व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग ७

समाधानी जीवन मिळणे इतके कठीण का?

समाधानी जीवन मिळणे इतके कठीण का?

 बहुतेक लोकांना खूप प्रयत्न करूनही जीवनात खरा उद्देश का सापडत नाही? “स्त्रीपासून जन्मलेला मानवप्राणी अल्पायु व क्लेशभरित असतो. तो फुलासारखा फुलतो व खुडला जातो; तो छायेप्रमाणे सत्वर निघून जातो, राहत नाही.” (ईयोब १४:१, २) परादीसात पहिल्या मानवी जोडप्याच्या जीवनात घडलेल्या एका घटनेमुळे त्यांच्यासमोर ठेवलेली अद्‌भुत आशा नाहीशी झाली.

मानवी कुटुंबाने खरोखर आनंदी होण्याकरता त्यांचा देवासोबत एक चांगला संबंध असणे आवश्‍यक होते—आणि हा संबंध त्यांनी जबरदस्तीने नव्हे तर स्वेच्छेने जोडायचा होता. (अनुवाद ३०:१५-२०; यहोशवा २४:१५) यहोवाला मनापासून, प्रेमाने स्फुरणारी उपासना आवडते. (अनुवाद ६:५) म्हणूनच यहोवाने एदेन बागेत अशी एक आज्ञा दिली जिचे पालन करण्याद्वारे पहिला मनुष्य आपली मनःपूर्वक निष्ठा शाबीत करू शकत होता. देवाने आदामाला सांगितले: “बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा; पण बऱ्‍यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्‍या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.” (उत्पत्ति २:१६, १७) ही एक साधी परीक्षा होती. यहोवाने बागेतील सर्व झाडांपैकी केवळ एका झाडाचे फळ खाण्यास आदामाला मनाई केली होती. बरे काय व वाईट काय हे ठरवण्याचा आपल्या बुद्धिमान निर्माणकर्त्याला अधिकार आहे याचे हे झाड एक प्रतीक होते. पहिल्या मनुष्याने या आज्ञेविषयी, देवाने “अनुरूप साहाय्यक” म्हणून दिलेल्या आपल्या पत्नीला सांगितले. (उत्पत्ति २:१८) त्या दोघांनाही देवाच्या शासनाच्या अधीन राहण्याची आणि त्याच्याप्रती, म्हणजे आपल्या निर्माणकर्त्या व जीवनदात्याप्रती कृतज्ञता आणि प्रीती व्यक्‍त करण्यासाठी त्याच्या इच्छेनुसार वागण्याची ही व्यवस्था मान्य होती.

मग एक दिवशी एक सर्प हव्वेशी बोलला आणि त्याने तिला विचारले: “तुम्ही बागेतल्या कोणत्याहि झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हास सांगितले हे खरे काय?” हव्वेने उत्तर दिले की त्यांना केवळ ‘बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाचे’ अर्थात बऱ्‍यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्‍या झाडाचे फळ खाण्यास मनाई होती; व ते खालल्यास तुम्ही “मराल” असे देवाने सांगितले होते.—उत्पत्ति ३:१-३.

हा सर्प कोण होता? बायबलमधील प्रकटीकरण हे पुस्तक त्याची ओळख “जुनाट साप” व “सर्व जगाला ठकविणारा जो दियाबल व सैतान म्हटलेला” या शब्दांत करून देते. (प्रकटीकरण १२:९) दियाबल सैतानाला देवाने निर्माण केले होते का? नाही. यहोवाची सर्व कार्ये परिपूर्ण व चांगली आहेत. (अनुवाद ३२:४) या आत्मिक प्राण्याने आपण होऊन स्वतःला दियाबल म्हणजे “निंदक” आणि सैतान म्हणजे “विरोधक” बनवले. तो ‘आपल्या वासनेने ओढला गेला तेव्हा मोहात पडला;’ त्याला देवाची जागा घेण्याचा मोह झाला आणि त्यामुळे त्याने निर्माणकर्त्याच्या विरोधात विद्रोह करण्याचे ठरवले.—याकोब १:१४.

दियाबल सैतानाने हव्वेला म्हटले: “तुम्ही खरोखर मरणार नाही. कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील, आणि तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल.” (उत्पत्ति ३:४, ५) सैतानाने बऱ्‍यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्‍या झाडाचे फळ अतिशय आकर्षक असल्याचे भासवले. एका अर्थाने तो असा तर्कवाद करत होता की: ‘देव तुम्हाला एका चांगल्या गोष्टीपासून वंचित करत आहे. म्हणून तुम्ही काही विचार न करता त्या झाडाचे फळ खा कारण खाल्ल्यावर तुम्ही देवासारखे व्हाल आणि बरे काय व वाईट काय हे स्वतः ठरवू शकाल.’ आजही सैतान बऱ्‍याच लोकांना देवाच्या सेवेपासून परावृत्त करण्यासाठी हाच तर्कवाद वापरतो. तो म्हणतो, ‘आपल्या मनाप्रमाणे वागा. ज्याने तुम्हाला जीवन दिले त्याच्याप्रती तुमच्या कर्तव्याचा विचार करू नका.’—प्रकटीकरण ४:११.

सैतानाशी बोलल्यानंतर हव्वेला त्या झाडाचे फळ पूर्वीपेक्षा अधिकच आकर्षक वाटू लागले; तिला त्याची ओढ लागली व ते खाल्ल्याशिवाय तिला राहावेना! तिने ते घेतले व खाल्ले आणि मग आपल्या पतीलाही ते देऊ केले. ते फळ खाण्याचे काय परिणाम होतील हे पूर्णपणे माहीत असताना देखील आदामाने आपल्या पत्नीचे ऐकले व ते खाल्ले. परिणाम काय झाला? स्त्रीला परमेश्‍वराने हा दंड दिला: “मी तुझे दुःख व तुझे गर्भधारण बहुगुणित करीन; तू क्लेशाने लेकरे प्रसवशील; तरी तुझा ओढा नवऱ्‍याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालविल.” आणि पुरुषाला त्याने कोणता दंड दिला? “तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे; तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील. ती तुला काटे व कुसळे देईल; तू शेतातले पीक खाशील; तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुनः मातीला जाऊन मिळशील; कारण तिच्यातून तुझी उत्पत्ति आहे; तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.” आता आदाम व हव्वेला स्वतःच्या मनाप्रमाणे आनंद व समाधान शोधावे लागणार होते. देवाच्या उद्देशांच्या चौकटीबाहेर राहून समाधानी जीवन जगण्याचे मानवांचे प्रयत्न यशस्वी होणार होते का? रम्य परादीसाची देखरेख करण्याच्या व त्याच्या सीमा पृथ्वीच्या दिगंतापर्यंत वाढवण्याच्या आनंददायक कामाऐवजी आता त्यांना देवाच्या गौरवाकरता काही न करता, केवळ जिवंत राहण्यासाठी धडपड करावी लागणार होती.—उत्पत्ति ३:६-१९.

बऱ्‍यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्‍या झाडाचे फळ खाल्ले त्या दिवशीच पहिले मानवी जोडपे देवाच्या दृष्टीने मेले आणि शारीरिक मरणाकडे त्यांचा प्रवास सुरू झाला. कालांतराने त्यांचा मृत्यू झाला तेव्हा काय झाले? बायबल आपल्याला मृत लोकांच्या स्थितीविषयी माहिती देते. “आपणास मरावयाचे आहे हे जिवंताला निदान कळत असते; पण मृतांस तर काहीच कळत नाही; त्यांस आणखी काही फलप्राप्ति व्हावयाची नसते; त्यांचे स्मरण कोणास राहत नाही.” (उपदेशक ९:५; स्तोत्र १४६:४) मृत्यूनंतरही अस्तित्वात राहणारा “आत्मा” वगैरे काही नसतो. पापाचा दंड मृत्यू आहे, नरकाच्या अग्नीत सार्वकालिक यातना नव्हेत! शिवाय मृत्यूनंतर मनुष्य स्वर्गात सर्वकाळ परमसुखात राहतो, हे देखील खरे नाही. *

एखाद्या केकचे पात्र विशिष्ट ठिकाणी दबलेले असेल, तर केकवरही तो ठसा उमटेल; त्याचप्रमाणे अपरिपूर्ण झालेला पुरुष व स्त्री केवळ अपरिपूर्ण संततीलाच जन्म देऊ शकत होते. बायबल या प्रक्रियेचे अशाप्रकारे वर्णन करते: “एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशाप्रकारे मरण पसरले.” (रोमकर ५:१२) म्हणूनच, आपण सर्वजण जन्मतःच पापी आहोत व व्यर्थतेच्या स्वाधीन आहोत. आदामाच्या वंशजांकरता जीवन निराशादायक व क्लेशदायक बनले. पण यातून सुटका आहे का?

^ वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित, आपण मरतो तेव्हा आपले काय होते? (इंग्रजी) या माहितीपत्रकात तुम्हाला मृतांच्या स्थितीविषयी सविस्तर माहिती सापडेल.