भाग ४
अद्वितीय ग्रंथाचा लेखक
अमेरिकेच्या जनतेपैकी जवळजवळ ९६ टक्के देवावर विश्वास असल्याचे सांगतात; याच्या तुलनेत युरोप व आशियात मात्र हे प्रमाण फार कमी आहे. पण ज्या देशांत बहुतेक लोक देव म्हटलेल्या कोणा व्यक्तीवर विश्वास ठेवत नाहीत तेथेसुद्धा, हे विश्व अस्तित्वात आणण्यास कोणतीतरी अज्ञात शक्ती कारणीभूत ठरली असावी ही कल्पना बरेचजण स्वीकारतात. १०,००० येनच्या नोटांवर ज्यांचे चित्र छापलेले आहे ते सुप्रसिद्ध जपानी शिक्षणतज्ज्ञ युकीची फुकुझावा यांनी एकदा लिहिले: “स्वर्गाने एका मनुष्याला उच्च आणि दुसऱ्याला नीच असे निर्माण केले नाही असे म्हटले जाते.” ‘स्वर्ग’ हा शब्द वापरताना फुकुझावा नैसर्गिक तत्त्वाच्या संदर्भात बोलत होते. त्यांच्या मते याच नैसर्गिक तत्त्वाने मनुष्यास उत्पन्न केले. बरेचजण अशा एका अमूर्त ‘स्वर्गाची’ संकल्पना स्वीकारतात. नोबेल पुरस्कारविजेता केनीची फुकुई हे देखील त्यांच्यापैकी एक आहेत. त्यांनी विश्वातील एका महान यंत्रणेवर आपला विश्वास असल्याचे सांगितले. धार्मिक परिभाषेत ही यंत्रणा म्हणजेच “देव.” पण फुकुई यांनी तिला “निसर्गाची किमया” म्हटले.
२ या बुद्धीजीवींचे असे मानणे होते, की अनादिअनंत असे काहीतरी किंवा कोणीतरी असावे ज्याने या विश्वातील सर्व गोष्टींना गतिमान केले. का? हे विचारात घ्या: सूर्य इतका मोठा तारा आहे की त्यात लक्षावधी पृथ्वी ग्रह सामावू शकतील, पण खरे पाहता तो आपल्या आकाशगंगेतला केवळ एक ठिपका आहे. शिवाय आपली आकाशगंगा विश्वातील अब्जावधी आकाशगंगांपैकी केवळ एक आहे. वैज्ञानिकांच्या निरीक्षणांवरून असे भासते की या आकाशगंगा एकमेकींपासून विलक्षण गतीने दूर जात आहेत. विश्वाला गतीमान करण्यासाठी नक्कीच प्रचंड सामर्थाची गरज पडली असेल. हे सामर्थ्य कोणाचे किंवा कशाचे होते? बायबल म्हणते, “आपले डोळे वर करून पाहा; ह्यांना कोणी उत्पन्न केले? तो त्यांच्या सैन्याची मोजणी करून त्यांस बाहेर आणितो; तो त्या सर्वांस नावांनी हाका मारितो, तो महासमर्थ व प्रबळ सत्ताधीश आहे; म्हणून त्यापैकी कोणी उणा पडत नाही.” (यशया ४०:२५, २६) या वचनावरून असे दिसून येते, की विश्वाला गतिमान करणारी एक व्यक्ती होती—तीच त्या ‘महासामर्थ्याचा’ उगम होती.
३ पृथ्वीवरील सजीव सृष्टीचाही विचार करा. उत्क्रांतीवादाचे पुरस्कर्ते म्हणतात त्याप्रमाणे ही सजीव सृष्टी आपोआप आली असावी का? जीवरसायनशास्त्रज्ञ मायकल बीही म्हणतात: “विज्ञानाने जीवनाचे रसायनशास्त्र समजून घेण्यात विलक्षण प्रगती केली आहे, पण रेणवीय पातळीवर जैविक यंत्रणांची अचूकता आणि गुंतागुंतीची रचना इतकी आश्चर्यकारक आहे की त्यांच्या उत्पत्तीविषयी स्पष्टीकरण करण्याचे विज्ञानाचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. . . . पण वैज्ञानिकांची हार मानण्याची तयारी नाही, त्यांच्यापैकी बरेचजण असे ठामपणे म्हणतात की ही स्पष्टीकरणे देण्यात आली आहेत किंवा आज न उद्या नक्कीच देण्यात येतील; पण त्यांच्या विधानांना पुष्टी देणारे पुरावे मात्र कोणत्याही व्यावसायिक विज्ञान साहित्यात आढळत नाहीत. याहून महत्त्वाचे म्हणजे, जीवनाच्या यंत्रणांवर स्पष्टीकरण देऊ पाहणारे डार्विनचे सिद्धान्त सदैव अतर्क्यच राहतील असे म्हणण्याची—[जैवरेणवीय] यंत्रणांच्या रचनेच्या आधारावरच—बरीच निर्विवाद कारणे सापडतात.”
४ मानवी जीवन कोणत्याही बौद्धिक प्रेरणेशिवाय अस्तित्वात आले हा सिद्धान्त तुम्हाला खरोखरच पटतो का? ज्याला “विश्वातील सर्वात गुंतागुंतीची वस्तू” म्हणण्यात आले आहे त्या मानवी मेंदूविषयी काही माहिती आता आपण विचारात घेऊया आणि पाहूया की या माहितीच्या आधारावर आपण कोणत्या निष्कर्षावर पोचू शकतो. डॉ. रिचर्ड एम. रेस्टॅक यांच्यानुसार, ‘सर्वात कार्यक्षम न्युरल-नेटवर्क कॉम्प्युटरमध्ये, साध्या माशीच्या मेंदूच्या क्षमतेतील केवळ दहा हजाराव्या भागाइतकी क्षमता आहे.’ मानवाचा मेंदू माशीच्या मेंदूपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. विविध भाषा शिकण्याकरता त्याला प्रोग्राम करण्यात आले आहे. तो स्वतःची दुरुस्ती स्वतःच करतो, नवे प्रोग्राम लिहितो आणि आपल्या क्षमतेत सुधारणा देखील करतो. तुम्ही नक्कीच हे मान्य कराल की ‘साध्या माशीच्या मेंदूच्या क्षमतेतील केवळ दहा हजाराव्या भागाइतकी क्षमता’ असलेला शक्तिशाली सुपरकम्प्युटर कोणातरी बुद्धिमान रचनाकाराने निर्माण केला असेल. मग मानवी मेंदूविषयी काय? *
५ जवळजवळ ३,००० वर्षांआधी, मानवांना स्वतःच्या शारीरिक रचनेतील कित्येक चमत्कारिक बाबी अद्याप उमगल्या नव्हत्या तेव्हा बायबलच्या एका लेखकाने मानवी शरीराच्या घडणीविषयी मनन करून असे म्हटले: “भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करितो. तुझी कृत्ये अद्भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे.” डीएनए रेणू काय असतात याचा मागमूसही नसताना त्याने लिहिले: “मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले, आणि माझा एकहि दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेविले होते.” (स्तोत्र १३९:१४, १६) तो कोणाविषयी बोलत होता? या विश्वात सर्वकाही अस्तित्वात आणणारा “महासमर्थ” कोण आहे?
६ बायबलच्या अगदी पहिल्याच वचनात असे म्हटले आहे: “प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली.” (उत्पत्ति १:१) तो बायबलचा लेखक, त्यातील मजकूर प्रेरित करणारा देखील आहे. तो एक अशी व्यक्ती म्हणून स्वतःची ओळख करून देतो जिच्यासोबत आपण एक अर्थपूर्ण संबंध जोडू शकतो.
^ याविषयी अधिक सविस्तर माहिती तुम्हाला वॉचटावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित, तुमची काळजी वाहणारा निर्माता अस्तित्वात आहे का? (इंग्रजी) या पुस्तकातील २ ते ४ अध्यायांमध्ये सापडेल.