व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग ८

समाधानी जीवनाची पुनःप्राप्ती

समाधानी जीवनाची पुनःप्राप्ती

 देवाच्या शासनाविरुद्ध विद्रोह केल्यामुळे मानवजातीच्या जीवनात व्यर्थता आली तरीसुद्धा, देवाने मनुष्यांना कोणत्याही आशेविना ठेवले नाही. बायबल याविषयी खुलासा करते: “सृष्टि व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली ती आपखुशीने नव्हे, तर ती स्वाधीन करणाऱ्‍यामुळे. सृष्टीहि स्वतः नश्‍वरतेच्या दास्यातून मुक्‍त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता मिळावी ह्‍या आशेने वाट पाहते.” (रोमकर ८:२०, २१) होय देवाने पहिल्या मानवी जोडप्याच्या संततीला एक आशा देऊ केली. मानवजात वारशाने मिळालेल्या पाप व मृत्यूच्या दास्यातून मुक्‍त केली जाईल याविषयी ही खात्रीलायक आशा होती. मानवांना पुन्हा एकदा यहोवा देवासोबत एक घनिष्ट नातेसंबंध जोडणे शक्य होणार होते. ते कसे?

मानवजातीला पाप व मृत्यूच्या दास्यातून सोडवण्याकरता देवाने त्यांना एक आशा देऊ केली

आदाम व हव्वेने पाप केले तेव्हा त्यांनी आपल्या वंशजांकडून या पृथ्वीवर सार्वकालिक समाधानी जीवन उपभोगण्याची आशा हिरावून घेतली. बरे काय व वाईट काय हे ठरवण्याच्या स्वातंत्र्याच्या मोबदल्यात त्यांनी आपल्या भावी कुटुंबाला पाप व मृत्यूच्या दास्यात विकले. त्या कुटुंबात जन्मलेल्या त्यांच्या वंशजांची तुलना एखाद्या एकाकी बेटावर, क्रूर राजांच्या अधिपत्याखाली कैद करून ठेवलेल्या गुलामांशी करता येते. आधीच पापाच्या गुलामीत असणाऱ्‍या मानवजातीवर, खरोखर मृत्यूने देखील एखाद्या राजाप्रमाणे आजवर राज्य केले आहे. (रोमकर ५:१४, २१) त्यांना सोडवणारा कोणीही नाही असे भासते. शेवटी, त्यांच्या स्वतःच्या पूर्वजानेच त्यांना गुलामीत विकले होते! पण एक उदार मनाचा मनुष्य आपल्या पुत्राला पाठवतो व हा पुत्र सर्व गुलामांची सुटका करण्याकरता आवश्‍यक असलेली पूर्ण किंमत देतो.—स्तोत्र ५१:५; १४६:४; रोमकर ८:२.

या दृष्टान्तात गुलामांना सोडवणारा माणूस यहोवा देवाला सूचित करतो. गुलामांची सुटका करण्याकरता मोबदला देणारा त्याचा पुत्र म्हणजे येशू ख्रिस्त. पृथ्वीवर येण्याआधी तो देवाचा एकुलता एक पुत्र म्हणून अस्तित्वात होता. (योहान ३:१६) तो यहोवाची अगदी पहिली सृष्टी होता आणि विश्‍वातील इतर सर्व प्राणी त्याच्याद्वारे अस्तित्वात आले. (कलस्सैकर १:१५, १६) यहोवाने आपल्या या आत्मिक पुत्राचे जीवन चमत्कारिकरित्या एका कुमीरिकेच्या उदरात स्थलांतरित केले आणि त्याचे एक परिपूर्ण मानव म्हणून जन्मास येणे शक्य केले; यामुळे दैवी न्यायाची मागणी पूर्ण करण्याकरता आवश्‍यक असणारी किंमत अर्थात एक परिपूर्ण जीवनाची किंमत प्राप्त होऊ शकली.—लूक १:२६-३१, ३४, ३५.

येशू जवळजवळ ३० वर्षांचा असताना त्याचा यार्देन नदीत बाप्तिस्मा झाला. त्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळी त्याला पवित्र आत्म्याने म्हणजेच देवाच्या कार्यकारी शक्‍तीने अभिषिक्‍त करण्यात आले. अशारितीने तो ख्रिस्त म्हणजेच “अभिषिक्‍त” बनला. (लूक ३:२१, २२) येशूचे या पृथ्वीवरील सेवाकार्य साडेतीन वर्षे चालले. या काळात त्याने आपल्या अनुयायांना ‘देवाच्या राज्याविषयी’ अर्थात ज्याच्या शासनाधीन मानवजात यहोवा देवासोबत पुन्हा एकदा शांतीपूर्ण संबंध जोडू शकेल अशा स्वर्गीय सरकारविषयी शिकवले. (लूक ४:४३; मत्तय ४:१७) मानवांनी जीवनात आनंद मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता हे येशूला माहीत होते आणि त्याने आपल्या अनुयायांना आनंदी होण्याच्या संदर्भात खास मार्गदर्शन देखील केले. मत्तय ५-७ अध्याय उघडून, डोंगरावरील प्रवचनात येशूने शिकवलेल्या काही गोष्टी वाचण्यास तुम्हाला आवडेल का?

गुलामीतून मुक्‍त करणाऱ्‍याबद्दल तुम्हाला मनापासून कृतज्ञता वाटणार नाही का?

आदामासारखे न करता येशू आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीत देवाला आज्ञाधारक राहिला. “त्याने पाप केले नाही.” (१ पेत्र २:२२; इब्री लोकांस ७:२६) उलट, पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याचा हक्क असूनही आदामाने जे गमवले होते, त्याची किंमत देवाला सादर करण्याकरता त्याने आपला ‘प्राण दिला.’ वधस्तंभावर त्याने आपले परिपूर्ण मानवी जीवन अर्पण केले. (योहान १०:१७; १९:१७, १८, २८-३०; रोमकर ५:१९, २१; फिलिप्पैकर २:८) असे करण्याद्वारे येशूने खंडणी दिली; म्हणजेच मनुष्याला पाप व मृत्यूच्या गुलामीतून परत विकत घेण्यासाठी आवश्‍यक असलेली किंमत पुरवली. (मत्तय २०:२८) तुम्ही एखाद्या कारखान्यात ढोर मेहनत करत आहात, अक्षरशः गुलामाचे जीवन जगत आहात अशी कल्पना करा. अशा गुलामीतून तुम्हाला मुक्‍त करण्याची जो व्यवस्था करेल किंवा तुमच्याऐवजी स्वतःचे जीवन अर्पण करण्यास जो पुढे येईल त्याच्याप्रती तुम्हाला मनापासून कृतज्ञता वाटणार नाही का? खंडणीच्या तरतुदीद्वारे तुम्हाला देवाच्या विश्‍वव्यापी कुटुंबात परत येण्याचा आणि पाप व मृत्यूच्या गुलामीतून मुक्‍त असे एक खरोखर समाधानी जीवन जगण्याचा मार्ग मोकळा झाला.—२ करिंथकर ५:१४, १५.

यहोवाने आपल्याला दाखवलेल्या या अपात्री कृपेविषयी जाणून घेऊन तिच्याविषयी कदर बाळगल्यास, बायबलमध्ये सापडणाऱ्‍या सुज्ञानाच्या वचनांचे जीवनात पालन करण्याची तुम्हाला अधिकच प्रेरणा मिळेल. उदाहरणार्थ, पालन करण्यास सर्वात कठीण असणाऱ्‍या एका तत्त्वाचे उदाहरण घ्या—कोणी आपल्या भावना दुखवल्यास त्यांना क्षमा करणे. दुसऱ्‍या अध्यायात आपण विचारात घेतलेले कलस्सैकरांच्या ३ ऱ्‍या अध्यायांतील १२-१४ या वचनांतील शब्द तुम्हाला आठवतात का? तुम्हाला कोणाविरुद्ध काही गाऱ्‍हाणे असले तरीही त्यांना क्षमा करा असे प्रोत्साहन या वचनांत दिले होते. याच वचनांत याचे कारणही देण्यात आले होते: “प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीहि करा.” यहोवा व येशू ख्रिस्ताने मानवजातीकरता काय केले आहे याची तुम्हाला मनापासून जाणीव झाल्यास, इतरजण जेव्हा तुमच्याविरुद्ध कोणत्याही चुका करतात आणि खासकरून जेव्हा ते पश्‍चात्ताप करून क्षमा मागतात तेव्हा त्यांना क्षमा करणे तुम्हाला जड जाणार नाही.