भाग ५
देवाची ओळख करून घेणे
तुम्हाला मार्गदर्शन हवे असल्यास तुम्ही कोणा भरवशालायक व्यक्तीजवळच जाणार नाही का? सल्ला देणाऱ्यावर तुमचा भरवसा असल्यास त्या सल्ल्याचे पालन करणे तुम्हाला जास्त सोपे जाईल, मग त्या सल्ल्याचा फायदा लगेच दिसून येवो अथवा न येवो. बायबलमधील व्यवहारोपयोगी मार्गदर्शनाचा खरोखर फायदा करून घ्यायचा असेल तर तुम्ही त्याच्या लेखकाला जाणून घेतले पाहिजे. किंबहुना तुम्ही त्याचे “मित्र” देखील होऊ शकता!—यशया ४१:८.
२ तुम्हाला कोणाशी मैत्री करायची असल्यास, साहजिकच तुम्हाला त्याचे नाव जाणून घ्यावेसे वाटेल. बायबलमधील देवाला नाव आहे का? त्याने असे घोषित केले: “मी यहोवा आहे; हे माझे नाव आहे; आणि दुसऱ्याला मी आपले गौरव देणार नाही, व कोरीव मूर्तीला आपली प्रशंसा देणार नाही.” (यशया ४२:८, पं.र.भा.) “यहोवा” त्याचे नाव आहे; इब्री भाषेत ते (उजवीकडून डावीकडे वाचले जाते) יהוה याप्रकारे लिहिले जाते. हे नाव बायबलच्या इब्री शास्त्रवचनांत जवळजवळ ७,००० वेळा आढळते. देवाच्या नावाचा अर्थ “तो बनण्यास लावतो” असा असल्याचे समजले जाते. आणि यातून असे सूचित होते की आपल्या उद्देशांच्या पूर्तीकरता त्याला जे काही बनण्याची गरज पडेल ते तो स्वतःला बनण्यास लावतो. शिवाय, इब्री भाषेच्या व्याकरणानुसार त्याचे नाव अशा रूपात आहे, जे विशिष्ट क्रिया पूर्णतेकडे वाटचाल करत असल्याचे सूचित करते. याचा काय अर्थ होतो? यातून आपल्याला असे कळून येते की यहोवाने आपल्या उद्देशांच्या पूर्तीकरता जे काही बनावे लागेल ते स्वतःला बनण्यास लावले आहे आणि अजूनही लावत आहे. तो एक जिवंत परमेश्वर आहे, केवळ एक निर्गुण निराकार शक्ती नव्हे!
३ यहोवा निर्माणकर्ता बनला. (उत्पत्ति १:१) तो ‘आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील अवघे निर्माण करणारा जिवंत देव’ आहे. (प्रेषितांची कृत्ये १४:१५) यहोवाने सर्वकाही निर्माण केले, यात पहिले मानवी जोडपे आदाम व हव्वा यांचाही समावेश होतो. म्हणूनच देवाला “जीवनाचा झरा” म्हटले आहे. (स्तोत्र ३६:९) तसेच तो जीवित सृष्टीचा पालनपोषण करणाराही बनला. त्यामुळे “त्याने स्वतःस साक्षीविरहित राहू दिले नाही, म्हणजे त्याने उपकार केले, आकाशापासून पर्जन्य व फलदायक ऋतु तुम्हाला दिले, आणि अन्नाने व हर्षाने तुम्हाला मन भरून तृप्त केले.” (प्रेषितांची कृत्ये १४:१७) आफ्रिकेत व आशियात बरेच लोक आपल्या पूर्वजांकडून जीवन मिळाले असल्यामुळे त्यांची पूजा करतात. मग ज्याने पहिल्या जोडप्याला निर्माण करून त्यांना प्रजननाची शक्ती दिली त्या जीवनाच्या निर्माणकर्त्याचे व पालनकर्त्याचे त्यांनी अधिकच ऋणी असू नये का? या गोष्टीवर मनन केल्यामुळे तुम्ही देखील कदाचित असे म्हणण्यास प्रेरित व्हाल की “हे प्रभो आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस; कारण तू सर्व काही निर्माण केले; तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.”—प्रकटीकरण ४:११.
४ बायबलमधून तुम्ही तुमच्या निर्माणकर्त्या यहोवाचा परिचय करून घेऊ शकता आणि तो कशाप्रकारचा देव आहे हे शिकू शकता. बायबलमधून आपल्याला हे कळून येते की “देव प्रीति आहे.” (१ योहान ४:१६; निर्गम ३४:६, ७) उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत तुम्ही जसजसे बायबलचे वाचन कराल तसतसे तुम्हाला अनेक अहवाल वाचायला मिळतील जे दाखवून देतात की तो खरोखरच एक प्रेमळ देव आहे. मग आपल्या निर्माणकर्त्याला जाणून घेण्याकरता देवाचे वचन दररोज वाचण्याची सवय तुम्ही का लावून घेत नाही? ज्यांना बायबलविषयी माहिती आहे त्यांच्या मदतीने त्याचा लक्षपूर्वक अभ्यास करा. (प्रेषितांची कृत्ये ८:२६-३५) असे केल्यामुळे तुम्हाला दिसून येईल की तो न्यायी परमेश्वर देखील आहे आणि त्याअर्थी तो दुष्टता सर्वकाळ चालू देणार नाही. (अनुवाद ३२:४) प्रीती आणि न्याय यांत संतुलन साधणे मानवाकरता सोपे नाही, पण आपल्या अद्भुत बुद्धीमुळे यहोवा या दोन गुणांत नेहमी अचूक संतुलन ठेवतो. (रोमकर ११:३३; १६:२७) सर्वसमर्थ असल्यामुळे त्याच्या उद्देशांच्या पूर्तीकरता त्याला जे वाटेल ते करण्याचे सामर्थ्य त्याच्याकडे आहे. (उत्पत्ति १७:१) बायबलमध्ये सापडणाऱ्या सुज्ञ सल्ल्याचे पालन करून पाहा; मग तुम्हाला तुमच्या निर्माणकर्त्याची अधिकच चांगली ओळख होईल आणि तुम्हाला जाणीव होईल की त्याच्या मार्गदर्शनामुळे नेहमी आपल्याला फायदाच होतो.
५ देवाजवळ येण्याचा आणखी एक मार्ग आहे. तो म्हणजे प्रार्थना. यहोवा ‘प्रार्थना ऐकणारा’ आहे. (स्तोत्र ६५:२) तो ‘आपल्या मागण्या किंवा कल्पना ह्यांपलीकडे . . . अधिक्याने कार्य करावयास समर्थ आहे.’ (इफिसकर ३:२०) केवळ काही काम साधून घेण्यासाठीच तुमच्याकडे येणाऱ्या एखाद्या ‘मित्राविषयी’ तुम्ही काय विचार कराल? तुम्हाला कदाचित त्याच्याविषयी चांगले मत राहणार नाही. त्याप्रकारे, प्रार्थनेच्या विशेषाधिकाराचा उपयोग आपण केवळ देवाकडून आपल्या गरजा पूर्ण करण्याची विनंती करण्याकरता नव्हे तर त्याची उपकारस्तुती करण्यासाठी देखील केला पाहिजे.—फिलिप्पैकर ४:६, ७; १ थेस्सलनीकाकर ५:१७, १८.