म्हणजे खरे अभिषिक्‍त ख्रिश्‍चन आणि नकली ख्रिश्‍चन यांच्यातला फरक ओळखणं कठीण झालं होतं. b पण १९१४ मध्ये कापणीची वेळ आली तेव्हा त्यांच्यातला फरक स्पष्टपणे दिसू लागला. १९१४ च्या आधीच्या काही दशकांमध्ये विश्‍वासू बायबल विद्यार्थी, ख्रिस्ती धर्मजगताच्या खोट्या शिकवणींचा पर्दाफाश करत होते आणि त्या भ्रष्ट संघटनेपासून स्वतःला वेगळं करत होते. आता शुद्ध उपासना पुन्हा सुरू करण्याची यहोवाची वेळ आली होती. त्यामुळे ‘कापणीची वेळ’ सुरू झाल्याच्या काही वर्षांनंतरच, म्हणजे १९१९ च्या सुरुवातीला देवाच्या लोकांची मोठ्या बाबेलच्या कैदेतून पूर्णपणे सुटका करण्यात आली. (मत्त. १३:३०) अशा प्रकारे त्यांचा बंदिवास संपला!

२६ तेव्हापासून शुद्ध उपासना पुन्हा सुरू होण्याबद्दल यहेज्केलने केलेल्या भविष्यवाण्या खूप मोठ्या प्रमाणात पूर्ण होऊ लागल्या. इतकी मोठी पूर्णता प्राचीन काळात देवाच्या लोकांनी कधीच पाहिली नव्हती. यहुद्यांच्या बाबतीत पूर्ण झालेली पाच अभिवचनं पुढे मोठ्या प्रमाणात कशी पूर्ण झाली ते आता आपण पाहू या.

२७. देवाने आपल्या लोकांना कसं शुद्ध केलं?

२७ पहिलं अभिवचन. मूर्तिपूजा आणि खोट्या धर्माशी संबंधित घृणास्पद कामांचा अंत होईल. १९ व्या शतकाच्या शेवटी आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीला विश्‍वासू ख्रिस्ती लहान गटांमध्ये एकत्र येऊ लागले आणि खोटे धार्मिक रितीरिवाज पाळायचं सोडून देऊ लागले. त्यांनी त्रैक्य, अमर-आत्मा आणि नरकाग्नीची शिकवण मानायचं सोडून दिलं. कारण त्यांना समजलं की या शिकवणी बायबलवर आधारित नाहीत, तर त्यांची सुरुवात खोट्या धर्मातून झाली आहे. तसंच, उपासनेत मूर्तींचा किंवा प्रतिमांचा उपयोग करणं चुकीचं आहे हेही त्यांना माहीत झालं. हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की उपासनेत क्रॉसचा उपयोग करणं हीसुद्धा एक प्रकारची मूर्तिपूजाच आहे.—यहे. १४:६.

२८. देवाचे लोक आपल्या देशात कोणत्या अर्थाने परत आले?

२८ दुसरं अभिवचन. देवाचे लोक आध्यात्मिक देशात परत येतील. कोणत्या अर्थाने? विश्‍वासू ख्रिस्ती मोठ्या बाबेलमधून बाहेर आले त्यानंतर यहोवाने त्यांना एका खरोखरच्या देशात नाही, तर एका सुंदर आध्यात्मिक देशात आणलं. हा देश म्हणजे, अशी स्थिती किंवा वातावरण जिथे आध्यात्मिक रितीने पुन्हा कधीच त्यांची उपासमार होणार नव्हती. (यहेज्केल ३४:१३, १४ वाचा.) आज या देशावर यहोवाचा आशीर्वाद आहे. त्यामुळे पूर्वी कधी नाही इतक्या मोठ्या प्रमाणात तो आपल्या लोकांना आध्यात्मिक अन्‍न पुरवत आहे. याबद्दल या पुस्तकाच्या १९ व्या अध्यायात आपण आणखी पाहणारच आहोत.—यहे. ११:१७.

२९. १९१९ पासून प्रचार काम वेगाने कसं वाढत गेलं?

२९ तिसरं अभिवचन. यहोवाच्या वेदीवर पुन्हा अर्पणं दिली जातील. पहिल्या शतकापासूनच ख्रिश्‍चनांना हे शिकवण्यात आलं होतं, की त्यांनी देवाला प्राण्यांची अर्पणं नाही तर त्यापेक्षाही मौल्यवान असं काहीतरी द्यायचं होतं. ते म्हणजे, त्यांनी यहोवाची स्तुती करायची होती आणि इतरांना त्याच्याबद्दल प्रचार करायचा होता. (इब्री १३:१५) पुढे अनेक शतकांपर्यंत ते मोठ्या बाबेलच्या बंदिवासात होते, त्यामुळे अशी स्तुतीची अर्पणं देण्यासाठी कोणतीही संघटित व्यवस्था नव्हती. पण या बंदिवासातून देवाच्या लोकांची सुटका झाली त्याच्या काही काळाआधीपासूनच, ते स्तुतीची बलिदानं देत होते. ते आवेशाने प्रचाराचं काम करत होते आणि सभांमध्ये आनंदाने यहोवाचा गौरव करत होते. मग १९१९ पासून ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाने’ प्रचारकार्यावर जास्त जोर दिला आणि ते काम आणखी चांगल्या प्रकारे संघटित केलं. (मत्त. २४:४५-४७) त्यामुळे यहोवाच्या पवित्र नावाची स्तुती करणाऱ्‍यांची संख्या वाढतच गेली. याचाच अर्थ, यहोवाच्या वेदीवर असंख्य बलिदानं दिली जाऊ लागली.

३०. आपल्या लोकांना चांगले मेंढपाळ मिळावेत म्हणून येशूने काय केलं?

३० चौथं अभिवचन. दुष्ट मेंढपाळ नसतील. येशूने ख्रिस्ती धर्मजगतातल्या भ्रष्ट, स्वार्थी आणि खोट्या मेंढपाळांच्या तावडीतून देवाच्या लोकांची सुटका केली. तसंच, ख्रिस्ती मंडळीतले जे वडील त्या खोट्या मेंढपाळांसारखं वागत होते त्यांच्याकडून त्याने त्यांची जबाबदारी काढून घेतली. (यहे. २०:३८) एक चांगला मेंढपाळ असल्यामुळे येशू आपल्या मेंढरांची खूप चांगली काळजी घेत आला आहे. उदाहरणार्थ, १९१९ मध्ये त्याने विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाला नेमलं. विश्‍वासू अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या या छोट्याशा गटाने, देवाच्या लोकांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांना आध्यात्मिक अन्‍न पुरवण्यासाठी पुढाकार घेतला. पुढे “देवाच्या कळपाचा” सांभाळ करण्यासाठी वडिलांना प्रशिक्षण देण्यात आलं. (१ पेत्र ५:१, २) या ख्रिस्ती मेंढपाळांना सहसा यहेज्केल ३४:१५, १६ या वचनांची आठवण करून दिली जाते. कारण त्यांत, यहोवा आणि येशू आपल्या मेंढरांची कशी काळजी घेतात याचं खूप सुरेख वर्णन करण्यात आलं आहे.

३१. यहेज्केल ११:१९ मधली भविष्यवाणी यहोवाने कशी पूर्ण केली?

३१ पाचवं अभिवचन. यहोवाच्या लोकांमध्ये एकी असेल. गेल्या अनेक शतकांपासून आपण पाहत आलो आहोत, की ख्रिस्ती धर्मजगतामध्ये हजारो पंथ आणि कितीतरी गट तयार झाले आहेत. त्यांच्या शिकवणी एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत आणि त्यांच्यात मुळीच एकी नाही. पण याच्या अगदी उलट, यहोवाने आपल्या लोकांच्या बाबतीत एक चमत्कारच केला आहे. “मी त्या सगळ्यांचं हृदय एक करीन” या यहेज्केलद्वारे दिलेल्या अभिवचनाची यहोवाने खूप मोठ्या प्रमाणात पूर्णता केली आहे. (यहे. ११:१९) त्याने त्यांच्यात एकी आणली आहे! आज जगभरात येशूचे लाखो शिष्य आहेत. ते वेगवेगळ्या देशांतून, वंशांतून, संस्कृतींतून आणि समाजातून आलेले आहेत. पण त्या सगळ्यांना बायबलचं एकसारखं शिक्षण दिलं जातं आणि ते सगळे एकत्र मिळून एकाच प्रकारचं काम करतात. येशूने आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री यहोवाला कळकळून विनंती केली होती, की त्याच्या शिष्यांमध्ये नेहमी एकी असावी. (योहान १७:११, २०-२३ वाचा.) यहोवाने या विनंतीचं आज आपल्या काळात खूप अनोख्या पद्धतीने उत्तर दिलं आहे.

३२. शुद्ध उपासनेबद्दलच्या भविष्यवाण्या पूर्ण होताना पाहून तुम्हाला कसं वाटतं? (“बंदिवासाबद्दलच्या आणि शुद्ध उपासना पुन्हा सुरू होण्याबद्दलच्या भविष्यवाण्या,” ही चौकटसुद्धा पाहा.)

३२ शुद्ध उपासना पुन्हा सुरू होत असल्याच्या या रोमांचक काळात तुम्ही जगत आहात याचा तुम्हाला आनंद वाटत नाही का? आज यहोवाची उपासना करण्यासाठी आपण ज्या वेगवेगळ्या गोष्टी करतो त्यांवरून दिसून येतं, की यहेज्केलच्या भविष्यवाण्या पूर्ण होत आहेत. यहोवाने यहेज्केलद्वारे म्हटलं होतं: “मी तुमचा स्वीकार करीन.” (यहे. २०:४०) त्यामुळे आपण खातरीने म्हणू शकतो, की आज यहोवा आपल्या लोकांवर खूश आहे आणि तो त्यांचा स्वीकार करतो. देवाचे लोक कित्येक शतकं मोठ्या बाबेलच्या बंदिवासात होते, पण तिथून त्यांची सुटका झाली आहे. आज त्यांच्यामध्ये एकी आहे, त्यांना भरपूर आध्यात्मिक अन्‍न मिळत आहे आणि संपूर्ण जगात ते यहोवाची स्तुती करत आहेत. खरंच, या लोकांपैकी तुम्ही एक आहात याचा तुम्हाला अभिमान वाटत नाही का? पण शुद्ध उपासना पुन्हा सुरू होण्याबद्दल यहेज्केलने केलेल्या भविष्यवाण्यांपैकी काहींची, पुढे आणखी मोठ्या प्रमाणात पूर्णता होणार आहे. त्याबद्दल आता आपण पाहू या.

“एदेन बागेसारखा”

३३-३५. (क) यहेज्केल ३६:३५ या भविष्यवाणीचा यहुद्यांनी कसा अर्थ घेतला? (ख) या भविष्यवाणीचा आज यहोवाचे लोक कसा अर्थ घेतात? (“‘सगळ्या गोष्टी पुन्हा पूर्वीसारख्या होतील’ तो काळ” ही चौकटसुद्धा पाहा.)

३३ आपण जसं पाहिलं की १९१४ मध्ये येशू राजा बनला तेव्हा दावीदच्या घराण्याचं शासन पुन्हा सुरू झालं. आणि “सगळ्या गोष्टी पुन्हा पूर्वीसारख्या” होण्याचा काळ सुरू झाला. (यहे. ३७:२४) त्यानंतर यहोवाने बरीच शतकं बंदिवासात असलेल्या आपल्या लोकांची सुटका केली आणि येशूला त्या लोकांमध्ये शुद्ध उपासना पुन्हा सुरू करण्याचा अधिकार दिला. पण येशूने सुरू केलेलं हे काम तिथेच संपलं का? नाही. ते भविष्यातही एका उल्लेखनीय पद्धतीने चालू राहील. याबद्दलची रोमांचक आणि सविस्तर माहिती यहेज्केलच्या भविष्यवाण्यांमध्ये दिली आहे.

३४ उदाहरणार्थ बायबलच्या या शब्दांकडे लक्ष द्या, “लोक म्हणतील: ‘जो देश उद्ध्‌वस्त झाला होता, तो आता एदेन बागेसारखा बनलाय.’” (यहे. ३६:३५) यहेज्केलने आणि बंदिवासात असलेल्या यहुद्यांनी याचा शब्दशः अर्थ घेतला का? नाही. तो देश खरोखर एदेन बागेसारखाच होईल अशी अपेक्षा त्यांनी केली नाही. (उत्प. २:८) उलट तो देश सुपीक आणि सुंदर होईल असं आश्‍वासन यहोवा देत आहे हे त्यांना समजलं.

३५ त्या अभिवचनाचा आज आपण कसा अर्थ घेतो? सैतानाच्या अधिकाराखाली असलेलं हे दुष्ट जग आज एदेन बागेसारखं सुंदर होईल अशी अपेक्षा आपण करत नाही. तर हे शब्द लाक्षणिक अर्थाने पूर्ण होत आहेत हे आपण ओळखतो. यहोवाचे सेवक या नात्याने आपण एका सुंदर देशात, म्हणजेच आध्यात्मिक नंदनवनात आनंदाने राहत आहोत. आज आपण अशा प्रकारचं जीवन जगतो ज्यामुळे इतरांचं भलं होतं, यहोवाच्या नावाचा गौरव होतो आणि यहोवाच्या पवित्र सेवेला आपण जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व देतो. हा आध्यात्मिक देश दिवसेंदिवस आणखीनच सुंदर होत आहे. पण ‘देश एदेन बागेसारखा बनेल’ हे अभिवचन भविष्यात शब्दशः कसं पूर्ण होईल? चला त्याबद्दल आता पाहू या.

३६, ३७. नंदनवनात कोणती अभिवचनं पूर्ण होतील?

३६ शुद्ध उपासना पुन्हा सुरू करण्याचं काम फक्‍त लाक्षणिक नंदनवनापुरतंच मर्यादित नाही, तर हर्मगिदोनच्या मोठ्या युद्धानंतर येशू संपूर्ण पृथ्वीलाच खरोखरचं नंदनवन बनवेल. यहोवाची मुळात हीच इच्छा होती की पृथ्वी एदेन बागेसारखी, एका नंदनवनासारखी व्हावी. आणि तेच करण्यासाठी येशू हजार वर्षांच्या आपल्या शासनकाळात मानवांना मार्गदर्शन देईल. (लूक २३:४३) तेव्हा सर्व मानवांमध्ये एकी असेल, ते पृथ्वीची चांगली काळजी घेतील आणि पृथ्वीसुद्धा भरपूर अन्‍नधान्य देईल. कुठेही कसलीच भीती किंवा कोणताही धोका नसेल. इतकंच काय, तर पुढे दिलेलं अभिवचनसुद्धा तेव्हा पूर्ण होईल: “मी त्यांच्यासोबत शांतीचा करार करीन आणि देशातल्या सगळ्या हिंस्र प्राण्यांना हाकलून लावीन; म्हणजे माझी मेंढरं ओसाड रानात सुरक्षित राहू शकतील आणि जंगलात झोपू शकतील.” कल्पना करा, या वचनातले शब्द पूर्ण होतील तो काळ किती सुंदर असेल!—यहे. ३४:२५.

३७ ते चित्र आपल्या डोळ्यांपुढे आणायचा प्रयत्न करा. या विशाल पृथ्वीवर जिथे पाहिजे तिथे तुम्ही फिरू शकाल. तुम्हाला कसलीही भीती नसेल, कोणत्याही प्राण्यापासून तुम्हाला धोका नसेल. त्यामुळे तुम्ही निश्‍चिंत असाल आणि शांतीने राहाल. तुम्ही घनदाट जंगलात एकटे फिरायला जाऊ शकाल आणि निसर्गाच्या सौंदर्याचा मनसोक्‍त आनंद घेऊ शकाल. इतकंच नाही, तर तिथे तुम्ही निवांत झोपू शकाल. आणि सकाळी उठल्यावर तुम्हाला अगदी ताजंतवानं वाटेल आणि तुम्ही सुरक्षित असाल.

अशा एका काळाची कल्पना करा जेव्हा आपण जंगलातही निश्‍चिंत झोपू शकू! (परिच्छेद ३६, ३७ पाहा)

३८. यहेज्केल २८:२६ मधली भविष्यवाणी तुम्ही स्वतः पूर्ण होताना बघाल तेव्हा तुम्हाला कसं वाटेल?

३८ नंदनवनात यहोवाचं हे अभिवचनसुद्धा पूर्ण होईल: “तिथे ते सुरक्षित राहतील. ते घरं बांधतील आणि द्राक्षमळे लावतील. त्यांच्याशी तिरस्काराने वागणाऱ्‍यांना, म्हणजे त्यांच्या आसपासच्या राष्ट्रांना जेव्हा मी शिक्षा करीन, तेव्हा ते देशात निर्भयपणे राहतील. त्या वेळी त्यांना कळून येईल, की मी यहोवा त्यांचा देव आहे.” (यहे. २८:२६) पृथ्वीवर यहोवाचा एकही शत्रू नसल्यामुळे सगळीकडे शांती आणि सुरक्षा असेल. आपण पृथ्वीची काळजी तर घेऊच, पण त्यासोबतच आपण स्वतःची आणि आपल्या जवळच्या लोकांचीही काळजी घेऊ. आपण सुंदर घरं बांधू आणि आरामात राहू. तसंच आपण द्राक्षमळे आणि बागाही लावू.

३९. नवीन जगाबद्दलच्या भविष्यवाण्या नक्कीच पूर्ण होतील याची तुम्हाला खातरी का आहे?

३९ ही सर्व अभिवचनं तुम्हाला स्वप्नं वाटतात का? असं कधी वाटलं तर “सगळ्या गोष्टी पुन्हा पूर्वीसारख्या होण्याच्या” या काळात तुम्ही कोणकोणत्या गोष्टी पूर्ण होताना पाहिल्या आहेत त्यांचा विचार करा. या कठीण काळात, सैतानाचा इतका विरोध असतानाही यहोवाच्या मदतीने येशूने शुद्ध उपासना पुन्हा सुरू केली आहे आणि तो हे काम अजूनही करत आहे. खरंच, यहोवाने यहेज्केलद्वारे भविष्याबद्दल जी अभिवचनं दिली आहेत ती सगळी पूर्ण होतील याचा हा किती जबरदस्त पुरावा आहे!

a बंदिवासात असलेले बहुतेक यहुदी बाबेल शहरापासून थोडं दूर वस्त्यांमध्ये राहत होते. जसं की, यहेज्केल खबार नदीजवळ असलेल्या वस्तीमध्ये इतर यहुद्यांसोबत राहत होता. (यहे. ३:१५) पण काही यहुदी बाबेल शहरातच राहत होते; जसं की, ‘शाही आणि उच्च घराण्यातले लोक.’—दानी. १:३, ६; २ राजे २४:१५.

b उदाहरणार्थ, १६ व्या शतकातल्या प्रोटेस्टंट धर्मसुधारकांपैकी कोण अभिषिक्‍त ख्रिस्ती होते हे आपण नक्की सांगू शकत नाही.