व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग २

समाधानी जीवनाकरता काही उपयुक्‍त सूचना

समाधानी जीवनाकरता काही उपयुक्‍त सूचना

 तुमच्यासमोर एखादी समस्या येते तेव्हा तुम्ही कोणाचा सल्ला घेता? कदाचित एखाद्या जवळच्या मित्राचा अथवा मैत्रीणीचा किंवा एखाद्या अनुभवी सल्लागाराचा. कधीकधी त्या विशिष्ट समस्येशी संबंधित असलेली माहिती मिळवल्यामुळे, उदाहरणार्थ ग्रंथालयातून ही माहिती मिळवल्यामुळे मदत मिळू शकते. किंवा कदाचित तुम्ही अनुभवी वडीलधाऱ्‍यांचा सल्ला घेत असाल. यांपैकी कोणताही मार्ग तुम्ही निवडला तरीसुद्धा, ती समस्या सोडवण्याकरता मौल्यवान सूचना देणाऱ्‍या सुज्ञानाची वचने विचारात घेणे सहायक ठरेल. खाली काही उपयुक्‍त मार्गदर्शन दिले आहे जे निश्‍चितच तुमच्या कामी पडेल.

“मुलाच्या स्थितीस अनुरूप अशा मार्गाचे शिक्षण त्याला दे”

कौटुंबिक जीवन: आजच्या या जगातल्या अनैतिक वातावरणात मुलांचे संगोपन करताना बऱ्‍याच आईवडिलांना चिंता वाटते. पुढील सल्ला विचारात घेतल्याने कदाचित त्यांना मदत होऊ शकते: “मुलाच्या स्थितीस अनुरूप अशा मार्गाचे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीहि तो त्यापासून परावृत्त होणार नाही.”  मुले मोठी होऊ लागतात तसतशी त्यांना एका निश्‍चित ‘मार्गाची’ अथवा पालन करावयाच्या काही निश्‍चित दंडकांची आवश्‍यकता भासते. आता बहुतेक तज्ज्ञांना जाणीव झाली आहे की मुलांना त्यांच्या हिताकरता ठराविक नियम लावून देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आईवडिलांनी घालून दिलेल्या सुज्ञ आदर्शांमुळे मुलांना सुरक्षिततेची भावना येते. तसेच: “छडी व वाग्दंड ज्ञान देतात, पण मोकळे सोडिलेले पोर आपल्या आईला खाली पाहावयास लावते.”  “छडी” हा शब्द आईवडिलांच्या अधिकाराला सूचित करतो; मुलांनी वाममार्गाला लागू नये म्हणून आईवडिलांनी हा अधिकार प्रेमळपणे उपयोगात आणला पाहिजे. पण याचा अर्थ, मुलांशी कोणत्याही प्रकारे दुर्व्यवहार करावा असा होत नाही. आईवडिलांना असा सल्ला दिला जातो: “आपल्या मुलांना चिरडीस आणू नका; आणाल तर ती खिन्‍न होतील.” 

“तुम्हापैकी प्रत्येकाने जशी स्वत:वर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी”

सुखी कुटुंबाचे खरे गुपीत म्हणजे पती व पत्नीचा सुदृढ नातेसंबंध. पण असा हा नातेसंबंध असण्याकरता काय आवश्‍यक आहे? “तुम्हापैकी प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी; आणि पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी.”  कुटुंबाचा गाडा सुरळीत चालावा म्हणून प्रेम आणि आदर हे वंगणाचे कार्य करतात. पण हा सल्ला उपयोगी पडण्यासाठी प्रथम पती व पत्नी यांनी एकमेकांशी सुसंवाद साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण “मसलत मिळाली नाही म्हणजे बेत निष्फळ होतात.”  पण एकमेकांशी हा सुसंवाद साधण्यासाठी आपल्या जोडीदाराच्या हृदयातील भावना जाणून घेणे, विशिष्ट गोष्टीविषयी आपल्या जोडीदाराला मुळात काय वाटते हे त्याच्या किंवा तिच्याकडून काढून घेणे महत्त्वाचे आहे. सुज्ञ व्यक्‍ती नेहमी हे आठवणीत ठेवते की “मनुष्याच्या मनातील मसलत खोल पाण्यासारखी असते, तरी समंजस ती बाहेर काढितो.” 

सकारात्मक मनोवृत्ती बाळगा आणि प्रेमळ नातेसंबंध जोडण्यासाठी पुढाकार घ्या

बऱ्‍याच वृद्धांना त्यांच्या मुलांनी एकटे सोडून दिल्यामुळे, जीवनाच्या संधिकाली अत्यंत एकाकीपणात दिवस कंठावे लागतात. एकेकाळी ज्या देशांत वडीलधाऱ्‍यांना खूप सन्मानाने वागवण्याची प्रथा होती तेथे देखील आज हीच गत आहे. पण अशा या आईवडिलांच्या मुलांनी या सुज्ञ वचनांकडे लक्ष द्यावे: “आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर.”  “आपल्या जन्मदात्या बापाचे ऐक, आपल्या वृद्ध झालेल्या आईला तू तुच्छ मानू नको.”  “जो आपल्या बापाशी दंडेली करितो व आपल्या आईला हाकून लावितो, तो लज्जा व अप्रतिष्ठा आणणारा मुलगा होय.”  त्याचप्रमाणे, वृद्ध आईवडिलांनी देखील सकारात्मक दृष्टिकोन बाळगून आनंदी कौटुंबिक नातेसंबंधांना हातभार लावण्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. “जो फटकून राहतो तो आपली इच्छा पुरवू पाहतो, व त्याला सगळ्या सुज्ञतेचा संतोप येतो.” १०

मद्यपान: “द्राक्षारस जिवास उल्लास देतो” ११ आणि त्यामुळे मनुष्य ‘आपली विपत्ती विसरतो’ १२ हे खरे आहे. पण आठवणीत असू द्या: “द्राक्षारस चेष्टा करणारा आहे, मद्य गलबला करणारे आहे, त्यांच्यामुळे झिंगणारा शहाणा नव्हे.” १३ अतिमद्यपानाचे दुष्परिणाम लक्षात घ्या: “शेवटी तो [अर्थात, मद्य] सर्पासारखा दंश करितो, फुरश्‍याप्रमाणे झोंबतो. तुझे डोळे विलक्षण प्रकार पाहतील. तुझ्या मनातून विपरित गोष्टी बाहेर पडतील. . . . मी शुद्धीवर केव्हा येईन? मी पुनः त्याचे सेवन करीन.” १४ माफक प्रमाणात मद्यपान करणे हितकारक ठरू शकते, पण त्याचे अतिसेवन सर्वतोपरी टाळले पाहिजे.

आर्थिक व्यवहार: काहीवेळा पैशांचा विचारपूर्वक वापर केल्यामुळे आर्थिक समस्या टाळता येतात. या सल्ल्याकडे लक्ष द्या: “मद्यपी व मांसाचे अतिभक्षण करणारे यांच्या वाऱ्‍यास उभा राहू नको. कारण मद्यपी व खादाड दरिद्री होतात, कैफ मनुष्याला चिंध्या नेसवितो.” १५ दारू किंवा ड्रग्सचे व्यसन, तसेच जुगारासारख्या वाईट सवयी टाळल्यामुळे आपण आपल्या पैशांचा उपयोग आपल्या कुटुंबाच्या हिताकरता करू शकतो. इतर काही लोक अंथरूण पाहून पाय पसरत नाहीत आणि त्यामुळे शेवटी केवळ कर्ज फेडण्यासाठी त्यांना रात्रंदिवस राबावे लागते. काहीजण तर एका कर्जाचे व्याज फेडण्यासाठी दुसरे कर्ज काढतात. या संदर्भात, पुढील सुवचने आठवणीत ठेवणे सहायक ठरेल: “जो निरर्थक गोष्टींच्या मागे लागतो त्याला भरपूर दारिद्र्‌य येईल.” १६ आपण स्वतःला असे विचारू शकतो: ‘ज्या वस्तू मला विकत घ्याव्याशा वाटतात त्यांची मला खरोखर गरज आहे का? किती अशा वस्तू आहेत ज्या दोन चार वेळा वापरून कपाटात ठेवून दिल्या जातात?’ एका वृत्तपत्रातील सदर लेखकाने म्हटले: “मनुष्याच्या गरजा थोड्या असतात—पण इच्छा अमर्याद.” पुढील सुज्ञ वचनाकडे लक्ष द्या: “आपण जगात काही आणिले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही; आपल्याला अन्‍नवस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे. . . . द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे, त्याच्या पाठीस लागून . . . [कित्येकांनी] स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे.” १७

आर्थिक समस्या सोडवण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे मेहनत करणे. “अरे आळशा, मुंगीकडे जा; तिचे वर्तन पाहून शहाणा हो . . . आणखी थोडी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी खातो, आणखी हात उराशी धरून निजतो असे म्हणत जाशील तर तुला दारिद्र्‌य दरोडखोराप्रमाणे आणि गरिबी तुला सशस्त्र मनुष्याप्रमाणे गाठील.” १८ पैशांचे विचारपूर्वक समायोजन करणे आणि वाजवी अंदाजपत्रक तयार करणे देखील सहायक ठरू शकते: “तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरुज बांधावयाची इच्छा असता तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही?” १९

“जो आपल्या धंद्यात निपुण आहे अशा मनुष्याला तू पाहिले काय?”

पण आपला काहीही दोष नसताना जर आपल्याला दारिद्र्‌याला तोंड द्यावे लागत असेल तर? उदाहरणार्थ, मेहनत करण्याची तयारी असूनही आर्थिक मंदीच्या काळात एखाद्याची नोकरी जाऊ शकते. किंवा आपण अशा देशात राहत असू, जेथे बहुतेक लोक दारिद्र्‌य रेषेखाली राहतात. अशा परिस्थितीत आपण काय करू शकतो? “ज्ञान आश्रय देणारे आहे व पैसाहि आश्रय देणारा आहे; तरी ज्ञानापासून असा लाभ होतो की ज्याच्यापाशी शहाणपण असते त्याच्या जीविताचे ते रक्षण करिते.” २० शिवाय, या सल्ल्याचा विचार करा: “जो आपल्या धंद्यात निपुण आहे अशा मनुष्याला तू पाहिले काय? तो राजांसमोर उभा राहील.” २१ विशिष्ट कौशल्ये आत्मसात करून त्यांत निपुण झाल्यामुळे आपल्याला काम मिळण्यास मदत होईल का?

“द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल”

पुढील सल्ल्यात कदाचित तुम्हाला विरोधाभास आढळेल पण खरे पाहता हा सल्ला अत्यंत परिणामकारक आहे: “द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल . . . कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल.” २२ अर्थात, काहीतरी परत मिळण्याची अपेक्षा ठेवून आपण इतरांना द्यावे, असा याचा अर्थ होत नाही. उलट येथे उदार मनोवृत्ती विकसित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे: “उदार मनाचा समृद्ध होतो, जो पाणी पाजितो त्याला स्वतःला ते पाजण्यात येईल.” २३ गरजेच्या वेळी इतरांना मदत केल्यामुळे आपण उदार मनोवृत्तीला प्रोत्साहन देतो आणि अशा मनोवृत्तीमुळे कालांतराने आपल्यालाही फायदा होऊ शकतो.

१० नातीगोती: एका सुज्ञ राजाने असे निरीक्षण केले: “मी सर्व उद्योग व कारागिरी ही पाहिली. ही सर्व चढाओढीमुळे हातात. हाहि व्यर्थ व वायफळ उद्योग होय.” २४ चढाओढीच्या भावनांमुळे कित्येकजण मूर्खपणे वागतात. स्वतःचा २७ इंच टीव्ही अगदी चांगला चालत असूनही, केवळ शेजाऱ्‍याने ३२ इंच टीव्ही आणला म्हणून काहीजण लगेच ३६ इंच टीव्ही आणायला निघतात. अशी चढाओढ करणे खरोखर व्यर्थ किंवा वाऱ्‍यामागे धावण्यासारखे आहे—कारण इतकी धडपड करूनही हाती काहीच लागत नाही. तुम्हालाही असे वाटत नाही का?

रागाच्या तीव्र भावनेवर आपण कशाप्रकारे मात करू शकतो?

११ इतरांच्या बोलण्यामुळे किंवा कृतीमुळे कधीकधी आपल्या भावना दुखावल्या जातात. पण हा सल्ला विचारात घ्या. “मन उतावळे होऊ देऊन रागावू नको; कारण राग मूर्खांच्या हृदयात वसतो.” २५ अर्थात कधीकधी रागवण्याचे वाजवी कारण असू शकते. एक प्राचीन लेखक देखील ही गोष्ट मान्य करून म्हणतो: “रागावा, परंतु पाप करू नका तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये.” २६ पण मग रागाच्या तीव्र भावनेवर आपण कशाप्रकारे मात करू शकतो? “विचारवंत माणसाला चटकन राग येत नाही. चुकीकडे काणाडोळा करणे त्याला भूषणावह आहे.” २७ तेव्हा, विचारवंत असणे आवश्‍यक आहे. आपण मनातल्या मनात असा विचार करू शकतो: ‘ती व्यक्‍ती अशाप्रकारे का वागली? विशिष्ट परिस्थितीने तिला असे करण्यास भाग पाडले असावे का?’ विचारवंत असण्यासोबतच रागाच्या भावनांवर मात करण्यासाठी इतरही काही गुणांची आवश्‍यकता आहे. “करुणायुक्‍त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्‍हाणे असल्यास आपसांत क्षमा करा. . . . पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीति ती ह्‍या सर्वांवर धारण करा.” २८ होय, नातीगोती जपताना अनेक समस्या येतात, पण प्रेमाने या समस्या सोडवल्या जाऊ शकतात.

१२ तरीसुद्धा, शांतीसंबंधांत व्यत्यय आणणारा आणखी एक “लहानसा अवयव” आहे—जीभ. पुढील शब्दांत खरोखर किती सत्य आहे: “मनुष्यांपैकी कोणीहि जिभेला वश करावयास समर्थ नाही. ती शांतिरहित असून दुष्ट आहे व प्राणघातक विषाने भरलेली आहे.” २९ तसाच हा सल्ला देखील लक्ष देण्याजोगा आहे: “प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद असावा.” ३० पण जिव्हेचा वापर करताना केवळ वरकरणी शांती टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात आपण अर्धसत्यांचा कधीही आधार घेऊ नये. “तुमचे बोलणे, होय तर होय, नाही तर नाही एवढेच असावे; ह्‍याहून जे अधिक ते वाइटापासून आहे.” ३१

१३ इतरांसोबत आपण सुदृढ नातेसंबंध कसा टिकवू शकतो? या मार्गदर्शक तत्त्वाकडे लक्ष द्या: “कोणीहि आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्‍यांचेहि पाहा.” ३२ असे केल्यास बरेचजण ज्याला सुवर्णनियम म्हणतात, त्याचे आपण पालन करत असू: “ह्‍याकरिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.” ३३

१४ तणाव: तणावाने भरलेल्या या जगात आपण भावनिक संतुलन कसे साधू शकतो? “आनंदी मनाने मुख प्रसन्‍न होते, मनातील खेदाने हृदय भंग पावते.” ३४ आपल्याला जे योग्य वाटते त्याकडे इतरांनी दुर्लक्ष केल्यास साहजिकच आपले ‘मन आनंदी’ राहणार नाही. पण आपण पुढील शब्द आठवणीत ठेवल्यास चांगले होईल: “फाजील धार्मिक होऊ नको; मर्यादेबाहेर शहाणपण मिरवू नको; तू आपला नाश का करून घ्यावा?” ३५ पण जर जीवनाच्या चिंता आपल्याला त्रस्त करत असतील तर आपण काय करावे? आपण नेहमी हे आठवणीत ठेवू या की, “मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते, परंतु गोड शब्द त्याला आनंदित करितो.” ३६ “गोड शब्द” अथवा आपल्याला प्रोत्साहन देणाऱ्‍या प्रेमळ शब्दावर आपण विचार करू शकतो. नैराश्‍यजनक परिस्थितीतही सकारात्मक मनोवृत्ती बाळगल्यामुळे आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होऊ शकतो: “आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध होय.” ३७ इतरांना आपली कदर नाही असे वाटल्यामुळे आपण निराश होतो तेव्हा पुढील सल्ल्याचे पालन करून पाहू शकतो: “घेण्यापेक्षा देणे ह्‍यांत जास्त धन्यता आहे.” ३८ सकारात्मक मनोवृत्ती बाळगल्यामुळे आपण दैनंदिन जीवनातील ताणतणावांना यशस्वीपणे तोंड देऊ शकतो.

१५ वरती उल्लेख केलेली सुवचने या २१ व्या शतकातही उपयोगी पडू शकतात असे तुम्हाला वाटते का? खरे पाहता, ही सुवचने एका प्राचीन पुस्तकात अर्थात बायबलमध्ये आपल्याला सापडतात. पण सुज्ञानाच्या इतर उगमांपेक्षा बायबलचे मार्गदर्शन का घ्यावे? याची बरीच कारणे आहेत, त्यांपैकी एक म्हणजे, बायबलमधील तत्त्वे सर्व कालखंडांत उपयुक्‍त शाबीत झाली आहेत. यासुहीरो आणि कायोको यांचे उदाहरण घ्या. हे दोघे स्त्रीमुक्‍ती चळवळीत सक्रिय होते. यासुहीरोपासून कायोको गरोदर राहिल्यामुळे त्या दोघांनी नाईलाजास्तव लग्न केले. पण आर्थिक समस्या आणि एकमेकांना आपण अनुरूप नाही याची जाणीव झाल्यामुळे लवकरच त्यांचा घटस्फोट झाला. नंतर एकमेकांच्या नकळत त्या दोघांनीही बायबलचा अभ्यास करण्यास सुरवात केली. एकमेकांच्या जीवनात झालेले लक्षणीय बदल दोघांनीही पाहिले. यासुहिरो व कायोको यांनी पुन्हा लग्न करण्याचे ठरवले. आज त्यांच्या जीवनात समस्या नाहीत अशातला भाग नाही. पण आता त्यांच्याजवळ बायबलची तत्त्वे आहेत ज्यांचे पालन ते करतात आणि आपल्या चुका कबूल करून समस्या सोडवतात. यहोवाच्या साक्षीदारांमध्ये तुम्हाला बायबलची तत्त्वे जीवनात लागू केल्यामुळे होणारे उत्तम परिणाम पाहायला मिळतील. त्यांच्या एखाद्या सभेला उपस्थित राहून बायबलच्या तत्त्वांनुसार जगण्याचा प्रयत्न करणाऱ्‍या या लोकांचा परिचय करून घेण्यास तुम्हाला आवडणार नाही का?

१६ बायबल सोन्याच्या खाणीसारखे आहे. यात ज्ञानाचा अमर्याद साठा आहे. वरील मार्गदर्शक सूचना या सुज्ञानाची केवळ काही उदाहरणे आहेत. यहोवाचे साक्षीदार आपल्या जीवनात बायबल तत्त्वांचे स्वेच्छेने पालन का करतात, यामागे काही निश्‍चित कारणे आहेत. ही कारणे आणि बायबलविषयी काही मूलभूत सत्ये जाणून घ्यायची तुमची इच्छा आहे का?